भक्तांनो, विघ्नहर्त्याच्या उत्सवात अतिउत्साह टाळाच!

भक्तांनो, विघ्नहर्त्याच्या उत्सवात अतिउत्साह टाळाच!

एवढे मोठे महाभारत त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होते. पण त्याची मांडणी लिखित स्वरुपात त्यांना जमत नव्हती आणि म्हणून त्यांनी गणेशाची आराधना केली. गणेशाच्या आराधनेने गणपती बाप्पाप्रसन्न झाले. त्यावेळी महर्षी व्यास मूनींनी गणरायाला ममहाभारतफ लिहीण्याची विनंती केली. परंतु गणपती बाप्पांनी अटी व शर्तीवर महाभारत लिहीण्याचे कबूल केले. ती अट म्हणजे मी महाभारत अवश्य लिहिन, पण ते सांगतांना तुमच्याकडून त्यामध्ये खंड पडता कामा नये आणि मी ही ते न थांबता लिहीन. ठरल्याप्रमाणे महाभारत लिहायला सुरुवात झाली. तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील चतुर्थी.

अरुण वांद्रे

व्रत वैकल्याचा श्रावण मास नंतर भाद्रपद महिना सुरू होतो आणि सबंध हिंदुधर्मीय बांधव ज्या गणेश चतुर्थीची आतुरतेने वाट बघत असतात ती गणेश चतुर्थीची. ढोल-ताशांचा आवाज दुमदुमला. मोठ्या आनंदाने, स्फूर्तीने आणि प्रत्येकाच्या अंगात एक नवचैतन्य संचारल्याने मंगलमय वातावरणात लाडक्या गणपती बाप्पाचे घराघरात आगमन झाले. या विघ्नहर्ता बाप्पाच्या आगमनाने दु:खाच हरण होऊन प्रत्येकाच्याच मनात घराघरात सुखाचे, मांगल्याचे आणि नवचैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

माती आणि शाडू मातीच्या मूर्तींची गणेश चतुर्थीला स्थापना करण्यामागील कारणही तसेच आहे. महर्षी व्यास मूनींनी महाभारत घडण्यापूर्वी त्याची रचना करुन ठेवलेली होती. एवढे मोठे महाभारत त्यांच्या डोळ्यासमोर दिसत होते. पण त्याची मांडणी लिखित स्वरुपात त्यांना जमत नव्हती आणि म्हणून त्यांनी गणेशाची आराधना केली. गणेशाच्या आराधनेने गणपती बाप्पा प्रसन्न झाले. त्यावेळी महर्षी व्यास मूनींनी गणरायाला ममहाभारतफ लिहीण्याची विनंती केली.परंतु गणपती बाप्पांनी अटी व शर्तीवर महाभारत लिहीण्याचे कबूल केले.

ती अट म्हणजे मी महाभारत अवश्य लिहिन, पण ते सांगतांना तुमच्याकडून त्यामध्ये खंड पडता कामा नये आणि मी ही ते न थांबता लिहीन. ठरल्याप्रमाणे महाभारत लिहायला सुरुवात झाली. तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील चतुर्थी. भाद्रपद चतुर्थीला महाभारताचे लिखाण अखंडीतपणे सुरु होऊन ते भाद्रपद महिन्यामध्ये दहाव्या दिवशी संपले. तो दिवस म्हणजेच भाद्रपद शु. 14 अर्थात अनंत चतुर्दशी.

एका दिवसाचे 24 तास ु 10 दिवस = 240 तास गणपती बाप्पांनी लिखाण सातत्याने सुरु ठेवले. त्यामुळे गणपती बाप्पांच्या शरीरातील तापमान वाढले, त्यांच्या अंगाची लाहीलाही होऊ लागली. त्यांच्या वेदना कमी व्हाव्यात म्हणून त्यांच्या अंगावर दुर्वा टाकल्या, मातीचे लेपन केले आणि तेव्हा कुठे दहा दिवस न थांबता गणरायांनी महाभारत लिहून पुर्ण केले. पण, सततच्या मातीच्या लेपनाने त्यांचे अंग संपूर्ण ताठरले. त्यांना दरदिवशी लेपलेल्या मातीने व ती अंगावर वाळल्याने त्यांना खूप त्रास होऊ लागला.

व्यास मुनींनी दहाव्या दिवशी त्यांना पाण्यात ठेवले व पाण्यामुळे माती भिजून सावकाश निघून गेली. अशा रितीने महाभारत लिहीण्याचे कार्य दहा दिवसात पूर्ण करुन आपली कार्यक्षमता आणि कुशाग्र बुध्दिमत्ता गणपतींनी सिध्द केली. तेव्हापासून शाडू मातीच्या गणपतीची मूर्ती भाद्रपदातील चतुर्थीला स्थापना करण्याची आणि अनंत चतुर्दशीला या मुर्तीचे विसर्जन (पाण्यात) करण्याची सुरु झालेली प्रथा आजतागायत कायम आहे.

स्वातंत्र्याची चळवळ सुरु असतांना भारतातील जनतेवर जातीयतेचा फार मोठा पगडा होता. हीच गोष्ट टिळकांच्या लक्षात आली आणि त्यांनी ठरविले की, इंग्रजांशी लढा द्यायचा असेल तर सर्व जाती धर्माचे लोक एकत्र यायला हवेत. त्यांनी गीतेचा गाढा अभ्यास केलेला असल्यामुळे सर्व जाती-धर्माच्या लोकांना एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवासारखा दुसरा पर्याय नाही, हे त्यांच्या लक्षात आले आणि सर्वप्रथम त्यांनी पुण्यात इ.स. 1893 साली सार्वजनिक गणेशोत्सव सुरु केला.

सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने सर्वच जण जातपात विसरुन एकत्र येऊन दरवर्षी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे करु लागले. या एकजुटीचा फायदा टिळकांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी चांगल्या प्रकारे करुन घेतला. आज सबंध भारतातच नव्हे तर जगात जेथे भारतीय माणूस आहे तेथे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो.

गणपती हे दैवत म्हणजे नेमके काय? हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. हिंदू धर्मात कुठल्याही शुभारंभाच्या वेळी, मंगलकार्याच्या वेळी ज्या देवतेचे पूजन केले जाते, ती देवता म्हणजे श्री गणेश. गणेशाला बुध्दिची देवता म्हणूनही संबोधले जाते.

कलेची देवताही गणपतीच. कुठलेही काम पूर्ण करण्याची जी शक्ती प्रदान करते, ती देवता म्हणजे गणपती. कामातील अडचणी दूर करुन अभय देण्याबरोबरच योग्य-अयोग्यातील फरक सांगून गणपती न्यायदानाचे कार्यही करतो आणि म्हणूनच श्री गणेशाला अग्रपूजेच्या मानाचे स्थान आहे. गणपती आपल्याला पूर्ण क्षमतेने काम करण्याची आणि यश मिळवण्यासोबतच संघर्ष करण्याची प्रेरणा देतो.

धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चार पुरुषार्थाच गणपतीच प्रतिनिधीत्व करतो. गणपती वाईट गोष्टी आणि अज्ञानावर विजय मिळविण्यासाठी पूर्ण क्षमतेने लढण्यासाठी प्रेरणाही देतो. प्रत्येक मानवामध्ये शक्तीचा भरपूर साठा निसर्गातच असतो. त्या शक्तीचा वापर त्याने केला पाहीजे, हे ही गणपतीच सुचवितो.

मानवी शरीरातील अंर्तशक्ती ओळखण्याचा संदेशही देत असतो. तसेच आपल्या यशाच्या मार्गात येणार्‍या प्रत्येक अडथळ्यांवर मात करण्याचा संदेशही देत असतो. प्रत्येक कामात संकटे ही येतीलच पण ती दूर करण्याची शक्ती आपल्या अंर्तमनातच आहे, हा संदेशही गणपतीच देत असतो.

भगवान गणेश हे निसर्गाच्या शक्तीचे विराट रुप आहे. गणपतीमध्येच ब्रह्मा, विष्णू, महेश, सरस्वती, लक्ष्मी आणि दुर्गा यांचेही रुप आहे. गणपतीनेच झाडे, वृक्ष, वेली, फुले, फळे यांच्या रुपात स्वत:ला सामावून घेतलेले आहे. अशा रितीने गणपती एक योगी आहे आणि म्हणूनच देवाधी देवांमध्ये सर्वप्रथम पूज्य म्हणजे गणपतीलाच मानले जाते. गणपती आणि कार्तिकी यांच्यामध्ये बुध्दीमान कोण? हे बघण्यासाठी महादेवाने या आपल्या दोन्ही मुलांना पृथ्वीला प्रदक्षिणा घालण्याचे सांगितले.

तेव्हा कार्तिकी पृथ्वीला प्रदक्षिणा घालत राहीला आणि गणपतीने मात्र आपल्या आई-वडीलांना प्रदक्षिणा घालून स्वत:ला बुध्दिमान असल्याचे क्षणार्धात सिध्द केले. अशा या गणपतीची आराधना केल्याने मानवाला बुध्दि, ऐश्वर्य, मान, सन्मान, संपत्ती, आरोग्य या गोष्टी प्राप्त करता येतात. अत्यंत पवित्र, मंगलमय, सर्वांना सुख आणि जिवनात चैतन्य बहाल करणार्‍या गणेशोत्सवाला मागील वर्षापासूनच कोरोना कोविड-19 या संसर्गामुळे दुष्ट लागलेली आहे. अजूनही संपूर्णत: कोरोनाचा नायनाट झालेला नाही आणि या वर्षी सुध्दा गणेश भक्तांच्या आनंदावर कोरोनामुळे विरजन पडलेले आहे.

कारण, शासनाच्या निर्बंधांचे पालन करुन आपल्याला या ही वर्षाचा सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करावयाचा आहे. सार्वजनिक गणेश मंडळांनी शासनाच्या अटी व शर्तींचे कुठेही उल्लंघन होणार नाही याची काळजी घेऊन दहा दिवस विघ्नहर्त्याची आराधना करायची आहे. मनोभावे श्रीगणेशाची पूजा अर्चा करुन गणपती बाप्पाला साकडे घालू या की सबंध जगाला कोरोना या संसर्गजन्य रोगापासून मुक्ती मिळू दे आणि सर्वांना भयमुक्त होऊन पुनश्च एकदा या पृवीतलावर रामराज्य येऊ दे. कारण तोच खर्‍या अर्थाने पालनहार असून सुखकर्ता आणि दु:खहर्ता आहे.

अरुण वांद्रे

- केंद्र प्रमुख, शिरसोली, मो. : 9021138701

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com