Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedडॉ.अभिजीत मोरेंसमोर पक्षातील गटबाजी मिटविण्याचे आव्हान

डॉ.अभिजीत मोरेंसमोर पक्षातील गटबाजी मिटविण्याचे आव्हान

राकेश कलाल

नंदुरबार – Nandurbar

- Advertisement -

गेल्या दीड वर्षापासून जिल्हाध्यक्षांविना असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अखेर डॉ.अभिजीत मोरे यांच्या रुपाने तरुण तडफदार जिल्हाध्यक्ष लाभला आहे. मात्र, काही महिन्यांपासून पक्षात गटबाजी दिसून येत आहे. त्यातच नुतन जिल्हाध्यक्षांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेवून पक्षांतर्गत गटबाजी करणार्‍यांची गय केली जाणार नाही, असा इशारा देणार आहे. त्यामुळे डॉ.मोरे यांच्यासमोर पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासह अंतर्गत गटबाजी दूर करण्याचे आव्हान राहणार आहे.

एकेकाळी नंदुरबार जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला समजला होता. मात्र, सन 1999 मध्ये शरद पवार यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देवून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पहिले नंदुरबार जिल्हाध्यक्ष म्हणून कै.डॉ.दिलीपराव मोरे यांची निवड करण्यात आली होती. त्यामुळे पक्षाच्या स्थापनेपासून कै.डॉ.मोरे राष्ट्रवादीशी जोडले गेले. डॉ.मोरे यांच्या निधनानंतर कै.रुपसिंग पराडके हे काही दिवस जिल्हाध्यक्ष होते. त्यांचेही निधन झाल्यानंतर डॉ.दिलीप मोरे यांच्या मातोश्री कै.कमलाताई मराठे यांनी बरीच वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा म्हणून धुरा सांभाळली. त्यानंतर तत्कालीन अपक्ष आमदार डॉ.विजयकुमार गावित यांनीदेखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला व ते राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून कॅबिनेट मंत्रीही झाले. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसला नंदुरबार जिल्हयात अच्छे दिन आले.

डॉ.गावित यांनी आपल्या आदिवासी विकास मंत्रीपदाच्या कार्यकाळात राष्ट्रवादी काँग्रेसची पाळेमुळे जिल्हयात घट्ट रोवली. त्यामुळे काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला सुरुंग लागून राष्ट्रवादीची भरभराट झाली. मात्र, नेतृत्व डॉ.कमलाताई मराठे यांच्याकडे होते. त्यांच्या कार्यकाळात जिल्हा परिषदेवरही राष्ट्रवादीची सत्ता होती. तसेच नवापूर, तळोदा येथील नगरपालिका, जिल्हयातील बर्‍याच ग्रामपंचायतींवरही राष्ट्रवादीने सत्ता स्थापन केली होती. त्यावेळी जिल्हयात भाजपाचे नामोनिशानही नव्हते. दरम्यान, 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी डॉ.विजयकुमार गावित, डॉ.हीना गावित यांनी भाजपात प्रवेश केला आणि दोन्ही पितापुत्री निवडूनदेखील आले. तेव्हापासून राष्ट्रवादी काँग्रेसची वाताहत होण्यास सुरुवात झाली आणि भाजपाची भरभराट झाली. राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपासोबत गेले. त्यातील अनेक पदाधिकारी असे होते जे भाजपा आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षाच्या बैठकांना, कार्यक्रमांना हजेरी लावत. आजही तीच स्थिती आहे.

दरम्यान, डॉ.कमलाताई मराठे यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा आ.डॉ.गावित यांचे लहान बंधू राजेंद्रकुमार गावित यांच्याकडे आली. परंतू या काळातही भाजपा व राष्ट्रवादी हे पक्ष दोन असले तरी कार्यकर्ते एकच असल्याचे चित्र दिसत होते. गेल्यावर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत तर राष्ट्रवादीने एकही जागा लढवली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँगे्रस पक्ष फक्त नावालाच असल्याचे जाणवत होते.

मात्र, राज्यात अनपेक्षितपणे शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस पक्षाचे सरकार स्थापन झाल्याने या तीनही पक्षांना महत्व प्राप्त झाले. गेल्या काही महिन्यांपासून जिल्हयात राष्ट्रवादी काँगे्रस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रीय झालेले दिसत होते. डॉ.कमलाताई मराठे या जिल्हाध्यक्ष असतांना युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्षपद डॉ.अभिजीत मोरे यांनी काही महिने सांभाळले होते. परंतू नंतर डॉ.विक्रांत मोरे यांच्याकडे ते पद आल्याने डॉ.मोरे यांनी राजीनामा दिला होता. तेव्हापासून बरीच वर्षे ते राजकारणापासून दूर होते. परंतू काही महिन्यांपासून ते पुन्हा सक्रीय झाले आहेत. धुळयाचे माजी आमदार तथा पक्षाचे निरीक्षक अनिल गोटे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरोनाच्या कालावधीत डॉ.मोरे यांनी पक्षाच्या बॅनरखाली धान्य वाटप, मास्क, सॅनिटायझर वाटप यासह विविध उपक्रम राबविले. परंतू डॉ.मोरे हे सक्रीय झाल्यापासून राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व विद्यमान कार्याध्यक्ष सागर तांबोळी यांच्यात गटबाजी सुरु झाली आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यक्रम, मेळावे हे दोन्ही गटांकडून स्वतंत्र घेण्यात आले आहेत. दोन्ही गटातील कार्यकर्ते, पदाधिकारी एकमेकांच्या कार्यक्रमांना जात नाहीत. आंदोलनाचे कार्यक्रमदेखील दोन्ही गटाचे वेगवेगळे होतात. नुकतेच कांदा निर्यातबंदीबाबतचे आंदोलन दोन्ही गटांकडून वेगवेगळया दिवशी घेण्यात आले. त्यामुळे पक्षात ही उघडउघड गटबाजी दिसून येत आहे. त्यातच पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदाची सुत्रे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी डॉ.अभिजीत मोरे यांच्याकडे सोपविल्याने साहजिकच दुसरा गट नाराज झाला आहे. परंतू पक्षाने सागर तांबोळी यांना कार्याध्यक्ष पद देवून ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला आहे.

दरम्यान, शुक्रवारीच नुतन जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांनी पत्रकार परिषद घेवून पक्षविरोधी कारवाया करणार्‍या तसेच गटबाजी करणार्‍यांची गय केली जाणार नाही, असा इशारा दिला आहे. आता डॉ.मोरे हे या पक्षातील गटबाजी दूर करण्यासाठी काय भुमिका घेतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. गटबाजी दूर झाली तरच पक्षाला अच्छे दिन येणार आहेत. त्यामुळे राज्यातील सत्तेत राष्ट्रवादीचा सहभाग असल्याचा फायदा घेवून जिल्हयात पक्षाला गतवैभव प्राप्त करुन देण्यासह पक्षातील गटबाजी दूर करण्याचे आव्हान डॉ.मोरे यांच्यासमोर राहणार आहे.

– मो.९५५२५७६२८४

एकाच घरात दोन जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. तर त्यांचे लहान बंधू डॉ.विक्रांत मोरे हे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत.त्यामुळे एकाच घरात दोन पक्षांचे जिल्हाध्यक्षपद आले आहे. दोन्ही पक्षांचा सत्तेत सहभाग आहे. त्यामुळे हा एक दुर्मिळ योगायोग म्हणावा लागेल.

तिसर्‍या पिढीवर राष्ट्रवादीची धुरा

राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली, त्यावेळी प्रथम जिल्हाध्यक्ष म्हणून डॉ.दिलीपराव मोरे यांची निवड करण्यात आली होती. त्यांच्यानंतर धडगावचे रुपसिंग पराडके हे काही काळ जिल्हाध्यक्ष बनले होते. त्यानंतर डॉ.कमलाताई मराठे या दीर्घकाळ जिल्हाध्यक्षा होत्या. आता विद्यमान जिल्हाध्यक्ष डॉ.अभिजीत मोरे हे आहेत. त्यामुळे डॉ.अभिजीत मोरे यांचे वडील, त्यांच्या आजी यांनी सक्षमपणे जिल्हाध्यक्षपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर आता तिसर्‍या पिढीकडे पक्षाने सुत्रे सोपवून पक्षाने मोरे कुटूंबियांवर विश्वास दाखविला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या