दिलीपकुमार : अनटोल्ड स्टोरी

दिलीपकुमार : अनटोल्ड स्टोरी

- सोनम परब

बॉलिवूडचा इतिहास लिहायला घेतला, तर तो एका नावाशिवाय पूर्णच होऊ शकत नाही. कारण ते फक्त नाव नाही. तो आहे बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार. तो आहे सर्वसामान्यांना आपण स्वत:च पडद्यावर आहोत, याचा आभास निर्माण करणारा नायक, केवळ पडद्यावरचा नायकच नाही, तर सामाजिक जीवनातही ज्यानं आपला खास ठसा उमटवला, असा तो आहे एक लढवय्याही. सुपरस्टार काय असतो, आणि कलेत परफेक्शनिस्ट असणं म्हणजे काय, हे ज्यानं त्यानंतरच्या तमाम कलाकारांना शिकवलं.... तो आहे एक महानायक... त्याचं नाव युसूफ खान, अर्थात दिलीपकुमार... या महानायकाच्या आयुष्यातील अज्ञात, अपरिचित असे खुसखुशीत किस्से...

अभिनेता दिलीपकुमार आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे नाते अगदी निकटचे होते. दोघांचे संबंध हे सख्ख्या बहिण-भावापेक्षा अधिक होते. याबाबत लता मंगेशकर नेहमी भरभरून बोलतात. त्या म्हणतात की, मला जवळचे कोण आहे असे जेव्हा वाटायचे तेव्हा दिलीपकुमार यांच्यापासून सुरवात व्हायची. ते मला लहान बहिणीप्रमाणे प्रेम करत. एवढेच नाही तर लता मंगेशकर यांच्या बिझी शेड्यूलवरून दिलीपकुमार यांना काळजी वाटायची. एकदा तर ते लाईव्ह कॉन्सर्टची यादी पाहून लता मंगेशकर यांच्यावर चिडेले होते.

पाकिजाच्या गाण्यावरून नाराजी - १९७४ मध्ये लंडनच्या रॉयल अल्बर्ट हॉलमध्ये लता मंगेशकर यांचा पहिला कार्यक्रम होता. तेव्हा या कार्यक्रमाची सुरवात करण्यासाठी दिलीपकुमार यांना पाचारण करण्यात आले होते. ’मिस्टर परफेक्टनिस्ट’ म्हणून ओळखले जाणारे दिलीपकुमार हे कोणतेही काम असो इतक्या अचूकतेने करत की त्यात शंका राहत नसे. स्टेजवर लता मंगेशकर यांच्यासंबंधी बोलायचे असल्याने त्यांनी मंगेशकर यांच्याकडून गाण्यांची यादी मागवली.

कार्यक्रमाची सुरवात पाकिजाचे गाणे ’इन्ही लोगों ने लीना दुपट्टा मेरा’ या गाण्याने सुरवात करण्याचे ठरवल्याने दिलीपकुमार नाराज झाले आणि ते लता यांना म्हणाले, की आपल्याला हे गाणे का म्हणायचे आहे. कारण या गाण्याचे शब्द तितक्या प्रमाणात ताकदीचे नाहीत’. यावर लता यांनी दिलीपकुमार यांना खूप समजून सांगायचा प्रयत्न केला. हे गाणे लोकांना खूप आवडते आणि त्यांना हे गाणे ऐकायचे, असे त्यांना सांगितले. मात्र दिलीपकुमार या मताशी सहमत झाले नाही. लता यांनी युक्तीवाद केल्यानंतर दिलीपकुमार यांनी त्याविषयी काही मत मांडले नाही.

पानसुपारीचा डबा आणि नाराजी- अशाच प्रकारचा किस्सा संगीतकार कल्याणी आनंदजी यांच्या घरी घडला. कल्याणजी यांच्या भावाकडे झालेल्या एका पार्टीत दिलीपकुमार हे लता मंगेशकर यांच्यावर नाराज झाले होते. कल्याणजींच्या भावाकडे झालेल्या पार्टीत बॉलिवूडमधील एकाहून एक मातब्बर मंडळी भोजनाचा आस्वाद घेत होती. सर्वांचे जेवण झाल्यावर लता मंगेशकर यांनी अगदी सहजपणे पानसुपारीचा डबा दिलीपकुमार यांच्यासमोर नेला. हे पाहून हसणारे दिलीपकुमार अचानक गंभीर झाले आणि त्यांनी पानसुपारीचा डबा आणणे आवडले नसल्याचे सांगितले. ते म्हणाले की, लता ही गोष्ट चांगली नाही.

चांगल्या घरातील मुली अशा प्रकारे पानसुपारीचा डबा कोणासमोर नेत नाही आणि ही गोष्ट मला खटकली. तुम्ही माझ्या लहान बहिण आहोत. हा अधिकार आपल्याला कोणी दिला. दिलीपकुमारांच्या या सल्ल्याने लता यांना विचार करण्यास भाग पडले. दिलीपकुमार यांच्यातील जो प्रामाणिकपणा, आत्मियता आणि स्वभावातील असणारा सरळपणा हा आजकाल दिसून येत नाही, असे लता मंगेशकर म्हणतात. दिलीपकुमार यांनी नेहमीच लता मंगेशकर यांच्यावर प्रेम केले आणि त्याबाबत लता या नेहमीच आभारी राहिलेल्या आहेत. लता मंगेशकर यांनी हा किस्सा लेखक यतींद्र मिश्र लिखित लता-सूरगाथा यात सांगितलेला आहे. लता मंगेशकर यांच्यावर लिहलेल्या गेलेल्या पुस्तकापैकी हे सर्वात मोठे पुस्तक मानले जाते.

ताज हॉटेल आणि सायराचे रुसणे- मायानगरीत दिलीपकुमार आणि सायरा बानो यांची जोडी बेमिसाल राहिलेली आहे. दिलीपकुमार आणि सायराबानो यांच्यातील प्रेमाला बहर आला तेव्हा पहिल्या डेटला ते मुंबईच्या ताज हॉटेलला गेले होते. मुंबईचे ताज हे दिलीपकुमार यांचे आवडीचे हॉटेल. त्यामुळेच पहिल्या भेटीला हीच जागा निवडली. परंंतु त्यांना सायराबानोंच्या भेटीचा आनंद घेता आला नाही. यादरम्यान त्यांना सतत फोन येऊ लागले आणि वेटर वारंवार येऊन फोन घेण्याचा आग्रह करत होता. हे पाहून सायराबानो रुसल्या आणि त्यांनी घरी जाण्याची इच्छा बोलून दाखवली. दिलीपकुमार यांना आपल्या चूकीची जाणीव झाली आणि ते गाडीत सोडण्याच्या बहाण्याने सायराबानो यांना बिचवर घेऊन गेले. गाडीतच त्यांनी सायरा बानो यांना लग्नासाठी मागणी घातली. अर्थात सायरा बानो यांना तर स्वप्नातील राजकुमार मिळाला होता, हे सांगायची गरज नाही.

दिलीपकुमार आणि सायरा : तेरी मेरी कहानी- असे म्हणतात की प्रेमाला वय नसते. ट्रॅजडी किंग दिलीपकुमार आणि सायरबानो यांच्या प्रेमकहानीने देखील जगाला हेच सांगितले आहे. सुरवातीच्या काळात या प्रेमी जोडींना प्रत्येकांने नाकारले होते, तरीही ते डगमगले नाही. तेच पुढे अनेक चढउतारातही खंबीरपणे एकत्र उभे राहिले होते. भेटीपासून ते विवाहापर्यंत प्रत्येक किस्सा रंजक आणि रोचक राहिलेला आहे. केवळ बारा वर्षाची असताना सायराबानो यांनी दिलीपकुमार यांना स्वप्नातील राजकुमार म्हणून शिक्कामोर्तब केले हाते. तत्कालिन काळात दिलीपकुमार हे बॉलिवूडचे सर्वाधिक लोकप्रिय अभिनेते होते. त्यांच्या अभिनयाची, रुबाबदारपणाची, देखणेपणाची भूरळ लाखो चाहत्यांना पडली होती. त्यात सायरबानो देखील अपवाद ठरल्या नाहीत. सायरबानो आणि दिलीपकुमार यांच्या प्रेमाचे असे काही किस्से आहेत की चित्रपटातील प्रेमकहान्या देखील फिक्या पडू शकतात.

पडद्यावर दिलीपकुमार यांचे आगमन- १९५२ चा काळ होता. दिलीपकुमार यांचा बॉलिवूडवर दबदबा होता. सुरवातीच्या काळातील काही चित्रपटांनी दिलीपकुमार हे बॉलिवूडचे बादशहा बनले. याच काळात त्यांचा सुपरहिट चित्रपट आन झळकला होता. दुसरीकडे सायराबानो होती. तिचे वय अवघे १२ होते. सायराबानो यांची आई नसीम बानो या स्वत: कलाकार असल्याने सायरबानो यांना चित्रपट पाहणे ही काही नवीन बाब नव्हती. मात्र त्या अन्य मंडळीप्रमाणेच दिलीपकुमार यांचे चित्रपट पाहण्यासही उत्सुक असायच्या. अशा काळातच त्या दिलीपकुमार यांचा एक चित्रपट पाहण्यासाठी टॉकीजवर गेल्या. चित्रपटात दिलीपकुमार यांनी एंट्री करताच टॉकीजमध्ये एकच टाळ्यांचा आणि शिट्यांचा आवाज घुमला. श्रोत्यांची तारीफ ऐकून टॉकीजमध्ये बसलेल्या सायरबानो यांची धडधड वाढली. पडद्यावर दिलीपकुमार यांचा चेहरा सायराबानो यांच्या डोळ्यात सामावला गेला. त्याचवेळी त्या दिलीपकुमार यांच्या प्रेमात पडल्या आणि नंतर आयुष्याच्या साथीदार बनल्या.

सायराबानो यांची ‘लंबी जुदाई’ - सायरबानो या प्रत्येक क्षणी दिलीपकुमार यांचाच विचार करत असत. काळ पुढे सरकत गेला. दिलीपकुमार आणि सायराबानो यांचे प्रेम अधिक गडद होते गेले. सायराबानो यांनी दिलीपकुमार यांना अनेकदा पडद्यावर पाहिले होते. आता त्या आपल्या स्वप्नातील राजकुमारला प्रत्यक्षात पाहयचे होते. मुगल ए आझम चित्रपटाच्या प्रिमियरला मराठा मंदिर चित्रपटगृहात दिलीपकुमार येणार असल्याची बातमी सायराबानो यांना समजली. ही बातमी ऐकून त्या बैचेन झाल्या. सायराबानो याच दिवसाची वाट पाहत होत्या. फक्त एकदाच दिलीपकुमार यानंा जवळून पाहायचे होते. मोठ्या अपेक्षेने सायराबानो मराठा मंदिरला पोचल्या. दिलीपकुमारचे चाहते अगोदरच जमा झालेले होते. मात्र काही कारणाने दिलीपकुमार तेथे पोचले नाही. दिलीपकुमार न आल्याने त्यांचा हिरमोड झाला.

राजकुमारला भेटण्यासाठी चित्रपटात ‘एंट्री’ - कोणत्याही परिस्थितीत दिलीपकुमार यांची झलक सायराबानो यांना पाहयची होती. मात्र अनेकदा प्रयत्न करुनही दिलीपकुमार यांची भेट होता होईना. काळानुसार दिलीपकुमार हे मेगास्टार बनले होते. त्यामुळे सायराबानो यांना दिलीपकुमारपर्यंत पोचणे दिवसेंदिवस कठिण होऊ लागले. त्यामुळे दिलीपकुमार यांना भेटण्यासाठी काहीतरी खास शक्कल लढवावी लागेल, असा त्यांनी विचार केला. आईप्रमाणेच त्यांनी चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून दिलीपकुमारजवळ जाणे सोपे होईल. सायराबानो यांच्यासमोर दोनच गोष्टी होत्या. पहिले म्हणजे आईप्रमाणे बॉलिवूडमध्ये मोठी कलाकार बनने आणि दुसरे म्हणजे दिलीपकुमार यांच्याशी विवाह करून आयुष्यभरासाठी सोबती म्हणून राहणे. हे दोन स्वप्ने उराशी बाळगून सायरा बानो यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल टाकले. त्यांना लवकरच ब्रेक मिळाला. त्यांना पहिल्याच जंगली चित्रपटात शम्मीकपूरसारख्या बड्या अभिनेत्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. या चित्रपटात सायराबानो यांनी आपल्या सौदर्यांची भूरळ चाहत्यांवर पाडली. त्यानंतर सायराबानो यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही.

दिलीपकुमार यांचा काम करण्यास नकार- सायराबानो यांनी चित्रपटसृष्टीत बर्‍यापैकी बस्तान बसवले होते. एकामागून एक हिट चित्रपट होऊ लागले. दिलीपकुमार यांच्यासमवेत काम करण्याची आणि ओळख करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सायराबानो यांना वाटले. तेव्हा सायराबानो या पुन्हा स्वप्न रंगवू लागल्या. मात्र त्यांना पुन्हा एकदा नशिबाने साथ दिली नाही. सायराबानो यांना एका चित्रपटात सहनायिका म्हणून आणले तेव्हा दिलीपकुमार यांना त्यांच्याविषयीची माहिती मिळाली. यादरम्यान आपले स्वप्न आता लवकरच पूर्ण होईल, असे सायरा यांना वाटू लागले. मात्र असे काही घडले नाही. दिलीपकुमार यांनी सायराबानो यांच्यासमवेत काम करण्यास नकार दिला. यामागचे कारण सांगताना दिलीपकुमार यांनी सायराबानो या त्यांच्यातुलनेत खूपच लहान असल्याचे सांगितले. दोघांची जोडी पडद्यावर चांगली दिसत नाही, असे दिलीपकुमार यांचे मत बनले होते. हे कारण ऐकून पुन्हा एकदा सायराबानो यांचे मन दुखावले गेले.

सायरा याची उर्दू भाषेची शिकवणी- एकीकडे दिलीपकुमार हे सायराबानो यांच्यापासून दूर जात होते तर दुसरीकडे सायराबानो यांचे प्रेम अधिकच वाढू लागले होते. सायराचे आई-वडिल तिच्या वर्तनाने वैतागले होते. शेवटी आई-वडिलांनी मदत करायचे ठरवले. सायराची आई आपल्या मुलीला तिचे प्रेम मिळवून देण्यासाठी धडपडू लागल्या. त्यांनी दोघांना एकत्र आणण्याचा चंग बांधला. दुसरीकडे सायराबानो देखील दिलीपकुमार यांचे मन जिंकण्यासाठी प्रयत्न करू लागल्या. दिलीपकुमार यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्यासाठी उर्दू भाषा देखील शिकली.

दिलीपकुमार यांच्याकडून स्वीकार- दिलीपकुमार सायराबानोपासून फार काळ दूर राहू शकले नाही. सायराबानो यांचा बर्थडे होता. बर्थडे पाटीचे निमंत्रण दिलीपकुमार यांना पाठवले गेले. त्यास त्यांनी होकार दिला. ठरल्याप्रमाणे दिलीपकुमार यांची गाडी त्यांच्या घरी पोचली. घरात प्रवेश करताच त्यांची नजर सायराबानोवर पडली. ते सुद्धा सायराकडे पाहतच राहिले. सायरा यांनी साडी घातली होती. त्या खूपच सुंदर दिसत होत्या. सायराबानो यांच्यात आज अल्लडपणा दिसत नव्हता. सायराबानो या पूर्ण स्त्रीप्रमाणे दिसत होत्या. शुभेच्छा देण्यासाठी दिलीपकुमार हे सायराबानोकडे वळाले परंतु नजर ढळली नाही. बर्थ डे विश करण्यासाठी दिलीपकुमार यांनी सायराला शेकहँड केले तेव्हा ते सायराबानोच्या सौंदर्यांत हरवून गेले. हीच ती वेळ होती की बॉलिवूडचा बादशहा प्रेमात बुडाला होता.

प्रेमाची कबुली- दिलीपकुमार हे बर्थ डे पार्टीची रात्र विसले नाहीत. त्यांच्यासमोर सतत सायराचा चेहरा यायचा. सायराप्रमाण दिलीपकुमार ही प्रेमात आकंठ बुडाले होते. आता त्यांना वेळ दडवायचा नव्हता. लवकरात लवकर प्रेमाची कबुली द्यायची होती. या काळात सायराबानो या झुक गया आसमानची शुटिंग करत होत्या. ते सायराकडे गेले आणि त्यांनी प्रेम व्यक्त केले. काही वेळ सायराबानो यांना विश्‍वासच बसला नाही. त्यांनी डोळ्यातल्या डोळ्यातच दिलीपकुमार यांच्या प्रेमाला होकार दिला. दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.

मात्र त्यांच्या निर्णयाला अनेकांचा आक्षेप होता कारण दोघांत खूप अंतर होते. दिलीपकुमार यांचे वय ४० तर सायराबानो या २२ वर्षाच्या होत्या. तरीही ते कोणाचाही विचार न करता विवाहाच्या बंधनात अडकण्यावर ठाम राहिले. सायराबानो आणि दिलीपकुमार यांची प्रेमाची कहानी एखाद्या चित्रपटाला शोभेल अशीच होती. दिलीपकुमार यांच्यावर अतोनात प्रेम करणार्‍या सायराबानो यांनी दिलीपकुमार यांची शेवटपर्यंत साथ सोडली नाही. ते कायम एकमेकांच्या सुख दु:खात एकत्र राहिले. दिलीपकुमार आणि सायराबानो यांच्या कहानीने जगाला एकच गोष्ट सांगितली ती म्हणजे प्रेमाला वय नसते. असे प्रेम की ते कधीही, कोणाबरोबर आणि केव्हाही होऊ शकते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com