डेलीसीयस् शेंदडी

वाईक शोधायचो पण शेंदडीच सापडायची...
डेलीसीयस् शेंदडी

मोहनदास भामरे

धुळे - Dhule

आज खुप वर्षांनी शेतात आलो. मातीत रंगलो.मातीत खेळलो.मातीत लोळलो,माती हातात घेतली.खुप दिवसांचा विरह असल्याने तिला कुरवाळले, आंजारले, गोंजारले व भक्ती भावाने कपाळाला ही लावले.

काळी माती.. रंग नाही ..रुप नाही..

पण तिच्या उदरातुन किती नाना रंगांचे, नाना ढंगांचे, नाना चवींचे पीक व फळे ती जन्माला घालते.

शेतात गेल्यावर ही माऊली काही ना काहीतरी खायाला देतेच. आज काय मिळेल खायाला? म्हणुन तिच्याकडे लहान बाळासम हट्ट धरला. या मातेला ते समजले की काय?

तेवढ्यात एका वेलीत पाय अडकला.

पाय मोकळा करावा म्हणुन खाली वाकलो तर डोळ्यात भरले ते कोवळे लुसलुशीत वाईक!फटकन तोडले नि तोंडात टाकले.वाह., काय गोड चव लागली म्हणून सांगु? लगेच मी अजुन वेल ऊलटे सुलटे केले. अजुन एक पानांच्या आड दडलेलं एक वाईक मला खुणावत होते.तेही तोडले नि टाकले तोंडात..

वाह..मजा आली. बाजारातुन आणलेल्या फळापेक्षा झाडावरुन वा वेलीवरुन तोडुन खाण्याची मजाच और असते.

माणसाचं कसं असतं नाही? एक मिळालं की लगेच अजुन शोधायचं.अजुन मिळवायचा मोह.. पुढच्या वेली धुंडाळल्या.. धुंडाळता धुंदाळता एक वेल दिसली तिला खुप खुप वाईक लागलेले दिसले.मला खुप आनंद झाला.मी एक दोन तोडले नि कच् कन चावून तोंडात घातले.,

अरे बापरे...थु...थु.. करत बाहेर थुकले.कडुशार चव त्याची.,

अरे त्या शेंदड्या आहेत.कढू असतात त्या...

मित्र ओरडला. मी थबकलो. ती वेल पाहिली फळे पाहिली.बिलकुल वाईक सारखीच..ईतकासाही फरक नाही.

वाईक शोधायचो पण शेंदडीच सापडायची. रंगारुपाला आकर्षक म्हणुन वाईक समजत तोंडात घालायचो.चाखायचो ..कडुशार चवीने थु थु करत थुंकायचो.

पाहता क्षणी कसं ओळखायचं त्यांना?

अरे वेड्या एकाद दुसरं दिसतं ते वाईक नि घडचे घड आढळतात त्या शेंदड्या, किती लगडलेली वेल ती..फळेच फळे..पण कडुशार!

मी मातीकडे तक्रारच केली. काय ग बये.. गोड फळे कमी व कढू फळे भरपुर?

असं कसं? माती हसली. गोड हसली...

हो...एकाच मायच्या पोटी जन्म घेणारी लेकरं., सारखीच थोडी निपजतात? दिसामाजी काळे गोरे असणारच...

सांगता सांगता माती विव्हळतांना भासली....हतबलपणे! तिचं विव्हळणं दुर्लक्षितच..पण तिच्या उदरातलच ते अपत्य..

मी परतलो, परततांना एक माऊली मात्र त्या शेंदड्या तोडुन तिच्या फाटक्या लुगड्याच्या खोळमध्ये भरत होती. तिला विचारलं. यातर कढू आहेत ना ताई? हो,,.पण त्यांची भाजी छान लागते...

बापरे..कढू शैंदड्यांची ही भाजी? मला आश्चर्य वाटले..

मी त्या मायच्या घरी गेलो.शेंदड्यांची भाजी खाणेसाठी. तिने भाजी केली.चवळी घातली.शेंगदाण्याचे कुट टाकुन जायकेदार फोडणी दिली. चमचमीत भाजी तय्यार..

तिचा फोटो काढला.

बाजरीच्या भाकरीचा काला मोडुन ती भाजी खाल्ली,

एक आगळी वेगळी अप्रतिम व अवीट चवीचा मनसोक्त आस्वाद घेतला व ढेकर देत तुम्हाला हे सांगतोय,,

पाकखान्यातला मेणु कसा बनला? हे करणार्या माणसाच्या कलेवर अवलंबून असते.पदार्थ तेच असतात पण त्यांचे प्रमाण जोखुन प्रसन्नतेने पकवले तर कडु कारले वा कडू शेंदडीचाही साखरपाक होतो.माझी खान्देशातील गरीब माय म्हणुनच कोंड्याचा मांडा करु शकते व कडु शेंदडीचा साखरपाक..

आणि तो पक्वान्न खाणार्याच्या चोखंदळ जीभेपेक्षा त्याच्या मनाच्या ऊभारीवर जास्त अवलंबुन असतो,

चवीला जेमतेम असलैला पदार्थालाही अस्सल खवैय्या चवदार बनवत असतो.तो असा काही थाटात जेवतो की कडु शेंदडीलाही वा कडु कारल्यालाही गोडवा प्राप्त करुन देतो.

समोरचा पदार्थ आनंदाने खाल्ला तर गोड लागतो.त्याची नावे अशी ठेवावीत की तोंडाला पाणीच सुटावे.म्हणुनच की काय,बालपणी आम्ही बिना तेलाच्या खुडमिर्चीच्या पाण्यालाही चिली वॉटर या गोंडस नावाने काला मोडुन खायचो.

असच काहीसं झालं.

त्या शेंदडीच्या मेणुला कौतुकाने कडेवर घेतला व त्याला मायेनै आंजारुन गोंजारुन केळीच्या पानावर परोसला म्हणून त्याची ऊंची वाढली, म्हणुनच शैंदडीचा कडुपणा जाऊन ती गोड झाली .....

शेंदडी डेलीसीयस झाली.आपल्या ताटात जे काही आहे त्याचे नाव वा सौंदर्यातच चव शोधली की ती चवदार असते, पौष्टीक असते, अन्नाला पुर्णब्रह्म समजले की ते अधिक चविष्ट बनते.

मग काय?

शेंगदाण्याला काजु बदाम व मठला मटन बनायला कितीसा वेळ लागतो? शेतात मला आश्चर्य वाटलं खरं

पण क्षणभरच...

रोज रोज गोड वाईक मिळत नाही म्हणुन आमची माय हळहळत नाही.जे मिळतं त्यात आनंद शोधण्याची कला माझ्या गरीब मायला अवगत आहे, कडु शेंदडी लाही डेलीसीयस करण्याची किमया माझ्या खान्देशची माय करु शकते... माझी खान्देशची मायच करु शकते..

- मो. नं. 98505 15422

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com