यूपीतील संघर्ष आणि संघ

यूपीतील संघर्ष आणि संघ

- कमलेश गिरी

संघ नेहमी कोणताही निर्णय दूरगामी योजनेअंतर्गत घेत असतो तर भाजपच नव्हे तर कोणताही राजकीय पक्ष तत्कालीन गरजा लक्षात घेऊन त्यानुसार आपले निर्णय घेत असतो. त्यामुळेच मुख्यमंत्री बनल्यानंतर योगी आदित्यनाथ यांना लोकसभा आणि विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात स्टार प्रचारक म्हणून पाठविण्यात आले. संघ योगी आदित्यनाथांना कधीच कमकुवत होऊ देणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

उत्तर प्रदेशातील राजकारण आता पुढील वर्षी तेथे होत असलेल्या विधानसभा निवडणुकांभोवती केंद्रित होताना दिसत आहे. भाजप पक्षसंघटना आणि सरकारमध्ये अनेक प्रकारचे परिवर्तन दिसत आहे आणि अनेक बदल होणार आहेत. सरकार आणि पक्ष संघटनेसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सहमती आणि विचार यांना स्थान दिले जाते असे म्हटल्यास ती अतिशयोक्ती ठरणार नाही. काही दिवसांपूर्वी भाजपचे केंद्रीय संघटनेचे महासचिव बी. एल. संतोष यांचा उत्तर प्रदेशचा प्रदीर्घ दौरा आणि त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे दिल्लीत झालेले आगमन या घटनांवरून अनेक राजकीय अन्वयार्थ काढले जात आहेत. अनेक घटना अजूनही पडद्यामागेच राहिल्या आहेत. संघाचे प्रभावी पदाधिकारी आणि भाजपचे केंद्रीय नेते यांच्यात सहमती होताना दिसत नाही. भाजप मधील एक गट योगी आदित्यनाथ यांच्याविषयी आधीपासूनच असंतुष्ट असल्याचे सांगितले जाते.

दिल्लीतील अनेक भाजप नेत्यांचे अधिपत्य योगी आदित्यनाथ यांना मान्य नाही आणि त्या नेत्यांच्या कार्यचौकटीतही योगी बसत नाहीत, हे यामागील कारण असल्याचे बोलले जाते. भाजपचे एक केंद्रीय महासचिव तर सुरुवातीपासूनच योगी आदित्यनाथांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करू नये म्हणून प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. वेळोवेळी ते यासाठी राजकीय खेळीही करीत आले आहेत. काही दिवसांपूर्वी एका माजी अध्यक्षांना आपली बाजू समजून देण्यात ते यशस्वी ठरले. त्यानंतर भाजप संघटनेचे महासचिव बी. एल. संतोष आणि उत्तर प्रदेशचे प्रभारी राधामोहन सिंह हे अनेक दिवस उत्तर प्रदेशात होते.

राज्याच्या मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सर्व आमदारांशी त्यांनी विचारविनिमय केला. या चर्चांचा संपूर्ण तपशील भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याकडे सोपविण्यात आला. हे प्रकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दरबारात पोहोचले. त्यानंतर योगी आदित्यनाथ दिल्लीला आले आणि तूर्त तरी प्रकरण थंड झाल्याचे दिसत आहे.

योगी आणि त्यांच्या समर्थकांना या घडामोडींमधून राज्यात समांतर सत्तेचे नवे शक्ती केंद्र निर्माण होण्याचा धोका दिसतो आहे. गेल्या चार-पाच महिन्यांपासून सुरू असलेल्या या ओढाताणीतून संघ नेतृत्व मध्यममार्ग काढू इच्छित आहे, असे मानले जाते.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जवळून ओळखणार्‍या आणि पाहणार्‍या एका हिंदुत्ववादी विचारवंतांच्या म्हणण्यानुसार, वास्तविक योगी आदित्यनाथ यांच्याकडे संघाने आपला अधिकार वापरून एका बृहत योजनेअंतर्गत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्रिपद सोपविले होते. त्यावेळची म्हणजे 2017 ची विधानसभा निवडणूक योगी आदित्यनाथ यांच्या नावावर लढविण्यात आलेली नव्हती आणि मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत ते सर्वांत पुढे असल्याचेही त्यावेळी मानले जात नव्हते. वस्तुतः मुख्यमंत्री पदासाठी सर्वांत आघाडीवर असणार्‍या नावांमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष केशवप्रसाद मौर्य आणि तत्कालीन केंद्रीय मंत्री मनोज सिन्हा या दोघांचा समावेश होता.

परंतु राजकारणात जे दिसते ते घडत नाही. उत्तर प्रदेशातही तसेच घडले. अलीकडील काही दिवसांत संघ परिवारात सत्ता संघर्षाच्या कहाण्या राजकीय क्षेत्रात चवीने सांगितल्या-ऐकल्या जात आहेत. उत्तर प्रदेशमधील मागच्या निवडणुकांमध्ये सुनील बन्सल यांनी खूप मेहनत घेतली होती असे सांगितले जाते. मनोज सिन्हा यांनीही आपल्या विभागातील जमीन पक्षासाठी तयार केली. परंतु मुख्यमंत्रिपदाची खुर्ची मनोज सिन्हा यांनाही मिळाली नाही आणि सुनील बन्सल यांनाही महत्त्वाचे स्थान मिळाले नाही. सुनील बन्सल यांना ‘समांतर सत्ताकेंद्र’ म्हटले जाऊ लागले, हे तर उत्तर प्रदेशच्या राजकारणाची माहिती असलेल्यांना ठाऊक आहेच. ही गोष्ट योगी आदित्यनाथ यांना पटली नाही. या दोन्ही नेत्यांमधील समन्वयाच्या अभावाची चर्चा वारंवार खुलेपणाने होत राहिली.

आता विधानसभा निवडणुकांना एक वर्षापेक्षाही कमी अवधी शिल्लक असताना राजकीय डावपेच खेळले जाऊ लागले आहेत. येथूनच संघ परिवारातील सत्ता संघर्षाची चर्चा सुरू झाली असून, भाजपसुद्धा संघ परिवारातीलच एक घटक आहे. दिल्लीहून माजी नोकरशहा अरविंद शर्मा यांना उत्तर प्रदेशात पाठविण्यात आले.

ते नरेंद्र मोदी यांचे खासम्खास असल्याचे मानले जाते. त्यांना राज्यात उपमुख्यमंत्रिपदाची खुर्ची दिली जाईल, तसेच केशवप्रसाद मौर्य यांना उपमुख्यमंत्रिपदावरून हटवून प्रदेशाध्यक्ष केले जाईल, अशा चर्चा सुरू आहेत. दरम्यान, बी. एल. संतोष आणि राधामोहनसिंह या दोघांची दिल्ली आणि लखनौदरम्यान जी धावपळ सुरू आहे, त्यातून अनेक राजकीय कहाण्यांचा जन्म झाला आहे.

ही समस्या सरसंघचालक मोहन भागवत आणि सह-सरकार्यवाह दत्तात्रेय होसबोले यांच्यापर्यंत जाऊन पोहोचली. त्यामुळेच भाजपच्या काही रणनीतीकारांपेक्षा योगी आदित्यनाथांचे पारडे जड झाल्याचे मानले जाते. योगी आदित्यनाथांच्या मागे मोठा संत परिवार आहे.

योगींच्या हिंदू वाहिनीची ताकद त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात वाढतच गेली. जे लोक भाजपशी केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्याने बांधले गेले, त्यांना तूर्तास योगी आदित्यनाथ यांच्यापेक्षा कोणताही नेता मोठा दिसत नाही. संघात दत्तात्रेय होसबोले, विश्व हिंदू परिषदेत मिलिंद परांडे आणि भाजपमध्ये योगी आदित्यनाथ हे त्रिकुटच येणार्‍या काळात भारतीय राजकारणाचा नवा अध्याय लिहील, असेही बोलले जाऊ लागले आहे. हिंदू राजकारणाचे जे समर्थक आहेत, त्यांना हे लोक खूपच महत्त्वाचे वाटतात.

संघ नेहमी कोणताही निर्णय दूरगामी योजनेअंतर्गत घेत असतो तर भाजपच नव्हे तर कोणताही राजकीय पक्ष तत्कालीन गरजा लक्षात घेऊन त्यानुसार आपले निर्णय घेत असतो. त्यामुळेच मुख्यमंत्री बनल्यानंतर योगी आदित्यनाथ यांना लोकसभा आणि विविध राज्यांमधील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात स्टार प्रचारक म्हणून पाठविण्यात आले. पूर्वी मोदींना असेच सर्वत्र पाठविले जात असे.

संघाच्या एका पदाधिकार्‍याच्या म्हणण्यानुसार, संघ योगींना मोदींचा पर्याय म्हणून नव्हे तर त्यांच्या नंतरच्या भाजपसाठी तयार करीत आहे. जोपर्यंत नरेंद्र मोदी राजकारणात आहेत, तोपर्यंत भाजप आणि सरकारमधील वरिष्ठ नेते कार्यरत आहेत आणि राहतील. परंतु ते सक्रिय राजकारणातून अलग झाल्यानंतर नेतृत्वशून्यता निर्माण होता कामा नये. अटलबिहारी वाजपेयी यांच्यानंतर अशी स्थिती निर्माण झाली होती. म्हणूनच भाजपमध्ये दुसर्‍या फळीचे काही नेते वेळीच तयार करण्याचे संघाचे प्रयत्न सुरू आहेत.

राजकारणाचे पुढील युग प्रखर राष्ट्रवादाचे आहे आणि त्यात योगी आदित्यनाथांसारखे प्रखर राष्ट्रवादी आणि दृढ हिंदुत्ववादी नेतेच भाजपला पुढे नेऊ शकतात. त्यामुळेच संघ योगी आदित्यनाथांना कधीच कमकुवत होऊ देणार नाही, असे जाणकारांचे म्हणणे आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com