एकात्मतेचा संदेश देणारी दिवाळी

एकात्मतेचा संदेश देणारी दिवाळी

आपला देश अत्यंत सुंदर परंपरांनी संपन्न आहे. इतक्या रंगबिरंगी आणि सुंदर परंपरांनी समृद्ध देश जगाच्या पाठीवर अन्यत्र क्वचितच सापडेल. प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक प्रांतात इतकी विविधता असूनही सण-उत्सव मात्र परस्परांशी संबंधित असतात. हे सणासुदीचे धागे आपल्याला मोत्याच्या माळेप्रमाणे एकत्र गुंफतात. आपल्याकडील सण एकमेकांना जोडून घेण्याचे माध्यम आहेत. दिवाळीच्या वेळी सर्व समाजांमधील लोक एकत्र येतात. हा सण विविधतेत असलेली एकता दाखवून देतो. हीच सणांनी आपल्याला दिलेली एकात्मता महत्त्वाची आहे.

-कलापिनी कोमकली

प्रख्यात शास्रीय गायिका

वनाचा प्रवास आपल्याला असंख्य जाणिवांनी समृद्ध करणारा असतो. आपल्या अनुभवातून आपल्याला जगातील विविध रंगांची अनुभूती मिळते आणि सुख-दुःखं जगायला आपण शिकतो. माझ्या घराच्या अंगणात आणि बैठकीच्या खोलीत मी विविध रागांचे दीप उजळताना पाहिले. वडील होते तेव्हाही त्यांच्या स्वरमाधुर्याने घर उजळून निघत असे. कधी-कधी जेव्हा ते ‘राम निरंजन हमारा रे’ किंवा ‘सुनता है गुरू ग्यानी’ किंवा ‘कुदरत के गत न्यारी’ गात असत तेव्हा मनात खोलवर एक प्रकाश उतरत आहे, असा भास होत असे. जेव्हा मनाच्या आत आणि बाहेर दोन्ही बाजूंना प्रकाश उजळतो, तीच खरी दिवाळी!

खरे सांगायचे झाल्यास आपला देश अत्यंत सुंदर परंपरांनी संपन्न आहे. इतक्या रंगबिरंगी आणि सुंदर परंपरांनी समृद्ध देश जगाच्या पाठीवर अन्यत्र क्वचितच सापडेल. प्रत्येक गावात, प्रत्येक शहरात, प्रत्येक प्रांतात इतकी विविधता असूनही सण-उत्सव मात्र परस्परांशी संबंधित असतात. हे सणासुदीचे धागे आपल्याला मोत्याच्या माळेप्रमाणे एकत्र गुंफतात. आपल्याकडील सण एकमेकांना जोडून घेण्याचे माध्यम आहेत. काही सणांना धार्मिक महत्त्व आहे, काहींना आध्यात्मिक महत्त्व आहे तर काहींचे केवळ सामाजिक महत्त्व अधिक आहे. असे उत्सव सामाजिक समरसतेसाठीचे निमित्त होत. दिवाळीच्या वेळी सर्व समाजांमधील लोक एकत्र येतात. प्रत्येक वर्गातील व्यक्ती या सणाचा आनंद घेतात. हा सण विविधतेत असलेली एकता दाखवून देतो. हीच सणांनी आपल्याला दिलेली एकात्मता महत्त्वाची आहे.

मला वाटते की, दिवाळी असो वा होळी असो, हे सामाजिक सण आहेत. परंतु दीपावलीचे तर आध्यात्मिक महत्त्वही अधिक आहे. याच दिवशी चौदा वर्षांचा वनवास संपवून प्रभू श्रीरामचंद्र अयोध्येत परतले होते असे मानतात. परंतु सण साजरे करण्याचे सध्याचे स्वरूप मात्र खूपच बदलून गेले आहे. दीपावली हा आता सामाजिक उत्सव न राहता व्यक्तिगत सण झाला आहे. महानगरांमध्ये विशेषतः अपार्टमेन्टमध्ये आकुंचन पावणार्‍या जीवनामुळे हा सण खूपच बदलला आहे. गेल्या काही दशकांमध्ये आपली जीवनशैलीही खूपच बदलली आहे, हे वास्तव आहे. आपले सकाळ-संध्याकाळचे परिपाठ बदलले आहेत. त्यामुळेच दीपावलीमागील खरी भावना शोधावी लागत आहे. मला हरिवंशराय बच्चन यांच्या ङ्गनिशा निमंत्रणफ कवितेतील काही ओळी या वेळी आठवत आहेत...

‘साथी, घर-घर आज दीवाली

फैल गयी दीपों की माला

मंदिर-मंदिर उजियाला’

मला आठवते, की आमच्या कुटुंबात दीपावली हाच सर्वांत महत्त्वपूर्ण सण असायचा. या सणाच्या वेळी माझे बाबा देवासमधून बाहेर जात नसत. संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन घरात लक्ष्मीपूजन करीत असे आणि दिव्यांची सजावट करून दिवाळी साजरी करीत असे. घर, अंगण आणि घराच्या मागील अंगणात (ज्याला आम्ही ‘परस’ म्हणत असू) पिवळ्या मातीने आणि शेणाने सारवण करणे आणि सजवणे मला आवडते. हे काम दिवाळीच्या तीन-चार दिवस आधीच मी पूर्ण करते. दिवाळीच्या दिवशी सायंकाळी घराच्या कानाकोपर्‍यात पणती ठेवल्याने मांगल्याचा अनुभव मिळतो. हा अनुभव कदाचित शब्दांत सांगताही येणार नाही. त्यावेळी वडिलांनी गायिलेली बंदिश आठवते- ‘सखियां! वा घर सबसे न्यारा, जहां पूरन पुरुष हमारा!’

महाराष्ट्रात दिवाळीच्या पहिल्या दिवशी भल्या पहाटे ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमांचे आयोजन करण्याची प्रथा आहे. पहाट म्हणजे सूर्योदय. या पहाटेची मी आतुरतेने वाट पाहते. मी पहाटेच्या वेळी पुणे, सोलापूर, नाशिक, मुंबई अशा ठिकाणचेच कार्यक्रम स्वीकारायचे. जेणेकरून संध्याकाळपर्यंत पुन्हा देवासला परतून दिवाळी साजरी करू शकेन. माझी आई वसुंधराताई तर दिवाळीत लाडू, अनरसे, चकली, चिरोटे, शेव-चिवडा घरातच तयार करीत असे. बाबांना आईच्या हातची चकली खूप आवडत असे आणि आईसुद्धा चकलीसाठी स्वतःच्या हातांनी भाजणी दळत असे. ती चकली अक्षरशः लाजवाब असे. वास्तविक, हे सण आपल्याला पूर्वजांची भेट घडवून आणणारे आहेत. वारंवार त्यांची आठवण येते. मी घरातल्या ज्येष्ठांची आठवण काढते. त्यांच्या मेहनतीमुळे आणि समर्पणामुळे आपण आज सुखी, संपन्न जीवन जगत आहोत, याची जाणीव होते.

आज सणासुदीच्या वातावरणात खूपच बदल झाले आहेत. काही सामाजिक कारणे, काही पर्यावरणीय कारणे, तर कुठे आर्थिक कारणांमुळे अनेक ठिकाणी दिवाळीचे स्वरूप बदलल्याचे दिसते. त्यामुळं गोंधळ आणि कोलाहलापासून दूर मी माझ्या घरात, अंगणात आपल्या कुटुंबीयांसमवेत दिवाळी साजरी करते. लक्ष्मीपूजनानंतर आई आणि बाबांची आठवण म्हणून आम्ही सर्वजण राग धन बसंतीमधील बंदिश गातो...

‘दीप की ज्योति जरे शुभ घडी

दीप बाती बनी नीके शुभ घडी

चंदन घोलकर आंगन लीपयो

मोतियन चौक पुराओ शुभ घडी।’

आता पुन्हा एकदा दिवाळी आली आहे. मी हृदयाच्या तळाशी पोहोचून दिव्याखालचा अंधार वाचण्याचा प्रयत्न करेन, जेणेकरून आपल्यातील दोष मला जाणून घेता येऊ शकतील. त्याचबरोबर, दिव्यांची प्रभा आपल्या जीवनात सामावून घेण्याचा प्रयत्न करेन. त्यातूनच मी माझ्या श्रोत्यांना आणि चाहत्यांना सूर, लय आणि तालाची भेट देऊ शकेन. प्रत्येक वर्षाप्रमाणेच मी प्रेम आणि भावनांनी मन भरून घेईन आणि त्या भरल्या मनानेच दिवाळी साजरी करेन.

-कलापिनी कोमकली

प्रख्यात शास्रीय गायिका

Related Stories

No stories found.