चीनी षड्यंत्रावर शिक्कामोर्तब?

चीनी षड्यंत्रावर शिक्कामोर्तब?

- डॉ. शैलेंद्र देवळाणकर, परराष्ट्र धोरण विश्‍लेषक

करोनाचा प्रसार जगभरात होऊ लागल्यानंतर काही शास्रज्ञांनी, अभ्यासकांनी आणि पत्रकारांनी हा विषाणू चीनच्या वुहानमधील प्रयोगशाळेत तयार झालेला असून तो नैसर्गिक नसल्याचे दावे केले होते. आता ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका अहवालातून यावर शिक्कामोर्तब झाले आहे.

या अहवालानुसार चीनने आपले विस्तारवादाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मोठ्या युद्धाची तयारी सुरू केली असून हे युद्ध चीनला अण्वस्रांनी नव्हे तर महासंहारक जैविक अस्रांनी लढायचे असल्याचे स्पष्ट झाले आहे. करोना हा यासाठीच्या षड्यंत्राचाच एक भाग असल्याचे हा अहवाल सांगतो. ‘द वीकेंड ऑस्ट्रेलियन’ या प्रसिद्ध वृत्तपत्रातील एका अहवालात नुकताच एक अत्यंत खळबळजनक स्वरुपाचा गौप्यस्ङ्गोट करण्यात आला आहे.

अमेरिकेच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाकडे सबळ पुरावे आलेले असून हे पुरावे या निर्णयाप्रत घेऊन जाऊ शकतात की करोनाची निर्मिती ही कोणत्याही पद्धतीने नैसर्गिक नसून किंवा ती अपघातात्मक पद्धतीने झालेली नसून हा एक अत्यंत मोठ्या चीनी षड्यंत्राचा भाग आहे, असा दावा या वृत्तपत्रातील अहवालाने केला आहे. चीनी सरकारमधून ङ्गुटलेल्या या दस्तावेजांची खातरजमा करण्यात आली असून ते अस्सल असल्याचे अनेक अभ्यासकांनी म्हटले आहे. ‘सार्सचा अनैसर्गिक स्रोत आणि तिसरे महायुद्ध लढणार्‍या जनुकीय जैविक अस्रांच्या मानवनिर्मित प्रजातीफ या शीर्षकांतर्गत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. यामध्ये नमूद केल्यानुसार, अमेरिकेच्या तपास यंत्रणांनी याबाबतची सर्व माहिती गोळा केली असून ती त्यांच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाला सादर केलेली आहे. त्यावरुन चीनने तिसर्‍या महायुद्धाची तयारी सुरू केली असल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनने आपल्या विस्तारवादाच्या राक्षसी महत्त्वाकांक्षेला मूर्त रुप देण्यासाठी वन बेल्ट वन रोड (ओबीओआर) हा प्रकल्प हाती घेतला होता.

सुरुवातीला या प्रकल्पामध्ये ७० हून अधिक देश सहभागी होणार होते. परंतु आता या प्रकल्पाला बहुतांश देश विरोध करु लागले आहेत. कारण यामागचा चीनचा कावेबाजपणा हळूहळू अनेक देशांना उमगू लागला आहे. त्यामुळे चीनने आपले विस्तारवादाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आता एका मोठ्या युद्धाची तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे चीनला हे युद्ध अण्वस्रांनी लढायचे नाहीये, तर त्यासाठी महासंहारक जैविक अस्रांचा वापर करण्याचा त्यांचा डाव आहे. ही तयारी एक दशकांपूर्वीच चीनने सुरू केली आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या तयारीचा भाग म्हणजेच करोना विषाणूची निर्मिती ही प्रयोगशाळेत करण्यात आली. थोडक्यात, करोना हा एका मोठ्या षड्यंत्राचा भाग आहे अशा स्वरुपाचे खळबळजनक वृत्त ङ्गद ऑस्ट्रेलियनफने दिले आहे.

आज जागतिक सत्तासमीकरणे, सत्तास्पर्धा आणि वर्चस्व या सर्व गोष्टी अर्थकारणाशी निगडित आहेत. ज्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत आहे, सक्षम आहे त्या देशाचा आंतरराष्ट्रीय राजकारणावरचा प्रभाव मोठा आहे. ही बाब अचूकपणाने ओळखून चीनने इतर राष्ट्रांच्या अर्थव्यवस्था कशा प्रकारे डबघाईला येतील आणि आपली अर्थव्यवस्था कशा प्रकारे सदृढ बनेल अशा दृष्टिकोनातून करोनाची निर्मिती केली. करोनाचा मुख्य उद्देश हा शत्रू देशांच्या अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करणे हा होता. आज चीनचा करोनानिर्मितीमागचा हा उद्देश बर्‍याच अंशी सङ्गल होताना दिसत आहे. कारण आज जगामध्ये करोनाची दुसरी, तिसरी, चौथी लाट येते आहे. युरोपमधील संपूर्ण मोठ्या अर्थव्यवस्था करोनाच्या महासंकटाने पूर्णतः कोलमडल्या आहेत. सातत्याने लॉकडाऊनचा पर्याय अवलंबावा लागत असल्याने त्यांचे अर्थचक्र थंडावले आहे. करोना संकटाने जगभरातील अनेक देशांमधील मोठमोठे उद्योगधंदे बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.

करोडो लोक बेरोजगार झाले आहेत. खुद्द अमेरिकेमध्ये ५ कोटी लोक करोना संकटकाळात बेरोजगार झाले आहेत. अमेरिकेमध्ये करोनाने मरण पावणार्‍यांची संख्या ५ लाखांच्या पुढे गेलेली आहे. कोणताही देश आज या संकटापासून पूर्णतः मुक्त झाल्याचा दावा करु शकत नाहीये. परिणामी एकंदर जगाची स्थिती आज अत्यंत बिकट बनलेली आहे. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी आणि जागतिक बँकेकडून प्रत्येक देशांच्या आर्थिक विकासासंदर्भातील आकडेवारी नुकतीच प्रकाशित करण्यात आली; यामध्ये बहुतांश देशांचा आर्थिक विकासाचा दर २०२१-२२ या वित्तीय वर्षांतही नकारात्मकच राहील असे अनुमान वर्तवण्यात आले आहे. करोनाने जगाला अनेक वर्षे मागे लोटलेले आहे. एखाद्या युद्धामध्येही जितके नुकसान होत नाही त्याहून महाभयंकर नुकसान करोनाच्या महासंकटामुळे होताना दिसत आहे.

अमेरिकेमध्ये १९३० आणि २००८ मध्ये आलेल्या आर्थिक महामंदीमुळेही जितके नुकसान झालेले नव्हते तितके नुकसान करोनाच्या संकटामुळे होताना दिसत आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाची समीकरणे बदलू लागली आहेत. प्रत्येक राष्ट्र आज आत्मकेंद्री बनताना दिसत आहे. ग्लोबल लिबरॅलिझम किंवा जागतिक उदारमतवाद किंवा जागतिक कल्याणाचा सामूहिक आदर्शवाद हा आता कुठे तरी मागे पडताना दिसत आहे.

एकीकडे ही सगळी परिस्थिती असताना ज्या चीनमध्ये करोनाचा उगम आणि प्रसार झाला तेथे मात्र सारं काही आलबेल असल्याचे दिसत आहे. आज इतर देशांमध्ये लसीकरणासाठी मोठमोठ्या मोहिमा हाती घेतल्या जात आहेत, प्रत्येक देश आपल्या नागरिकांना कोविड प्रतिबंधक लस देण्यासाठी झटताना दिसत आहे; पण चीनमध्ये मात्र अशी कोणतीही मोहीम हाती घेतली गेलेली दिसून येत नाहीये. तसेच करोना संक्रमण रोखण्यासाठी बहुतांश देशांमध्ये पूर्णतः किंवा अंशतः लॉकडाऊन केले जात आहेत, पण असे लॉकडाऊन चीनमध्ये दिसून आले नाहीये. संपूर्ण जग चिंताक्रांत, निराश आणि हतबल झालेले असताना चीनमध्ये मोठमोठे समारंभ पार पडत आहेत. ज्या वुहानमधून करोनाचा उगम झाला तेथे नुकताच स्ट्रॉबेरी म्युझिक ङ्गेस्टिव्हल साजरा झाला. या ङ्गेस्टिव्हलमध्ये लाखो चिनी लोक सहभागी झाले होते. तिथे कसल्याही प्रकारच्या मास्कची वा सोशल डिस्टन्सिंगची सक्ती करण्यात आली नव्हती. यामुळे चीनसंदर्भातील गूढ आता वाढू लागले आहे.

दुसरीकडे चीनच्या अर्थव्यवस्थेला करोनाचा ङ्गटका बसलेला नसल्याचे दिसत आहे. आज बहुतांश देशांचे व्यापार आणि निर्यात यावर करोनाचा मोठा आघात झाला आहे. परंतु चीनची निर्यात मात्र प्रचंड वाढलेली आहे. करोनाशी लढा देण्यासाठी लागणार्‍या साहित्याच्या व्यापारातून चीन बक्कळ नङ्गा कमावताना दिसत आहे. करोनावरच्या लसीच्या निर्यातीत चीनचा वाटा सर्वाधिक आहे. करोना लसींच्या एकूण निर्यातीपैकी ५० टक्के निर्यात एकट्या चीनकडून होत आहे. त्यातून चीन अब्जावधी डॉलर्स नङ्गा कमावतो आहे. थोडक्यात, करोनामुळे जग बुडत असताना चीन पूर्णपणे ङ्गायद्यात येताना दिसत आहे.

आता प्रश्‍न उरतो तो, इतर देशांना उद्ध्वस्त करण्यासाठी चीनने करोनाची कशा प्रकारे निर्मिती केली, यामध्ये चीनचा कसा हात आहे हे सिद्ध कसे होणार हा. वास्तविक, गेल्या दीड वर्षाच्या काळातील चीनचे संपूर्ण वागणे हे अत्यंत रहस्यमय आणि गूढ राहिले आहे. त्यामुळे चीनविरोधातील संशय बळावत चालला आहे. करोनाचा उगम कसा झाला याबाबत सुरुवातीपासूनच चीनने केलेले दावे हे विसंगत आणि ङ्गसवे राहिले आहेत. वुहानमधील डॉ. ली यांनी सार्ससारख्या एका विषाणूचा संसर्ग होत असून त्याची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चीन शासन-प्रशासनाला कळवले होते. परंतु त्यावेळी या डॉक्टरच्या म्हणण्याकडे गांभीर्याने पाहण्याऐवजी त्याला अटक करण्यात आली. तसेच त्याला टॉर्चर करुन विषाणूविषयी केलेले पहिले वक्तव्य त्याला बदलण्यास भाग पाडले. त्याला नवीन माहिती देण्याचा हुकुम देण्यात आला.

काही दिवसांनी डॉ. ली यांचा याच विषाणूमुळे मृत्यू झाला. चीनमधील अनेक पत्रकार, डॉक्टर्स, शास्रज्ञ गायब झाल्याच्या बातम्या पुढे आल्या. अमेरिकेतील वॉशिंग्टन पोस्ट, वॉल स्ट्रीट जर्नल, न्यूयॉर्क टाईम्सच्या पत्रकारांना चीनने बाहेर काढले. हॉंगकॉंगमधील काही शास्रज्ञांनी चीनच्या विषाणू प्रयोगशाळेत अशा प्रकारचे १५० हून अधिक विषाणू असल्याचा दावाही केला होता. गेल्या एक दशकापासून चीन याबाबत संशोधन करत आहे. गेल्या वर्षभरातील या आणि अशा सर्व गोष्टी, अनेक अभ्यासकांचे-शास्रज्ञांचे दावे, चीनची वर्तणूक पाहता ङ्गद ऑस्ट्रेलियनफमधील अहवालातील दावा हा खरा असल्याचे सहजगत्या लक्षात येते.

कोरोनाबाबत विचार करता, चीनने असे का केले असेल याचा विचार केला तर चीन हा अत्यंत महत्त्वाकांक्षी देश आहे. चीन त्याला ‘मिडल किंगडम थिअरी’ म्हणतो. म्हणजेच जगाच्या नकाशात चीन केंद्रस्थानी आहे आणि आम्ही जगाला नेतृत्व दिले पाहिजे अशी एक मोठी महत्त्वाकांक्षा चीनमध्ये आहे. या महत्त्वकांक्षेपोटी चीन सदैव तयारी करत असतो. परंतु अमेरिका असेपर्यंत ही महत्त्वाकांक्षा पूर्ण होऊ शकत नाही हे चीनला माहिती आहे. कारण चीनच्या तुलनेत अमेरिका प्रगत आहे. त्यामुळे चीनला अमेरिकेचा समोरासमोर सामना करणे, युद्धमार्गाने

मुकाबला करणे शक्य नाही. शिवाय अंतराळ, सामरीक यांसारख्या क्षेत्रात अमेरिकेचा मुकाबला करणे चीनला शक्य नाही. त्यामुळे कटकारस्थानाच्या माध्यमातून अमेरिकेचे सामर्थ्य कमी करण्याचा प्रयत्न चीन करतो आहे असा दावा काही अभ्यासक करू लागले आहेत. या अभ्यासकांनी काही साहित्याचे संदर्भही दिलेले आहेत. त्यानुसार, अमेरिकेचा सामना कसा करता येईल यासाठी चीनमधील लष्करी अधिकार्‍यांनी काही साहित्य निर्मिती केली होती. त्यामुळे अमेरिकेचे सामर्थ्य कमी करण्यासाठी चीनने हा विषाणू तयार केला का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. यापूर्वी सार्ससारखा विषाणू चीनमधूनच आला होता.

आता मुद्दा उरतो तो म्हणजे जरी चीनविरोधात सबळ पुरावे असले तरी त्यांच्याविरोधात कारवाई करणार कोण? चीन हा सुरक्षा परिषदेचा कायमस्वरुपी सदस्य आहे. संयुक्त राष्ट्रसंघटनेच्या १५ महत्त्वाच्या समित्यांचा चीन सदस्य आहे. अशा वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवरुन चीनविरोधात काही कारवाई केली जाणे हे खूप अवघड आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयात जरी एखाद्या देशाने धाव घेतली आणि न्यायालयाने चीनविरोधात निकाल दिला तरी त्याची अमलबजावणी कोण करणार हा प्रश्‍नच आहे. कारण आज आंतरराष्ट्रीय समुदायामध्येही एकी नाहीये. उलट चीन, रशिया, इराण, पाकिस्तान हे देश एकत्र येताना दिसत आहेत. त्यामुळे जगाला महासंकटाच्या खाईत लोटूनही चीन नामानिराळाच राहण्याची शक्यता अधिक आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com