विघ्नहर्ता गणरायास साकडे घालूया

विघ्नहर्ता गणरायास साकडे घालूया
बंधू भगिनी अन् बाल गोपलांनो आपणा सर्वांना गणेश चतुर्थी निमित्त हार्दिक शुभेच्छा! गणरायांच्या आगमनाला मुंबई,कोकणासह सारं राज्य सज्ज झालाय. या मंगलमय प्रसंगी भक्तजनांच्या आनंदाला जणू उधाणच येत असल्याचे दृष्टोत्पत्तीस येते. हिंदू संस्कृतीचं आराध्य दैवत म्हणजे गुणांचे संवर्धन करून बुद्धीला प्रकाशमान करणारे गुणपती अशी महिमा सांगितली जाते.

रणवीर राजपूत

गणेशोत्सव शहरात असो वा गावात त्या त्या ठिकाणच्या नागरिकांनी गणेशोत्सवाची सजावट पर्यावरणपूरकच करावी, ज्यातून पर्यावरण रक्षण व संवर्धनाचा संदेश मिळेल.त्याप्रमाणेच कोरोना प्रतिबंधक उपायांवर संदेशवजा माहिती प्रसारित करावी. त्यातून सदर उत्सवा द्वारे लोकांना कुठली बचावात्मक पावलं उचलावीत, याची उपयुक्त माहिती मिळू शकेल.असं केल्याने लोकसहभागातून कोरोनाशी लढा देणे शासकीय यंत्रणेला सुकर जाईल.

गणपती हे अनेक गुणांचे अधिपती असून त्यांना गुणांचे संवर्धन करणारे गुणपती असेही म्हटले जाते. चौदा विद्या आणि चौसष्ट कलांची पुंजी ज्यांच्याकडे आहे ,ते श्री गणराया. या पार्श्वभूमीवर त्यांची भक्तिभावे आराधना करून त्या विद्या अन् त्या कला आम्हा भक्तांना अवगत होऊ दे,अशी प्रार्थना आपण करायला हवी.गणपतीची भक्ती ही केवळ नवसापुरती वा धन लाभासाठी नसावी,तर ती सद्गुणांचे संवर्धन करण्यासाठी असावी.

पारतंत्र्याच्या काळात सामाजिक एकीकरण करण्याच्या उद्देशाने लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सव अन् शिवजयंती हे दोन उत्सव सार्वजनिकरित्या साजरे करण्याची मुहूर्तमेढ केली. त्यातून स्वातंत्र्य चळवळीस चालना मिळण्यास देखील मदत झाली अन् ती त्या काळाची गरजही होती.आता स्वातंत्र्याच्या कालखंडात तर गणेशोत्सव हा राज्यासह देशाच्या सांस्कृतिक चळवळीचा एक अविभाज्य भाग बनला आहे.

श्री गणेशाची पूजाअर्चा व भक्ती एवढं करून भक्तजनांनी थांबायचं नाही, तर त्याबरोबरच दैनंदिन व्यवहारात, वागण्यात, बोलण्यात अन् आचरणात सात्विकता असणं तितकंच अगत्याचं आहे.त्यामुळे आपआपसात मनभेद होणार नाहीत. आपण भक्तीभावाने आपल्या कुटुंबियांसाठी, आप्तमित्रांच्यासुख-समृद्धीसाठी श्री गणरायाची पूजाअर्चा, उपासना केली, म्हणजे सकलजन समाधानाने व सदभावाने जीवन जगून समाजात धार्मिक सहिष्णुता प्रस्थापित होण्यास हातभार लागेल, हे निश्चित. असं केल्याने समाजाचं देणंही फिटेल अन् आत्मिक समाधानही मिळेल.

या पार्श्वभूमीवरच गणेशोत्सवाला अध्यात्मिक आणि राष्ट्रीयत्वाच्या दृष्टीने अनन्यसाधारण महत्व आहे.राज्याचे माजी गृहमंत्री दिवंगत आर आर पाटील यांच्या संकल्पनेतून ग्रामीण क्षेत्रात एक गाव एक गणपती हा स्तुत्य उपक्रम राबविला गेला होता. त्यातून गटा-गटातले वाद संपुष्टात येऊन, गाव एकसंघ राहते. कुठलाही सण असो वा उत्सव..तो साजरा करत असताना कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, याची पुरेपूर दक्षता बाळगावी.

मित्रहो,आपण दरवर्षी मोठ्या हर्षोल्हासात गणेशोत्सव साजरा करत असतो. परंतु सध्याचा काळ हा कोरोना महामारीचा असल्याने आपल्या प्रिय उत्सवावर काही प्रमाणात मर्यादा आल्या आहेत. महत्वाचे म्हणजे कोरोना महामारीला नियंत्रित करण्यासाठी गर्दी करण्यावर केंद्र व राज्य सरकारने काही निर्बंध घातले आहेत.कारण आपण जर उत्सवानिमित्त गर्दी करून सोशल डिसटंन्सचे नियम पायदळी तुडविले, तर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढेल अन् त्यातून रुग्णसंख्या वाढून लोकांच्या जिवाला धोका पोहोचू शकेल.

अत: हा धोका लक्षात घेऊन, गणेशभक्तांनी संयम बाळगून यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने व प्रातिनिधिक स्वरूपात साजरा करावा, असे आवाहन करण्यात येते. राज्य शासन, महापालिका व अन्य शासकीय यंत्रणेने गणेशोत्सव साजरा करण्यासंदर्भात जी काही नियमावली नागरिकांसाठी प्रसिद्ध केली आहे, तिचे तंतोतंत पालन करून कोरोनाचं जिवघेणं संकट टाळण्यास हातभार लावावा.कारण यातच सर्वांचं हित सामावलेलं आहे.

महत्वाचे म्हणजे गणेशोत्सवाचे राजकारण करत शासकीय नियमांची तमा न बाळगता, सदर उत्सव मोठ्या जोशात साजरा करून कोरोनाच्या तिसर्‍या लाटेला निमंत्रण देणे योग्य आहे काय, याचे आधी आत्मपरीक्षण करावे.एवढंच विरोधासाठी नस्ते विरोध करणार्‍या राजकीय विरोधकांना सांगणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लोकांना गणेशोत्सव साधेपणाने साजरा करण्याविषयी आवाहन केलं आहे.

त्या अनुषंगाने राज्यात तिसर्‍या लाटेचा धोका उद्भवू नये, म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेला हा उत्सव प्रातिनिधिक स्वरूपात साजरा करण्याची विनंती केली आहे.

आजच्या घडीला लोकांचे प्राण वाचविणे महत्वाचे आहे, तर उत्सव आपण पुढच्या वर्षी धूमधडाक्यात साजरे करू. विघ्नहरता गणरायाचा उत्सव साधेपणाने साजरा करूया अन् एकजुटीने कोरोनावर मात करूया.

वक्रतुंड महाकाय, सूर्यकोटि समप्रभ !

निर्विघ्नं कुरुमे देव,सर्व कार्येषु सर्वदा !

रणवीर राजपूत

(मो.न.9920674219)

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com