कोरोना आणि माहिती-तंत्रज्ञान
फिचर्स

कोरोना आणि माहिती-तंत्रज्ञान

Balvant Gaikwad

कोरोनाच्या संसर्गकाळात माहिती तंत्रज्ञान हेच प्रमुख शस्त्र बनले. वर्क फ्रॉम होम करणार्‍यांपासून घरी परतू पाहणार्‍या मजुरांना ऑनलाइन नोंदणी करण्यापर्यंत अनेक ठिकाणी तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला. तो कितपत प्रभावी ठरला आणि त्याचा लाभ कुणाला झाला, हाही प्रश्न चर्चेला आला पाहिजे. तंत्रज्ञान हे दुधारी शस्त्र असल्यामुळे ज्याप्रमाणे अनेकांना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी तंत्रज्ञानाचा फायदा झाला, तसाच खोट्या बातम्या पसरविणार्‍यांपासून ऑनलाइन फसवणूक करणार्‍यांपर्यंत अनेकांनी तंत्रज्ञानाचा गैरफायदाही घेतला.

बालेन्दु शर्मा दधिच, प्रख्यात तंत्रज्ञानतज्ज्ञ

कोरोनाच्या संकटकाळात दोन गोष्टी सर्व स्तरांमधील व्यक्तींसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरल्या आहेत. पहिली म्हणजे सोशल डिस्टन्सिंग आणि दुसरी सोशल मेसेजिंग. या दोन्ही गोष्टींचा परिणाम आपले घर, कार्यालय, व्यवसाय, शिक्षण, अर्थव्यवस्था, समाजजीवन एवढेच नव्हे तर आपल्या साहित्य आणि संस्कृतीवरही पडला आहे. अनेक जण या घटकांच्या जवळ आपोआप खेचले गेले आहेत आणि आता हे संबंध प्रदीर्घकाळ कायम राहतील, असाच अंदाज आहे. सोशल मेसेजिंगकडे केवळ चॅट म्हणून न पाहता डिजिटल संपर्काचे प्रतीक म्हणून पाहिले जाऊ शकते. हे माध्यम इतर अनेक गोष्टींना आपल्यात सामावून घेणारे ठरले आहे. उदाहरणार्थ, ऑनलाइन कोलॅबोरेशन, डिजिटल मनोरंजन, आभासी बैठका, डिजिटल व्यापार, डिजिटल बँकिंग आणि डिजिटल शिक्षण इत्यादी. सध्याच्या संकटकाळात ज्या मोजक्या सकारात्मक गोष्टी घडल्या आहेत त्यातील एक म्हणजे सर्वजण तंत्रज्ञानाच्या जवळ गेले आहेत. सर्वांनी तंत्रज्ञानाची क्षमता ओळखली आहे आणि त्याचा अशा प्रकारे वापर केला आहे, जेणेकरून आपले कामकाज जवळजवळ सामान्य रूपात सुरू आहे.

तंत्रज्ञान, विशेषतः इंटरनेट आणि क्लाउड्सची शक्ती जर नसती, तर या संकटाचा मुकाबला करणे व्यक्तिगत आणि राष्ट्रीय स्तरावर खूपच अवघड बनले असते. एका जुन्या समजुतीनुसार, तीन आठवड्यांपर्यंत आपण एखाद्या विशिष्ट स्वरूपात काम केले किंवा एका विशिष्ट वस्तूचा वापर केला, तर ती आपली सवय बनून जाते. तंत्रज्ञान हे आपल्या सवयीचे होऊन जाणे ही जागतिकीकरणाच्या आणि तंत्रज्ञानाचा दबदबा असण्याच्या सध्याच्या काळातील एक चांगली घटना आहे.

त्याचप्रमाणे कोरोना विषाणूशी सुरू असलेल्या युद्धात तंत्रज्ञानाचा एक शस्त्र म्हणून व्यापक प्रमाणावर उपयोग करण्याची घटनाही भारतात प्रथमच पाहावयास मिळाली आहे. तंत्रज्ञानाने लोकांना एकमेकांशी जोडून ठेवले, एवढेच नव्हे तर वेगाने माहिती पोहोचविणे, व्यवहार सुरळीत करणे, एवढेच नव्हे तर संभाव्य रुग्णांवर नजर ठेवणे यासारख्या कामातही मदत केली आहे. परंतु याचे काही विरोधाभासी पैलूही आहेत. तंत्रज्ञानात मुळातच एक लोकशाहीवादी आणि सर्वसमावेशक ताकद आहे. परंतु कोरोना संकटाने तिच्या मर्यादाही उघड केल्या आहेत. तंत्रज्ञान आपल्या स्तरावर माहिती बाधित करत नाही, हे खरे आहे आणि सर्वांना सशक्त करण्याची क्षमता त्यात असते; परंतु त्याची ही ताकद अनेक पैलूंवर अवलंबून असते. ही गोष्ट आज जितक्या तीव्रतेने जाणवली, तशी पूर्वी जाणवली नव्हती. उदाहरणार्थ, दिल्लीतील एका मोठ्या सोसायटीत जेव्हा छोट्या कामगारांना (माळी, धोबी, कचरा उचलणारे, मोलकरीण, चालक आदी) काम करण्याची अनुमती देण्याचा विचार करण्यात आला आणि बरेच आवश्यक निर्बंध लावण्यात आले (फेसमास्क, सॅनिटायझर, सोशल डिस्टन्सिंग वगैरे) तेव्हा एका ठिकाणी सर्वजण अडखळले. ती गोष्ट म्हणजे सर्वांच्या मोबाइलमध्ये आरोग्य सेतू अ‍ॅप असणे.

बहुतांश छोट्या कामगारांकडे स्मार्टफोन नाहीत, तर स्वस्तातले मोबाइल फोन आहेत. त्यावर अँड्रॉइड अ‍ॅप चालू शकत नाहीत. अशा ठिकाणी तंत्रज्ञानाच्या मर्यादा समोर येतात. आपल्या आसपास एखादा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहे का, याची माहिती आरोग्य सेतू अ‍ॅप आपल्याला देते. त्याचप्रमाणे ज्याच्याकडे हे अ‍ॅप आहे, अशा व्यक्तीला संसर्ग झाल्यास सरकारी यंत्रणांना सूचित करण्याचासुद्धा हा एक चांगला मार्ग आहे. परंतु त्याला किती मर्यादा आहेत, हे उपरोक्त सोसायटीतील उदाहरणावरून स्पष्ट होते. स्मार्टफोन नसल्यामुळे हे लोक असुरक्षित आणि त्यांच्यामुळे त्यांच्या संपर्कातील अन्य लोकही सुरक्षित, अशी परिस्थिती उद्भवते. अशा वेळी तंत्रज्ञानाची शक्ती लोकशाहीवादी, निष्पक्ष आणि सर्वसमावेशक आहे, असे कसे म्हणता येईल? अशाच प्रकारे स्वतःचा स्मार्टफोन आणि संगणक नसलेले लाखो विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर फेकले गेले. कोलॅबोरेशन म्हणजेच सहकर्माच्या परिघातूनसुद्धा असंख्य लोक केवळ स्वतःचा संगणक नसल्यामुळे किंवा इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली नसल्यामुळे बाहेर फेकले गेले.

एकीकडे शहरी लोकसंख्येची असंख्य कामे तंत्रज्ञानाच्या मदतीने सुरू राहिली, तर दुसरीकडे ग्रामीण आणि अविकसित भागांत असा एखादा मार्ग शोधण्यात आला आहे, हेही ठाऊक नव्हते.

जरी ठाऊक झाले असते तरी विजेची अखंडित उपलब्धता, डिजिटल उपकरणे किंवा तांत्रिक सक्षमतेच्या अभावी हे लोक मागेच राहिले असते. भाषिक आव्हाने आणि गरिबांशी संबंधित मुद्दे बाजूला ठेवले तरी आपल्या लक्षात येईल की आजच्या काळात डिजिटल विभाजन वाढलेच आहे. तंत्रसमृद्ध लोक पुढे निघून गेले आहेत आणि तांत्रिकदृष्ट्या वंचित असलेली लोकसंख्या मागे राहिली आहे.

सोशल मीडियाने या संकटाच्या काळात लोकांना एकमेकांशी जोडून ठेवले; परंतु याच माध्यमावरून चुकीची माहिती, फेक न्यूज आणि गैरप्रचारही मोठ्या प्रमाणावर झाला. लोकांमध्ये भय आणि द्वेष पसरविणार्‍या लोकांना आयती संधी मिळाली. कारण या काळात लोकांकडे बराच वेळ मोकळा होता. सर्वसाधारणपणे दररोज 3.47 तास इतका वेळ स्मार्टफोनचा वापर करण्यात आला.

या वेळापैकीही 19 टक्के वेळ चॅटिंग करण्यात गेला आहे. 15 टक्के वेळ सोशल नेटवर्किंगमध्ये, 14 टक्के वेळ व्हिडिओ स्ट्रीमिंगमध्ये आणि सहा टक्के वेळ ब्राउजिंगमध्ये व्यतीत झाला आहे. यातील दुसरा मुद्दा आपण दुर्लक्षित करायचे ठरविले तरी स्मार्टफोनवरील कमीत कमी 54 टक्के वेळ अशा कारणांसाठी खर्च झाला आहे, ज्यातून चुकीची माहिती आणि दिशाभूल करणार्या बातम्या इंटरनेटच्या माध्यमातून पसरविल्या जातात. एवढेच नव्हे तर सायबर गुन्हेगारांनाही या संकटाच्या काळात फसवणुकीची संधी मिळाली.

तंत्रज्ञानाच्या दुधारी तलवारीचा वापर करून साध्यासुध्या लोकांना त्यांनी फसविले. काही नाकर्त्या माणसांनी आपल्यावरील काम दुसर्यावर ढकलण्यासाठीही तंत्रज्ञानाचा आधार घेतला. श्रमिकांसाठी रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या; परंतु लाखो श्रमिक माहितीची वाटच पाहत बसले. धोरणकर्त्यांच्या किंवा तंत्रज्ञानाच्या किंवा मजुरांच्या अगतिकतेच्या पातळीवर कुठेतरी चूक राहूनच गेली. आता कुणाला दोष द्यायचा? राज्य सरकारांनी मजुरांची नोंदणी करण्यासाठी वेबसाइट्स तयार केल्या. त्यातील अनेक वेबसाइट्स व्यवस्थित चालल्याच नाहीत. आपण तासन्तास नोंदणीसाठी प्रयत्न केल्याचे श्रमिकांनी माध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले. अनेकदा मजुरांना हेल्पलाइनशी संपर्क करताना अडचणी आल्या.

साहजिकच, अनेक मंडळींना आपला नाकर्तेपणा लपविण्यासाठी तंत्रज्ञानाचा आधार मिळाला, असे म्हणता येईल. जेव्हा एखाद्या हेल्पलाइनशी संपर्क होऊ शकत नसेल किंवा एखादा माणूस वेबसाइटपर्यंत पोहोचूच शकत नसेल, तर त्याचे उत्तर देणे सोपे असते- मागणीच एवढी वाढली की, सर्व्हर ती पूर्ण करू शकत नाही.

परंतु अशा व्यक्तींना एक गोष्ट विचारायला पाहिजे. एखाद्या वेबसाइटच्या चार-पाच मिरर (वेगवेगळी ठिकाणे) बनविण्यापासून त्यांना कुणी रोखले होते का? या विवेचनावरून एवढे लक्षात येईल, की तंत्रज्ञान उपयुक्त असले, तरी ते समाजाचे सरळसरळ दोन भाग करणारे ठरले आहे. जिथे उपलब्धता आणि ज्ञान नाही, तिथपर्यंत तंत्रज्ञान पोहोचले, तरच त्याचा लाभ झाला असे म्हणता येईल.

Deshdoot
www.deshdoot.com