Friday, April 26, 2024
HomeUncategorizedवर्षपूर्ती

वर्षपूर्ती

– हिमांशू चौधरी

कोरोना विषाणूचा फैलाव होण्यास कुठून सुरुवात झाली? कुणी म्हणेल, हा काय प्रश्न झाला? सगळ्या जगानं एका सुरात सांगितलंय की, चीनच्या वुहान शहरातूनच कोरोना विषाणू जगभर पसरला.

- Advertisement -

चीनने या विषाणूची माहिती बरेच दिवस जगापासून लपवली म्हणून जगातल्या 120 पेक्षा अधिक देशांमध्ये आज विचित्र अवस्था निर्माण झालीय. लोकांचे जीव वाचवण्यासाठी लॉकडाउन लागू करावा तर अर्थव्यवस्था कोलमडून पडते आणि अर्थव्यवस्था सावरायला जावं तर मृतांची संख्या वाढतेय… चीन, हो चीनच याला कारणीभूत! जगभरात असं चीनविरोधी वातावरण निर्माण झालं आणि त्यामुळंच चीनने स्वतःला भीती असल्याचा कांगावा करून विस्तारवादी धोरण आक्रमकपणे राबवलं. शेजार्‍या-पाजार्‍यांना त्रास द्यायला सुरुवात केली. समुद्रातल्या हालचाली वाढवल्या. जगाची खात्री पटली, की या सगळ्याच्या मुळाशी कोरोना विषाणूच आहे.

विषाणूच्या जगभर झालेल्या प्रसाराला आपण जबाबदार आहोत, हे चीनने आतून स्वीकारलंय आणि म्हणूनच भीतीपोटी चीन आक्रमक झालाय, अशी चर्चा सुरू असतानाच चीनने जगाला आणखी एक सॉलिड धक्का दिलाय. कोरोनाचा विषाणू मूळचा चीनमधला नाहीच, असा जावईशोध आता चीनला लागलाय.

शांघाय इन्स्टिट्यूट फॉर बायोलॉजिकल सायन्सेसच्या शास्त्रज्ञांनी चीनला क्लीन चिट तर देऊन टाकलीच आहे; पण विषाणूच्या प्रसारासाठी भारतीय उपखंडाकडे बोट दाखवलंय. म्हणजे, चीनमध्येच विषाणू बाहेरून आला, अशी थिअरी मांडायला सुरुवात केलीय. डिसेंबर 2019 मध्ये वुहान शहरात कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली होती. म्हणजे, महाराष्ट्राच्या सरकारप्रमाणेच आता या घटनेचीही ‘वर्षपूर्ती’ झाली.

चीनच्या ज्या शास्त्रज्ञांनी हा अजब दावा केलाय त्यांच्या मते, चीनमध्ये आढळण्यापूर्वीच विषाणू भारत किंवा बांगलादेशात अस्तित्वात होता. ही थिअरी अर्थातच वादग्रस्त आहे. खरं तर विषाणूच्या फैलावाचा आरोप आता चीनला दुसर्‍या कुणाच्यातरी माथी मारायचाय. वास्तविक, तसा प्रयत्न आधीपासूनच सुरू आहे. अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ज्याला ‘चिनी विषाणू’ म्हणाले होते, तो त्यांच्याच अमेरिकेतून चीनमध्ये आल्याचा दावा सुरुवातीला चिनी अधिकार्‍यांनी केला होता. अमेरिकेच्या शिष्टमंडळाचं चीनमध्ये आगमन, कॅनडातून आलेलं कुरियर अशा काही थिअरीज् सुरुवातीच्या काळात चीनकडून मांडल्या गेल्या होत्या. परंतु ते सगळे बार फुसके ठरले होते. उलट वुहानमध्येच व्हायरोलॉजीची प्रयोगशाळा असल्यामुळं हा विषाणू मानवनिर्मितच असावा, अशी शंका घेतली गेली. त्यासाठीही काही थिअरीज् मांडल्या गेल्या.

आजही जगातील सर्वाधिक लोकसंख्येचा देश आणि विषाणूचा प्रसाराचा प्रारंभबिंदू असूनसुद्धा चीनमध्ये सगळ्यात कमी रुग्णसंख्या कशी काय? हा प्रश्न जगाला पडलाय. त्यामुळं झटपट दुसरी थिअरी मांडणं चीनला गरजेचं होतं आणि चीनने थेट भारतीय उपखंडाकडेच बोट दाखवलं. ‘वर्षपूर्ती म्हणजे एकमेकांकडे बोटं दाखवण्याचा दिवस’ या व्याख्येवर आम्ही दुसर्‍यांदा शिक्कामोर्तब केलं. महाराष्ट्र सरकारची वर्षपूर्ती राज्याच्या प्रत्येक महसुली विभागात एक या प्रमाणात पत्रकार परिषदा घेऊन ‘साजरी’ करण्यात आली. सरकारकडूनही विरोधकांच्या आरोपांना उत्तरं दिली गेली. वातावरण तापलं; पण राज्याची आर्थिक, प्रशासकीय दुरवस्था कुणामुळं जास्त झाली, हे अनुत्तरितच राहिलं. त्याचप्रमाणं चीनने कोरोनाची वर्षपूर्ती अशी भारताकडे बोट दाखवून साजरी केली. विषाणू कसा आला आणि कसा ठेचायचा, हे अनुत्तरितच राहिलं.

- Advertisment -

ताज्या बातम्या