Thursday, April 25, 2024
HomeUncategorized‘आत्मनिर्भर’ सत्तासुखाचे स्वप्न!

‘आत्मनिर्भर’ सत्तासुखाचे स्वप्न!

नाशिक | एन. व्ही. निकाळे Nashik

हातची सत्ता गेल्यावर ‘पाण्याविण तळमळणार्‍या माशा’सारखी काही राजकीय नेत्यांची अवस्था होते. आघाडी सरकार पडण्याची भाकिते यापुढेही चालू राहतील, असा राजकीय पंडितांचा अंदाज आहे. कारण भाकिते वर्तवण्याशिवाय विरोधकांना दुसरा पर्याय तरी कोणता? कार्यकर्ते, आमदार आणि विशेषत: ‘आयारामां’ना थोपवण्यासाठी सत्तेचे गाजर वरचेवर दाखवावेच लागते. विरोधी पक्षातील आमदार आमच्या संपर्कात असे सत्ताधार्‍यांनी म्हणत राहावे, हाही एक रिवाजच!

- Advertisement -

मुख्यमंत्रिपदावर आरूढ झाल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा साठावा वाढदिवस आला, पण तो यंदाच्या विशेष परिस्थितीत साधेपणाने गाजला. मुख्यमंत्री म्हणून ठाकरे यांचा हा पहिलाच वाढदिवस! एरव्ही सत्ताप्राप्तीच्या आनंदात तो मोठ्या धूमधडाक्यात साजरा झाला असता, पण ‘करोना’ संकटामुळे सत्ताधारी पक्षाच्या कार्यकर्त्यांना तो मोह आवरावा लागला.

तथापि मुख्यमंत्र्यांची ताजी मॅरेथॉन मुलाखत या स्थितीतही बरीच गाजली. वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार संजय राऊत यांनी ही मुलाखत घेतली. मुलाखतीत कोणकोणत्या गोष्टींवर मुख्यमंत्री भाष्य करणार? कोणकोणते गौप्यस्फोट करणार? याची उत्सुकता त्यांचे चाहते आणि राजकीय अभ्यासकांइतकीच, किंबहुना काकणभर जास्तच विरोधकांनासुद्धा होती!

मुख्यमंत्र्यांच्या मुलाखतीचा रोखठोकपणा त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांना, विशेषत: विरोधी पक्षनेत्यांना कोल्हापुरी लवंगी मिरचीसारखा झोंबला असेल. मुख्यमंत्र्यांनी काढलेले ‘चिमटे’ही अनेकांना रुतले असतील. काँग्रेसची सत्ता हिरावण्याचे महानाट्य सध्या राजस्थानात रंगले आहे. आतापर्यंत त्याच्या अनेक तालमी झाल्या. मात्र नाटकाच्या प्रयोगाची तूर्तास शक्यता दिसत नाही. अशावेळी महाविकास आघाडीने दिल्लीतील ‘चाणक्य’ आणि मराठी मुलखातील विरोधकांना बरेच जेरीस आणले आहे.

धारावीतील ‘करोना’ संसर्ग नियंत्रणात आणल्याबद्दल जागतिक स्तरावर मुंबई मनपा, राज्य सरकार आणि आरोग्य यंत्रणेचे कौतुक होत आहे, पण विरोधकांना ते का रुचावे? सरकारच्या चुका शोधण्यातच विरोधक अद्याप धन्यता मानत आहेत. आघाडी सरकार पाडण्याचे अनेक मुहूर्त सांगणार्‍या तथाकथित ज्योतिषांवर मुख्यमंत्र्यांनी नेम साधला. हातचे राखून न ठेवता सडकून टीकेचे शब्दबाण सोडले. त्या बाणांनी विरोधक स्वाभाविकच घायाळ झाले असतील. ‘आघाडी सरकार तीनचाकी रिक्षा असले तरी सुकाणू (स्टेअरिंग) माझ्याच हाती आहे. हिंमत असेल तर सरकार पाडूनच दाखवा!’ असे जाहीर आव्हानच मुख्यमंत्र्यांनी दिले. ‘तीनचाकी रिक्षा’ संबोधून आघाडी सरकारची खिल्ली उडवणार्‍यांना केंद्रातील ‘एनडीए’च्या पूर्वीच्या ‘आगगाडी’ सरकारची आठवणही मुख्यमंत्र्यांनी करून दिली. त्यावर काहीतरी प्रत्युत्तर देणे विरोधकांना भाग होते.

‘राज्यात दोन मुख्यमंत्री असून एक ‘मातोश्री’त तर दुसरे राज्यभर फिरत आहेत’ अशी टर विरोधकांनी उडवली. तर राज्यात एक-दोन नव्हे तर तीन मुख्यमंत्री असल्याची मल्लिनाथी करून राजकीय प्रगल्भतेची ‘जाण’ दुसर्‍या विरोधकाने व्यक्त केली. उपमुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. समाज माध्यमांवर बारामतीतील कार्यक्रमाचे मुख्यमंत्र्यांसोबतचे छायाचित्रही प्रसिद्ध केले. त्यावरून ‘स्टेअरिंग कोणाच्या हाती?’ असा सवाल माध्यमांनी उपस्थित करून आघाडीत बिघाडी करण्याचा इरादा आजमावून पाहिला. ‘आमचे सरकार भक्कम असून पाच वर्षे चालेल’ असे आघाडीचे नेते पुन:पुन्हा ठासून सांगत आहेत. त्यामुळे कर्नाटक, मध्य प्रदेश वा राजस्थानसारखी कारस्थाने महाराष्ट्रात कामी येणार नाहीत आणि मराठी मातीत पुढील चार वर्षे तरी सत्तेचे ‘कमळ’ फुलण्याची शक्यता दिसत नाही, असेही आघाडीचे नेते आत्मविश्वासाने सांगतात.

मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांच्या सहा-सात महिन्यांतील कामगिरीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. सत्तेविना तळमळणार्‍या नेत्यांना आपण आता विरोधी बाकाचे धनी आहोत, हे वास्तव स्वीकारायला सहा महिन्यांचा कालावधी खरे तर पुरेसा ठरावा. राज्याच्या सुदैवाने विरोधक म्हणून आपल्या भूमिकेची जाणीव त्यांना झाली असावी. आघाडी सरकारमधील तिन्ही पक्ष एकजुटीने ‘करोना’शी लढत आहेत. विरोधक मात्र सरकारच्या कामांतील उणीवा शोधत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आव्हानाने विरोधक खूप खवळल्यासारखे वाटतात, पण त्या आव्हानाला उत्तर देणे तर भागच होते. ‘आघाडी सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. अंतर्गत लाथाळ्यांमुळेच ते पडेल’ अशी जुनीच चावून चोथा झालेली भविष्यवाणी नेते म्हणून माजी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा वर्तवली. ‘आघाडी सरकार तीनचाकी रिक्षा आहे. ती कुठे न्यायची ते चालक नव्हे तर मागे बसलेले ठरवतात’ अशी संभावनाही केली.

या गदारोळात ‘कमळ’तळ्याच्या नवनिर्वाचित प्रदेश पदाधिकार्‍यांची पहिली बैठक मुंबईत झाली. राष्ट्रीय अध्यक्षांनी दिल्लीतून बैठकीचे अध्यक्षस्थान ‘ऑनलाईन’ भूषवले. ‘महाराष्ट्रातील पुढील सर्व निवडणुका स्वबळावर लढू व जिंकू. कोणाशीही युती करणार नाही’ अशी भीष्मप्रतिज्ञा त्यांनी ‘ऑनलाईन’ केली. प्रदेशाध्यक्षांना मात्र ती प्रतिज्ञा फारशी मानवली नसावी. राष्ट्रीय अध्यक्षांच्या भूमिकेला छेद देणारे वक्तव्य करून त्यांनी खळबळ उडवून दिली. मुख्यमंत्रीपदासाठी ‘काडीमोड’ घेणार्‍या व आता दोन्ही काँग्रेसच्या पाठबळावर मुख्यमंत्रीपद मिळवून राज्याचे नेतृत्व करणार्‍या शिवसेनेशी पुन्हा घरोबा करण्याचा मानसही त्यांनी मोकळ्या मनाने व्यक्त केला.

एक प्रकारे ती ‘ऑफर’च असावी, असेही अनेकांचे मत आहे. आघाडी सरकारचा संसार सुरळीत चालू असताना ‘हातचे सोडून पळत्याच्या पाठी’ कोण लागेल? प्रदेशाध्यक्षांची ही कल्पना माजी मुख्यमंत्र्यांना रुचली नसावी. त्यांनी प्रदेशाध्यक्षांचे विधान खोडून काढले. एकूणच सत्ता गमावल्यापासून विरोधी पक्षनेत्यांतील ताळमेळ डळमळीत झाला असावा. राष्ट्रीय अध्यक्ष एक बोलतात. त्याविरुद्ध प्रदेशाध्यक्ष भाष्य करतात. दुसरे नेते त्यावर बोळा फिरवतात. दोन दिवसांनी प्रदेशाध्यक्षांनी ‘पीछे मूड’ केले.

‘माझे विधान उलटे वाचले गेले’ असे भाबडेपणे सांगून त्यांनी रितीप्रमाणे माध्यमांवर खापर फोडण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. सैरभैरतेचेच हे लक्षण जनतेला वाटले तर नवल काय? काहीतरी बरळून गेल्यावर खुलासा करण्याचा हा लोकप्रिय रिवाजच आहे. किंबहुना भारतीय राजकारणात हाही एक शिरस्ता बनला आहे. नेत्यांत ताळमेळ नसेल तर राज्यातील निवडणुका ‘स्वबळा’वर लढण्याचे व जिंकण्याचे स्वप्न पक्षाध्यक्षांनी कोणाच्या ‘बळा’वर पाहायचे?

‘मी पुन्हा येईन’चा नारा देऊन शपथ घेणार्‍यांना अवघ्या ऐंशी तासांत मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता.

पहाटेच्या अंधारातील शपथही लाभदायी ठरू शकली नाही. याउलट धीर धरणार्‍या शिवराजसिंहांनी दिल्लीश्वरांच्या आशीर्वादाने चौथ्यांदा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्रीपद पुन्हा पटकावले. हातची सत्ता गेल्यावर ‘पाण्याविण तळमळणार्‍या माशा’सारखी काही राजकीय नेत्यांची अवस्था होते. आघाडी सरकार पडण्याची भाकिते यापुढेही चालू राहतील, असा राजकीय पंडितांचा अंदाज आहे. कारण भाकिते वर्तवण्याशिवाय विरोधकांना दुसरा पर्याय तरी कोणता? कार्यकर्ते, आमदार आणि विशेषत: ‘आयारामां’ना थोपवण्यासाठी सत्तेचे गाजर वरचेवर दाखवावेच लागते. विरोधी पक्षातील आमदार आमच्या संपर्कात असे सत्ताधार्‍यांनी म्हणत राहावे, हाही एक रिवाजच!

गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीआधी इतर पक्षांतून, प्रामुख्याने दोन्ही काँग्रेसमधून आलेल्या नेत्यांच्या ‘कमळ’तळ्यातील उड्या मात्र सत्तेविना त्यांना गारठून टाकणार्‍या ठरल्या असाव्यात. त्यामुळे अस्वस्थ ‘आयाराम’ कधी पवित्रा बदलतील आणि ‘भरती’ला ‘ओहोटी’ लागून गळती कधी सुरू होईल हे तरी कोण सांगू शकणार? ‘येती पाच वर्षेच नव्हे तर पुढील पंचवीस वर्षे आमचे सरकार सत्तेतून हलणार नाही’ असे आघाडीचे नेते ठामपणे सांगतात. हे विधानही त्याच प्रकारचे! ‘आत्मनिर्भरता’ भारतातील कुठल्याही राजकीय पक्षात कोणकोणत्या रितीने वापरली जाईल हे ब्रम्हदेव तरी सांगू शकेल का?

- Advertisment -

ताज्या बातम्या