Friday, April 26, 2024
HomeUncategorized‘करोना आणि ऑक्सिमीटर’

‘करोना आणि ऑक्सिमीटर’

करोनामुळे पल्स ऑक्सिमीटर अधिकच चर्चेत आले आहे. कारण इतर आजारांसोबतच करोनाची लक्षणे ओळखण्यासाठीसुद्धा या उपकरणाचा उपयोग होत आहे. या उपकरणाद्वारे केल्या जाणार्‍या चाचणीला ‘पल्स ऑक्सिमेट्री’ असे संबोधले जाते.

करोनाचा संसर्ग पुन्हा एकदा झपाट्याने वाढत असल्याने अनेकजण फिंगर पल्स ऑक्सिमीटरद्वारे घरीच आपल्या रक्तातील ऑक्सिजनचे प्रमाण आणि प्लसरेट म्हणजे ह्रदयाच्या ठोक्यांचे रिडींग (हृदयाच्या स्पंदनांची गती) तपासून पाहत आहेत. जेणेकरुन पल्स ऑक्सिमीटरद्वारे वेळीच सावध होवून पुढचे अप्रिय प्रसंग टाळता येतील. या टेस्टमुळे याचा शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण मोजले जात असल्याने करोना इन्फेक्शनचा छडा लावायला मदत होते.

- Advertisement -

तुम्हा सर्वांनाच माहित असेल की, श्‍वसनात अडचण येणे हे करोनाचे प्रमुख लक्षण मानले जाते. करोना संसर्ग झालेल्या अनेकांना श्‍वास घेण्यात अडथळा येत आहे. कारण, त्यांच्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा कमी होते आहे. शरारीत ऑक्सिजन कमी होताच या लोकांची परिस्थिती अतिशय गंभीर होते आहे. त्यामुळे पल्स ऑक्सिमीटरला एकप्रकारे ट्रिगरही बोलू शकतो. हे आपल्याला ऑक्सिजनच्या कमी किंवा जास्त असण्याचा संकेत देते. ऑक्सिमीटर कसे काम करते यासंदर्भात माहिती देत आहोत.

पल्स ऑक्सिमीटर ही एक प्रकारची चाचणी असते. पल्स ऑक्सिमीटर मध्ये आपलं बोट ठेवायचं असतं आणि त्यानंतर लगेचच त्यावर काही नंबर दाखवले जातात. या चाचणीमध्ये वेदना होत नाही. ऑक्सिमीटर आपल्या शरीरातील ऑक्सिजनची मात्रा मापण्यास मदत करते. तसेच पल्स डिव्हाईस आपल्या शरीरात झालेल्या छोट्यात छोट्या बदलाचीही माहिती देते. ऑक्सिमिटरमध्ये अंगठ्याच्या बाजूचे किंवा मधले बोट किमान 30 ते 60 सेकंद ठेवावे. तांत्रिक त्रुटी वगळता हे यंत्र अत्यंत अचूक प्रमाण दाखवत असते. या टेस्टच्या आधारे पुढे कुठल्या टेस्ट किंवा कुठला उपचार रुग्णाला द्यावा हे डॉक्टर सांगू शकतात. तुम्ही ही टेस्ट घरीच करत असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने पुन्हा ही टेस्ट किती अंतराने आणि कितीवेळा करावी हे तुम्ही ठरवू शकाल. निश्‍चित पातळीपेक्षा रिडींग जास्त किंवा कमी असेल तेव्हा काय करावे हे सुद्धा डॉक्टरांच्या सल्ल्यानेच ठरवावे.

तज्ञांच्या मते, निरोगी शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण 94 ते 99 टक्के असायला हवे. तुमचे रिडिंग याहून कमी किंवा अधिक सतत येत असेल, तर डॉक्टरांना सल्ला घ्यायलाच हवा. एखाद्या वेळेस हे प्रमाण कमीजास्त झाले तर हरकत नाही, पण सतत किंवा वारंवार असे घडले तर नक्कीच ते धोकादायक आहे किंवा जर काही काळासाठी याची संख्या तुमच्या शरीरात कमी झालं तरी तो चिंतेचा विषय ठरत नाही. पण बर्‍याच काळासाठी ही संख्या कमीच राहणं चिंतेची बाब ठरु शकतं त्यामुळे ऑक्सिजनची मात्रा 89 पेक्षा खालावल्यास आणि बराच वेळ तशीच राहिल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले जात आहे. जो पर्यंत शरीरातील ऑक्सिजनचं प्रमाण हे 94 च्या वर आहे, श्‍वास घेण्यास विशेष अडचण नसेल तर करोना योग्य वैद्यकीय उपचारांनी घरच्या घरी बरा होऊ शकतो. दरम्यान, काही वेळा या टेस्टच्या रिडिंगमध्ये फारतर 2 टक्के चूक असण्याची शक्यता असते असेही सांगण्यात येते.

करोना विषाणू थेट फुफ्फुसांवर आघात करत असल्याने त्याचा परिणाम थेट ऑक्सिजनच्या पातळीवर होत असतो. अशावेळी पल्स ऑक्सिमीटर महत्त्वाचे ठरते. एखादा रुग्ण शांत अवस्थेत बसलेला असतानाही त्याची ऑक्सिजनची पातळी ही 89 पेक्षा पेक्षा कमी दिसत असेल तर मात्र वेळीच हा धोका ओळखून तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे.

आपलं ह्रदय किती चांगल्या पद्धतीने काम करतंय याची इत्यंभूत माहिती पल्स डिव्हाईसद्वारे आपल्याला समजू शकते. आपणा सर्वांनाच ठाऊक असेल की ह्रदय आपल्या संपूर्ण शरीरात ऑक्सिजन पुरवठ्याचं कार्य करतं. त्यामुळे पल्स ऑक्सिमीटरच्या मदतीने ह्रदयाचं कार्य किती व्यवस्थित सुरु आहे हे समजतं. तसेच फुफ्फुसासाठी दिलेलं औषध किती चांगल्या पद्धतीने काम करतंय हे समजण्यासोबतच श्‍वास घेण्यास अडथळा येत असल्यास ते देखील समजते. म्हणजेच श्‍वासाशी निगडीत अनेक प्रकारची माहिती मिळवण्यासाठी हे डिव्हाईस लाभदायक आहे.

तुमचा ऑक्सिमीटर डुप्लिकेट तर नाही ना?

सध्या विविध किमतीचे ऑक्सिमीटर बाजारात उपलब्ध आहेत. करोनामुळे मागणी वाढल्याने अनेक कंपन्यांनी किंमतीतही वाढ केली आहे. जे उपकरण आधी 1200 रुपयाला मिळत होतं. ते आता तीन/चार हजाराला मिळत आहे. ऑक्सिमीटरच्या किंमती 500 रुपयांपासून 2000 रुपयांपर्यंत आहेत . तर अ‍ॅमेझॉनवरती या यंत्राची किंमत 1,800 ते 5,500 रुपयांपर्यंत दिसते. आम्ही निश्‍चित असा एखादा ब्रँड सुचवत नाही आहोत. मात्र खरेदी करण्यापूर्वी तिथले लोकांचे अभिप्राय वाचून मगच कोणते यंत्र घ्यायचे ते ठरवा किंवा विश्‍वासार्ह आणि अधिकृत औषध विक्रेत्यांकडून खरेदी करावी किंवा डाक्टरांचा सल्ला घ्यावा. कोणताही ऑक्सिमीटर घेताना कंपनीचा ब्रँड आणि उत्पादनाची विश्‍वासार्हता तपासून पाहणे आवश्यक मानले जाते. सध्या बहुतांश कंपन्यांचे ऑक्सिमिटर चीन, तैवान येथून आयात केले जातात. भारतीय बनावटीच्या ऑक्सीमीटरचे प्रमाण कमी असल्याने चिनी बनावटीचे डिव्हाईस विकण्याशिवाय पर्याय नाही, असेही सांगितले जाते तसेच डुप्लिकेट ऑक्सिमीटर उपलब्ध करून दिली जात असल्याची शक्यता नाकारली जाऊ शकत नाही.

ऑक्सिजनचे प्रमाण आणखी कशामुळे होवू शकतेे कमी?

शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाले तर त्याचा परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होण्यामागचे कारण अनेकदा प्रदूषण असते. प्रदूषणामुळे शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण कमी होऊ लागतो. इतकंच नव्हे तर दमा, अ‍ॅलर्जी, मायग्रेन, फुफ्फुसांमध्ये इन्फेक्शन, खोकला आणि डोळ्यांचा थकवा हे आजार प्रदूषणामुळे होतात. या सगळ्यामागचे कारण म्हणजे शरीरात ऑक्सिजनची कमतरता होय.

प्रदूषणाचा परिणाम आपल्या शरीरातील ऑक्सिजनच्या प्रमाणावर होत असतो. यामुळे अनेक आजारांना निमंत्रण मिळू शकते. प्रदूषणामुळे श्‍वासासोबत आपल्या फुफ्फुसात सूक्ष्म कण पोहोचतात. ज्याचा वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतो. फुफ्फुसांचे काम सुरळीत होत नाही आणि शरीरात इतर समस्या वाढतात. शरीरात कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढू लागते. याला कार्बोऑक्सिहीमोग्लोबिन म्हणतात आणि अनेक आजारांचे हे कारण असते. 89 पेक्षा कमी ऑक्सिजन असल्यास थकवा, स्किन अ‍ॅलर्जी, डोळ्यांमध्ये जळजळ, सर्दी-ताप, अस्थमा यासारखे आजार उद्भवतात.

ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात ‘या’ पदार्थांचा समावेश करा

शरीरातील ऑक्सिजनची पातळी कशी वाढायची किंवा ऑक्सिजनची पातळी कशाप्रकारे संतुलित ठेवायला हवी, त्यासाठी आहारात कोणत्या पौष्टिक गोष्टींचा वापर करावा याविषयी जाणून घेऊया.

ज्यांना करोना झाला आहे मात्र त्यांची परिस्थिती जास्त गंभीर नाही अशा रुग्णांना शरीरातील ऑक्सिजनची पातळी संतुलित ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. या रुग्णांना इतर रोगांशी लढण्यासाठी ऑक्सिजन पातळी योग्य असणे महत्त्वाचे आहे.

शरीरात इतर गोष्टींप्रमाणे ऑक्सिजन पातळीही योग्य असणे गरजेचे आहे कारणऑक्सिजनच्या कमरतेमुळे आपली रोगप्रतिकार शक्ती कमी होते. थकवा येणे, श्‍वास घेण्यास त्रास जाणवतो. त्याचप्रमाणे आपली रक्ताभिसरण क्रिया मंदावते. ब्रेन हॅमरेज व हार्ट अटॅकचा धोका संभावतो. ऑक्सिजनच्या कमतरेमुळे थायरॉईड असलेल्या रुग्णांचे हार्मोन संतुलन बिघडते. शरीरात ऑक्सिजनची कमतरता जाणवू नये म्हणून शारीरिकरित्या हालचाल करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर पौष्टिक आहाराचे सेवन केले पाहिजे. आहारात आयर्नयुक्त पदार्थांचा मोठ्या प्रमाणात समावेश करणे गरजेचे आहे.

ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी कच्च्या किंवा पिकलेल्या केळ्यांचा आहारात समावेश करा. लिंबाचे सेवन केल्याने शरीरातील व्हिटामिन्स सी ची कमतरता दूर होते. लिंबू पाणी शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यासाठी मदत करते. त्याचप्रमाणे रुग्णांनी पपईचे सेवन करणेही कधीही गरजे आहे. पपईमुळे रक्तातील ऑक्सिजन पातळी वाढते. रोजच्या आहारात गाजर, बटाटे यांचाही समावेश करा त्यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते. पालेभाज्यांचा आहारात समावेश करावा. पालेभाज्यांमध्ये अल्कलाईन मोठ्या प्रमाणात असते ते शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास मदत करते.

तुळशीचा फायदा

प्रदूषणमुक्त हवा देणार्‍या तुळशीचे झाड प्रत्येक ठिकाणी लावणे गरजेचे असते. याला घरात लावल्याने घरातील हवा शुद्ध राहते. प्रदूषणाचा स्तर साधारण 30 टक्क्यांपर्यंत कमी करण्यात तुळस मदत करते म्हणून तुळशीचे झाडेही लावावीत. यासोबतच तुळशीचे सेवन करणेही चांगले असते. तुळशीचे पाणी पिणेही फायदेशीर ठरते.

असा बनवा तुळशीचा काढा

तुळशीची दहा बारा पाने घेऊन ती स्वच्छ धुवा. आता एका भांड्यात तीन कप पाणी घ्या. यात तुळशीची पाने, एक तुकडा आले, दोन काळी मिरी टाकून चांगले उकळा. हे पाणी आटून दोन कप झाल्यानंतर पाणी गाळून घ्या. दिवसातून हा काढा प्या. यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. तसेच शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाणही वाढते.

काढा पिण्याचे फायदे

तुळशीच्या नियमित सेवनाने त्वचेशी संबंधित समस्या दूर होतात. रक्त शुद्ध होण्यास मदत होते. तसेच त्वचा उजळते. डायबिटीजचा त्रास असल्यास तुळशीची पाने चावून खा. अथवा याचा काढा करा. हे प्यायल्याने खूप फायदा होतो. मायग्रेनची समस्या असल्यास तुळशीचे सेवन जरूर करा. याची दोन पाने चावून खाल्ल्याने अनेक फायदे होतात.

प्राणायामने वाढेल शरीरातील ऑक्सिजन

शरीरात ऑक्सिजनचे प्रमाण वाढवण्यासाठी अनुलोम-विलोम, कपालभाती, भस्त्रिका प्राणायाम आणि ओमचा जप करणे अतिशय फायदेशीर ठरते. दररोज केवळ 15 मिनिटे प्राणायाम केल्यास शरीरात ऑक्सिजनचे प्रमाणही वाढते.

(सूचना : सर्वसामान्य माहितीच्या आधारावर वरील लेखात माहिती दिली आहे. याबाबत अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)

- Advertisment -

ताज्या बातम्या