दखल: दहा वर्षांनंतरही कांद्याचा भाव ‘जैसे थे’

दखल: दहा वर्षांनंतरही कांद्याचा भाव ‘जैसे थे’

नाशिक | विजय गिते | Nashik

महागडे बियाणे (Seeds), औषधे, मजूरटंचाई (Labor shortage), निसर्गाचा लहरीपणा, विजेचे भारनियमन अशा संकटांवर मात करत शेतकरी (farmers) कांद्याचे उत्पादन घेतो. उन्हाळ कांद्याबाबत (summer onion) बोलायचे म्हटले तर अखेरच्या टप्प्यात पाणीटंचाई (Water scarcity) आणि वाढत्या उष्णतेमुळे कांदा उत्पादनात किमान 40 टक्के घट तर नित्याची झाली आहे तरी चांगला बाजारभाव मिळून उत्पन्न हाती येईल, ही अपेक्षा फोल ठरत आहे.

सातत्याने कांदा (onion) भावात घसरण होत असल्याने उत्पादनखर्चही भरून निघण्याची चिन्हे नाहीत. या गंभीर परिस्थितीकडे शासनाने पूर्णत: दुर्लक्ष केल्याने कष्टकरी शेतकरी मेटाकुटीस आला आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी कांदा उत्पादक शेतकर्‍यांकडून वारंवार रास्ता रोकोचे हत्यार उपसले जाते. मात्र, यावर रामबाण उपाय अजून राज्यकर्त्यांकडून केला जात नाही. खर्चात भरमसाठ वाढ; मात्र भाव मात्र ‘जैसे थे’ असून दहा वर्षांपूर्वी कांद्याला जो भाव मिळत होता तोच भाव आजही मिळत आहे. त्यामुळे खर्च आणि उत्पन्न याचा मेळ कसा साधायचा, असा प्रश्न कांदा उत्पादकांसमोर आहे.

जिल्ह्यातील लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचाच (Lasalgaon Agricultural Produce Market Committee) आढावा घेतला तर 12 वर्षांपूर्वी एप्रिल महिन्यात 625 रुपये प्रति क्विंटलने विक्री झालेला कांदा यावर्षीही त्याच सरासरीने विक्री होत आहे. गेल्या 10 ते 12 वर्षांमध्ये महागाई झपाट्याने वाढत असतांना कांदा सहाशे ते एक हजार रुपये या दरानेच विक्री होत आहे. उत्पादन खर्चात भरमसाठ वाढ होत असताना शेतमालाचे दर मात्र ‘जैसे थे’ असल्याचे आकडेवारी वरून स्पष्ट होते.

कांदा पीक नगदी समजले जात असले तरी ते जुगारासारखे झाले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे उत्पादनातही मोठी घट झाली आहे. त्यामुळे उत्पादन खर्चाच्या निम्मेच उत्पन्न मिळत असल्याने कांदा शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी आणत आहे. भाव असला की कांदा नाही आणि कांदा असला तर भाव नाही. कृषी उत्पन्न बाजार समिती 10 वर्षांपूर्वी आणि आजही सहा ते दहा रुपये किलो दरानेच कांदा खरेदी करत आहे. दुसरीकडे मात्र उत्पादन खर्चात तिपटीने वाढ झाली आहे. 10 वर्षांपूर्वी कांद्याला साधारण एकरी खर्च 20 हजारांपर्यंत येत होता, तोच खर्च आज 70 हजारांपर्यंत गेला आहे. इंधन दरवाढीमुळे तर शेतीच्या उत्पादन खर्चात भरमसाट वाढ झाली आहे. रासायनिक खते, कीटकनाशक यांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मात्र, त्यातुलनेत शेतमालाचे दर वाढत नाही, असे चित्र आहे.

कृषिप्रधान असलेल्या देशात सरकारने सर्व शेतमालाला हमीभाव देणे गरजेचे आहे. शेती पिकविण्यासाठी लागणार्‍या सर्व गोष्टींचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. मात्र शेतमालाच्या भावात वाढ झाली नाही. त्यामुळे बळीराजाला नुकसानीत शेती करावी लागत आहे. राज्य व केंद्र शासनाकडून शेतकर्‍यांबाबत नेहमीच चुकीचे धोरण अवलंबिले जात असल्याने दिवसेंंदिवस शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढत असल्याचा आरोप होत आहे.

कांद्यावर खरिपाचे अर्थकारण अवलंबून असताना शेतकर्‍यांना योग्य मोबदला मिळत नाही. नाफेडकडून खरेदी सुरू असताना देखील कांद्याच्या दरातील घसरण थांबलेली नाही. कांद्याला किमान अडीच हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळणे आवश्यक आहे, तसेच येथून मागे विकलेल्या कांद्याला प्रतिक्विंटल पाचशे रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी कांदा उत्पादकांकडून होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com