Friday, April 26, 2024
HomeUncategorizedदखल: सहकारात आदर्श पायंडा

दखल: सहकारात आदर्श पायंडा

नाशिक | विजय गिते | Nashik

‘विना सहकार नाही उद्धार’ या उक्तीप्रमाणे जिल्ह्यात व राज्यभर सहकार क्षेत्रात (Cooperative sector) जोमाने कार्य सुरू आहे. मात्र,या क्षेत्रातही अलीकडच्या काळात काही ठिकाणी अपप्रवृत्तींनी शिरकाव करत सहकार क्षेत्राचे कुरण करून ‘स्वाहाकार’ केल्यामुळे सहकार क्षेत्र बदनाम होत आहे. मात्र, अशाही गोड-कटू अनुभवाच्या परिस्थितीत दिंडोरी तालुक्यातील (dindori taluka) उमराळे (umrale) बुद्रुक सोसायटीने मार्गदर्शन मंडळाची पाच वर्षांसाठी निवड करत सहकार क्षेत्रात एक आदर्शवत पायंडा घातला आहे.

- Advertisement -

उमराळे बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था (Executive Service Cooperative Society) मर्यादित या सोसायटीच्या संचालक मंडळाची पहिली बैठक संस्थेचे नवनिर्वाचित चेअरमन अधिकराव श्रीधर केदार (Chairman Adhikrao Sridhar Kedar) यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीला उत्सुकता म्हणून विद्यमान संचालक मंडळ हजर होतेच. परंतु, गावातील ज्येष्ठ-श्रेष्ठ व्यक्ती, तरुण कार्यकर्तेही मोठ्या संख्येने मंदिरासमोर आले होते.

आपल्याला या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये बसता येणार नाही. हे त्यांना माहीत होते. परंतु, आमच्या सर्व बैठका या ओपन हाऊसप्रमाणे राहतील व सर्वांना आमच्या संचालक मंडळाच्या बैठकीमध्ये बसता येईल, नव्हे तर हजरही राहता येईल, असे संचालक मंडळाने आधीच जाहीर केले होते. त्यामुळे सर्वजण हजर होते. यावेळी स्वीकृत संचालक म्हणून 5 वर्षांकरिता कचु सोनवणे तर तज्ज्ञ संचालकांची निवड करण्यात आली.

सर्वात महत्वाचे म्हणजे या बैठकीत ‘मार्गदर्शन मंडळा’ची निवड 5वर्षाकरिता करण्यात येऊन सहकारातला एक नवा आदर्श पायंडा या दिवशी पाडला. संचालक मंडळाप्रमाणेच नव्हे तर एक पाऊल पुढे हे ज्येष्ठांचे मार्गदर्शन मंडळ काम करेल असे जाहीर करण्यात आले. या मार्गदर्शन मंडळात 17 लोकांची निवड करण्यात आली. सामाजिक समतोल राखून ही निवड सर्वानुमते करण्यात आली.

जाब विचारण्याचे करणार काम

हे मंडळ दैनंदिन कामकाजावर लक्ष ठेवणे, थकबाकी वसुलीवर लक्ष देणे, अपूर्ण शेअर्स पूर्ण करणे, मयत सभासदांचे शेअर्स वारसांना त्वरित देणे, सभासदत्व व भागभांडवल वाढविणे अशी कामे या मार्गदर्शन मंडळाने लक्ष देऊन करवुन घ्यावी, असे ठरले. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ज्याप्रमाणे कुटुंबात ज्येष्ठ व्यक्ती असतील व त्यांचा सल्ला घेऊन निर्णय घेण्यात आले तर ते निर्णय चुकत नाही. त्याचप्रमाणे आम्ही संचालक मंडळ घेत असलेले निर्णय बरोबर आहे की चुकीचे, संस्थेच्या गावाच्या हिताचे आहे की, अहिताचे? याचा जाब विचारण्याचे किंवा संचालक मंडळाच्या निदर्शनास आणून देण्याचे काम हे मार्गदर्शक मंडळ करील,असा ठरावही करण्यात आला.

‘सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास’

सहकारात अनेक वाईट, चुकीच्या घटना घडतात व त्या दररोज प्रसिद्धी माध्यमात येतात. परंतु,उमराळे बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेने हा एक आदर्श पायंडा पाडून ‘सबका साथ-सबका विकास-सबका विश्वास’ ही घोषणा सार्थ ठरविली आहे. स्वच्छ व पारदर्शक कारभार करण्याच्या दृष्टीने हे पहिले पाऊल संस्थेने टाकले आहे. उमराळे बुद्रुक व नाळेगाव पंचक्रोशीतील सर्व नागरिक, सभासद व शेतकरी बांधवांनी या कार्याला हातभार लावावा, लक्ष द्यावे, सहकार्य करावे, अशी अपेक्षा संचालक मंडळाने व्यक्त केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या