शिक्षण
शिक्षण
फिचर्स

योग्य शिक्षण निवडीचे आव्हान

-प्रा.संजय परमसागर

Gokul Pawar

Gokul Pawar

यंदा जुलै महिना उजाडला तरी कोणतीही शाळा-महाविद्यालय सुरू झालेले नाही. त्याचे कारण ‘करोना’! या महामारीमुळे सारे जग धास्तावले आहे. दैनंदिन जीवन प्रभावित झाले आहे. शासनालाही विकासकामे थांबवून आरोग्यसेवेला प्राधान्य द्यावे लागत आहे. अशा अवघड परिस्थितीतून मार्ग काढून योग्य शिक्षणाची कास विद्यार्थ्यांना धरावी लागेल. बदलत्या वातावरणात आपले स्थान आणि ओळख निर्माण करावी लागेल. पालकांची मदत विद्यार्थ्यांना याकामी उपयुक्त ठरू शकेल.

नाशिकरोड परिसराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. लोकसंख्याही वाढत आहे. ‘स्मार्ट सिटी’चे काही प्रकल्प येऊ घातले आहेत. विकास झपाट्याने होत आहे. ग्रामीण भागही नाशिकरोडशी नाळ जुळवून आहे. त्यामुळे अनेक शैक्षणिक संस्था आणि प्रकल्प विस्तारत आहेत. नवनवीन गृहप्रकल्प आकाराला येत आहेत. जून महिला उजाडला की, शाळा-महाविद्यालयांचे प्रवेश सुरू होतात.

परंतु यंदा जुलै उजाडला तरी कोणतीही शाळा-महाविद्यालय सुरू झालेले नाही. कारणही तसेच आहे. चीनमधून आलेल्या ‘करोना’ महामारीमुळे सारेच जग हादरले आहे. जीवनाची घडी विस्कटली आहे. शासनालाही विकासकामांना ब्रेक लावून आरोग्यसेवेकडे प्राधान्याने लक्ष द्यावे लागत आहे. नियोजित खर्च अवांतर खर्चाकडे वळत आहे. तरीही योग्य काळजी घेऊन परिस्थितीवर मात करायची आहे.

करोना प्रादुर्भाव विद्यार्थ्यांना होऊ नये म्हणून राज्यातील शाळा आणि शैक्षणिक संस्था मार्चपासून बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र आता 2020-21 या शैक्षणिक वर्षात मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्य शासनाने ‘ऑनलाईन’ शिक्षणाची पद्धत सुरू केली. ऑनलाईन शिक्षणातून मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला जात आहे. एकविसाव्या शतकासाठीची आवश्यक कौशल्ये मुलांच्या अंगी रूजवण्याचे प्रयत्न व्हायला हवेत. मुलांचा कल पाहून आणि ध्येय ठरवून योग्य शिक्षणाचा पर्याय निवडला पाहिजे. विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांनी ‘ऑनलाईन’ तंत्रज्ञानातून शिकणे व शिक्षकांनी वर्गात मुलांसमोर अध्यापन करणे यातील मुलभूत फरक समजून घेणे आवश्यक आहे. त्यासाठी स्मार्टफोन, संगणक, इंटरनेट, स्मार्ट टीव्ही, रेडिओ यांचा वापर करण्यासाठी तयार व्हावे लागेल.

शिक्षकांनीही त्यासाठी प्रशिक्षण घेऊन ऑनलाईन सादरीकरणाच्या क्लिप्स तयार ठेवल्या आहेत. ऑनलाईन शिक्षण काही ठिकाणी सुरूही झाले आहे. पालकांची भूमिका यात खूप महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी घरातील अवांतर खर्चाला कात्री लावून विद्यार्थ्याच्या ऑनलाईन शिक्षणाकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागेल. ऑनलाईन शिक्षणाच्या नावाने इतर अ‍ॅप्समध्ये आपला पाल्य रमत नाही ना? याची काळजी घ्यावी.

रोजचा अहवाल घ्यावा. आज कुठले लेक्चर झाले? इतर मुलांसोबतचे चॅटिंग याबाबतही दक्ष राहावे लागेल. आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढून अथवा घरातील इतर सदस्यांकडे याची जबाबदारी द्यावी लागेल. विद्यार्थ्यांनीही घरच्यांच्या विश्वासाला तडा न देता या प्रसंगाला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी लागेल. लवकरच ही परिस्थिती निवळून सामान्य व्हावी.

नाशिकरोडमध्ये अनेक शैक्षणिक संस्था या आव्हानासाठी सज्ज आहेत. कला, वाणिज्य, विज्ञान या शाखांसह इतरही नावीन्यपूर्ण अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. बीए, बीसीए, बीएस्सी, संगणक शास्त्र, बायोटेक्नॉलॉजी, तंत्रशिक्षण महाविद्यालये यात सिव्हिल, मॅकेनिकल, इलेक्ट्रिकल, प्रॉडक्शन, संगणक शाखा आहेत. त्यासाठी सामनगाव येथील पॉलिटेक्निक कॉलेज, सर डॉ. मो. स. गोसावी तंत्रनिकेतन, गोखले एज्युकेशन सोसायटीचे बिटको महाविद्यालय येथे कला, वाणिज्य व विज्ञान शाखांसह बीबीए, बीसीए, बीएस्सी (संगणक) याबरोबर पीएचडी (हिंदी) रिसर्च ची सोय उपलब्ध आहे.

करिअर गाइडन्सची सोय उपलब्ध आहे. अशोका महाविद्यालय येथे बीए, बीएस्सी अध्यापक महाविद्यालय आहे. आरंभ महाविद्यालय, स्व.बिंदू रामराव देशमुख महिला महाविद्यालय, के.जे. मेहता फडोळ महाविद्यालय, धात्रक महाविद्यालय, भाटिया कॉलेज व इतर अनेक शैक्षणिक संस्था आहेत.

पारंपरिक शिक्षणाबरोबरच अकरावी, बारावी, एचएससी व्होकेशनल (एमसीव्हीसी) यात इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी व मेडिकल, लॅब टेक्निशियन या अभ्यासक्रमांची बिटको महाविद्यालयात तर आरंभ महाविद्यालय व के.जे. मेहता महाविद्यालयात लॉजिस्टिक अ‍ॅण्ड सप्लाय चेन मॅनेजमेंट, अकौंंटिंग अ‍ॅण्ड ऑफिस मॅनेजमेंट व मार्केटिंग मॅनेजमेंट आदी अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. या अभ्यासक्रमानंतर उच्चशिक्षणाची सोय उपलब्ध आहे.

रोजगार, स्वयंरोजगाराभिमुख व काळानुरूप या अभ्यासक्रमांत बदल झाले आहेत. यातून योग्य शिक्षणाची कास धरून बदलत्या वातावरणात आपले स्थान निर्माण करून ओळख निर्माण करा. पालकांनी विद्यार्थ्यांना योग्य सहकार्य करावे. करोना संकटातून लवकरच परिस्थितीत बदल होवो. सारे काही सुरळीत सुरू होवो. शाळा, शिक्षक यांनाही विद्यार्थ्यांना समोरासमोर शिकवण्याची आतुरता आहे.

Deshdoot
www.deshdoot.com