Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedआव्हानांबरोबर संधीही वाढतील

आव्हानांबरोबर संधीही वाढतील

स्पर्धा सर्वच व्यवसायांमध्ये असली तरी येणार्‍या काळात आपला लौकिक टिकवण्यासाठी गुणवत्तापूर्ण पदार्थ, चवीसोबतच उत्तम व तत्पर सेवा व आगळे-वेगळे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. येणार्‍या काही वर्षांमध्ये आव्हाने वाढणार असली तरी संधीही त्याच पटीने किंबहुना त्यापेक्षा दुपटीने वाढणार आहेत.

आदित्य कासारे | नाशिक

- Advertisement -

नाशिक शहर विकासाच्या सर्वच पातळ्यांवर अतिशय वेगाने पुढे सरकत असलेले शहर आहे. विकासासोबतच शहराचा विस्तारही मोठा होत आहे. सोबतच रोजगाराच्या संधी शोधताना देशभरातील लोक नाशिकमध्ये स्थिरावले आहेत.

नाशिक म्हणजे एक मिनी भारतच आहे. देशभरातील प्रथा-परंपरा व खाण्याच्या आवडीनिवडीमुळे खवय्यांची संख्याही वाढू लागली आहे.

नाशिक शहरातील उद्योग, पर्यटन, धार्मिक स्थळे यामुळे पाहुण्यांची वर्दळ कायमच असते. त्या अनुषंगाने हॉटेल उद्योगांचे अस्तित्व अधोरेखित होत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावरील हॉटेल चेन नाशिकमध्ये स्थापित होऊ लागली आहे.

यासोबतच शहरात आधीपासूनच असलेल्या वेगवेगळ्या मध्यम हॉटेलची मोठी फळी तयार झाली आहे. सगळ्यांना येणार्‍या काळात आपल्या गुणवत्तेच्या आधारावर ग्राहक टिकवावे लागणार आहेत.

कोणतेही हॉटेलचे अस्तित्व हॉटेलच्या बांधणीतून तयार होणारे वातावरण, त्यासोबतच दिली जाणारी तत्पर सेवा व व सर्वात महत्त्वाचे म्हणजे फूड कॉलिटी अर्थात पदार्थांची चव यावर व्यवसायाचे गणित अवलंबून असते.

चव एकदा ग्राहकांच्या मनात रुजली की मग ते कितीही लांबून तेथे येत असतात. याचा अनुभव नाशिककर सातत्याने घेत आले आहेत.हॉटेल व्यवसायात ग्राहकांना तत्पर सेवा अत्यंत महत्त्वाची असते. यासाठी प्रशिक्षित व कुशल सेवकवर्ग गरजेचा असतो.

त्यातूनच येणार्‍या काळात ग्राहकांना टिकवणे हे मोठे आव्हान व्यवसायात पुढे येणार आहे. स्पर्धा रोज वाढू लागली आहे. त्यामुळे ग्राहकांसोबतच हॉटेलमधील स्टाफ टिकवणे येणार्‍या काळात डोकेदुखी ठरणार आहे.

ग्राहकांना हॉटेलमध्ये जास्त वेळ थांबवण्याकरता अथवा त्यांच्या मनोरंजनाच्या दृष्टीने आगामी काळात वेगवेगळ्या क्लुप्त्या वापराव्या लागणार आहेत. हॉटेलची बांधणी, मांडणी, निसर्गाशी जोडणी, यासोबतच मनोरंजनासाठी विविध उपक्रमांचे आयोजन हे येणार्‍या काळात वैशिष्ट्यपूर्ण ठरणार आहे.

दोनपेक्षा जास्त हॉटेलची मालिका असणार्‍या व्यावसायिकांसाठी सेंट्रल किचन ही संकल्पना कार्यान्वित होणार आहे. अनेक क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. तो पदार्थांच्या प्राथमिक प्रक्रियेमध्येही वापरावा लागणार आहे.

जेणेकरून सेवकांवर अवलंबून राहण्याची प्रक्रिया कमी होईल. यासोबतच ग्राहकांना खाद्यपदार्थांव्यतिरिक्त सेवा देणे गरजेचे होणार आहे. शनिवारी- रविवारी म्युझिकल नाईट, बार्बी क्यू नाईट, कराओके नाईट, डान्स फ्लोअर, चिल्ड्रन प्ले रूम अशा विविध गोष्टी उपलब्ध करून दिल्यास कुटुंबाला हॉटेलचा आनंद घेणे सोपे होणार आहे. त्यामुळे आगामी काळात अशा स्पर्धात्मक सुविधांची निर्मिती करण्यावर जास्त लक्ष द्यावे लागणार आहे.

शहरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या हॉटेल्सची मालिका स्थापित होत आहे. स्पर्धेमध्ये उत्पादनांची गुणवत्ता हा महत्त्वाचा भाग असतो. त्याचसोबत हॉटेल इंडस्ट्रीमध्ये ‘टेस्ट’ हा मोठा भाग आहे.

कोविडच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांपासून हॉटेल इंडस्ट्री बंद असली तरी पार्सलच्या माध्यमातून बर्‍याच ठिकाणी ग्राहकांनी आपली नाळ जोडलेली आहे. आगामी काळात ही प्रणाली जास्त वेगाने कार्यरत राहणार आहे. हॉटेलमध्ये जाण्यापेक्षा घरात पदार्थ मागवून आनंद घेतला जाऊ शकतो. पूर्ण क्षमतेने जेव्हा हॉटेल व्यवसाय सुरू होईल तेव्हा मोठ्या प्रमाणात वर्दळ हॉटेल्समध्ये येण्याची शक्यता आहे.

हॉटेलमध्ये जाऊन जेवणाचा आनंद घेण्याची परंपरा आता अनेक कुटुंबांमध्ये रूढ झाली आहे. त्यामुळे नवनवीन संकल्पना व नवनवे पदार्थ बनवणे हे आव्हान संचालकांसमोर राहणार आहे. ग्राहकांना तोच-तोचपणा नको असतो. त्यामुळे वेगळी आकर्षक मांडणी व वातावरण देण्याच्या दृष्टीने प्रत्येकाला जागरुकतेने प्रयत्न करण्याची गरज आहे.

स्पर्धा सर्वच व्यवसायांमध्ये असली तरी येणार्‍या काळात आपला लौकिक टिकवण्यासाठी गुणवत्तापूर्ण पदार्थ, चवीसोबतच उत्तम व तत्पर सेवा व आगळे- वेगळे वातावरण निर्माण करण्याची गरज आहे. येणार्‍या काही वर्षांमध्ये हॉटेल्समध्ये नवनवे बदल करणे क्रमप्राप्त ठरणार आहे.

सुरक्षिततेच्या उपाययोजनां- बाबत नागरिक जागरुक झाले आहेत. त्याचीही काळजी करणे येणार्‍या काळात हॉटेलचालकांना बंधनकारक ठरणार आहे. आव्हाने वाढणार असली तरी संधीही त्याच पटीने किंबहुना त्यापेक्षा दुपटीने वाढणार आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या