Friday, April 26, 2024
HomeUncategorizedचीनचे पाणीयुद्ध आणि भारत

चीनचे पाणीयुद्ध आणि भारत

– ब्रिगेडियर हेमंत महाजन, निवृत्त

ब्रम्हपुत्रा नदी बरमार पर्वताला वेढा घालून भारतामध्ये प्रवेश करते. ही एक प्रचंड मोठी घळ आहे. इथे या नदीचे पाणी दोन ते अडीच हजार मीटर उंचीवरुन खाली कोसळते आणि नंतर ते भारतात प्रवेश करते.

- Advertisement -

अलीकडेच समोर आलेल्या वृत्तांनुसार, या ठिकाणी चीन जगातील सर्वांत मोठे धरण बांधणार आहे. हे धरण आकाराला आल्यास भारतासह दक्षिण पूर्व आशियाई देशांना प्रचंड मोठा फटका बसणार आहे. चीनच्या या पाणीयुद्धाला शह देण्यासाठी भारताने तिबेट कार्ड खेळण्याची गरज आहे.

चीन भारताविरुद्ध वेगवेगळ्या आघाड्यांवर युद्ध लढत आहे. महाराष्ट्रातील वीजपुरवठ्यावर झालेला सायबर हल्ला, लडाखमध्ये चीनने केलेली घुसखोरी, अरुणाचल प्रदेशच्या सीमेवर चीनने वसवलेली 500 हून अधिक गावे वसवण्याचा प्रयत्न, उत्तराखंडमध्ये बर्फ कडा कोसळून झालेला घातपात अशा अनेक घटनांमुळे चीनचे आव्हान बहुआयामी आहे हे स्पष्ट झाले आहे. यामध्ये आणखी एक आयाम आहे. तो म्हणजे चीनचे भारताविरुद्ध पाणीयुद्ध किंवा पर्यावरण युद्ध. या युद्धामध्ये चीनचे वर्चस्व आहे. कारण भौगोलिक दृष्ट्या चीन वरच्या भागात वसलेला आहे. भारतात येणार्‍या अनेक मोठ्या नद्यांचे उगमस्थान चीनच्या पठारावर आहे. या नद्या चीनमधून उगम पावून भारतात प्रवेश करतात आणि पुढे बांगलादेश, दक्षिण पूर्व आशियामधल्या अन्य देशांमध्ये जातात. अशा वेळी जर चीनमध्ये या नद्यांचे पाणी अडवले गेले तर भारत, बांगलादेश आणि दक्षिण पूर्व आशियामधल्या देशांवर याचा गंभीर आर्थिक परिणाम होेऊ शकतो. पण चीनकडून याचा विचार न करता पाणी अडवण्याचे प्रयत्न युद्धपातळीवर सुरु आहेत.

चीन असे का करतो आहे?

चीनचे हे प्रयत्न सुनियोजित रणनीतीचा भाग आहेत. चीनी सैन्याची भारतीय सैन्याबरोबर लढण्याची अजिबात हिंमत नाही. त्यांचे शहरातील नाजूक सैनिक हे अतिशय कणखर अशा भारतीय सैनिकांशी कधीही लढाई लढू शकत नाहीत, याची चीनला पुरेपूर कल्पना आहे. त्यामुळेच चीन इतर प्रकारांचा अवलंब करुन, आक्रमण करुन भारताची आर्थिक प्रगती थांबवण्याचा प्रयत्न करत आहे. चीनला भारत प्रत्त्युत्तर देत नाही असे नाही. विद्यमान सरकार आणि आपल्या यंत्रणा चीनच्या या कुरघोड्यांना जशास तसे प्रत्युत्तर देत आहेत. पण भारताची भूमिका ही स्वसंरक्षणात्मक असल्याने आपण चीनविरुद्ध पुरेशी आक्रमक कारवाई करत नाही. खरे पाहता आजच्या स्थितीत ती करण्याची गरज आहे.

चीनमध्ये उगम पावणारी ब्रम्हपुत्रा नदी लांबच्या बरमार या पर्वताला वेढा घालून भारतामध्ये प्रवेश करते. ही एक प्रचंड मोठी घळ आहे. इथे या नदीचे पाणी दोन ते अडीच हजार मीटर उंचीवरुन खाली कोसळते आणि नंतर ते भारतात प्रवेश करते. अलीकडेच समोर आलेल्या वृत्तांनुसार, या ठिकाणी चीन जगातील सर्वांत मोठे धरण बांधणार आहे. यामुळे तिथे तयार होणारी वीज ही जवळजवळ थ्री गॉरबेज धरणाच्या तुलनेमध्ये तिप्पटीहून अधिक असेल. ब्रम्हपुत्रेचे पाणी या ठिकाणी अडवून नंतर ते चीनमधील इतर दुष्काळी भागांकडे पाठवले जाईल. अर्थात यासाठी बराच काळ जावा लागणार आहे; परंतु या पाणीयुद्धाला सुरुवात झाली आहे हे मात्र निश्चित.

यापूर्वी चीनने अनेक वेळा ब्रम्हपुत्रा नदीवर अनेक छोटी मोठी धरणे बांधलेली आहेत. यामुळे 2016 मध्ये सीयॉन नदीचे पाणी हे पूर्णपणे थांबलेले होते. 2017 मध्ये वेगवेगळ्या नदीवर होणार्‍या धरणांच्या कामांमुळे ब्रम्हपुत्रेचे भारतातील पाणी हे अतिशय गढूळ, सिमेंट, रेती मिश्रीत भरले गेलेले होते. आंतरराष्ट्रीय कायद्याप्रमाणे चीनने या नदीच्या पाण्याची माहिती भारताला देणे गरजेचे आहे. परंतु चीन कुठलेही कायदे पाळत नाही. चीनने कुठलीही माहिती भारताला देणे बंद केले आहे. त्यामुळे अचानक आसाम आणि उतराखंडमध्ये महापुर येतात. हे संकट आपल्याला टाळता येत नाहीये.

आता चीन जे धरण ग्रेटबेण्डवर बांधत आहे ते पूर्ण होण्यास बराच काळ जावा लागणार आहे; परंतु यासंदर्भात काही माहिती समोर आली आहे. त्यानुसार चीन डोंगराच्या आता प्रचंड मोठा बोगदा बनवून तिथून ते पाणी दीड ते दोन हजार फुट उचलून नंतर ते चीनच्या दुष्काळी भागात वळवेल. असे झाल्यास ब्रम्हपुत्रेचे पाणी हे नंतर भारतामध्ये येणे पूर्णपणे थांबेल. असे असताना भारतातील काही तथाकथित तज्ज्ञ मात्र भारताने इतकी काळजी करण्याचे कारण नाही, असे सांगताना दिसत आहेत. ब्रम्हपुत्रा नदी ज्यावेळी भारतातून वाहते तेव्हा त्यामध्ये पुरेसे पाणी असते, असे त्यांचे म्हणणे आहे. परंतु ब्रम्हपुत्रेमध्ये भारताच्या आत असलेले पाणी हे फक्त पावसाळ्यामध्ये तीन ते चार महिने असते. बाकीच्या आठ महिन्यांमध्ये ब्रम्हपुत्रेमध्ये येणारे पाणी हे तिबेटमधून येते. ब्रम्हपुत्रा नदी ही अतीउंच भागातून वाहणारी नदी आहे. ही नदी जवळजवळ 2200 किमीचा प्रवास हिमालयातून करते. तिथून ती अतिशय चांगल्या प्रतीची काळी माती भारताच्या अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये वाहून आणते. त्यामुळेच आसामची जमीन सुपिक होते. या नदीवर धरण बांधले गेले तर जी सुपिक माती पाण्याबरोबर वाहून येते ती येणे बंद होणार आहे. परिणामी, आसाममधल्या जमीनीचा कस कमी होऊ लागेल. याशिवाय चीनने जर पाणी अचानक सोडले तर मोठ्या प्रमाणात पूर येऊ शकतो. चीनच्या या पाणी अडवणुकीमुळे या नदीतील जलसृष्टी, जैवसृष्टी आणि माशांची पैदास यांवरही अत्यंत प्रतिकूल परिणाम होणार आहे.

चीनने मेकॉन नदीचे पाणी थांबवल्यामुळे दक्षिण पूर्व आशियामधल्या देशांवर काय परिणाम झाला आहे याचा अभ्यास केल्यास याची प्रचिती येते. चीनने पाणी अडवल्यामुळे या देशांमध्ये पाण्याचा दुष्काळ निर्माण झालेला आहे. भविष्यात अशाच प्रकारचा दुष्काळ अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या काही भागांमध्ये होऊ शकतो. म्हणजेच चीन या पाण्याचा वापर दबावासाठी, युद्धाच्या रणनीतीसाठी करु शकतो.

भारताने काय करावे?

या पार्श्वभूमीवर दक्षिण पूर्व आशियाई देश आणि जागतिक समुदायाच्या मदतीने भारताने चीनविरुद्ध एक आघाडी उघडून चीनवर दबाव आणणे आवश्यक आहे. तसेच हा विषय पुन्हा एकदा संयुक्त राष्ट्रसंघामध्ये आणला पाहिजे. यामुळे आपल्याला चीन विरुद्ध आक्रमक कारवाई करता येईल. दुसरीकडे, भारताने या नद्यांवर भारताच्या आत धरणे बांधून पाणी साठवण्याची क्षमता निर्माण करावी. कारण ब्रम्हपुत्रा नदीला भारतातून उगम पावणार्‍या अनेक उपनद्याही मिळतात. परंतु त्यांचे पाणी नंतर वाहून जाते. ते साठवले तर दुष्काळी परिस्थीतीला सामोरे जाणे आपल्याला सोपे जाईल. सर्वांत जास्त आक्रमक कारवाई म्हणून भारताने चीनची दुखरी नस असलेल्या तिबेटचा वापर केला पाहिजे.

तिबेटमध्ये राहणारे 50 लाख तिबेटीयन्स हे चीनच्या बाजूने नाहीत. आपण त्यांचा वापर करून चीन विरुद्ध एक युद्ध तिबेटमध्ये सुरु करु शकतो का यावर विचार करायला पाहिजे. तिबेटखेरीज चीनच्या अन्यही काही दुखर्‍या नसा आहेत. त्यांचा पुरेपुर वापर करण्याची गरज आहे. थोडक्यात, चीनला आपण एक कडाडून इशारा देण्याची आता वेळ आली आहे. तुम्ही जर आमच्याविरुद्ध सायबरयुद्ध, पाणीयुद्ध, पर्यावरणयुद्ध छेडले तर आम्हीही तिबेटच्या लोकांविषयी बोलून नवीन प्रकारचे युद्ध सुरु करु शकतो.

- Advertisment -

ताज्या बातम्या