Saturday, April 27, 2024
HomeUncategorizedकोरोना आणि शिक्षणक्षेत्रातील आणीबाणी

कोरोना आणि शिक्षणक्षेत्रातील आणीबाणी

शिक्षण ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. ज्ञान, कौशल्य, संवेदना, भावना, विचार, सृजन, माहिती या सर्वांना वृद्धिंगत करणारी प्रक्रिया म्हणजे शिक्षण होय. आज कोरोना महामारीमुळे शिक्षणप्रणालीच्या अखंड निरंतरतेला बाधा पोहोचली आहे. कोरोना महामारीमुळे लाखो विद्यार्थी आणि हजारो शिक्षक घरात बसून आहेत. विद्यार्थ्यांना ज्ञानग्रहण करण्याची इच्छा आहे. शिक्षकांना ज्ञान देण्याची इच्छा आहे.

परंतु दोघांच्या प्रत्यक्ष संवादावर मर्यादा आली आहे. आपण गेल्या 30-40 वर्षांपासून जागतिकीकरणाच्या रेट्यामुळे काही मूलभूत क्षेत्राकडे दुर्लक्ष करत आहोत. शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, कृषी, पिण्याचे पाणी, महिला सक्षमीकरण या सर्व मूलभूत क्षेत्राकडे जाणिवपूर्वक, हेतुपुरस्कृत आपण दुर्लक्ष करत आहोत. अनेक समस्यांची, प्रश्नांची आपणाला सोपी उत्तरे हवी आहेत. राजकारणी, प्रशासन केवळ दैनिक कामकाज हाताळत आहेत. भविष्याचा अंदाज बांधणार्या नेतृत्वाची प्रशासन, शासन, राजकारणाच्या क्षेत्रात अत्यंत वानवा आहे. केवळ पायापुरती पाहण्याची वृत्ती सार्वजनिक झाली आहे. यातून नव्या समस्यांना, प्रश्नांना सामोरे जाण्याची कुठलीही नीती आपल्याजवळ समाज म्हणून आज घडीला नाही. कोरोना महामारीमुळे आता शिक्षण व्यवस्थेचे काय नियोजन करावे? या संदर्भात शासनाकडे कुठलेही ठाम धोरण नाही. कोणतीही प्रभावी योजना नसल्यामुळे कोरोना महामारीत शिक्षण प्रणालीला कुलूप घालून जबाबदारी स्वीकारल्याचा भास हा पोकळ आहे. सगळी शिक्षण व्यवस्था बंद ठेवणे, म्हणजे सर्जनशील बुद्धिमत्तेवर जाणीवपूर्वक गंज चढवण्यासारखे आहे. तुमच्या हजारो मुलांच्या जिज्ञासेला काही काळ कुलूपबंद करण्याची तयारी शासन, प्रशासन स्तरावर दिसत आहे. शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद राहील्यामुळे कोणते असे मोठे नुकसान होणार आहे? कोणते असे उत्पादन थांबणार आहे? कोणता असा करोडोंचा शासनाचा कर बुडणार आहे? त्यामुळे शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद ठेवणे हाच कोरोनावर मात करण्याचा अंतिम उपाय आहे असा संपूर्ण समज समाजाचा झालेला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शैक्षणिक संस्था बंद ठेवण्याशी मीही सहमत आहे. परंतु संपूर्ण ज्ञानप्रक्रिया थांबविण्याची वेळ आपल्यावर का आली? या मागील प्रक्रियेची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न प्रस्तुत लेखात केला आहे.

- Advertisement -

कोरोनापूर्व काळातील आपल्या शिक्षण प्रणालीतील काही मुलभूत प्रश्नांकडे मी आपले लक्ष केंद्रित करू इच्छितो. जगातील सर्वोत्तम शिक्षण प्रणाली असणार्‍या देशांमध्ये एका वर्गात किती विद्यार्थी असतात? किती विद्यार्थ्यांमागे किती शिक्षक असतात? याचे प्रमाण किती असावे? याबद्दल निश्चित धोरण आहे. जगातील काही देशांचे उदाहरण आपण पाहूया. जगातील प्रथम क्रमांकाचे शिक्षण असलेला देश फिनलँडमध्ये एका वर्गात साधारणतः 10 विद्यार्थी असतात. या 10 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असतो. अमेरिकेमध्ये 15 ते 20 विद्यार्थ्यांचा एक वर्ग असतो. या 15 ते 20 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असे प्रमाण असते. चीनमध्ये 20 ते 25 विद्यार्थ्यांचा 1 वर्ग असतो. व तेवढ्याच विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असतो. भारतात साधारणतः प्राथमिक पासून ते महाविद्यालयीन स्तरापर्यंत 60 ते 120 विद्यार्थ्यांचा 1 वर्ग असतो आणि तेवढ्याच विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक असतो. काही जण आपल्या लोकसंख्येकडे बोट करू शकतात. परंतु चीनची लोकसंख्या आपल्याएवढीच आहे. मग चीनने हे कसं काय शक्य केले? याचे उत्तर आपला शिक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन हे आहे. या सगळ्याचा कोरोना महामारीशी काय संबंध असे आपणाला वाटेल. आपल्याकडे विद्यार्थी संख्या लक्षात घेऊन सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध असत्या, तर कदाचित 25 ते 30 विद्यार्थी एका वर्गात बसून सर्व कोरोनाबद्दलची खबरदारी घेऊन प्रत्यक्ष शिक्षण सुरू करता आले असते. टॉयलेट, सॅनिटायझर, पाणी या सर्व साधनांना घेऊन आपण शिक्षणव्यवस्था सुरु करु शकलो असतो. हे न करण्यापाठीमागे एक महत्वाचे कारण आहे. ते म्हणजे आपण आपल्या एकूण राष्ट्रीय उत्पन्नाच्या 6% टक्के वाटा शिक्षणावर खर्च करणे अपेक्षित होते. पण आपण केवळ दोन ते तीन टक्के खर्च करत आहोत. म्हणून ही परिस्थिती भारतात उभी राहिली आहे. समाज या स्थितीकडे उघडे डोळे ठेऊन बघत नाही. कारण श्रीमंतांनी स्वतःसाठी वेगळी बेटे तयार केली आहेत. मध्यमवर्गही श्रीमंतांच्या पावलावर पाऊल ठेवत नव्या व्यवस्थेच्या शोधात आहे. गरीब, वंचित, शोषित वर्गाला पर्याय नसल्यामुळे त्यांना सार्वजनिक शिक्षण प्रणालीवर विसंबून राहावे लागते. त्यांना या व्यवस्थेत कोणीही दाद देत नाही.

भारतामध्ये सर्वांना शिक्षण मिळावे यासाठी अनेकांनी संघर्ष केला आहे. चळवळी केल्या आहेत. कित्येक शतकांच्या अथक प्रयत्नानंतर शिक्षण सर्वांपर्यंत पोहोचले. ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे पुन्हा हजारो-लाखो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू शकतात. श्रीमंत, नवमध्यमवर्ग, मध्यमवर्ग यांच्याकडे ऑनलाइन शिक्षण घेण्याची सर्व साधने उपलब्ध आहेत. हा वर्ग ऑनलाइन शिक्षण प्रणालीत स्वतःला सहज सामावून घेऊ शकतो. खेड्यात राहणार्‍या दलित, शोषित, आदिवासी, शेतकरी, मजूर या समाजसमूहाला ऑनलाइन शिक्षण घेणे शक्य आहे का? हा वर्ग आजही रोजच्या भाकरीसाठी संघर्ष करत आहे. हा वर्ग ऑनलाइन शिक्षणप्रणालीची साधने कशी मिळवणार? हजारो-लाखो विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणे म्हणजे समाजात पुन्हा नवी जातीव्यवस्था, उच्च-नीच उतरण निर्माण करण्यासारखेच आहे. विजेचा अभाव, नेटवर्क नसणे यासारख्या अडथळ्यांवर विद्यार्थी कसे मात करणार? या अभावग्रस्ततेतून विद्यार्थ्यांमध्ये न्यूनगंड निर्माण होऊ शकतो. विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य येऊ शकते. शिक्षणासाठी चांगला मोबाईल मिळाला नाही म्हणून आत्महत्या करणारा बीड जिल्ह्यातील गरीब विद्यार्थी व्यवस्थेचा बळी ठरू शकतो. त्या हजारो विद्यार्थ्यांच्या अपूर्णतेबद्दल, अभावग्रस्ततेबद्दल आपण विचार करायला पाहिजे.

खूप वेळ मोबाईल पाहून मुलांचे डोळे दुखतात. विषय नीट समजत नाही. थेट संवादाच्या अभावामुळे विद्यार्थ्यांचा अध्ययनातील रस कमी होऊ शकतो. शिक्षण प्रक्रियेपासून, अध्ययनापासून विद्यार्थी दूर जाऊ शकतो. पालक आपल्या पाल्याच्या शिक्षणासाठी चिंतातुर झाले आहेत. पालक आपल्या चिमुकल्या मुलांवर ऑनलाइन शिक्षणासाठी दबाव टाकत आहेत. आज घराघरात मुलांच्या ऑनलाइन शिक्षणासाठीचा तणाव निर्माण झाला आहे. पालक-पाल्य यांच्यात काहीशा संघर्षाच्या, तणावाच्या भावना जन्म घेत आहेत. यातून पालक आणि पाल्य यांच्या नात्यासंदर्भात गुंतागुंतीचा प्रश्न उभे राहू शकतात. मुलांना आई-वडील आवडत नाहीत. कारण ते मुलांकडून ऑनलाइन शिक्षण घेण्याचा आग्रह धरतात. मुलांना ऑनलाइन शिक्षण सहज, सोपे, सुलभ वाटत नाही. कृत्रिम, त्रोटक ऑनलाइन शिक्षणामुळे मुले तणावात येतात. या सर्वांना पुढे मानसोपचाराची गरज लागू शकते. ऑनलाइन शिक्षणामुळे मुलांचा अध्ययनातील रस कमी होऊ शकतो. मुलांना सोपे विषय अवघड वाटू शकतात. यातून मुले शिक्षणापासून, अध्ययनापासून दूर गेल्यास त्याला जबाबदार कोण? शिक्षक आणि मुले वर्गात समोरासमोर प्रत्यक्ष संवाद करत असतात. शिक्षक मुलांचा चेहरा वाचत असतो. आपल्या विद्यार्थ्याला विषय समजतो की नाही याबद्दल खात्री करून घेतो. मुलांना विषय न समजल्यास शिक्षक पुन्हा परत एकदा तोच विषय मुलांसमोर ठेवतो. तोच विषय वेगवेगळी उदाहरणे देऊन समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. ऑनलाइनच्या कोरड्या अध्यापनात शिक्षकाकडे हा पर्याय असत नाही. मुळात अध्ययन ही एक सर्जनशील, जिवंत प्रक्रिया असते. शिक्षक व विद्यार्थी यांच्या संवादांमध्ये भावना, संवेदना असतात. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील संवाद शब्दांपलिकडचा असतो. तो ऑनलाईनमध्ये असत नाही. ऑनलाईन अध्यापनात व्याख्यान पद्धतीचा वापर करावा लागतो. मानव्यविद्या, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखांच्या अध्यापनासाठी ऑनलाइन अध्यापन पद्धती योग्य ठरू शकते. विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकशास्त्र, औषधनिर्माण शास्त्र, आरोग्यशास्त्र या विद्याशाखांसाठी ऑनलाइन अध्यापनाला मर्यादा आहेत. प्रात्यक्षिक ऑनलाईन कसे शिकवणार? हा ही प्रश्न आहे. प्रत्यक्ष विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती काही विद्याशाखांसाठी आवश्यक असते. संगीत, नाटक, ललित कला, अभिनय या विद्याशाखांचे अध्ययन-अध्यापन ऑनलाईन कसे होणार? शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र, समाजकार्य, पत्रकारिता, जनसंज्ञापन, संगणकशास्त्र, ग्रंथालय माहितीशास्त्र यांचे अध्यापन ऑनलाईन कसे करावे? हे सर्व विषय ऑनलाइन शिकवता येऊ शकत नाहीत.

कोरोनामुळे ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय राबवणे अत्यंत अवघड आहे. विज्ञान-तंत्रज्ञान, कला, अभियांत्रिकी, आरोग्य, कृषी, औषधनिर्माण शास्त्र, समाजकार्य, शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षणशास्त्र, जनसंज्ञापन, पत्रकारिता या सर्व विद्याशाखांचे ऑनलाइन अध्यापन कसे काय शक्य आहे? या सर्व विद्याशाखांचा मुख्य भाग हा प्रात्यक्षिकांवर अवलंबून असतो. प्रात्यक्षिकांचे ऑनलाइन अध्यापन किती प्रमाणात यशस्वी होऊ शकते? प्रात्यक्षिकांचे व्हिडिओ मुलांनी ऑनलाइन पाहून त्यांच्या ज्ञानात किती भर पडेल? याबद्दल शंका वाटते. सैद्धांतिक, संकल्पनांचे अध्यापन ऑनलाइन पद्धतीने करता येऊ शकते. परंतु या अध्यापनाला काही मर्यादा आहेत.

ऑनलाईन अध्यापन करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान व त्याची साधने शाळा, महाविद्यालयांकडे फारशी उपलब्ध नाहीत. केवळ तुटपुंज्या साधनांवर ऑनलाइन शिक्षण देण्याचा प्रयोग यशस्वी होऊ शकत नाही. शिक्षकांवर ऑनलाईन शिक्षणाचे ओझे टाकणे हे त्यांच्यावर अन्यायकारक ठरू शकते. शिक्षकांचे ऑनलाईन शिक्षण देण्यासंदर्भात कुठलेही प्रशिक्षण झालेले नाही. सर्वांना नविन तंत्रज्ञान अवगत आहे असे गृहित धरणे काही लोकांवर अन्याय करणारे ठरू शकते. शिक्षण हे पंचेंद्रियांच्या एकत्रित संवेदनेतून साध्य केले जाते. डोळे, कान, नाक, जीभ, त्वचा या सर्वांबरोबरच संवेदना, भावना यांच्या एकत्रित प्रतिसादातून शिक्षणाची सृजनात्मक प्रक्रिया घडत असते. ऑनलाइन शिक्षण हे कोरडे, रुक्ष असते. डोळे आणि कान या दोन ज्ञान इंद्रियांवर ताण देऊन दिलेले ऑनलाइन शिक्षण अपूर्ण ठरते. पूर्वी अस्पृश्यता पाळण्याच्या काळात वर्गाबाहेर बसून विद्यार्थी ज्ञान ग्रहण करीत असत. त्यांना कधी-कधी फळ्यावरील अक्षरे नीट दिसत नसत. शिक्षक काय बोलले ते नीट ऐकू येत नसे. यातून ज्ञानग्रहण करणार्या मुलांवर अन्याय होत असे. ऑनलाइन शिक्षणामुळे आपण नवी अस्पृश्यता शिक्षण क्षेत्रात जन्माला घालतो आहोत का? असा प्रश्न पडतो.

समाजाची शिक्षकांकडे पाहण्याची दृष्टी संकुचित स्वरूपाची दिसते. शिक्षकांना फुकटचा भरपूर पगार मिळतो. शिक्षकांना फार कमी काम असते. कोरोना काळात शिक्षक घरात बसून फुकटचा पगार घेत आहेत. या संकुचित मानसिकतेच्या परिणामातून प्रशासकीय अधिकार्यानी शिक्षकांची ड्यूटी दारू दुकानासमोरील गर्दीला शिस्त लावण्यासाठी लावली. यातून भारतीय समाजाच्या भविष्यातील अधोगतीचे चित्र स्पष्ट होते. चेक नाक्यावर शिक्षकांना ड्युटी लागते. सर्वे करण्यासाठी शिक्षकांची नेमणूक होते. सहाय्यक नोडल अधिकारी म्हणून शिक्षकांची नेमणूक केली जाते. यातून समाजातील विशिष्ट वर्ग शिक्षकांकडे नकारात्मक भावनेने पाहतो असे दिसते. या सर्वांचा परिणाम शिक्षकांच्या मानसिकतेवर होणार नाही का? उद्या कोरोनाचा काळ संपल्यावर अध्यापन करणार्या शिक्षकांना समाजातील आपली नगण्यता पुन्हा आठवणार नाही का? शिक्षकांच्या मानसिकतेचा समाज, प्रशासकीय अधिकारी कधी विचार करणार आहेत का? ज्या समाजात शिक्षकाला किंमत असत नाही तो समाज ज्ञान, कौशल्यापासून दूर जातो, गुलाम बनतो. विचार प्रक्रियेला गती देणारा शिक्षक जेव्हा कमजोर होतो. तेव्हा समाजातील विचारप्रक्रिया मंद होते.

समाजाची विचारप्रक्रिया मंद झाली की, तो गुलाम बनतो. हे भविष्य सांगण्यासाठी कुणाचीही गरज लागणार नाही. कोरोना काळात काही शिक्षकांनी उत्तम प्रयोग केले. कोरोना पूर्वकाळात शिक्षक आपल्या दैनंदिन कामकाजात व्यस्त असत. आजच्या आधुनिक तंत्रज्ञानाने अनेक सुलभ, सोपी साधने निर्माण केली आहेत. वेबसाईट, यूट्यूब वरील चैनल, फेसबुक लाईव्ह, गुगल मीट, संपर्क लाईव्ह यासारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन करण्याचे नवे मार्ग काही शिक्षकांनी सहजपणे हाताळले. शिक्षक या साधनांकडे कदाचित लवकर वळाले नसते. कोरोनाच्या आपत्तीमुळे, गरजेपोटी शिक्षकांनी नवे तंत्रज्ञान अवगत केले. ब्लॉग लिहून एखाद्या विषयाच्या नोट्स मुलांना छोट्याश्या लिंकद्वारे देणे सहज-सोपे झाले. अभ्यासक्रमाच्या अनेक पुस्तकांच्या पीडीएफ मुलांपर्यंत सहज पोहोचवता येतात. लाखो संदर्भ ग्रंथ पीडीएफ स्वरूपात मुलांना देता येतात.

अभ्यास विषयासंदर्भातील उत्तम व्हिडिओ मुलांना शेअर करता येतात. या सगळ्या साधनांमुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनाला गती आली. मुलांमध्ये ज्ञानग्रहणाची जिज्ञासा जागृत होऊ शकते. कोरोनामुळे शिक्षकांना थोडा निवांतपणा मिळाला. यातून या वेळेचा चांगला वापर शिक्षकांनी केला. ऑनलाइन नव्या साधनांचा परिचय शिक्षकांना झाला. भविष्यात सर्व शिक्षक या ऑनलाईन साधनांचा सुयोग्य, गरजेपुरता वापर करतील. कोरोनामुळे शिक्षकांना उत्तम प्रयोग करण्याची संधी मिळाली.

कोरोना काळात ऑनलाईन शिक्षणाबद्दल जागरूकता वाढली. जगभरातील अभ्यासकांमध्ये सुसंवाद घडू लागला. विचारांचे आदान-प्रदान घडू लागले. प्रदेश, भाषा यांच्यातील अंतर कमी झाले. ऑनलाइन कौशल्याधारित कोर्समुळे शिक्षकांमध्ये कौशल्य निर्माण झाले. हे सगळे प्रयोग आज सुरू आहेत. कोरोनाच्या स्थितीमुळे या नव्या तंत्रज्ञानाला गती मिळाली. हे नवतंत्रज्ञान हाताळण्याचा वेग वाढला. कोरोना आपत्ती ही इष्टापत्ती ठरली. थोड्याच दिवसात ऑनलाइन शिक्षणासाठी शासन-प्रशासन, विद्यापीठ शाळा, महाविद्यालयांवर, शिक्षकांवर दबाव टाकू शकतात. हे ऑनलाइन शिक्षण सुरू करण्याबद्दल वरील काही मुद्द्यांचा विचार समाजमनाने करावा. यासाठी हा लेखप्रपंच केलेला आहे.

डॉ. गणपतराव ढेंबरे,मो. 9421081270

(लेखक हे श्री. व्ही. एस.नाईक महाविद्यालय रावेर येथे मराठी विभागात कार्यरत आहेत)

- Advertisment -

ताज्या बातम्या