विघ्नहारी विघ्नहर्ता

विघ्नहारी विघ्नहर्ता
गतवर्षीप्रमाणेच यंदाही करोनाचे सावट गणेशोत्सवावर आहे. तिसर्‍या लाटेची चर्चा सुरू झाल्यानं घरामध्ये सजावटीसाठी, बाप्पासाठी काही वस्तू आणताना पुन्हा मनं धास्तावली आहेत. खरेतर देवाला फक्त श्रद्धायुक्त अंत:करणाने शरण जाणे हीच खरी पूजा आहेे. त्याला माहीती असते कोणाला केव्हा अन् किती द्यायचे. आपल्या भक्तांची काळजी आणि अपराध पोटात घ्यायला तो सदैव सज्ज आहे. त्यामुळे गणेशोत्सवाला जरी एक वेगळी किनार असली तरी काळजी करू नका तर काळजी घ्या.

अरुणा सरनाईक

भाद्रपद श्ाुक्ल पक्षातील चतुर्थीला महासिध्दीविनायकी चतुर्थी म्हणतात. रविवारी अथवा मंगळवारी आल्यास तिचे महत्व अधिकच वाढते. हिला वरद चतुर्थी आणि शिवा चतुर्थी असेही म्हणतात. चतुर्थीही श्री गणेशाची प्रिय तिथी. चतुर्थी म्हणजे जागृती. प्रत्येक प्राणीमात्राला चार प्रकारची संकटे मानली आहेत. गर्भज म्हणजे प्रसुतिजन्य, देहज म्हणजे बाल्यावस्था, अिंंतम म्हणजे मरणात्मक आणि याम्यज म्हणजे यमलोक. यातून मुक्त होण्यासाठी, पुरूषार्थ प्राप्त करून देणारे व्रत म्हणून संकष्टी चतुर्थीचे व्रत केले जाते.

गणेशाला काहीही अर्पण करतांना विषम संख्येत अर्पण करतात. विषम संख्या शक्तीशी संबंधित असतात. गणेशाला 21 दूर्वा वाहतात. 21 हा आकडा संख्याशास्त्रानुसार 2 अधिक 1 बरोबर 3 असा आहे. गणपती तीन या आकड्याशी संबंधित आहे. तीन हा आकडा कर्ता, धर्ता या बरोबर हर्ताही आहे.

महादेवाला तीन पानाचीच बिल्वपत्रे वाहतात. दूर्वा वाहण्यामागील कथा फार रोचक आहे. अमलासुराचा वध गणेशाने त्याच्यापेक्षा आकराने मोठा होवून, त्याला गिळंकृत करून केला. त्यावेळी गणपतीच्या शरीराचा जो दाह झाला तो कोणत्याही उपायाने शांत होईना. त्यावेळी उदरातील अनल शांत करण्यासाठी विष्णूने कमळ, ब्रम्हदेवाने दोन मानस कन्या दिल्या. वरूणाने जल, इंद्राने चंद्र, शंकराने सहस्त्र फणांचा नाग देवूनही श्री गणेशाच्या उदरातील अनल शांत झाला नाही. तेथे आलेल्या ॠषींनी मिळून त्याच्या मस्तकावर प्रत्येकी 21 दूर्वा वाहिल्या आणि त्याचा अंगदाह कमी झाला. ही कथा असली तरी शास्त्रीय द़ृष्टीकोनाने पाहता दूर्वा या शीतकारक आहेत.

शमीपत्रामागील ही भूमिका अशी की,धनिष्ठा नक्षत्राचा वृक्ष शमी असून दसर्‍याला शमीपूजनानंतर सीमोल्लंघन करतात, हे आपल्याला माहिती आहेच. दुष्कृत्यांचा नाश करणारी अमंगलाचे मंगल करणारी शमी श्रीगणेशाला प्रिय असल्यास नवल ते काय? याची साले, पाने आणि फळे औषधी उपयोगी आहेत.

गणेशाला प्रिय 21 पत्री, मधुमालती,माका, बेलपत्र, दूर्वा,धोतरा, तुळस, शमी, आघाडा, डोरली, कण्हेर, मंदार, अर्जुन, विष्णुकांत, डाळींब, देवदार, मरवा, पिंपळ, जाई, केवडा, हादगा, बोर या वनस्पती औषधी वनस्पती म्हणून देखील ओळखल्या जातात. प्रत्येक पत्रींमध्ये काही ना काही औषधी उपयोगी गुणधर्म आहेतच. श्रींचा आवडता प्रसाद मोदक!

मोद म्हणजे आनंद! क म्हणजे लहानसा भाग. हाती धरलेला मोदक म्हणजे आंनद देणारी शक्ती होय. मोदक हे ज्ञानाचे प्रतिक. त्याला ज्ञानमोदक असेही नाव आहे. कारण ज्ञानाचाही आनंद असतोच ना? नैवेद्याला 21 मोदक करतात. त्याच्या जोडीला करंजी देखील असते. मोदक करंजी बहीणभाऊ मानल्या जातात. आपल्याकडे प्रत्येक सणाला, पदार्थांना नात्याची भावनेची जोड ही असतेच असते. कारण आपण नातेसंबंध जपणारे संस्कृतीप्रिय आहोत.

शास्त्राप्रमाणे गणेशमूर्ती शाडूची असावी. ती 9ते 10 इंचच उंच असावी. अथर्वशीर्षात ज्याप्रमाणे वर्णन केलेले आहे तशी असावी. एक दात असलेली, चार हात असलेली, पाश आणि अकुंश ही दोन शस्त्रे हातात धारण केलेली.

उरलेल्या एका हातात तुटलेला दात, दुसर्‍या हाताने प्रसाद मद्रा करून भक्तांना आशीर्वाद देणारी हवी. कान मोठे सुपासारखे, लंबोदर मूषकासहीत अथवा मूषकावर स्वार असणारी गणेशमर्ती असावी घराण्याच्या पंरपरेनुसार उजव्या सोंडेचा अथवा डाव्या सोंडेचा गणपती पूजला जातो.

सुखकर्ता दु:खहर्ता ही गणपतीची आरती सगळीकडेच म्हटली जाते. तसच ‘सेंदूर लाल चढाओ’ ही पण प्रसिध्द आरती आहे. पण त्या आरत्यांचा अर्थ आपण समजून घेतो का हा प्रश्नच आहे. सुखकर्तादु:खहर्ता ही गणपतीची आरती यात ‘दास रामाचा वाट पाहे सदना’ हा रामाचा दास कोण असावा? अर्थात रामदासस्वामी! यातील प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेणे गरजेचे आहे. वक्रतुंड ! वक्रान तुडयंति असा वक्रतुंड. जे वक्र म्हणजेच दुष्ट असतात त्यांचा नाश करणारा असा.

त्रिनयना ! म्हणजे तीन नेत्र असणारा. भगवान शंकराप्रमाणे त्यांच्या या पुत्राला तीन डोळे आहेत. गणपतीचा तिसरा डोळा ज्ञानाचा समजला जातो. तो लंबोदर आहे. कारण तो सर्वांचे सर्व अपराध पोटात घालतो म्हणून. अशा अर्थासहीत जाणून श्रध्देने हळू आवाजात आरती म्हणावी. मुलांना आरतीचा अर्थ समजावून सांगावा. शक्य झाल्यास आरती एकत्र बसून समजून, पाठ करून घ्यावी. तेव्हाच ती मनोभावे म्हटली जाईल. यामुळे आपोआपच ध्वनीप्रदुषण देखील टाळले जाईल.

गणेशाला अष्टद्रव्य अपर्ण केले जाते. धनप्राप्तीसाठी कमळ, बेल अथवा बेलफळ दूर्वासोबत वाहिल्यास धनप्राप्ती होते. गणेशाला दूर्वा अत्यंत प्रिय आहेत. त्या न वाहिल्यास पूजा अधुरी राहते असा समज आहे. लाल फुले त्यातल्या त्यात जास्वंद अिाण कण्हेर अधिक. मध तुपासोबत दूर्वाची आहुती दिल्यास समृध्दी आणि आनंद मिळतो.

मेव्याची खीर आहुतीत दिल्यास संतानप्राप्ती होते असा भावपूर्ण समज आहे. गतवर्षीप्रमाणेच यंदाही करोनाचे सावट गणेशोत्सवावर आहे. तिसर्‍या लाटेची चर्चा सुरू झाल्यानं घरामध्ये सजावटीसाठी, बाप्पासाठी काही वस्तू आणताना पुन्हा मनं धास्तावली आहेत. खरेतर देवाला फक्त श्रद्धायुक्त अंत:करणाने शरण जाणे हीच खरी पूजा आहेे. त्याला माहीती असते कोणाला केव्हा अन् किती द्यायचे. आपल्या भक्तांची काळजी आणि अपराध पोटात घ्यायला तो सदैव सज्ज आहे.

श्रीगणेश आपले आद्यदैवत आहे. कोणत्याही मंगल कार्यापूर्वी गणेशपूजन केलेच जाते. गणेश चतुर्थीला गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर घराण्याच्या पंरपरेनुसार दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस किंवा दहा दिवस मूर्तीचे पूजन केले जाते. मनोभावे केलेली पूजा देवापर्यंत निश्चितच पोचते. जिथे जो भाव तसा तो देव प्रकटतो. लोकमान्य टिळकांनीं त्यालाच हाताशी धरून जनजागृती केली आहे. देवघरातला देव त्यांनी आपल्या मदतीला धावविला. देशकार्यासाठी त्यांना गणेशपूजनाला मुहुर्ताची, गुरूजींची आवश्यकता भासली नाही. टिळकांची कळकळ पाहून स्वत: विघ्नहर्ता त्यांच्या मदतीला धावून आला होता.

गणेशपूजनाला लोकमान्यांनी एका ठराविक द़ृष्टिकोनाने सार्वजनिक स्वरूप दिले. आज त्यामागील कारण आपण जाणले पाहिजे. सण-उत्सव साजरे करताना सामाजिक भान जपले पाहिजे. उत्सव झाल्यावर उरलेला पैसा समाजकार्यासाठी वापरला गेला पाहीजे. आपला देश सण उत्सवासाठी प्रसिद्ध आहे. पण उत्सव साजरे करतांना वातावरणाची, पर्यावरणाची काळजी, स्वच्छता, सुरक्षा, अपघात याविषयी जागरूकता बाळगणे गरजेचे आहे.

उत्सवाचे दिवस आपल्या जीवनात आनंद निर्माण करतात. गरीब, श्रीमंत, आबालवृध्द, स्त्री -पुरूष उत्सवात सामील होतात. दु:ख विसरायला लावतात. घराघरात आंनदाचे मंगलमय पवित्र वातावरण निर्माण करतात. गतवर्षीप्रमाणेच यंदाही गणरायाच्या या मांगल्यदायी उत्सवाला एक वेगळी किनार असली तरी काळजी करू नका तर काळजी घ्या.

अरुणा सरनाईक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com