अंतराळ माझ्या कवेत गं...

अंतराळ माझ्या कवेत गं...

- प्रा.विजया पंडित

अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बाइडेन यांनी आणखी एका भारतीय वंशाच्या महिलेला एक महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. भव्या लाल यांना त्यांनी अमेरिकी अंतरिक्ष संशोधन संस्थेच्या म्हणजे नासाच्या मूल्यमापन समितीचे सदस्यपद दिले आहे.

भव्या यांना इंजिनिअरिंग आणि अंतरिक्ष तंत्रज्ञान या विषयांमधील मोठा अनुभव आहे. भारताच्या अंतरिक्ष कार्यक्रमामध्येही महिलांनी विशेष योगदान दिले आहे. यानिमित्ताने अंतराळ संशोधनाच्या क्षेत्रात महिलांनी गाजविलेल्या कर्तृत्वावर एक नजर टाकणे औचित्याचे ठरेल.

अमेरिकेच्या अध्यक्षपदी जो बाइडेन यांचा शपथविधी झाला आणि त्यांच्याबरोबर मूळ भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांनी उपाध्यक्षपदाची शपथ घेतली हे भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरले. आता बाइडेन यांनी आणखी एका भारतीय वंशाच्या महिलेला एक महत्त्वाची जबाबदारी सोपविली आहे. भव्या लाल यांना त्यांनी अमेरिकी अंतरिक्ष संशोधन संस्थेच्या म्हणजे नासाच्या मूल्यमापन समितीचे सदस्यपद दिले आहे. नासाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, भव्या लाल यांना इंजिनिअरिंग आणि अंतरिक्ष तंत्रज्ञान (स्पेस टेक्नॉलॉजी) या विषयांमधील मोठा अनुभव आहे. बाइडेन अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यापासून भारतीय वंशाच्या लोकांकडे अमेरिकेत अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या सोपविण्यात येत आहेत.

कमला हॅरिस यांच्याबरोबर भारतीय वंशाच्या तब्बल 20 तज्ज्ञांना बाइडेन यांच्या टीममध्ये जागा मिळाली आहे. त्यानंतर नासामधून ही बातमी आली. प्राप्त माहितीनुसार, भव्या लाल यांना देण्यात आलेले पद कार्यकारी प्रमुख असे आहे. बदलांविषयीच्या मूल्यमापन समितीत त्या काम करतील. ही बातमी आल्यानंतर भव्या लाल नेमक्या कोण आहेत, हे जाणून घेण्याची लोकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. भव्या लाल यांनी जो बाइडेन यांच्या प्रेसिडेन्शियल ट्रान्जिशन एजन्सीच्या रिव्ह्यू टीमच्या सदस्या म्हणून काम पाहिले होते. नासाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, भव्या लाल या नासाच्या बजेट आणि फायनान्स विभागात ज्येष्ठ सल्लागार (सीनिअर अ‍ॅडव्हाइजर) म्हणून भूमिका सांभाळतील.

भव्या लाल यांनी मॅसाचुसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून (एमआयटी) न्यूक्लिअर इंजिनिअरिंग विषयामध्ये पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. मॅसाचुसेट इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमध्ये त्यांनी टेक्नॉलॉजी अँड पॉलिसी विषयातही पदव्युत्तर पदवी संपादन केली आहे. जॉर्ज वॉशिंग्टन विद्यापीठातून त्यांनी पब्लिक पॉलिसी अँड पब्लिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन विषयात डॉक्टरेट संपादन केली आहे. न्यूक्लिअर अँड इमर्जिंग टेक्नॉलॉजीज् इन स्पेस (एनईटीएस) या विषयावरील अमेरिकी न्यूक्लिअर सोसायटीच्या वार्षिक संमेलनात त्या पॉलिसी ट्रॅकच्या सहअध्यक्ष होत्या. त्यांनी स्मिथसोनियन नॅशनल एअर अँड स्पेस म्यूझियमच्या सहकार्याने स्पेस हिस्ट्री आणि पॉलिसी या विषयांवर अनेकदा सेमिनारचे आयोजन केले आहे. अंतरिक्ष तंत्रज्ञान आणि धोरण समुदायाच्या त्या सक्रिय सदस्या आहेत. विज्ञानविषयक पाच राष्ट्रीय अकादमींच्या अध्यक्षा म्हणून भव्या लाल यांनी काम पाहिले आहे.

नॅशनल ओशनिक अँड अ‍ॅटमॉस्फेरिक अ‍ॅडमिनिस्ट्रेशन फेडरल अ‍ॅडव्हायजरी कमिटी ऑन कमर्शियल रिमोट सेन्सिंग या समितीवर त्या दोनदा कार्यरत राहिल्या आहेत. याखेरीज त्यांनी नासाच्या इनोव्हेटिव्ह अँडव्हान्स्ड कॉन्सेप्ट प्रोग्राम आणि नासा अ‍ॅडव्हायजरी काउन्सिल ऑफ टेक्नॉलॉजी, इनोव्हेटिव्ह अँड इंजिनिअरिंग अ‍ॅडव्हाइजरी कमिटीच्या काउन्सिल मेंबर म्हणूनही काम पाहिले आहे.

भव्या लाल यांच्या अभिनंदनीय निवडीनंतर आता पुन्हा एकदा भारतीय महिला आणि अंतरिक्षातील त्यांची कामगिरी हा विषय चर्चेत आला आहे. यापूर्वी रितू करिधाल या लखनौमध्ये जन्माला आलेल्या भारतीय युवतीने ‘रॉकेट वूमन’ ही उपाधी प्राप्त केली आहे. लखनौ विद्यापीठात बीएससी केल्यानंतर त्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाल्या आणि एअरोस्पेस इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले. 1997 मध्ये त्यांनी इस्रोमध्ये प्रवेश केला. मंगलयान मोहिमेत त्या डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर होत्या. नंतर त्यांनी चांद्रयान-2 मोहिमेचेही नेतृत्व केले.

रॉकेट सायन्टिस्ट नंदिनी हरिनाथ यांनी मिशन मंगलयान या प्रकल्पात मॅनेजर, मिशन डिझाइनर आणि डेप्युटी ऑपरेशन डायरेक्टर म्हणून काम केले. 20 वर्षांपासून इस्रोत कार्यरत असलेल्या नंदिनी यांनी आतापर्यंत इस्रोच्या 14 मोहिमांमध्ये काम केले आहे. चंद्रावर पहिले पाऊल ठेवणार्‍या नील आर्मस्ट्राँग यांचा आदर्श घेऊन अनुराधा टिके यांनी अंतरिक्ष विज्ञानाचे शिक्षण घेतले आणि इस्रोमध्ये प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम पाहिले. 1982 मध्ये इस्रोमध्ये प्रवेश करणार्‍या अनुराधा या पहिल्या महिला प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून नावारूपाला आल्या. कोलकता येथे जन्मलेल्या मौमिता दत्ता यांनी शिक्षण घेत असतानाच चांद्रयान मोहिमेबद्दल वाचले आणि इस्रोमध्ये जाण्याचे स्वप्न पाहू लागल्या.

फिजिक्स विषयात एमटेक केल्यानंतर अहमदाबाद येथे स्पेस अ‍ॅप्लिकेशन सेंटरमध्ये शिक्षण घेतले. मंगलयान मोहिमेच्या त्या प्रोजेक्ट मॅनेजर होत्या. गुजरातच्या राजकोटमध्ये जन्माला आलेल्या मीनल रोहित यांनी निरमा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन या विषयात अभियांत्रिकीची पदवी घेतली. इस्रोमध्ये सॅटेलाइट अँड कम्युनिकेशन इंजिनिअर म्हणून त्यांनी काम पाहिले. मंगलयान प्रकल्पात प्रोजेक्ट मॅनेजर आणि सिस्टिम इंजिनिअर म्हणून त्यांनी भूमिका बजावली. एका मुलाखतीत त्यांनी असे सांगितले होते की, दोन वर्षे त्या स्वतःला दररोज 18-18 तास बंद खोलीत कोंडून घेत असत. या काळात त्यांनी एकदाही सुटी घेतली नाही. सध्या त्या इस्रोमध्ये शास्त्रज्ञ आणि सिस्टिम इंजिनिअर म्हणून काम करतात.

भारताच्या मंगलयान मोहिमेत अनेक महत्त्वाच्या जबाबदार्‍या महिला शास्त्रज्ञांनी सांभाळल्या होत्या, हे वरील विवेचनावरून दिसून येते. मंगळयान मोहीम भारतासाठी महत्त्वाची आहे, कारण पहिल्याच प्रयत्नात मंगळावर पोहोचण्याचा विक्रम भारताने नोंदविला. अन्य कोणत्याही देशाला पहिल्या प्रयत्नात मंगळाच्या कक्षेत यान पोहोचविता आले नव्हते. अशा या विक्रमी यशाच्या मोहिमेची महत्त्वाची जबाबदारी महिलांनी पार पाडली होती. चांद्रयान-1 मोहीम इस्रोने 2008 मध्ये पूर्ण केली आणि जेव्हा चांद्रयान-2 या दुसर्‍या मोहिमेद्वारे रोव्हर, लँडर आणि ऑर्बिटर चंद्रावर पाठविण्यात आले होते. या मोहिमेतील लँडर अपघातग्रस्त झाले होते; मात्र ऑर्बिटर अजूनही काम करीत आहे. या मोहिमेची महत्त्वाची जबाबदारी दोन महिलांवर होती.

पहिल्या म्हणजे रितू करिधाल आणि दुसर्‍या मुथैया वनिता. रितू यांनी मिशन डायरेक्टर म्हणून तर वनिता यांनी प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून काम पाहिले. मुथैया वनिता यांना ङ्गडेटा क्विनफ म्हणून ओळखले जाते. चेन्नईमध्ये जन्मलेल्या वनिता यांनी स्थानिक इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिक्षण घेतले. 2006 मध्ये त्यांना अ‍ॅस्ट्रॉनॉमिकाल सोसायटी ऑफ इंडियाच्या वतीने ‘बेस्ट वूमन सायन्टिस्ट’ पुरस्कार देण्यात आला

. मंगळयान मोहिमेत एकूण 500 पेक्षा अधिक शास्त्रज्ञांचा समावेश होता आणि त्यात 25 टक्के महिला होत्या. चांद्रयान-2 मोहिमेतही मिशन डायरेक्टर आणि प्रोजेक्ट डायरेक्टर महिलाच होत्या. असे असले तरी गेल्या काही वर्षांत इस्रोमधील महिलांची संख्या घटली आहे. अगदी अमेरिकेच्या नासामध्येही महिला शास्त्रज्ञ आणि अन्य महिला अधिकार्‍यांची संख्या घटली आहे. या पार्श्वभूमीवर, नासाने भारतीय वंशाच्या महिलेची निवड महत्त्वाच्या पदासाठी केली असून, भारतीयांना त्याचा अभिमान आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com