Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedचीनचे ‘नॅरेटिव्ह वॉरफेअर’

चीनचे ‘नॅरेटिव्ह वॉरफेअर’

– ब्रिगेडियर हेमंत महाजन

बदलत्या काळात युद्धशास्राचे आयाम बदलत चालले आहेत. या नवआयामांचा खुबीने अभ्यास आणि वापर करण्यात चीनने आघाडी घेतली आहे. जागतिक पातळीवरील आपली प्रतिमा आपल्या दुष्कृत्यांमुळे खराब होणार नाही याचा विचार चीनने बहुधा खूप आधीच केला असावा. त्यामुळेच चीनने जगभरातील बड्या माध्यम समूहात प्रचंड मोठी आर्थिक गुंतवणूक प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरित्या केली आहे.

- Advertisement -

आज करोनामुळे सबंध जगभरातील जनमत आपल्याविरोधात जात असल्याचे लक्षात घेऊन चीनने या माध्यमशक्तीचा वापर करुन घेण्यास सुरुवात केली आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे युरोपात झळकलेले ‘धन्यवाद चीन’ हे फलक !

चीन नेहमीच वेगळ्या प्रकारची लढाई सुरू करण्यापूर्वी अवलोकन करतो. भारताबरोबरच्या गेल्या चार दशकांच्या स्पर्धात्मक शत्रुत्त्वाचा चीनचा प्रवास पाहिल्यास याची सहज प्रचिती येते. शत्रूच्या केवळ एकाच अंगावर घाव न घालता टप्प्याटप्प्याने, सुनियोजितपणाने आणि चलाखीने सर्वांगावर घाव घालून त्याला गतप्राण, जराजर्जर करायचे आणि नंतर त्याच्यावर कब्जा मिळवायचा ही चीनची युद्धनीती राहिली आहे.

आधुनिक काळातही चीन याच रणनीतीनुसार आपली विस्तारवादाची भूमिका पुढे नेत आहे आणि महासत्ता बनण्याची महत्त्वाकांक्षाही पूर्ण करत आहे. बदलत्या काळात माहितीयुद्धाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. आज सोशल मीडियाचा प्रभाव वाढला असला तरी पारंपरिक माध्यमांची महत्ताही कमी झालेली नाही.

या दोन्हीही बाबतीत आपली दूरदर्शी चतुराई वापरत चीन सातत्याने जगाची दिशाभूल करण्याचे काम करत आहे. यासाठी जगभरातील माध्यम समूहात, माध्यमविश्वात चीन अफाट पैसा गुंतवत आहे. इतकेच नव्हे तर त्या-त्या देशातील पत्रकारांना, तज्ज्ञांना आमिषे दाखवून आपल्या समर्थनार्थ वातावरणनिर्मिती करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच त्यांच्याकडून आपल्या स्पर्धक- शत्रू देशातील जास्तीत जास्त गोपनीय माहिती मिळवण्याचाही चीनचा प्रयत्न राहिला आहे. मागील काळात भारतात एका पत्रकाराला अटक करण्यात आली होती. तो चीनचा समर्थकच नव्हे तर हस्तक होता. त्याची फारशी चर्चा झाली नाही; पण ते हिमनगाचे टोक होते, असे म्हणावे लागेल.

आपल्या प्रचंड आर्थिक ताकदीचा वापर करून चीनने अमेरिका, युरोप खंडातल्या मीडियाला ‘मॅनेज’ केले आहे. करोना विषाणूच्या निर्मिती आणि प्रसारावरुन अवघे जग चीनविरोधात प्रक्षुब्ध झाल्याचे लक्षात आल्यानंतर चीनने या माध्यमशक्तीचा वापर करुन घेण्यास सुरुवात केली आहे. दुर्दैवाने, चीनने हे माहिती युद्ध पूर्णपणे जिंकले आहे, असे म्हणावे लागेल. याचे कारण आजघडीला अनेक देशांचा चीनच्या विरोधातील राग केवळ मावळलेलाच नाहीये, तर या जैविक महायुद्धाच्या काळात लस डिप्लोमसी आणि इतर वैद्यकीय मदत केल्यामुळे हे देश चीनचे आभार मानत आहेत.

हा चमत्कार कसा घडला?

चीनबाबत हा चमत्कार घडण्याचे कारण म्हणजे, अमेरिका, युरोपमधील बड्या मीडिया हाऊसेसमध्ये चीनने आर्थिक घुसखोरी केली आहे. काही ठिकाणी इतर देशातल्या कंपन्यांमधून चीनने या मीडिया हाऊसेसमधील शेअर्स विकत घेतले आहेत. इतकेच नव्हे तर माध्यमांची मते आपल्या बाजूला वळविण्यासाठी चीनकडून या कंपन्यांमार्फत दरवर्षी हजारो कोटी रुपयांच्या जाहिराती दिल्या जातात. अनेकांना हे माहीत नसेल, पण वॉशिंग्टन पोस्ट, ऍमेझॉन, सीएनएन, वॉर्नर मीडिया, द अमेरिकन ब्रॉडकास्ट कंपनी, ईएसपीएन, वॉल्ट डिस्ने, द न्यूयॉर्क टाईम्स, द वॉशिंग्टन टाईम्स, वॉल स्ट्रीट जर्नल, लॉस एंजेलिस टाइम्स आदी नामांकित अमेरिकन मीडिया हाऊसेसमध्ये चिनचे शेअर होल्डिंग खूप मोठे आहे. हाच प्रकार युरोपमधील मीडियात दिसून येतो.

आजवर याविषयी सातत्याने बोलले जात असूनही अनेकांचा विश्वास बसत नसे. पण हे अधिकृतरित्या समोर आलेले आहे. अमेरिकेमध्ये एखाद्या मीडिया हाऊसेसमधील समभागांची जर परदेशी व्यक्ती अथवा संस्थेने खरेदी केली तर त्याविषयीची माहिती जाहीर करणे बंधनकारक आहे. त्यामुळेच ही माहिती बाहेर आलेली आहे. यानुसार, ऍमेझॉन आणि वॉशिंग्टन पोस्टमध्ये २५० दशलक्ष डॉलर्स इतकी चीनी गुंतवणूक आहे. वार्नर मीडिया, सीएनएनमध्ये ५० दशलक्ष डॉलर्सची गुंतवणूक आहे. अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कंपनीमध्येही २० टक्के चिनी गुंतवणूक आहे.

शांघायमध्ये थीम पार्क निर्माण करायला परवानगी देऊन डिस्ने वर्ल्डला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न चीनने केला आहे. या सर्वांचा वापर करत चीनने आता नॅरेटिव्ह वॉरफेअरची सुरुवात केली आहे. अलीकडील काळात युरोपमध्ये अनेक ठिकाणी मोठमोठे डिजिटल फलक झळकल्याचे दिसून आले. धक्कादायक बाब म्हणजे, या फलकांवर थँक्यू चीन किंवा धन्यवाद झी भाई असे लिहिलेले दिसून आले.

आंतरराष्ट्रीय पत्रकार महासंघाने चीनच्या या अपप्रचार युद्धाचा अभ्यास केला आहे. त्या अभ्यासातून काही महत्त्वाचे निष्कर्ष काढण्यात आले आहेत. त्यानुसार, जगाला इतक्या मोठ्या महामारीच्या खाईत ढकलूनही जग चीनला दोषी मानण्यास तयार नाहीये. उलटपक्षी याबाबतचा दोष त्या- त्या देशांमध्ये असलेल्या केंद्र व राज्य सरकार आणि सरकारी संस्थांवर टाकला जातो. त्यांनी या महामारीचा चांगल्या प्रकारे मुकाबला केला नाही, त्या त्या देशातील सरकारे कुचकामी ठरल्यामुळेच करोनाचा प्रचंड प्रसार झाला आणि त्या देशांचे नुकसान झाले, असा प्रचार चीनकडून केला जात आहे.

परदेशातील माध्यमांना मॅनेज करण्यासाठी चीन अनेक उपाय करतो. अनेक वेळा त्यांना चीनसाठी आवश्यक असलेली कामे दिली जातात. त्यांना चीनमध्ये पर्यटक म्हणून नेले जाते. यादरम्यान त्यांच्या प्रवासाचा आणि राहण्याचा खर्च पूर्णपणे चीन करतो. युरोप आणि अमेरिकेच्या माध्यमक्षेत्रामधील अनेक वृत्तपत्रांशी चीनने करार केले असून यानुसार या माध्यमांना चिनने पाठवलेल्या ५० बातम्या व लेख प्रकाशित करावे लागतात.

करोना विषाणूचा प्रसार जसजसा जगभरात फैलावू लागला तसतसे चीनने आपली प्रचंड मीडिया सैन्य उभे केले. यामध्ये त्या देशात असलेले चिनी नागरिक, चिनी हस्तक, पैसे देऊन तयार केलेली सोशल मीडियावरची ट्रोल आर्मी यांचा सहभाग होता.

आज जगाच्या, खासकरून युरोप आणि अमेरिकेमधल्या मीडियावर चीनने एक प्रकारचे वर्चस्व मिळवल्याचे दिसत आहे. कारण सद्यस्थितीत बहुतांश परदेशी माध्यमे चिनीविरोधात किंवा चीनला सोयिस्कर नसलेली कुठलीही बातमी प्रकाशित करत नाहीत. यामुळे अमेरिका आणि युरोपमधली मीडिया आता चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचे मुखपत्र बनली आहेत, अशी टीकाही आता आंतरराष्ट्रीय जाणकारांकडून केली जात आहे. इतकेच नव्हे तर चीनने या देशातील अनेक राजकीय नेत्यांच्या नातेवाईकांना मॅनेज करून त्या देशातील चिनी विरोध कमी केला आहे. याचे एक उदाहरण नुकतेच समोर आले आहे. अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा मुलगा हंटर बायडेन याचा चिनी कम्युनिस्ट पार्टीशी अतिशय गहिरा संबंध आहे.

याबाबतची बातमी प्रकाशित होताच लागलीच ती मीडियातून आणि सोशल मीडियामधून ‘अदृश्य’ झाली. आज ट्विटर, फेसबुक किंवा इतर मोठ्या सोशल मीडियांचे दिग्गज भारतीय कायद्यांची जराही पर्वा करत नाहीत; मात्र हेच दिग्गज चीनचे कायदे पूर्णपणे मानतात, चीनचे ऐकतात. अमेरिका, युरोप आणि इतर राष्ट्रांत चीनने तयार केलेल्या ट्रोल आर्मीमार्फत चीनसाठी सोयिस्कर बातम्या प्रकाशित केल्या जातात.

गेल्या वर्षभरात करोना महामारीमुळे जगभरातील माध्यमांचे अर्थकारण कोलमडून गेले आहे. मुद्रित माध्यमांचा खप आणि दृकश्राव्य माध्यमांचा टीआरपी घसरला आहे. औद्योगिक विश्वातील मंदीमुळे जाहिरातींचा ओघ आटला आहे. या स्थितीचा फायदा घेत चीनने आपले फासे अचूकपणाने टाकत ‘नॅरेटिव्ह वॉरफेअर’ गतिमान केले आहे. भारतानेही यातून योग्य तो धडा घेण्याची गरज आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या