लडाख पश्चातच्या रणनीतीचे आयाम

लडाख पश्चातच्या रणनीतीचे आयाम

- कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

स्थलसेनादिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेतील सेनाध्यक्षांचे विचार, त्यातल्या इन बिटवीन द लाईन्समधून प्रत्ययाला आलेली भारतीय रणनीतीतील संभाव्य बदलांची संकल्पना, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने थिएटर कमांड संरचनेच्या पुनर्रचनेला दिलेली परवानगी यातून काही संकेत मिळत आहेत.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल रावत यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने सध्याच्या लढाऊ संरचनेला आयजीबी युनिट्समधे परिवर्तित करण्याची परवानगी दिली आहे. हे परिवर्तन सामरिक शक्तिवर्धनाबरोबरच सेनाधुनिकीकरणाच्या अतिरिक्त खर्चाला आळा घालेल आणि सेनेचे अंतिम सामरिक ध्येय आणि महत्वाकांक्षा पूर्ण करेल.

मे, 2020 मध्ये लडाख क्षेत्रात झालेल्या चीनी घुसखोरीला दिलेल्या सैनिकी प्रत्युत्तरात, बदलत्या भारतीय रणनीतीची चुणूक दिसल्यामुळे, लष्कराच्या बदलत्या रणनीतीच्या संभाव्य आयामांची मिमांसा करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे हे निश्चित. गलवान खोर्‍यातील चकमकीनंतर भारतीय स्थलसेनेने तेथे त्वरित कुमक पाठवून चीनच्या कुटील अगोचरपणाला चाप लावला. याचबरोब भारतीय वायुसेनेने सीमेवरील की फ्रंटियर एयर बेसेसमध्ये सुखोई 30 एमकेआय, जग्वार, मिग आणि अतीशक्तीशाली राफेल फायटर बॉम्बर विमानांची तैनाती केली. चीनच्या सैनिकी हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय नौसेनेच्या टेहाळणी विमानांना आणण्यात आले. याचबरोबर पाणडुब्या,लढाऊ जहाज आणि विमानवाहू जहाजांना हिंद महासागरात उतरवले.

या सर्वांच्या उत्तरात, जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात चीननी तिबेटमध्ये 1700 विमानांचा सहभाग असलेला प्रचंड मोठा युद्धाभ्यास केला. हा लेख 2021 मधील स्थलसेनादिनाच्या पूर्वसंध्येला झालेल्या पत्रकार परिषदेतील सेनाध्यक्षांचे विचार, त्यातल्या इन बिटवीन द लाईन्समधून प्रत्ययाला आलेली भारतीय रणनीतीतील संभाव्य बदलांची संकल्पना, कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीने थिएटर कमांड संरचनेच्या पुनर्रचनेला दिलेली परवानगी, जगात प्रचलित असणार्‍या थिएटर कमांड संरचनेची उपलब्ध असलेली माहिती, विविध राष्ट्रांचे ‘रियल टाईम स्ट्रॅटेजी थिएटर कमांड वॉर गेम्स’, माझे सामरिक अनुभव आणि स्ट्रक्चरल ट्रान्सफॉर्मेशन्ससंबंधी माझ्या अंदाजांवर आधारित आहे.

पुढील काही महिने- वर्षांमध्ये भारताच्या संरक्षणदलांची पुनर्रचना होऊन चीन सीमेसाठी नॉर्दर्न कमांड, पाकिस्तान सीमेसाठी वेस्टर्न कमांड, सागरी तट रक्षणासाठी पेनिन्सुलर कमांड, एयर-आऊटर स्पेससाठी एयर डिफेन्स कमांड आणि समुद्री सीमेच्या रक्षणासाठी मेरीटाईम कमांड अशा पाच थिएटर कमांडसची निर्मिती केली जाईल. लेफ्टनन्ट जनरल किंवा समकक्ष अधिकार्‍यांकडे या कमांड्सची धुरा सोपवण्यात येईल. यासाठी आवश्यक असणारे मनुष्यबळ आणि संसाधनांच्या पूर्ततेची जबाबदारी, संबंधित सेनाध्यक्षांची असेल. आजमितीला स्थलसेना, नौसेना व वायुसेनेची 16 वेगवेगळी कमांड्स आहेत.

या आधी भारतीय संरक्षणदलांच्या सामरिक कारवाया केवळ भौगोलिक क्षेत्राच्या संरक्षणासाठीच केल्या जात असल्याने त्या पायदळ वर्चस्व (इन्फन्ट्री ओरिएंटेड) होत्या.1971 पर्यंत शत्रूला आधी शोषणक्षम हल्ला करू द्यायचा आणि नंतर त्याला तोंड देत प्रतिहल्ला करायचा, या धोरणानुसार संरक्षणदलांचे प्रशिक्षण, साधनसामुग्री आणि संरचना होत होती. जनरल सॅम माणेेकशॉ यांनी या धोरणाला साफ नाकारले. त्यांनी रणगाडे, विमान, समुद्री जहाजांच्या एकत्रित समन्वयी कारवाईंतर्गत पाकिस्तानवर हल्ला करत केवळ 14 दिवसांमध्ये त्याला धुळीस मिळवले. परिणामी1979 मध्ये भारताची पहिली आणि एकमेव मेकॅनाईझ्ड डिव्हिजन उभी करण्यात आली. 1980 आणि 90च्या दशकात, आक्रमणासाठी मॅकनाईझ्ड फोर्सेसचा वापर करणार्‍या नवीन सामरिक धोरणांवर चर्चा सुरू होऊन प्रशिक्षणांमधून त्याच्या संभाव्य सामरिक उपलब्धीची पडताळणी होऊ लागली.

1999मधील कारगिल युद्धाआधी भारतीय सेनेचे सामरिक धोरण त्यांच्या मेकॅनाईझ्ड इन्फन्ट्री आणि आर्टिलरीच्या बाहुल्यामुळे पाकिस्तानसारख्या शत्रूवर वर्चस्व मिळवण्याचे होते. 1980 मध्ये भारतीय सेनेने पंजाब आणि राजस्थानमध्ये पाकिस्तानविरुद्ध स्थलसेना आणि वायुसेनेचे संयुक्त ऑपरेशन करत चीनला हिमालयातच रोखून ठेवण्याचा सराव करणारे दोन मोठे युद्धाभ्यास केले. पण त्यांची संकल्पना युद्ध झाले तर पाकिस्तानला चिरडून टाकू पण चीनशी पंगा घेणार नाही या धर्तीची होती. त्यामुळे 2016पर्यत भारताची सामरिक धोरण संकल्पना अजूनही पाकिस्तानवर आतपर्यंत घणाघाती हल्ल्याभोवतीच घुटमळत होती असे म्हटल्यास ते वावगे होणार नाही.

1999च्या अणुस्फोटांनंतर पाकिस्तानने हे सामरिक समीकरण बदलून टाकत, भारताविरोधात प्रच्छन्न जिहादी युद्धाचा बिगुल फुंकला. याच सामरिक समीकरणाच्या दबावाखाली कारगिल युद्धाच्या वेळी भारतीय सेनेला त्यावेळी अत्यावश्यक असलेली सीमा पार करून पाकिस्तानवर हल्ला करण्याची परवानगी नाकारण्यात आली. दुसरीकडे भारत व चीनमधील आण्विक समीकरण समतोल असले तरी भारत सरकार आणि राजकीय नेते अजूनही 1962च्या युद्धात चीननी थोपवलेल्या पराजयाच्या छायेत वावरत होते. अर्थातच नव्याने अमलात आणली गेलेली प्रच्छन्न पाकिस्तानी युद्धसंकल्पना आणि आव्हानात्मक, कुरापती चीनी घूसखोरीपुढे वैचारिक भारतीय सामरिक धोरण अयशस्वी होऊ लागले यात नवल नाही.

1980-90च्या दशकांत भारताच्या सामरिक रणनीतीत झालेल्या बदलांमुळे 2004 मध्ये तत्कालीन सेनाध्यक्ष जनरल दीपक कपूर यांनी कोल्ड स्टार्ट स्ट्रॅटेजी या सामरिक संकल्पनेचा अंगिकार केला. पण या संकल्पनेतही चीनविरुद्ध केवळ होल्डिंग रोल होता. 2014नंतर या परिस्थितीत पुन्हा बदल होणे सुरू झाले आणि 2016च्या डोकलाम मधील चीनी घुसखोरीला यशस्वी रित्या तोंड दिल्यानंतर भारताने लडाखमधे पीपल्स लिबरेशन आर्मीची आणि चीनची नांगी ठेचली.

आपले दोन्ही शत्रू अण्वस्त्रधारी देश असल्यामुळे त्याची छाया सामरिक धोरणांवर पडणे स्वाभाविक आहे. पाकिस्तानी आण्विक धोरणानुसार जर भारताने इस्लामाबाद-कराची ग्रीन बेल्ट आणि आण्विक शस्त्रसाठ्यावर हल्ला केला किंवा त्यांना मोठी हानी सहन करावी लागली किंवा पराभव दिसू लागला तर तो त्याच्या अण्वस्त्रांचा बेधडक वापर करेल. चीनचे अण्वस्त्र धोरण जाहीर न झाल्यामुळे संदिग्ध आहे. भारत चीन वा पाकिस्तानविरुद्ध कुठलही सामरिक पाऊल उचलण्यापूर्वी यामुळे अणुयुद्धाची सुरवात तर होणार नाही ना, असा विचार करतो. या भावनेमुळेच मुंबई, पठाणकोट, उरीवरील जिहादी हल्ल्यानंतरही भारताने पाकिस्तानवर हल्ला केला नाही. भारताला पाकिस्तानी आण्विक धोरणाची परीक्षा घेण्याची इच्छा नसली तरी तो पाकिस्तान आणि चीन विरुद्ध युद्धसज्जता आणि शत्रूला आठवण राहील असा धडा शिकवण्यासाठी मोबिलायझेशन व रिऑर्गनायझेशन ऑफ फोर्सेससारख्या योग्य त्या उपाययोजना नक्कीच करेल.

डोकलाम व लडाखमध्ये घूसखोर चीनला आणि बालाकोटवरील हवाई हल्ला व पूंछमधील हवाई चकमकीत पाकिस्तानला यांची चुणूक बघायला मिळाली आहे.

या सर्व संकल्पनांमधूनच इंटिग्रेटेड बॅटल ग्रुप (आयबीजी) या आपल्या ठिकाणाहून निघाल्यावर 12 ते 48 तासांत हल्ला करू शकणार्‍या लीन अँड थिन अटॅकिंग फोर्स संकल्पनेचा जन्म झाला. तीन ते पाच इन्फन्ट्री युनिट्स मिळून शत्रूवर त्वरित, अचूक आणि मारक हल्ला करणारी एक आयजीबी बनेल. आयजीबी ही एक सहज व योजनाबद्ध हालचाल करणारी, ब्रिगेड साईझ्ड, स्वयंपूर्त लढ़ाऊ संरचना असेल.

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल रावत यांच्या म्हणण्यानुसार,भारत सरकारने सध्याच्या लढाऊ संरचनेला आयजीबी युनिट्समधे परिवर्तित करण्याची परवानगी दिली असून भविष्यात काही कार्यरत संरचनांमधून 10-12 आयजीबी निर्माण केल्या जातील. ही बाब सामरिक शक्तिवर्धनासाठी उपयुक्त असेलच; पण त्याबरोबरीने ते सेनाधुनिकीकरणाच्या अतिरिक्त खर्चाला आळा घालेल आणि सेनेचे अंतिम सामरिक ध्येय आणि महत्वाकांक्षा पूर्ण करेल.

आयजीबीची बनावट भारताच्या प्रत्येक क्षेत्रीय सीमेवरील धोका, भूभाग आणि नेमके कर्तव्य या तिन्हीवर आधारित असेल. आयजीबीचे अधिपत्य मेजर जनरल रँकचा सेनाधिकारी करेल. आयबीजींच्या एकाच वेळी, एकापेक्षा जास्त आघाड्यांवर जलद,अचूक व मारक हल्ले करण्याच्या क्षमतेमुळे भारतीय कारवाईच्या प्रत्युत्तरात चीनी आणि पाकिस्तानी सेनेला त्यांचे स्थान भक्कम करण्याची आणि प्रतिघातक हल्ला करण्याची संधी मिळू शकणार नाही.आयजीबींमुळे मारक संरचनेत चापल्य आणि गतीची सुसूत्रता तर येईलच; पण सर्वदलीय समन्वयही साधला जाईल.

सध्या कार्यरत असलेल्या आर्मी कमांडवर विविक्षित भूभागाचे सार्वभौमत्व अबाधित राखण्याची जबाबदारी असते. आर्मी कमांड सर्वात मोठी स्थिर संयंत्रणा आहे. त्यांच्या खाली कार्यरत असलेले कोअर हे सर्वात मोठ गमनशील संयंत्र (मोबाईल फॉर्मेशन) आहे. आजमितीला स्थलसेनेच्या संरचनेत तीन किंवा चार बटालियनचे ब्रिगेड, तीन ते पाच ब्रिगेड्सची डिव्हीजन आणि तीन ते चार डिव्हिजन्सचे कोअर असतात. कुठल्याही कोअरला सीमेचे सार्वभौमत्व राखण्यासाठी त्यांच्याकडे असलेल्या संसाधनांच्या महत्वानुसार, कोअर किंवा संरक्षक कोअरचा दर्जा दिला जातो.थिएटर कमांड कन्सेप्ट अंगिकारल्यावर या संरचनेत खूप मोठा बदल होईल. सांप्रत युनिट्समधील परिवर्तनांनंतर निर्माण होणार्‍या आयबीजीज उत्तर व पश्चिम क्षेत्रीय थिएटर कमांड आणि द्वीपकल्प कमांडमध्ये गरजेनुसार तैनात केल्या जातील. आयजीबींमध्ये पाकिस्तान व चीनच्या आण्विक समतोलाला धक्का न लावता, त्यांना आण्विक युद्ध सुरु करण्याची संधी न देता जलद, तीव्र पण सीमित युद्ध करून त्यांचा विविक्षित भूभाग जिंकण्याची क्षमता असेल.

या संभाव्य रणनीतीच्या माध्यमातून सीमापारहून प्रसवणारा जिहादी आतंकवाद आणि पाकिस्तानच्या प्रछन्न युद्धसंकल्पनेला पारंपरिक रणनीती अवलंबून चाप लावला जाईल. त्याचबरोबर,वेळोवेळी होणार्‍या चीनी घूसखोरीच्या वळवळीला प्रभावी प्रत्युत्तर देता येईल. सीमेजवळील छावण्यांमधे स्थित आयजीबींच्या त्वरित हालचालींमुळे एकाच वेळी मोठ्या प्रमाणावरील मारक सैनिकी संयंत्रणा, शत्रूला स्तंभित करून देशाच्या राजकीय व सामरिक ध्येयाकडे घोडदौड करू शकतात.

आयजीबींच्या माध्यमातून भारतीय सेना एकाच वेळी अनेक ठिकाणी शॅलो ऑफेन्सिव्ह करून शत्रू प्रदेशातील मोठया क्षेत्रात पुढील कारवाईसाठी पाय रोवू शकते. आयजीबी भू सीमा आणि तटीय रक्षणासाठी तसेच समुद्रातून होणार्‍या हल्ल्यांसाठी उपयुक्त असतील. स्थलसेना, नौसेना आणि वायुसेना या तीनही संरक्षणदलांच्या प्रचलित संरचनेतील उणिवांवर मात करून त्यांच्या सामरिक समन्वयाचा मार्ग थिएटर कमांड आणि आयजीबी निर्मितीमुळे प्रशस्त होईल.

पाकिस्तान आणि चीनसाठी योजलेल्या, त्यांना प्रतिहल्ल्याद्वारे कठोर दंडात्मक शिक्षा देण्याच्या संकल्पनेला,कमीत कमी वेळात आणि कमीत कमी हानी पत्करून आयजीबींच्या माध्यमातून मूर्त स्वरूपात आणता येईल. शत्रूच्या रणक्षेत्रातील पूर्वनियोजित कारवायांना आयजीबींच्या प्रतिसादातील अनिश्चिततेमुळे जबर धक्का बसू शकतो,त्या विफल होऊ शकतात. यांच्या फायर पॉवरमुळे तीनही दलांच्या संयुक्त करवाया, दोन आघाड्यांवरील युद्धे आणि अण्वस्त्र धोरणाला आवश्यक असणारी झळाळी मिळेल.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com