- कॅप्टन नीलेश गायकवाड

अं तरिक्षात माणसाचे सर्व बंध, पाश मोकळे होतात. जात-पात, रंगभेद, धर्म, संप्रदाय आदी गोष्टींच्या पलीकडे पाहायला लावणार्या अंतरिक्षाची ओढ माणसाला कायम राहिली आहे. अन्य एक आकर्षण अंतरिक्षातील रहस्यांचे आहे.

सूर्यमालेचा ठाव घेणारे मानवनिर्मित उपग्रह आणि चंद्राव्यतिरिक्त आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकापर्यंतच्या (आयएसएस) अनेक प्रवासांनी अंतरिक्षातील काही गोष्टींमागील गूढ उकलले आहे. परंतु हे ब्रह्मांड अनंत आहे आणि त्याबद्दल जाणून घेण्याची आपली इच्छाशक्ती इतकी प्रबळ आहे की, हा शोध कधीच थांबणार नाही, असे वाटते. अंतरिक्षाविषयी जाणून घेण्याची आणि त्याच्या आकर्षणात स्वतःला बांधून घेण्याची एक संधी कोरोनाकाळात उपलब्ध झाली. या कठीण काळात, याच महिन्यात एका खासगी कंपनीच्या रॉकेटने चार अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकापर्यंत पोहोचविले. एखाद्याकडे पैसे असतील आणि त्याची देण्याची तयारी असेल तर त्याला अंतराळाची यात्रा करता येईल का, हा प्रश्न अनेक वर्षे लोकांच्या मनात घोळत होता.

स्पेस एक्स या खासगी कंपनीच्या फाल्कन-9 या रॉकेटच्या माध्यमातून नासा या अंतरिक्ष संशोधन संस्थेची ही मोहीम पार पडली आणि त्यामुळे या आशेला नव्याने धुमारे फुटले आहेत. या वर्षात स्पेस एक्स या कंपनीची ही दुसरी अंतरिक्ष भरारी आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. या मोहिमेमुळे रशियन रॉकेटवरील नासाचे अवलंबित्व संपुष्टात आले आहे. यापूर्वी याच वर्षी मे महिन्यात असेच एक उड्डाण खासगी कंपनीने केले होते आणि नासाच्या ‘क्रू डेमो-2’ या मोहिमेअंतर्गत दोन अंतराळवीरांना अंतरिक्षात पाठवून पुन्हा सुरक्षित परत आणण्यात यश आले होते. स्पेस एक्सच्या ‘रेझिलियन्स’ या क्रू ड्रॅगन कॅप्सूलच्या सुमारे सत्तावीस तासांच्या स्वयंचलित उड्डाणानंतर आयएसएसपर्यंत पोहोचण्यात यश मिळविणारी ही मोहीम म्हणजे एक महान घटना आहे, असे अमेरिकेच्या अध्यक्षांनी म्हटले आहे. अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींच्या मते, मानवासह अंतरिक्षात उड्डाण करून संशोधन करण्याच्या प्रक्रियेतील नव्या युगाची ही सुरुवात आहे. रशियाच्या रॉकेटचा वापर करून अमेरिकेच्या अंतरिक्ष मोहिमा होत होत्या. हे अवलंबित्व आता समाप्त होईल, असे सांगितले जाते.

गेल्या सुमारे नऊ वर्षांपासून आयएसएस म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतरिक्ष स्थानकावर अंतराळवीरांची ने-आण करण्यासाठी अमेरिकेची नासा ही संस्था रशियाच्या सोयूज या रॉकेटचा वापर करीत आहे. या सेवेसाठी प्रतिव्यक्ती 9 कोटी डॉलरचे भरभक्कम शुल्क रशियाला देणे अमेरिकेला भाग पडते. स्पेस एक्स या खासगी कंपनीने फाल्कन-9 च्या रूपाने अमेरिकेसमोर एक पर्याय ठेवला आहे. नासाने यापूर्वी 2011 च्या जुलैमध्ये स्वतःच्या रॉकेटचा वापर केला होता. परंतु नंतर वाढता खर्च आणि दुर्घटनांमुळे नासाने 2014 मध्ये स्पेस एक्स आणि बोइंग या दोन कंपन्यांबरोबर अंतराळवीरांना आयएसएसपर्यंत पोहोचविणे आणि आणणे याविषयीचा करार केला.

एकाच वर्षात खासगी उड्डाणांमार्फत मानवाला अंतराळात नेण्याच्या दोन घटना घडल्या आहेत. अंतरिक्ष संशोधनाच्या क्षेत्रात यामुळे निश्चितच नव्या युगाचा प्रारंभ झाला असे म्हणता येईल. अशा मोहिमांमधून एकाच बाणात अनेक लक्ष्यांचा वेध घेणे शक्य आहे. या यशामुळे भविष्यात अंतरिक्ष कार्यक्रम खासगी कंपन्यांच्या हाती सोपविल्यास मोहिमांना नव्याने गती मिळण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर सरकारी संस्थांच्या निधीला कात्री लावण्याची वेळ आल्यास खासगी कंपन्या या मोहिमांना नवे बळ देऊ शकतील. कारण श्रीमंतांना अंतरिक्षाची सफर घडविण्याच्या मोबदल्यात खासगी कंपन्या चांगली रक्कम कमावू शकतील आणि ती अशा मोहिमांसाठी वापरता येईल. अर्थात या संपूर्ण प्रक्रियेबद्दल काही सवालही आहेत. उदाहरणार्थ, अंतरिक्षात प्रवास करणार्या लोकांच्या सुरक्षिततेचा मुद्दा खासगी कंंपन्यांमुळे अडगळीत तर पडणार नाही ना, असा एक सवाल आहे. दुसरा सवाल असा की, खासगी कंपन्या अंतराळाचे क्षेत्र केवळ पर्यटनाचे माध्यम बनवून टाकणार नाहीत कशावरून? असे झाल्यास दीर्घकालीन मोहिमा आणि संशोधनकार्य या गोष्टी मागे पडण्याची भीती आहे.

रात्रीच्या वेळी आसमंतात झगमगणारे तारे पाहून त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची अभिलाषा माणसाला फार पूर्वीपासून आहे. ज्या आकाशगंगेचा आपण केवळ छोटासा हिस्सा आहोत, त्या आकाशगंगेचे दर्शन अवकाशात जाऊन घेण्याची इच्छाही माणसाला पूर्वीपासूनच आहे. कोपर्निकसपासून गॅलिलिओपर्यंत अनेकांनी अंतरिक्षाची संरचना आणि सूर्यमालेच्या व्युत्पत्तीसंबंधी जी मते मांडली आहेत, ती पारखून घेण्याची प्रक्रिया सुरू होण्यासाठी कोणत्यातरी माणसालाच अंतरिक्ष नावाच्या पोकळीत शिरावे लागते. या बाबतीत सोव्हिएत संघाचे युरी गॅगरीन पहिले अंतराळवीर ठरतात. 1961 मध्ये ते अंतराळात गेले होते. त्यानंतर आठ वर्षांनी अमेरिकेचे नील आर्मस्ट्राँग आणि एडविन एल्ड्रिन यांनी चंद्रावर माणसाच्या पावलाचा ठसा उमटवला आणि पृथ्वीबाहेरील कोणत्यातरी अंतरिक्ष पिंडावर पाऊल ठेवण्याचे मानवाचे स्वप्न साकार झाले.

अर्थात, 1969 च्या अपोलो 11 मोहिमेनंतर कोणत्याही मानवाला चंद्रावर पाठविण्यात आलेले नाही. परंतु नंतरच्या चांद्रमोहिमांबरोबरच मीर आणि आयएसएस अंतरिक्ष स्थानकांची निर्मिती आणि भारत तसेच चीनच्या अनेक अंतरिक्ष मोहिमांनी हे सिद्ध केले आहे की, अंतरिक्षात जाणे आता फारसे अवघड राहिलेले नाही. परंतु एक समस्या अशी की, आतापर्यंतच्या सर्व अंतरिक्ष मोहिमा सरकारी संस्थांनीच पूर्णत्वास नेल्या. आता, मोहिमांवरील प्रचंड खर्च आणि त्या तुलनेत मिळणारी नगण्य कमाई पाहता सरकारी संस्था या मोहिमांमध्ये फारसा रस घेऊ इच्छित नाहीत. रशिया आणि अमेरिकाही आता बहुतांश मोहिमा केवळ स्वाभिमान म्हणून न राबविता आर्थिक कमाई करण्यासाठीच राबवितात.

जसजशा सरकारी संस्था खर्चिक मोहिमांपासून मागे सरकू लागल्या आहेत, तसतशा खासगी कंपन्या यातून मिळणारा लाभ घेण्यासाठी पुढे सरसावत आहेत. अंतरिक्ष हे आता आपल्याला पर्यटनकेंद्र करता येईल आणि प्रचंड पैसा कमावता येईल, असे या कंपन्यांना वाटू लागले आहे. जगभरातील श्रीमंतांना अंतरिक्षाची रोमहर्षक सफर घडवून कमाई करण्याचे स्वप्न कंपन्या पाहत आहेत. तीन देशांचे नागरिक आणि स्पेस एक्स एजन्सीचे संस्थापक अॅलन मस्क अशाच अब्जाधीशांपैकी एक आहेत, जे अंतरिक्ष पर्यटनाची संकल्पना साकार करून प्रचंड कमाईचा दरवाजा उघडू पाहत आहेत.

स्पेस एक्ससारख्या डझनभर कंपन्या असून, अनेकदा वापरता येणारे रॉकेट बनविण्याचा प्रयत्न त्या करीत आहेत. व्हर्जिन गॅलेटिक्स, मोजावे एअरोस्पेस, बोइंग, एक्सकॉर ही यापैकी काही कंपन्यांची नावे होत. नासाने आपल्या स्पेस शटलच्या माध्यमातून ज्या आयएसएस या अंतरिक्ष स्थानकापर्यंत अंतराळवीरांना नेऊन आणले, तेथेच पर्यटकांना नेण्याचे या कंपन्यांचे स्वप्न आहे. यापैकी स्पेस एक्स या अॅलन मस्क यांच्या कंपनीने सर्वाधिक गांभीर्याने प्रयत्न केले आणि बाजी मारली. अर्थात रॉकेट निकामी झाल्यास येणारी जोखीमसुद्धा त्यांनी स्वीकारली आहे. मात्र, सहा-सात महिन्यांत दोन यशस्वी अंतरिक्ष उड्डाणे करून या कंपनीने अंतरिक्ष यात्रांच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे.

जसजशा खासगी कंपन्या अधिकाधिक जोखीम पत्करतील आणि आपली कार्यक्षमता सिद्ध करतील, तसतसे सरकारी संस्थांचे अधिकाधिक काम त्यांना मिळेल. सरकारी संस्थांच्या तुलनेत स्पर्धात्मक खर्चात खासगी कंपन्या ही सारी कामे करू शकतात, असे आढळून आले आहे. सरकारी कंपन्यांच्या माध्यमातून अशी कामे केल्यास त्यासाठी सरकारला आर्थिक तरतूद करावी लागते आणि एखादी मोहीम यशस्वी झाली नाही, तर टीकेलाही सामोरे जावे लागते. आणखी एक उल्लेखनीय गोष्ट अशी की, योग्यता सिद्ध झाल्यावर उपग्रह प्रक्षेपणापासून अंतरिक्ष पर्यटनापर्यंतची सर्व कामे खासगी कंपन्यांच्या हवाली केली जाऊ शकतात.

दुसरीकडे, मंगळापासून ते अंतरिक्षात दूरवर असलेल्या सर्वच ग्रहपिंडांच्या संशोधनाचे काम सरकारी संस्थांना दिले जाईल. अशा कामांमध्ये अधिक सावधगिरी आणि अवलोकनाची अधिक गरज आहे. काही महिन्यांपूर्वीच भारताच्या अंतरिक्ष क्षेत्रात खासगी कंपन्यांना भागीदारीच्या अधिक संधी देण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता केली जाईल, असे भारत सरकारने जाहीर केले. अधिक संख्येने उपग्रह तयार करून त्यांचे प्रक्षेपण यामुळे होईल, अशी अपेक्षा त्यातून व्यक्त केली आहे. देशातील गरीब जनतेचे कल्याण आणि देशाच्या विकासाचे काम योग्य प्रकारे होऊ शकेल, अशीही अपेक्षा आहे.