पुन्हा कोरोनाच्या भयछाया…

अपर्णा देवकर

युरोपात कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. जर्मनीमध्ये लॉकडाऊनच्या दिशेने पावले टाकली जात आहेत. आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, सध्या जगातील करोनाबाधितांपैकी दोन तृतीयांश युरोपात आढळून येत आहेत. ही परिस्थिती कायम राहिली तर पुढील वर्षी फे ब्रुवारीपर्यंत पाच लाख बळी नोंदवले जाऊ शकतात, असा आरोग्य संघटनेचा अंदाज आहे. भारतासाठी ही बाब चिंतेची राहू शकते. कारण यावर्षी सुरवातीला युरोपात अशा रितीने संसर्गाचा प्रसार झाला होता आणि त्यानंतर भारतात कोरोनाची दुसरी लाट आली.

जागतिक आरोग्य संघटनेच्या युरोप कार्यालयाने युरोपातील वाढत्या संसर्गावरून नुकतेच चिंताजनक निवेदन जारी केले. कोपनहेगन येथील आरोग्य संघटनेच्या कार्यालयाने म्हटले की, परिस्थिती अशीच राहिली तर आगामी तीन-चार महिन्यांत युरोपातील मृतांचा आकडा हा 7 लाखांपर्यंत जावू शकतो. आरोग्य संघटनेने हे मत 53 देशातील स्थितीवरून मांडले आहे. कोरोना प्रोटोकॉलवरून युरोपातील नागरिक पुरेशी काळजी घेत नसल्याबद्धल संघटनेने खंत व्यक्त केली आहे. संवेदनशील भागात बुस्टर डोस देण्याची गरज संघटनेने बोलून दाखविली आहे. रोगप्रतिकारक शक्ती कमी असणार्‍या लोकांना बुस्टरची गरज असल्याचे मतही मांडले आहे. तसेच 60 पेक्षा अधिक वयोगटातील लोकांना तिसरा डोस देण्याची आवश्यकता असल्याचेही संघटनेने म्हटले आहे. युरोपात गेल्या आठवड्यात दररोज 4200 पेक्षा अधिक मृत्यू नोंदले गेले. संपूर्ण युरोपात आतापर्यंत कोरोनाचे पंधरा लाखाहून अधिक बळी गेले आहेत. 25 देशांत बेड आणि 53 पैकी 49 देशांत आयसीयू बेडची गरज आतापासूनच पुढे चार महिने भासणार असल्याचे आरोग्य संघटनेने म्हटले आहे. 1 मार्च 2022 पर्यंत युरोपात एकूण 20 लाख जणांचा मृत्यू कोरोनामुळे होईल, असे भाकित आरोग्य संघटनेने वर्तविले आहे.

गेल्या काही दिवसांपासून अमेरिका, रशिया आणि युरोपात कोरोना रुग्णांचा आकडा फुगत आहे. कोरोनाने पुन्हा डोके वर काढल्याने जग पुन्हा चितेत पडले आहे. विशेषत: युरोप हे कोरोना संसर्गाचे नवीन केंद्र बनले आहे. 60 ते 70 टक्के लसीकरण झालेल्या देशांतही कोरोनाचा फैलाव होत आहे. ऑस्ट्रियात कोरोना रोखण्यासाठी पुन्हा वीस दिवसांचा लॉकडाउन लागू केला आहे. नेदरलँडची देखील हिच स्थिती आहे. जर्मनीत दररोज 50 हजाराहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत आणि काही दिवसांतच ही संख्या दुप्पट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रशियात देखील कोरोनामुळे होणार्‍या मृत्युची संख्या ही झोप उडवणारी आहे. अमेरिका, ब्रिटन आणि युरोपात कोरोनाचा डेल्टा संसर्ग पसरला आहे. हा अतिशय वेगाने पसरतो. सर्वाधिक लसीकरण झालेल्या देशांत कोराना पसरण्यामागे सर्वात प्रमुख कारण म्हणजे लशीचा प्रभाव कमी होणे आणि लस घेण्याबाबत पळ काढणे. विशेषत: पूर्व युरोपात लस घेण्याबाबत नागरिकांकडून टाळाटाळ केली जात आहे. या स्थितीमुळे भारताला अधिक जागरूक राहण्याची गरज आहे. कारण यावर्षी सुरवातीला युरोपात अशीच स्थिती होती आणि त्यानंतर भारतात दुसरी लाट आली. या लाटेने भारतात हाहा:कार माजवला.

फायजरच्या लशीबाबत अलिकडेच एक अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यात म्हटले की, दुसरा डोस घेतल्यानंतर सहा महिन्याने रोगप्रतिकारक शक्ती कमी होऊ शकते. त्यामुळे तिसरा बुस्टर डोस घेणे गरजेचे असून त्या आधारावर संसर्गापासून बचाव करणे शक्य राहू शकते. अशाच रितीने भारतात कोव्हिशिल्ड लस निर्मिती करणार्‍या सीरम इन्स्टिट्यूटने देखील रोगप्रतिकारक शक्तीच्या कालमर्यादेबाबत मत मांडले होते. म्हणून याचा सारासार विचार करताना भारताने अमेरिका आणि युरोपातील वाढत्या संसर्गावर, प्रमाणांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. यानुसार आरोग्य मंत्रालयाला नियोजन करणे शक्य राहिल.

भारतात 18 पेक्षा कमी वयोगटातील मुलांना कोविड लस देण्याबाबत अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. बुस्टर डोसबाबत शास्त्रज्ञ सांशक आहेत. बुस्टर डोसच्या चांगल्या परिणामाबाबत अद्यापर्यंत कोणतेही विश्वासार्ह आकडे मिळालेले नाहीत, असे शास्त्रज्ञ सांगतात. एकुणात बूस्टर डोसची योजना गोंधळात अडकली आहे. सध्या हिवाळा असून यात संसर्गाचे विषाणू आणखीच शक्तीशाली होतात. फ्लूसारख्या संसर्गाचा धोका हा नेहमीच राहिला आहे. भारतात सध्या पुरेशा प्रमाणात डोस उपलब्ध आहेत. परंतु नागरिक डोस घेण्याबाबत गंभीर नाहीत. यात पहिला डोस घेणार्‍यांची संख्या अधिक आहे आणि ही बाब गंभीर आहे. यासंदर्भात सरकारने वेगाने काम करण्याची आवश्यकता आहे. कारण दोन्ही डोसबाबत समाधानकारक आकडे आल्यानंतरच मुलांना आणि बूस्टर डोस देण्याबाबत सरकारला पावले टाकता येतील. दुसरीकडे कोरोना संसर्गात घट झाल्यानंतर राज्यात वेगाने निर्बंध कमी गेले आहेत. सार्वजनिक ठिकाणं खुली केली असून यासाठी सध्या कोणतेही प्रमाणपत्र मागितले जात नसल्याचे चित्र आहे. पर्यटन स्थळं, धार्मिक स्थळं खुली केली असून तेथे ओसंडून गर्दी वाहत आहे. मास्क आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन होताना दिसून येत नाही. मिझोरामसारख्या अनेक राज्यात संसर्गाचा दर अधिक आहे. त्यामुळे देशातील कोरोनाची चिंता कायम आहे. लस न घेतलेली मंडळी किंवा सात महिन्यांपूर्वी दोन्ही डोस घेतलेल्या लोकांना संसर्गावरून अधिक सजग राहण्याची गरज आहे. कोरोना संसर्गाची देशातील आणि परदेशातील स्थिती पाहता सरकारने आणखी चार ते पाच महिने निर्बंध ठेवणे आवश्यक आहे. या आधारावर कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य राहू शकते. तिसर्‍या लाटेला आपण निष्प्रभ करू शकतो. अर्थात ही जबाबदारी आपल्यावरच आहे.

अपर्णा देवकर (आदित्य फीचर्स)


Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *