करोना झाला म्हणजे... तो गुन्हेगार नाही!
फिचर्स

करोना झाला म्हणजे... तो गुन्हेगार नाही!

घराकडेही बघतात संशयाने कोरोनाची बाधा झालेल्या रुग्णाच्या घराचा परिसर कन्टेनमेंट झोन म्हणून जाहीर केला जातो. परिसरात बांबूही बांधले जातात. मात्र त्याभागात राहणारे किंवा त्या रस्त्याने जाणारे त्याच्या घराकडे अशा पध्दतीने बोटे दाखवितात की जणू याठिकाणी फार मोठा गुन्हेगार राहत असावा. दोन-चार जण एकत्र येवून दबक्या आवाजाने अशी चर्चा करतात की जणू या घरात अवैध वस्तूचा साठाच सापडला की काय?

Rajendra Patil

करोना हा बरा होणारा आजार आहे, काळजी घेवून तो टाळता येणेही शक्य आहे, तरीही बाधा झालीच तर दुर्दैवाने बाधिताकडे अशा नजरेने बघितले जाते की जणू तो त्याने फार मोठा गुन्हा केला. त्याच्या कुटुंबियांना मिळणारी वागणूक किंवा त्याच्या घराकडे पडणार्‍या नजरा ह्यादेखील तिरस्काराच्या वाटतात. वास्तविक अशा परिस्थितीत त्यांचे मनोधैर्य वाढविण्याची, त्यांच्या पाठीशी खंवीरपणे उभे राहण्याची

करोना महामारीमुळे सारेच महासंकटात सापडले आहेत. परस्परांच्या संपर्कातून होणार्‍या बाधेमुळे अनेकांना जीव गमवावा लागला आहे. अद्याप यावर ठोस लस उपलब्ध न झाल्याने केेवळ डॉक्टरांच्या बुध्दी कौशल्यानुसार रुग्णाची अवस्था बघून दिलेल्या औषधांच्याच भरवशावर रहावे लागते आहे. जगणे आणि मरण्यातील अंतर अत्यंत कमी झाल्यामुळेच तुर्ततरी शारिरीक अंतर ठेवण्याच्या सूचना वारंवार दिल्या जात आहेत.

मात्र कोरोनासोबत लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या आणखी दुसर्‍या सकटात पोटाची आग भडकत असल्याने ती शमविण्यासाठी घराबाहेर पडावेच लागते आहे. अर्थात कोरोनाची बाधा कोणाला कोणाला कुठून कशी होईल हे निश्चित सांगता येणारे नाही. कोणाच्या स्पर्शातून कोरोना होईल किंवा कुठे स्थिरावलेला विषाणू आपली वाट पाहतो आहे याचा अंदाज बांधणे अवघड आहे. धुळे जिल्ह्यातील स्थिती प्रशासनाच्या दृष्टीने नियंत्रणात असली तरी बाधितांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे.

तिरस्कार नव्हे, सहानुभूती असावी

एकीकडे डॉक्टर्स, परिचारीका, आरोग्य कर्मचारी, पोलीस अधिकारी व कर्मचारी, सरकारी कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवादेणारे घटक स्वतःच्या जीवाची पर्वा न करता लढत आहेत. इतरांचा जीव वाचविण्यासाठी धडपडत आहेत. यापैकी अनेकांचा थेट बांधीतांशी रोजचाच संपर्क आहे. एकाअर्थाने मृत्यू त्यांच्या डोळ्यासमोर आहे.

असे असतांना ते खर्‍या अर्थाने योध्येम्हणून लढत आहेत. तर दुसरीकडे कोरोना झालेल्या व्यक्तीला, त्याच्या कुटुंबियांना समाजातून तिरस्काराची वागणूक मिळत असल्याचे दिसते आहे. बाधिताच्या कुटुंबाशी नातेच तोडले जात आहे. ऐरव्ही शेजारी शेजारी असतांना आणि रोजच्या जेवणातील अन्नपदार्थ एकमेकांच्या घरात दिले जात असतांना करोनाची बाधा झाल्याची समजताच त्या घराशीच संबंध तोडले जातात.

इतकेच नव्हे तर त्या घराकडे उपहासाचे, हेटाळणीच्या नजरेने बघून दबक्या आवाजात त्यांच्याविषयी चर्चाही केली जाते. जणू कोरोना झाला म्हणजे तो गुन्हेगारच आहे अशी धारणा काहींची झालेली दिसते. हे चुकीचेच असून उलट अशांकडे सहानूभुतीने बघण्याची, त्यांच्या कुटुंबाची मनोधैर्य वाढविण्याची गरज आहे. काळजी करु नका आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, काय मदत लागली तर सांगा असे म्हणत पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता आहे. अर्थात असे वागणारे आणि माणुसकीचे दर्शन घडविणारेही अनेकजण गाजावाजा न करता मदत करण्यासाठी धडपडत आहेत.

कुठे अंत्यसंस्कारासाठी पुढे येणारे मुस्लिम तरुण असो की, यासाठी कोरोना योध्ये म्हणून स्वतःहून पुढे येणारे भाजपचे तरुण असोत, मृतदेहाची हेटाळणी होवू नये म्हणून विल्हेवाट करण्यासाठी स्वतःच्या मालकीची जागा देणारे प्रविण अग्रवाल सारखे कार्यकर्ते असो की, कोरोना बाधितांना गरम पाण्याची व्यवस्था व्हावी म्हणून स्टिलची पिंप रुग्णालयास भेट देणारे मेहतर समाजाचे तरुण कार्यकर्ते असोत. यांच्या सारख्या असंख्य व्यक्तींमुळेच सामाजिक समतोड राखला जातो आहे.

कोणी स्वतःहून स्वतःला बाधा करुन घेत नाही, कुणाला अशी हौसही नाही. त्यामुळे बाधितांमध्ये एकटेपणाची भावना निर्माण होणार नाही, यासाठी इतरांनीही पुढे येण्याची गरज आहे.

हे लावताय जीवाची बाजी

डॉक्टर्स, परिचारीका, आरोग्य कर्मचारी, लॅबटेक्नीशियन हे तर स्वतःच्या जीवाची बाजी लावून खर्‍या अर्थाने योध्ये म्हणून लढत आहेत. त्यांना इतरांपेक्षा जास्त परिणाम आणि धोके माहित असतांना ते बजावीत असलेले कर्तव्य पाहता त्यांना सलामच ठोकला पाहिजे.

करोनाने नाती केलीत स्पष्ट

खरे तर कोरोनाचे हे महाभयंकर संकट आहे. यातून सारा देश आज वेगळ्या परिस्थितीतून जातो आहे. यामुळे असंख्य समस्या निर्माण झाल्या आहेत. कोरोनाची बाधा झाल्यानंतर बिघडणारी मानसीकता, कुटुंबाची होणारी होरपळ, दुर्दैवाने यात मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाची होणारी हेटाळणी, यातून मृताच्या कुटुंबियांना इतरांचा येणारा अनुभव याचे अनेक किस्से आहेत. काही चांगले अनुभव आहे तसे आयुष्यभर लक्षात राहणारे वाईट अनुभव देखील आहेत.

एरव्ही माझे माझे म्हणणारे, तुमच्यासाठी जीवदेण्यास तयार आहे अस सांगणारे किंवा तुम्ही फक्त हाक मारा, अजमावून तर बघा असे म्हणणारे किती तकलादू आहेत हे कोरोनामुळे स्पष्ट झाले आहे. खरे तर कोरोनामुळे आपले कोण, मनापासून साथ देणारे किती अन् केवळ वरवर भाव व्यक्त करणारे कोण यातील नातेसंबंध स्पष्ट झाले आहेत.

याशिवाय ज्यांच्यासाठी आपण धडपडतो, खूप काही करतो किंवा ज्यांची काळजी वाहतो तेही आपल्याला कोरोना झाल्यानंतर किती अंतर ठेवून वागतात याचा अनुभव येवू लागला आहे. आपला मुद्दा केवळ शारिरीक अंतराशी निगडीत नाही. प्रत्येकाने आरोग्याची काळजी घेतांना विशिष्ठ अंतर राखलेच पाहिजे. परंतु हे अंतर रक्ताचे नातेसंबंध दुरावणारे, कृतज्ञतेचा भाव विसरायला भाग पाडणारे किंवा केवळ स्वतःपूरता स्वार्थी विचार करणारे नसावे. दुर्दैवाने असाच अनुभव अधिक येत असल्याचे दिसते आहे.

- अनिल चव्हाण, धुळे

98222 95194

Deshdoot
www.deshdoot.com