दखल: काँग्रेस पदाधिकारी नावे अंतिम; मुहूर्त सापडेना

दखल: काँग्रेस पदाधिकारी नावे अंतिम; मुहूर्त  सापडेना

नाशिक | विजय गिते | Nashik

ज्याआज होणार, उद्या होणार अशा अपेक्षेवर असणार्‍या नाशिक शहर (nashik city) आणि जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या (District Rural Congress) कार्यकर्त्यांची पदाधिकारी नियुक्तीची अपेक्षा अजूनही पूर्ण होत नसल्याची चिन्हे आहेत.

यामुळे कार्यकर्ते (activists) सैरभैर असल्याचे चित्र आहे. लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या (Local bodies) निवडणुकांचा (election) बिगुल वाजण्याची चिन्हे आहेत. मात्र, शहराध्यक्षाविना नाशिक शहर काँग्रेस (Nashik City Congress) अशी परिस्थिती आहे.

शहर काँग्रेस आणि ग्रामीण काँग्रेसमध्ये आता भाकरी फिरविण्याचा निर्णय प्रदेश काँग्रेस कमिटीने (State Congress Committee) घेतलेला असल्याचे निश्चित आहे. यासाठी शहराध्यक्षपदासाठी नाव मुक्रर झालेले असून ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी आता दोन जणांची निवड करण्यात येणार असून या पदांसाठीही नावे अंतिम झालेली आहे. मात्र, या निवडीची घोषणा करण्यास प्रदेश काँग्रेसला (State Congress) आणि प्रदेशाध्यक्षांनाही मुहूर्त केव्हा सापडेल? अशी चर्चा आता शहर जिल्हा काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकार्‍यांमध्ये सुरू झाली आहे.

काँग्रेसच्या संघटनात्मक बदलाला पदवीधरचा अडसर असल्याने नावे निश्चित होऊनही ती जाहीर होण्यास विलंब होत आहे, अशी चर्चा आहे. शहराध्यक्षपदी शाहू खैरे (Shahu Khaire as City President) यांचे नाव अंतिम झाले असून, त्याबाबतचे नियुक्तीपत्र देखील तयार असल्याचे सांगितले जात आहे. पक्षाच्या नवीन धोरणानुसार जिल्ह्याला दोन जिल्हाध्यक्ष दिले जाणार आहेत. यात इगतपुरीचे (igatpuri) अ‍ॅड. संदीप गुळवे (Adv. Sandeep Gulve) व लासलगावचे (lasalgaon) गुणवंत होळकर यांची नावे निश्चित झाल्याचे बोलले जाते.

काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यापासून मागील आठवड्यात चौथ्यांदा नाशिक शहर व जिल्हा दौर्‍यावर आलेल्या प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (State President Nana Patole) यांच्याकडून संघटनात्मक बदलासंदर्भात पुन्हा अपेक्षा भंग झाला. प्रत्येक दौर्‍याच्या वेळी दोन दिवसांत संघटनात्मक बदल होतील, असे प्रदेशाध्यक्ष जाहीर करतात. प्रत्यक्षात नाशिकहून (nashik) पाठ फिरविली की, काहीही होत नसल्याचा अनुभव पक्ष कार्यकर्त्यांना नित्याचा झाला आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघाची (Nashik Graduate Constituency) निवडणूक (election) असल्याकारणानेच संघटनात्मक बदल करता येत नसल्याचीही चर्चा आहे. याबाबत प्रदेशाध्यक्ष पटोले यांनीही तसे मत व्यक्त केले आहे. शहराध्यक्षासह दोन्ही जिल्हाध्यक्षांची नावे निश्चित आहेत. मात्र, हा अडसर असल्याचे सांगत नावे जाहीर होऊ शकत नसल्याची चर्चा आहे. एकीकडे शहर असो की, जिल्हा काँग्रेस अंतर्गत गटबाजीमुळे पक्षाची रया गेलेली आहे.

शहरासह जिल्ह्यात पक्ष औषधालाही शिल्लक राहिलेला नाही, असे पक्षाचे कार्यकर्तेच खेदाने म्हणत आहेत. आशा बिकट परिस्थितीतीतून सावरण्यासाठी संघटनात्मक बदलाची मागणी स्थानिक पातळीवरून वारंवार होत आहे. मात्र, याला वेळोवेळी गटबाजी अडसर ठरत आली आहे. काँग्रेस पक्षातीळ आक्रमक चेहरा अशी ओळख असलेले पटोले यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर नाशिक शहरासह जिल्ह्यात बदल होतील, अशी अपेक्षा होती. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी दौरे करत नाशिकसाठी मुंबईत (mumbai) खास बैठका देखील घेतल्या. मात्र, पटोले यांना अजूनही नाशिक शहराध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष (Nashik City President and District President) नियुक्त करता येऊ शकलेले नाही.

पक्षाच्या राजस्थानमधील शिबिरानंतर आठ वर्षांपासून प्रभारी शहराध्यक्ष काम करत आहे. एक व्यक्ती एक पद या निकषानुसार प्रदेश उपाध्यक्ष शरद आहेर (State Vice President Sharad Aher) यांनी प्रभारी शहराध्यक्षपद सोडून तीन महिन्यांचा कालावधी लोटला. त्यानंतर पटोले यांनी शहर व जिल्हा काँग्रेसची आढावा बैठक घेत पदाधिकार्‍यांशी संवाद साधला. यात दोन दिवसांत नवीन शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्ष जाहीर केला जाईल, असे सांगितले. यापूर्वी प्रत्येक दौर्‍यातही पटोले यांनी हीच घोषणा केली. मात्र, मुंबईत गेले की, कोणत्याही हालचाली होत नाही. त्यामुळे पक्षांतर्गत मरगळ आली आहे.

प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या चौथ्या नाशिक दौर्‍यात बदल होतील,अशी चर्चा होती. मात्र, हा दौराही अपेक्षा भंग करणाराच ठरला. पक्षातील अनेक ज्येष्ठ, श्रेष्ठ पदाधिकारी, लोकप्रतिनिधींनी पटोले यांची भेट घेत संघटनात्मक बदलाबाबत चर्चा केली व निवडणुकांना सामोरे जायचे असल्यास संघटनात्मक बदलाशिवाय पर्याय नसल्याचे निदर्शनास आणून दिले.

पटोले यांनी सर्वांशी संवाद साधला. मात्र, नाशिक पदवीधर उपाध्यक्षपदी आहेर यांची वर्णी लागल्यानंतर, आहेर यांनी शहराध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे रिक्त झालेल्या शहराध्यक्षपदी शाहू खैरे यांचे नाव अंतिम झाले असून, पत्रदेखील तयार असल्याचे सांगितले जात आहे, तसेच जिल्ह्याला दोन जिल्हाध्यक्ष दिले जाणार आहेत. यात अ‍ॅड. संदीप गुळवे व गुणवंत होळकर यांची नावे निश्चित झाल्याचे बोलले जाते. मात्र, ही नावे जाहीर केली जात नसल्याने पक्षांतर्गत नाराजी पसरली आहे.

नाराजी ओढवून घ्यायची नाही

नाशिक पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढील वर्षी होऊ घातली आहे. त्यामुळे पक्षांतर्गत संघटनात्मक बदल करत कोणाचीही नाराजी ओढवून घ्यायची कशाला, अशी भूमिका पक्षाने घेतल्याने बदल होत नसल्याचीही चर्चा पक्षांतर्गत आहे. जिल्ह्याचे संपर्कनेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना दुखवायचे नाही, या भावनेतूनही शहराध्यक्ष, जिल्हाध्यक्ष निवडी रखडल्याची चर्चा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com