निर्जंतुकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञान
फिचर्स

निर्जंतुकीकरण आणि आधुनिक तंत्रज्ञान

कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी जगभर आरोग्य सेवा सेवक आणि सरकारांनी निर्जंतुकीकरणाच्या प्रयत्नांना प्राधान्य दिले आहे. साध्या हाताने पुसण्यापासून मोबाईल स्प्रे पद्धतीचा वापर करून सार्वजनिक जागांचे निर्जंतुकीकरण करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत. निर्जंतुकीकरण म्हणजे सर्व सूक्ष्म विषाणू, जीवाणू नष्ट करण्याची प्रक्रिया. यासंदर्भात अनेक लक्षवेधी संशोधने पुढे येत आहेत. त्याविषयी...

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

कोविड 19 (कोरोना व्हायरस) ने जगात धुमाकूळ घातला आहे. कोरोना व्हायरसच्या उद्रेकामुळे जगभरातल्या काम करण्याच्या पद्धतीवर ङ्गन भूतो न भविष्यतिफ परिणाम झाला आहे. त्यामुळे कामकाजाच्या नवनवीन पद्धतींचा अवलंब करण्याकडे सर्वच देशांचा कल दिसून येत असून वाढत जाणार आहे. त्यामुळे जगभर कोट्यवधी व्यक्ती, लाखो उद्योग हवालदिल जाले आहेत. अनेकांचे रोजगार, व्यवसाय नष्ट झाले आहेत. कोरोना विषाणू आजार 2019 (कोविड-19) चा प्रसार रोखण्यासाठी आणि चढता आलेख संपूर्णतः खाली आणण्यासाठी जागतिक समुदाय संघर्ष करत असून यासाठी जगभरातल्या आरोग्य सेवा कर्मचारी आणि सरकारांनी निर्जंतुकीकरणाच्या प्रयत्नांना मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिलं आहे. साध्या हाताने पुसण्यापासून मोबाईल स्प्रे पद्धतीचा वापर करून सार्वजनिक जागांचं निर्जंतुकीकरण करण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणावर केले जात आहेत. हे करण्यामागचं कारण म्हणजे रासायनिक जंतुनाशकांमुळे कोरोना विषाणू सहज निष्क्रिय होतो. पूर्णपणे स्वच्छता, स्वच्छता आणि स्वच्छता यावर लक्ष केंद्रित केलं जाईल. त्यावर लस व प्रभावी औषध विकसित होत नाही तोवर सर्वांनी सावध जीवनपद्धतीचा अंगीकार केला पाहिजे. ठराविक अंतर, मास्क आणि सर्वात महत्वाचं म्हणजे निर्जंतुकीकरण. निर्जंतुकीकरण (सॅनिटायझेशन) म्हणजे सर्व सूक्ष्म जीव (विषाणू, जीवाणू) नष्ट करण्याची कोणतीही पद्धत. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने, कोविड-19 चे रुग्ण आढळलेल्या भागातल्या कार्यालयांसह सार्वजनिक ठिकाणांच्या पर्यावरणाची स्वच्छता/निर्जंतुकीकरणासंदर्भात मार्गदर्शक तत्वं जारी केली आहेत.

आता तर कोविड-19 चा उद्रेक हा जागतिक साथीचा आजार जाहीर झाल्यामुळे देशातली सर्व शहरं आणि विशेषतः विषाणूचा प्रसार अधिक वेगाने होण्याची शक्यता असणार्या सार्वजनिक जागांची स्वच्छता करण्याचे महत्वपूर्ण प्रयत्न केले जात आहेत. 25 मार्च 2020 पासून देशव्यापी लॉकडाऊन जाहीर केल्यापासून बस/रेल्वे स्थानकं, रस्ते, बाजारपेठा, रुग्णालय परिसर, बँक आदींसह सर्व सार्वजनिक जागांचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी शहरं अनेक पद्धतींचा अवलंब करत आहेत. आघाडीच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन संस्था विस्तीर्ण सार्वजनिक जागांचं निर्जंतुकीकरण करण्याच्या सोयीस्कर आणि प्रभावी पद्धतींवर लक्ष केंद्रित करत आहेत. कोविड-19 च्या प्रसाराला आळा घालण्यासाठी भारताच्या 3.28 दशलक्ष चौरस किलोमीटरच्या विस्तीर्ण जागेचं निर्जंतुकीकरण आणि स्वच्छता करणं हे खूप मोठं आव्हान आहे. गर्दीची सर्व ठिकाणं, बाजारपेठा, मेट्रो स्थानकं, विमानतळ, शाळा, महाविद्यालयं, उंच इमारती, रुग्णालयं आणि सरकारी कार्यालयं या सर्व ठिकाणी जंतुनाशक फवारणी करणं ही एक मोठी मोहीम आहे. सध्या कार्यरत असलेले सफाई कामगार स्वतःच्या हाताने जंतुनाशक फवारणी करत आहेत. हे एक मोठं काम आहे. परंतु ते करण्यासाठी डीएएएस (सेवा म्हणून ड्रोन) ही पर्यावरणीय यंत्रणा अवलंबल्यास, स्वच्छतेचं कार्य अर्ध्या वेळेत पूर्ण होईल. स्वतःचं आणि आपल्या कुटुंबीयांचं आरोग्य धोक्यात घालून व्यक्तीश: फवारणी करणार्या स्वच्छता कामगारांची अनुपलब्धता, वेग आणि कार्यक्षमता तसंच सार्वजनिक आरोग्याच्या समस्यांचं निराकरण करणं हे या स्वयंचलित स्वच्छता यंत्रणेचं उद्दिष्ट आहे.

याच दृष्टिकोनातून गरुडा एरोस्पेस या कंपनीने सार्वजनिक जागा, रुग्णालयं आणि उंच इमारतींच्या स्वच्छतेच्या कामात मदत करण्यासाठी स्वयंचलित जंतुनाशक मानवरहित हवाई वाहन (युएव्ही) विकसित केलं आहे. ङ्गकोरोना-किलरफ नाव असणार्‍या या ड्रोनचा वापर 450 फुटांपर्यंतच्या इमारतींवर जंतुनाशक फवारणी करण्यासाठी केला जाऊ शकतो. ड्रोनने केलेली फवारणी ही कोविड-19 चे संभाव्य वाहक बनू शकणार्या कामगारांपेक्षा जलद, दीर्घकालीन आणि सुरक्षित असेल. तसंच ड्रोन उंचावरदेखील फवारणी करू शकतात; जे कामगारांना करणं शक्य नाही. नियमितपणे स्वच्छता करण्यासाठी ‘स्वच्छ भारत अभियान’ आधारित ड्रोनने स्वच्छता केल्यास कोविड-19 च्या प्रसाराला, भविष्यातल्या साथीच्या आजारांना तसंच अस्वच्छतेमुळे पसरणार्‍या संसर्गजन्य रोगांना आळा घातला जाईल.

चंदीगड आणि वाराणसीमधल्या भागात निर्जंतुकीकरण करण्यासाठी यापूर्वीच हे ड्रोन तैनात करण्यात आले आहेत.

सध्या 26 शहरांमध्ये वापरल्या जाणार्या या कोरोना-किलर 100 स्वच्छता ड्रोनची निवड नीती आयोगाने पहिल्या दहा सामाजिक आर्थिक नवोन्मेषात केली होती. हे ड्रोन पेटंट ऑटोपायलट तंत्रज्ञान, प्रगत उड्डाण नियंत्रक प्रणाली आणि इंधन कार्यक्षम मोटर्ससह सुसज्ज असून दिवसभर 12 तास कार्यरत राहण्यास सक्षम आहे. 15-20 लिटरची पेलोड क्षमता, 40-45 मिनिटांचा उड्डाण कालावधी आणि 450 फूट कमाल मर्यादा उंची (जी भारतातल्या उंच इमारतींच्या निर्जंतुकीकरणासाठी पुरेशी आहे.) ही या यंत्रणेची ठळक वैशिष्ट्यं आहेत. प्रत्येक ड्रोन दिवसाला 20 किलोमीटरचं अंतर व्यापू शकतो.

असे 300 कोरोना किलर ड्रोन्स दररोज सहा हजार किलोमीटर अंतरापर्यंत स्वच्छता मोहीम राबवू शकतील! ड्रोन उत्पादक संस्थेने कृषी सर्वेक्षण, प्राथमिक परीक्षण आणि सर्वेक्षण यासारख्या विविध गरजा पूर्ण केल्या आहेत. गेल्या चार वर्षांमध्ये त्यांनी अनेक सरकारी ऑर्डर्सची पूर्तता केली आहे. त्यांनी एक अद्वितीय ड्रोन समूहक व्यासपीठदेखील स्थापन केलं आहे, जे मोठ्या प्रमाणावर स्वच्छता मोहीम राबवल्यास विविध सहयोगी कंपन्यांमार्फत सोळा हजारपेक्षा जास्त ड्रोन पुरवू शकतं.

कोविड-19 साथीविरुद्धच्या लढाईत सरकारला आणि समाजाला मदत करण्यासाठी उत्पादनं आणि सेवा पुरवत या कठीण काळात भारतीय कंपन्या स्वतःचा विकास कशा प्रकारे साधत आहेत याचं हे उत्तम उदाहरण आहे. सामान्यत: निर्जंतुकीकरणासाठी उष्णता, रसायनं आणि (अल्ट्राव्हायोलेट रेज) अर्थात विकिरण पद्धतींचा वापर केला जातो. सर्वाधिक निर्जंतुकीकरण उष्णतेच्या वापराने करण्यात येतं. उकळत्या पाण्यापेक्षा अधिक तापमानात आणि 1.5 वातावरणीय दाबाखाली बहुतेक जीवाणू नष्ट होतात. शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणारी उपकरणं, बांधपट्टा (बँडेजेस) कापूस, कपडे, हातमोजे आणि मुखाच्छादन (मास्क) ऑटोक्लेव्ह उपकरणात ठेवून निर्जंतुक केले जातात. उष्ण वाफेच्या साहाय्याने ऑॅटोक्लेव्हमध्ये निर्जंतुक करण्याच्या वस्तू कमीत कमी 15 मिनिटे ठेवतात. काही पदार्थ आणि उपकरणं निर्जंतुक करण्यासाठी कापडात गुंडाळून अधिक वेळ ऑटोक्लेव्हमध्ये ठेवण्याची पद्धत आहे. आतल्या हवेचा दाब वाढवल्यास कमी वेळात निर्जंतुकीकरण करता येतं. याला प्रेशर ऑटोक्लेव्ह म्हणतात.

निर्जंतुकीकरणाची तिसरी पद्धत म्हणजे अल्ट्रा व्हायोलेट रे (नीलकिरण) वापरणं. ही पद्धत नवी नाही, अनेक वर्षं वैद्यकीय क्षेत्र त्याचा वापर करत आहे. आता यात यंत्रमानव आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला जात आहे. सेन्सरद्वारे विषाणूंचं स्थान निश्चित केलं जातं आणि रोबोद्वारे प्रकाश फवारतो. एक मिनिटाच्या अतिनील-सी प्रकाशामुळे 90 टक्क्यांपेक्षा जास्त निर्जंतुकीकरण केलं जातं. ज्यात कोरोनाचाही समावेश आहे. अनेक अमेरिकन आणि युरोपियन विमानतळांवर सध्या याचा वापर वाढला आहे. नासाही आपल्या अवकाशवीरांचा वेश निर्जंतुक करण्यासाठी या तंत्राचा वापर अनेक वर्षं करत आहे. रासायनिक निर्जंतुकीकरण म्हणजे जंतूनाशकांचे फवारे मारून विषाणू आणि कीड नष्ट करणं. शेतांमध्ये ही पद्धत सर्रास वापरली जाते. आपणही अनेक वेळा गृहनिर्माण संस्था आणि रस्त्यावर असं केलं जात असल्याचं पाहतो. फवारलेल्या जंतुनाशकांचा प्रभाव ठरवण्यासाठी कणांचा आकार आणि जंतुनाशकांच्या कणांची संख्या हे दोन महत्त्वपूर्ण निकष आहेत. अशा प्रभावी उपकरणाला फॉगर म्हणतात. उपकरणांच्या विकासाचा पुढील टप्पा म्हणजे जंतुनाशक आणि साफसफाई करण्यासाठी -3600 डिग्री कव्हरेज समाविष्ट करणं तसंच ते शाळा आणि घरांमध्ये वापरण्यासाठी सुलभ आणि स्वायत्त बनवणं.

व्यापक प्रमाणात स्वच्छता करण्यासाठी मोपिंग वैशिष्ट्यं आणि लांबी वाढवता येण्याजोग्या उपकरणांनी ही उपकरणं सुसज्ज करता येतील. कायनेटिक उद्योगाने इलेक्ट्रॉनिक वाहनावर पाण्यातली जंतुनाशकं वापरून एक उत्कृष्ट फॉगर माफक किमतीत उपलब्ध केला आहे. सध्याच्या कोविड-19 संकटानंतरही तो प्रासंगिक असेल. कारण विषाणू सर्वत्र आहेत आणि एन्फ्लूएंझाच्या अनेक घटना जगभर मोठ्या प्रमाणात पसरत आहेत

दीपक शिकारपूर,माहिती तंत्रज्ञान तज्ज्ञ

(लेखक उद्योजक व संगणक साक्षरता प्रसारक आहेत)

Deshdoot
www.deshdoot.com