बेपर्वाईने करोनात वाढ

बेपर्वाईने करोनात वाढ
COVID19

निफाड । आनंदा जाधव | Niphad

जिल्ह्यात करोनाचा (corona) पहिला रुग्ण हा निफाड तालुक्यात (Niphad Taluka) आढळून आला होता. पहिल्या व दुसर्‍या लाटेत देखील सर्वाधिक करोना रुग्णसंख्या ही निफाड तालुक्यातच पहावयास मिळाली असतांनाच आता ओमायक्रॉनच्या (omicron) नव्या संसर्गातील तिसर्‍या लाटेतील रुग्ण संख्या देखील निफाडमध्ये होत असल्याचे विदारक दृश्य दिसत आहे. नागरिकांची बेपर्वाही, सोशल डिस्टन्सचा (Social distance) उडालेला फज्जा अन् मास्कचा (mask) पडलेला विसर यामुळे निफाड तालुका (Niphad Taluka) आता करोनाचे माहेरघर बनतो की काय अशी परिस्थिती तयार होवू लागली आहे.

देशात ज्यावेळी करोनाचा शिरकाव झाला त्यावेळी नागरिकांच्या मनात मोठी भीती होती. साहजिकच हा संसर्ग आपल्या गावात येवू नये यासाठी ग्रामस्थांनी गावात येणारे सर्व रस्ते काट्या टाकून तर कोठे टोकर लावून बंद केले होते. तसेच ज्या गल्लीत करोनाचा रुग्ण आढळू लागले ती गल्लीच बंद करण्यात येत होती. सामान्य नागरिक तर त्यावेळी घराबाहेर पडणे देखील टाळत असे. बाजारपेठा, दुकाने यासह सर्वच व्यवहार बंद करण्यात आले.

ग्रामपंचायत स्तरावरून गावात सॅनिटायझर (Sanitizer) सह रोगप्रतिबंधक औषधांची (Prophylactic drugs) तर डास प्रतिबंधक औषधांची फवारणी करण्यात येत असे. करोना च्या प्रादूर्भावामुळे संपूर्ण गावे दहशतीच्या सावटाखाली होती. मात्र त्यानंतर आरोग्य विभाग (Department of Health), ग्रामपंचायत, सेवाभावी संस्था, तरूण वर्ग यांच्या योग्य नियोजनामुळे व वेळीच औषधोपचारामुळे करोनाचा प्रादूर्भाव ओसरू लागला. साहजिकच नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकत ‘झाले गेले गंगेला मिळाले’ हा न्याय लावत दैनंदिन व्यवहार सुरू केले. साहजिकच बाजारपेठेत गर्दी वाढू लागली.

त्याचा थेट परिणाम करोनाच्या दुसर्‍या लाटेवर झाला. या लाटेत माणसे किडी मुंगीसारखी मृत्यूमुखी पडू लागली. दवाखाने फुल्ल झाले. करोना सेंटरमध्ये रुग्णांना खाटा उपलब्ध होईना, ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा, औषधांची टंचाई अशा भीषण परिस्थितीचा सामना करावा लागला. दुसर्‍या लाटेत प्रत्येक गावात करोनाने कहर घातला. एप्रिल नंतर दुसरी लाट ओसरली तशी विवाहमुहूर्त धुमधडाक्यात सुरू झाले. निवडणुका झाल्या, बाजारपेठा गजबजल्या. शाळा, महाविद्यालये सुरू झाली अन् पुन्हा एकदा करोनाने डोके बाहेर काढले. मात्र आत्ताच्या तिसर्‍या लाटेत ओमायक्रॉन या नव्या संसर्गाचा उदय झाला.

दिवसागणिक रुग्णसंख्या वाढत आहे. शासन स्तरावरून आवाहन करून देखील नागरिक गर्दी कमी करण्यास तयार नाही. जिल्ह्यात निफाड हा सधन तालुका. नगदी पिकांचे प्रमाण देखील अधिक. त्यामुळे शेतमाल विक्रीसाठी बाजारपेठेत गर्दी ठरलेली. त्यामुळे गर्दीचा थेट परिणाम करोना वाढण्यावर होऊ लागला. पहिल्या लाटेपासून ते आत्ताच्या तिसर्‍या लाटेपर्यंत सर्वाधिक रुग्णसंख्या ही निफाड तालुक्यातच आढळून येत आहे. आताही एकट्या निफाड तालुक्यात जवळपास 200 च्या आसपास ओमायक्रॉनचे रुग्ण आहेत.

त्यात ओझर आणि निफाड शहरात रुग्णसंख्या सर्वाधिक असून त्यानंतर आता ओमायक्रॉनचे लोन खेडेगावापर्यंत पसरू लागले आहे. निफाड, पिंपळगाव, ओझर, लासलगाव, सायखेडा, विंचूर, सुकेणा या प्रमुख बाजारपेठे बरोबरच तालुक्यात अनेक मोठी गावे आहेत त्यांना आसपासची खेडी जोडली गेली आहेत. त्यामुळे नागरिक, शेतकरी, शेतमजूर, चाकरमानी, विद्यार्थी यांचा या बाजारपेठेशी नित्याचा संपर्क येतो. साहजिकच बाजारपेठेत गर्दी वाढत जावून करोनाला आयतेच आमंत्रण मिळते. आत्ताही तेच होत आहे.

नगरपंचायतीकडून वारंवार सूचना करून देखील नागरिक या सूचनांना ‘केराची टोपली’ दाखवत आहे. त्याचा थेट परिणाम करोना वाढीवर होत असून नागरिकांच्या बेफीकीरीमुळेच निफाड तालुका करोनाचे माहेरघर बनतो की काय अशी परिस्थिती तयार होत आहे. तालुक्यातून करोना हद्दपार करण्यासाठी आरोग्य विभाग शाळा, महाविद्यालय पातळीवर विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यावर भर देत आहे. मात्र याबरोबरच व्यापारी, शेतकरी, शेतमजूर, चाकरमानी, विद्यार्थी या सर्वच घटकांनी करोना नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. अन्यथा दुसर्‍या लाटेपेक्षाही भयानक परिस्थितीचा सामना करावा लागेल व हे सांगण्यासाठी कुण्या ज्योतिषाची गरज भासणार नाही. त्यामुळे काळ सोकावण्यापूर्वीच वेळीच सावध होणे हाच त्यावर एकमेव उपाय आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com