Friday, April 26, 2024
HomeUncategorizedउदया येतसे सूर्यदिवाळी

उदया येतसे सूर्यदिवाळी

– प्रा. डॉ. नरेंद्र कुंटे

दसरा झाला आणि आता दिवाळी आली. निरांजनातल्या छोट्या वातीच्या प्रकाशाने, देवापुढील समईला वातीने उजळणार्‍या देवघरापुरातल्या प्रकाशाने आणि घराच्या अंगणात लख्ख प्रकाश पाहायला मिळणार्‍या आकाशादिव्याने अंतर्मन आणि बाह्य जीवनव्यवहार या दोन्हीतही आनंद आणि उत्साह भरुन राहतो. घरी आकाशदिवा लावला आणि ‘आकाश’ न्याहाळत बसलो. तर काय? नित्यवाचतानील ग्रंथार्थातून ‘सूर्यादिवाळी’ पाहायला मिळाली.

- Advertisement -

संत हे ‘कुलदीपक’ असल्याने त्यांच्या ओवी-अभंगातून आकाशीचा सूर्यदीप आणि अंतर्मनातील ज्ञानदीप उजळीला जातो. जीवनात मार्गदर्शक असा हा दीपोत्सव अनुभवाला येतो तो संतांच्या लोककल्याणाच्या चिंतनशीलतेतून. ही चिंतनशीलता म्हणजेच विचारांचा ‘ज्ञानदीप’ नव्हे काय? ज्ञानदेवांची ‘ज्ञानेश्वरी’ ओवीस्वरुपात ‘सूर्यदिवाळी’ उलगडत गेली आणि तुकोबारायांच्या गाथेतील अभंगचरण ‘सत्संगाची दिवाळी’ दाखविती झाली. आपले मनाशी असलेले आकाशाचे नाते हे शब्दरुपाने साकार झालेल्या ज्ञानदीपातून प्रकाशमय होते. कसे म्हणाल तर, बुद्धीची दोरी आणि कल्पनेचे रंग अशा आकाशदीपाला असले तरी ‘कृपाशक्ती’ ही सर्वदूर पर्यंत पसरविण्याचे सामर्थ्य त्यांत आहे.

सर्व दिशा उजळवितो

ज्ञानदेवांनी ग्रंथ लेखनास प्रारंभ करतानाही आपण सर्व ज्ञानी नाही, अशा विनम्रतेने स्वत:ला अज्ञानी (मूर्ख) असे संबोधले आहे. पण ‘संकल्पपूर्ती’ होण्यासाठी संतकृपेचा : गुरुकृपेचा दीप म्हणजे जणू त्यांचाच वरदहस्त मानून ही संतकृपाच मला ‘पुढची वाट दाखवित’ आहे, या उजळलेल्या वाटेने मी ग्रंथलेखन करीत आहे, असे म्हटले आहे. दीप आणि प्रकाश एकत्रितच असतो. तसाच माझा ग्रंथ आणि मी एकरुपच आहोत, अशीच ह्यांची भवना आहे.

‘तया तत्वाचा चोखटा

दिवी पोतासाची सुभटा!

मग मीचि होऊनि दिवटा!

पुढापुढा चाले! (अ.10 ओवी 142)

तशी संतमंडळी वा गुरुदेवता ही स्वत:ची कृपाशक्ती देऊन लिहिते- चालतेे करते, हेच खरे! हा आकाशदीप आहे कसा? तर अविवेकाची काळजी दूर करुन विवेक निर्माण करतो. ही अवस्था ज्ञानप्राप्तीसाठी उपासना करणार्‍या योगीजनांची असते. ज्ञानप्राप्ती होणे हीच त्यांची दिवाळी असते. (अ.4 ओवी 54) ग्रंथवाचन, ईश्वरस्मरण, सद्गुणसंपादन आणि सद्गुण संवर्धन यायोगे जो आनंदप्राप्त होतो, तिच खरी दिवाळी आहे.

उदया येतसे सूर्य दिवाळी

‘जैसी पूर्व दिशेच्या राउळी।

उदया येताचि सूर्य दिवाळी।

की येरीही दिशा तियेची काळी!

काळिमा नाही! (अ.5 ओवी 76)

ही ओवी वाचनात आली तेव्हा ‘आकाशदीप’ विषयक अर्थ उलगडू लागला. ज्ञानदेवांनी पूर्वेस उगाविणार्‍या प्रकाशरुप सूर्याला दिवाळी का म्हटले आहे, या विषयीचे चिंतन मनात सुरु झाले. ओवीचा भावार्थ असा आहे की आत्मज्ञानी सत्पुरुषाला जेव्हा ईश्वर कळून येतो, तेव्हा त्या अनुभूतीने त्याच्या चित्तात कोणताही भेदच उतर नाही. त्याला सर्व जग मुक्तच दिसते. तसा हा सूर्य आहे. तो जरी पूर्वदिवेशला उगवला तरी तेवढीच दिशा प्रकाशीत करीत नाही. तर त्याचवेळी सर्वदिशा प्रकाशीत करतो. म्हणून हा सूर्य म्हणजे ज्ञान होय. मग, ‘ज्ञानसूर्याचे प्रकाशरुप’ हेच आकाशदीपाचे खरे रुप आहे. तुमची-आमची दिवाळी चार दिवसांचीच असते. पण ज्ञानाची प्रकाशमय दिवाळी ही सदैवच असते. ज्ञानोदय झाला की, तुम्हाला-आम्हाला आपला स्वधर्म, सत्कर्मासहित चालणारा जीवनमार्ग कसा आहे हे कळून येते. आपण जीवन कसे जगावे याचा विवेक करता येतो. त्यायोगे संपन्नता प्राप्त होणे हीच सूर्यदिवाळी होय.

अशा सूर्याचे, ज्ञानसूर्याचे, जगावर उपकारच आहेत. तो दिशा चुकत नाही, वेळ चुकत नाही. तो सदैव असतोच असतो. परोपकार हा त्याचा स्वधर्म तो सोडत नाही. जगाला प्रकाशीत करण्याचे सत्कर्म तो नित्यस्वरुपात करीतच राहतो, हेच खरे!

ज्ञानदेव म्हणतात की, दिवस आणि रात्र अशी विभागणी जरी होत असली, तरी सूर्य सदैव आहे. तो बारा तासानंतही असतो. पृथ्वीच्या गतिशीलतेमुळे तो बारा तासांचा आहे, पण जिथे पृथ्वी त्याच्या सामोरी येते, तेथेही तो आहेच ना! सूर्य हा सर्वाधिक प्रकाशमान असल्याने दिवाळीला आपण प्रकाशदीप लावतो आणि आनंद साजरा करतो. पण सूर्याची दिवाळी सदैवच आहे. ज्ञानसूर्यही कधीच मावळत नाही, हेही खरंच आहे.

सत्संगीने दिवाळीचा आनंद

दिवाळी सरली की, तुम्ही आम्ही एकमेकांकडे जातो. भेटतो. एकत्र फराळ करतो. याचा आनंदही उपभोगतो. त्याशिवाय हा सण साजरा केल्याशिवाय वाटत नाही. संतही असा आनंद घेतात. संतांचा सहवास प्राप्त होऊन त्यांची कृपा घडावी यासाठी होय. तिच त्यांची ‘दिवाळी’ होय.

तुकोबारायांनी अभंग चरणात म्हटले आहे की, ‘साधु संत येती घरा। तोचि दिवाळी दसरा”. आणखी एका अभंग चरणात ते सांगतात की, ‘दसरा दिवाळी तोचि आम्हा सण। सखे हरिजन । भेटतील। ।’ याचा अर्थ संत, साधु, सत्फरुष, सज्जन अशी मंडळी घरी आली, तर, चर्चा देवाचीच होणार. हे सर्व जण ज्ञानीच होत. म्हणून त्यांचे येणे ही ज्ञानदिवाळी होय. दुसर्‍या चरणात अगोदर दसरा मग दिवाळी असा उल्लेख तुकोबारायांनी केला आहे. तिथे अगोदर दसरा का? तर, दसर्‍याला आपण एकमेकांना भेटतो. सोने देतो. म्हणून ही सुवर्णदिवाळी होय. हरिभक्तांशिवाय दुसरे अधिक प्रेमळ’ कोण असाणार? नाहीच? म्हणून त्यांना ‘सखेजन’ म्हटले आहे. सत्संगाचे महात्म्य इथे प्रकट केली गेले आहे. ज्ञानदेवांची ‘सूर्यादिवाळी’ तर तुकोबारायांची सुवर्णदिवाळी होय. या दोन्हीचा आनंद घेत घेत आपण आपली दिवाळी साजरी करु या! ती ‘आनंद दिवाळी’ होय.

- Advertisment -

ताज्या बातम्या