देवळालीचे क्रीडा विश्व
देवळालीचे क्रीडा विश्व
फिचर्स

देवळालीचे क्रीडा विश्व

-अनिल दिवाणे

Gokul Pawar

Gokul Pawar

विविध खेळ व खेळाडूंची नगरी म्हणूनही देवळाली कॅम्पची देशभर ओळख आहे. शहराला खेळाचा वारसा आहे तो हॉकीचा! ब्रिटीशकालीन लष्करी छावणी असलेल्या या शहरात सातत्याने हॉकी खेळली जात असे. देशभरातील लष्करी खेळाडू यानिमित्ताने शहरात येत. ब्रिटीश राजवटीत भारतीय लष्कराने येथे अनेक स्पर्धा घेतल्या. येथील ‘कॅण्डेथ हॉकी स्पर्धा’ राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च स्पर्धा म्हणून गणली गेली. या स्पर्धेतून देवळालीने अ‍ॅण्टिक यांच्या रूपाने देशाला पहिला हॉकीपटू दिला.

निसर्गरम्य वातावरण व लष्करी प्रशिक्षण केंद्र म्हणून देवळालीची जगभर ओळख आहे. तशी विविध खेळ व खेळाडूंची नगरी म्हणूनही देवळालीची देशभर ओळख आहे. देवळालीशेजारील भगूर गावाची ओळख केवळ स्वातंत्र्यवीर तात्याराव सावरकर यांच्यामुळे असली तरी येथील लाल मातीत दम घुमटवणारे अनेक मल्ल तयार करणारी नगरी म्हणूनही भगूर परिचित आहे.

देवळाली कॅम्प शहराला खेळाचा वारसा आहे तो खर्‍या अर्थाने हॉकीचा! ब्रिटीशकालीन लष्करी छावणी असलेल्या या शहरात सातत्याने हॉकी खेळली जात असे. देशभरातील लष्करी खेळाडू यानिमित्ताने शहरात येत. ब्रिटीश राजवटीत भारतीय लष्कराने येथे अनेक स्पर्धा घेतल्या. येथील ‘कॅण्डेथ हॉकी स्पर्धा’ राष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च स्पर्धा म्हणून गणली गेली. या स्पर्धेतून देवळालीने अ‍ॅण्टिक यांच्या रूपाने देशाला पहिला हॉकी खेळाडू दिला. अ‍ॅण्टिक यांनी 1962 च्या ऑलिम्पिकमध्ये सहभाग घेऊन देशासह देवळालीचे नाव उज्ज्वल केले. येथील हॉकीच्या महिम्याचे आकर्षण लष्करासह नागरी विभागातील खेळाडूंना न झाल्यास नवल! ‘एमईएस’मध्ये नोकरी करणारे अनेक खेळाडू भारतीय लष्करी संघाकडून खेळताना आपला करिष्मा दाखवत. त्यांच्याच पावलांवर पाऊल ठेवत येथे गल्लोगल्ली हॉकीचे खेळाडू तयार झाले. गवळीवाडा, देवळाली इलेव्हन, वेलकम इलेव्हन, मॉमेडियन क्लब या संघांतून खेळणार्‍यांनी पुढे विद्यापीठ आणि राष्ट्रीय स्तरावरही नावलौकिक कमावला. त्या जोरावर त्यांना सरकारी सेवेत काम करण्याची संधी मिळाली.

हॉकीपाठोपाठ सर्वाधिक लोकप्रिय मैदानी खेळ म्हणून फुटबॉल या खेळाकडे पाहिले जाते. उत्तर महाराष्ट्रातील सर्वाधिक फुटबॉल स्पर्धा याच शहरात खेळल्या जातात. पूर्वी रिपब्लिकन सोशल ग्रुप, विद्यार्थी सेना, आनंद स्पोर्टस क्लब, भीमस्टार यांच्या स्पर्धांसाठी राज्यातील नामांकित खेळाडू हजेरी लावत. आजही येथे खेळली जाणारी गुरू सोशल फाउंडेशनची स्पर्धा अखिल भारतीय पातळीवर आयोजित केली जाते. त्या निमित्ताने येथील युवा खेळाडूंना दर्जेदार खेळाचे प्रात्यक्षिक पाहावयास मिळत आहे.

हॉकी, फुटबॉलसोबतच क्रिकेटचेही या शहरात मोठे आकर्षण आहे. मास्टर स्पोर्टस क्लबकडून गेल्या 23 वर्षांपासून येथे राज्यपातळीवरील कै. विजय भोर क्रिकेट स्पर्धा भरवली जाते. राज्यातील एक नामांकित व दर्जेदार स्पर्धा म्हणून अनेक खेळाडूंनी येथे हजेरी लावली आहे. त्यात रणजीपटूंचाही समावेश आहे. ‘रायगडचा टायगर’ म्हणून टेनिस क्रिकेटमध्ये देशभर ज्याच्या नावाचा डंका आहे तो उस्मान पटेल व त्याचा उमर क्रिकेट संघदेखील गेल्या वर्षीच्या स्पर्धेला खेळला. दक्षिणेकडील अभिनेता संजय चवानसह प्रसिद्ध अभिनेत्री भूमिका चावला यांची हजेरी या स्पर्धेत लागली आहे.

याशिवाय प्रसिद्ध कसोटीवर विनोद कांबळीने विजय भोर स्पर्धेचे आयोजन-नियोजन आणि प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहून ही स्पर्धा ‘टेनिस क्रिकेटचा वर्ल्डकप’ असल्याचे उद्गार काढले होते. खासदार हेमंत गोडसे यांच्या पुढाकाराने येथील मैदानावर उभारलेली प्रेक्षक गॅलरी यामुळे येथील युवा खेळाडूंमध्ये चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. या स्पर्धेला अनेकांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मास्टर स्पोर्टस क्लबचे अध्यक्ष सुनील दिनकर व त्यांच्या टीमचे हौसले बुलंद झाले आहेत. दिवसेंदिवस क्लबची सदस्य संख्याही वाढत आहे.

‘स्क्वॅश’ या खेळाचे आंतराष्ट्रीय खेळाडू याच शहरात निर्माण झाले आहेत. मेखला सुभेदारने या खेळात देशाचे प्रतिनिधित्व केले आहे. लष्करी विभागात आजही अनेक खेळाडू घडवण्याचे काम सुरू आहे. लॉनटेनिसमध्येही महाराज बिरमानी यांच्या टेनिस कोर्टवर 4 ते 40 वर्षे वयोगटातील खेळाडू सराव करतात. येथील अनेक खेळाडूंनी राष्ट्रीय पातळीपर्यंत मजल मारली आहे. भविष्यात येथून राष्ट्रीय खेळाडू निर्माण झाल्यास नवल वाटायला नको.

देशी खेळातही भगूर-देवळाली मागे नाही. स्वातंत्र्यसैनिक नरसिंगराव बलकवडे व्यायामशाळा ही उत्तर महाराष्ट्रातील अतिशय उच्च व गुणवत्ताधारक व्यायामशाळा म्हणून नावाजलेली आहे. 1986 मध्ये स्थापन झालेल्या या व्यायामशाळेची भरभराट अध्यक्ष अ‍ॅड. गोरखनाथ बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाली. कुस्ती, कबड्डी, शरीरसौष्ठव, ज्युडो, कराटे, किक बॉक्सिंग, लेझीम, लाठीकाठी, मलखांब यासारख्या मैदानी खेळांचा प्रसार करणार्‍या खेळाडूंच्या क्रीडा पंढरीतून शेकडो खेळाडू राष्ट्रीय पातळीवर चमकले आहेत. 70 वर्षांत नाशिकचा पहिला ‘महाराष्ट्र केसरी’ झालेला हर्षवर्धन सदगीरने याच व्यायामशाळेच्या लालमातीत घाम गाळला. विशाल बलकवडेसारखा आंतरराष्ट्रीय मल्ल याच व्यायामशाळेची देणगी आहे. इनडोअर व आऊटडोअर अशा दोन्ही प्रकारच्या अनेक स्पर्धा या व्यायामशाळेने यशस्वी केलेल्या आहेत. या स्टेडियममध्ये राष्ट्रीय महिला कुस्ती व ज्युडो स्पर्धा राज्यभर गाजली.

यंदा प्रथमच प्रो कुस्ती लिग स्पर्धा घेण्यात आली. छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतील राणादाने स्पर्धेला हजर राहून मल्लांना प्रोत्साहन दिले. लष्करी शिस्त व आरोग्यदायी वातावरणामुळे परिसरातील युवकांना बालवयातच खेळाची आवड निर्माण होते. गरज असते ती केवळ सुयोग्य मार्गदर्शनाची! त्यासाठी विविध क्लब सातत्याने प्रयत्नशील आहेत.

देवळालीच्या आनंदरोड मैदानावर अत्याधुनिक स्टेडियमचा प्रस्ताव बोर्डाने दिल्ली दरबारी पाठवला आहे. त्याचा पाठपुरावा खासदार हेमंत गोडसे यांच्याकडून झाला तर राष्ट्रीय दर्जाचे स्टेडियम येथे उभे राहील. तसे झाल्यास येथून नवनवे आंतरराष्ट्रीय खेळाडू निर्माण होतील. ते देवळालीचे नाव जगात रोशन करतील.

Deshdoot
www.deshdoot.com