संकट कोविड कचर्‍याचे

संकट कोविड कचर्‍याचे

- अपर्णा देवकर

एका आकडेवारीनुसार मे महिन्यात दररोज सरासरी 203 टन कोविड कचर्‍याचे उत्पादन होत असल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. विशेष म्हणजे 10 मे रोजी सर्वाधिक 250 टन कचरानिर्मिती झाल्याची नोंद झाली. गेल्या वर्षी एका दिवसात विक्रमी 220 टन कचरा साचला. दुसर्‍या लाटेने गेल्या वर्षीच्या आकडेवारीला मागे टाकले आहे. त्यामुळे कोरोना संकटावर मात करताना आता कोविड कचर्‍याचे संकट समोर उभे राहिले आहे.

एकीकडे देश कोविडच्या दुसर्‍या लाटेतून सावरत असताना आता दुसरीकडे सरकारसमोर कोविडचा कचरा हे मोठे आव्हान उभे राहिले आहे. दुसर्‍या लाटेत हजारोंचे प्राण गेलेले असताना बायोमेडिकल कचर्‍यात देखील प्रचंड वाढ झाली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी भारतात वेगाने खासगी, सरकारी आणि नर्सिंग होम आणि प्रयोगशाळा वाढवल्या. त्यामुळे तितक्याच वेगाने बायोमेडिकल कचरा देखील वाढत चालला आहे.

कोरोना आणि ब्लॅक फंगसच्या संकटात इंजेक्शन, सुई, सिरिंज, ग्लुकोज आदींचा प्रचंड वापर वाढला आहे. परिणामी बायोमेडिकल कचरा ही मोठी गंभीर समस्या म्हणून समोर आली आहे. वास्तविक बायो मेडिकल हे ‘यूज अँड थ्रो’ आहे. एक पीपीई किटमध्ये गॉगल्स, फेस शिल्डस, मास्क, ग्लोव्हज, गाउन, हेड कव्हर आणि शू कव्हर यासारख्या गोष्टींचा समावेश असतो. पीपीईमुळे डॉक्टरांना रुग्णांवर उपचार करणे शक्य झाले. पण वापरानंतर त्याचे रुपांतर हे सिंगल यूज प्लॅस्टिक, मायक्रोप्लास्टिकमध्ये होते. आपल्याकडे रिसायकलिंगमध्ये योग्य व्यवस्था नसल्याने पुर्नप्रक्रिया करणे देखील कठिण ठरत आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या अंदाजानुसार, सध्या जगभरात दर महिन्याला वैद्यकीय कर्मचार्‍यांना सुमारे 8 कोटी ग्लोव्हज, 16 लाख मेडिकल गॉगल्सबरोबरच 9 कोटीहून अधिक मेडिकल मास्कची गरज भासत आहे. हा आकडा केवळ वैद्यकीय कर्मचार्‍यांचा आहे. परंतु सर्वसाधारपणे जे थ्री लेअर मास्कचा वापर करत आहे, त्यांची संख्या तर अब्जाच्या घरात पोचली आहे. बायोमेडिकल कचर्‍यात कॅप्स, मास्क, प्लेसेंटो, पॅथॉलॉजिकल कचरा, प्लास्टर ऑफ पॅरिस, ऑपरेशन केल्यानंतर बाहेर काढलेला अवयव, कालबाह्य झालेली औषधे, डायलिसीस किट, आयव्ही सेटस, यूरिन बॅग, केमिकल कचरा यासारख्या गोष्टींचा समावेश आहे. शास्त्रीय मार्गाने त्याची विल्हेवाट होत नसेल तर ही बाब पर्यावरणाबरोबरच माणसासाठीही धोकादायक आहे.

मेडिकल कचर्‍याची विल्हेवाट लावण्यात सक्षम असलेली अमेरिकी कंपनी ‘ऑनसाइट वेस्ट टेक्नॉलॉजी’च्या मते, अमेरिकेच्या लोकसंख्येला लशीचे 66 कोटी डोस देण्यासाठी जितक्या सुई लागतील, त्या सूया एकत्र केल्यास पृथ्वीला 1.8 वेळेस गुंडाळता येऊ शकते. औद्योगिक संस्था असोसिएशन ऑफ इंडियन मेडिकल डिव्हाइस इंडस्ट्रीच्या एका अंदाजानुसार जगभरातील 60 टक्के नागरिकांना लस आणि हर्ड इम्युनिटी मिळवण्यासाठी जवळपास 800 कोटी ते 1 हजार कोटी सिरिंजची गरज भासणार आहे.

एवढेच नाही तर भारतातील 135 कोटी लोकसंख्येच्या 60 टक्के लोकांचे लसीकरण करण्यासाठी दीडशे कोटी सिरिंजची गरज भासणार आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अभ्यासात म्हटले की, दहा वर्षांपूर्वी 2010 मध्ये इंजेक्शनच्या असुरक्षित विल्हेवाटामुळे संपूर्ण जगात एचआयव्हीचे 33,800, हेपटायटिस बीचे 17 लाख आणि हेपेटायटिस सी चे तीन लाखाहून अधिक प्रकरणे समोर आले. यावरुन कोरोना लसीकरणाच्या काळात जर सिरिंज आरि सुईची योग्य विल्हेवाट लावली नाही तर पर्यावरणासमोर मोठे संकट उभे राहण्याची शक्यता आहे.

वैद्यकीय कचर्‍यावरुन केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने गेल्यावर्षी एक गाइडलाइन तयार केली होती आणि आतापर्यंत चारवेळेस ती अपडेट करण्यात आली. यात म्हटले की, आतापर्यंत 38 हजार 680 मेट्रिक टन कोविड मेडिकल कचरा हा संपूर्ण देशातून निकामी केला आहे. यात यावर्षी मार्च महिन्यांपासून ते आतापर्यंत 10 हजार 60 मेट्रिक टन कोरोना वैद्यकीय कचरा निर्माण झाला आहे. यावर्षी फेब्रुवारीत दररोज सरासरी 53 मेट्रिक टन कचरा निघत होता आणि तो कचरा मे महिन्यात वाढून 203 मेट्रिक टनवर पोचला आहे. पहिल्या लाटेत प्रकरणे कमी असतानाही मेडिकल कचर्‍याचे प्रमाण अधिक होते. कारण त्यात फूड वेस्ट देखील सामील केले जात होते. आतापर्यंतच्या वैद्यकीय कचर्‍यात महाराष्ट्र, केरळ, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, गुजरात, हरियाना, उत्तर प्रदेश आणि राजस्थान आघाडीवर आहे.

10 मे 2021 पर्यंतच्या आकडेवारीनुसार मे महिन्यात दररोज सरासरी 203 टन कोविड कचर्‍याची निर्मिती केली झाली. दहा मे रोजी कोविड कचर्‍याचा उच्चांक नोंदला म्हणजेच चोवीस तासात अडीचशे टन कचरा तयार झाला. गेल्यावर्षी 220 टन कचर्‍याची विक्रमी नोंद झाली होती. सरकारच्या सध्याच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ज्या ठिकाणी बायोमेडिकल कचर्‍याला डिस्पोज करण्यासाठी कॉमन बायो मेडिकल वेस्ट

ट्रिटमेंट फॅसिलिटीची सुविधा उपलब्ध नाही, तेथे प्रशासन आणि हेल्थकेअर सेवेला आपत्कालिन स्थितीत कचर्‍याची विल्हेवाट लावण्याची सुविधा उभारावी लागेल. दिल्लीत कोरोनाने हाहा:कार माजवला होता. आता तेथेही रुग्णांच्या संख्येत घसरण होत आहे. परंतु दिल्लीकरांना आता बायोमेडिकल कचर्‍याच्या वाढीचा सामना करावा लागत आहे. बायोटिक वेस्ट मॅनेजमेंटच्या मते, दिल्लीत गेल्यावर्षी 7.2 टनचा कचरा दररोज जमा होत असताना आता त्याची संख्या 12.5 ते 13 टनपर्यंत पोचली आहे. म्हणून सरकारने रुग्णालयाबाहेर पडणार्‍या बायो मेडिकल वेस्टसाठी ठोस धोरण आखणे गरजेचे आहे आणि त्याची अंमलबजावणी करायला हवी.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com