पर्यावरणपूरक होळी साजरी करा !
फिचर्स आणि ब्लॉग

पर्यावरणपूरक होळी साजरी करा !

Balvant Gaikwad

 प्राचार्य डी.एफ.पाटील ,मो.9561052271

अध्यक्ष, गिरणा-तापी जनविकास पर्यावरण संस्था, पाचोरा-भडगाव.

जे वाईट असेल ते होळीमध्ये जळून जाईल. चांगल्या विचारांचा, चांगल्या सुभाषितांचा शिमगा करा. अपशब्दांची, शिव्यांची होळी करा. हा सण पौराणिक काळापासून सुरू आहे. होळी सणाचा संदेश वाईट गोष्टींना जाळून चांगल्या गोष्टींचे संरक्षण करणे असा होतो.

‘होळी’ हा सण 9 मार्च रोजी तर दुसर्‍या दिवशी 10 मार्चला ‘धूलिवंदन’ आहे. होळी हा हिंदूंचा सांस्कृतिक व धार्मिक सण आहे. या सणाचे महत्त्व म्हणजे, आपल्यामधील दुर्गुण होळीत टाकून त्यांचे रूपांतर सद्गुणांमध्ये, चांगल्या गुणांमध्ये होऊन आपण चांगले वागू, असा संकल्प केला जातो. जे वाईट असेल ते होळीमध्ये जळून जाईल. चांगल्या विचारांचा, चांगल्या सुभाषितांचा शिमगा करा, अपशब्दांची, शिव्यांची होळी करा. हा सण पौराणिक काळापासून सुरू आहे. होळी सणाचा संदेश वाईट गोष्टींना जाळून चांगल्या गोष्टींचे संरक्षण करणे असा होतो.

शहरांमध्ये तसेच खेडेगावांमध्ये अनेक ठिकाणी होळी सणानिमित्त होळ्या पेटविण्यात येतात. होळी पेटविण्यासाठी मोठ्या प्रमाणावर लाकडे आणि शेणाच्या गोवर्‍यांचा वापर केला जातो. रात्रभर या होळीमध्ये लाकडे आणि गोवर्‍या जाळल्या जातात. यावेळी अनेक चांगली हिरवीगार झाडे तोडली जातात, कापली जातात आणि वाळलेल्या ओल्या शेणाच्या गोवर्‍या होळीमध्ये जाळत असतात. काही तरुण लोकांकडून वर्गणीद्वारे तर काही मुले चोरी, जबरदस्ती करून ऐनकेनप्रकारे वखारीतून, इतर ठिकाणातून, घरांमधून लाकडे जमा करून त्यांची होळी करीत असतात. या होळीमुळे वातावरणात हवा दूषित होते व हवेचे प्रदूषण होते तसेच पर्यावरणाचे संतुलन बिघडत असते. आर्थिक नुकसान होत असते. भारतात आज फक्त 12 ते 13 टक्के जमीन जंगलाखाली आहे. पर्यावरणशास्त्राच्या दृष्टीने हे प्रमाण 33 टक्के असायला हवे. कारण अवैध वृक्षतोड, जंगलतोड मोठ्या प्रमाणावर होत आहे. त्यामुळे पावसाचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.

प्राचीन काळात व मध्ययुगीन काळात जंगले मोठ्या प्रमाणावर होती, झाडे मोठ्या प्रमाणावर होती. आज आधुनिक काळात भारतात स्वातंत्र्य मिळाले त्या वेळेस भारताची लोकसंख्या 35 कोटी होती. लोकसंख्यावाढीचा वेग मोठ्या प्रमाणावर असून आज भारताची लोकसंख्या 135 कोटींच्या पुढे जाऊन पोहोचली आहे. लोकसंख्येचा विस्फोट झालेला आहे. ही वाढती लोकसंख्या पर्यावरणाची अतोनात हानी करीत आहे. अन्न शिजविण्यासाठी मानवाला लाकडे, गोवर्‍या, रॉकेल, गॅस इत्यादी इंधनाची गरज असते. गोरगरीब जनतेजवळ पैसा नसल्यामुळे त्यांना गॅस घेणे परवडत नाही. त्यामुळे भारतात वृक्षतोड, जंगलतोड मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळेच पर्यावरणाचे संतुलन बिघडले आहे. वृक्षांना वाचविणे आवश्यक आहे. ‘झाडे लावा-झाडे जगवा!’ वृक्षांचे अनेक फायदे आहेत. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आज्ञापत्रात वृक्षांचे महत्त्व सांगितले असून ‘रयतेने ही झाडे लावून लेकरांसारखी बहुतकाळ जतन करून वाढविली ती झाडे तोडिलियावरी त्याचे दु:खास पारावर काय?’ वृक्षांची काळजी घेण्याबाबतीत छत्रपती शिवाजी महाराज स्वत: किती दक्ष होते, हे त्यांच्या आज्ञापत्रावरून दिसून येते. संत तुकाराम महाराज यांनी ‘वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे’ असे वृक्षांचे महत्त्व सांगताना म्हटले आहे. आपण राहतो तेथील सभोवतालचा परिसर म्हणजे आपले ‘पर्यावरण’ होय. पृथ्वी किंवा पृथ्वीवरील कोणत्याही भागातील सजीव व निर्जीव घटकांमुळे निर्माण झालेली परिस्थिती म्हणजे ‘पर्यावरण’ होय. ‘झाडे लावा – झाडे जगवा!’ मिळेल शुध्द ताजी हवा. झाडांपासून मानवाला आणि प्राण्यांना सावली मिळते. झाडे वातावरणात गारवा निर्माण करतात. झाडे हवेतील दूषितपणा कमी करतात. झाडे हवेमध्ये प्राणवायूू सोडतात आणि कार्बन डायऑक्साईड शोषून घेतात. त्यामुळे हवा शुध्द राहते.

झाडांमुळे लाकूड मिळते. या लाकडांपासून इमारती, घरांचे दरवाजे, खिडक्या, टेबल- खुर्च्या, पलंग उपलब्ध होतात. मानवाच्या अंत्यविधीसाठी लाकडांचा वापर केला जातो. झाडांपासून मानवाला व प्राण्यांना फळे मिळतात. असे फायदे असूनसुध्दा वृक्षांवर, झाडांवर कुर्‍हाडी, करवती चालतात. कडूनिंब, आंबा, पिंपळ, वड, चिंच, बांबू ही झाडे तोडली जातात. ही अवैध वृक्षतोड, जंगलतोड थांबविण्यासाठी शासनाने आणि नागरिकांनी पुढाकार घ्यावा व ही वृक्षतोड थांबवावी.शेणाच्या गोवर्‍या या शेतीसाठी अतिशय उपयुक्त असे सेंद्रिय खत आहे. ते होळीत जाळल्यामुळे आर्थिक नुकसान होते. तसेच धुरामुळे हवेचे प्रदूषण होत असते. शेतीचे उत्पादन अधिक होण्यासाठी या सेंद्रिय खतांची शेतकर्‍यांना गरज असते. तसेच गोरगरीब महिलांना स्वयंपाक करण्यासाठी इंधन म्हणून या गोवर्‍यांची गरज भासते.होळीमध्ये नैवेद्य म्हणून पुरणपोळी टाकली जाते. भारतीय संस्कृतीत अन्न हे परब्रह्म आहे. ते कोणत्याही कारणांनी अग्निमध्ये जाळण्यासाठी टाकणे हे कितपत योग्य वाटते? भारतात कोट्यवधी लोकांना खाण्यासाठी अन्न मिळत नाही. त्यांना उपाशीपोटी जीवन जगावे लागते. अशावेळी होळीत अन्न टाकले जाणे योग्य आहे काय? याचा विचार संबंधित बंधू-भगिनींनी करावा. होळीच्या लाकडांवर नागरिक पाणी गरम करतात व या पाण्याने अंघोळ करतात, म्हणजे रोगराई होत नाही, अशी लोकांची अंधश्रध्दा पाहावयास मिळते. जर असे केले तर नजीकच्या भविष्यकाळात आपल्याला लाकडे आणि पाणीही मिळणे कठीण होईल. होळीमध्ये पुरणपोळी टाकण्यात येऊ नये. ती गोरगरीब गरजूंना खाण्यासाठी देण्यात यावी. अमंगलाची होळी करावी, दुर्गुणांची होळी करावी. एका गावात एकच छोटी होळी करावी. त्यामध्ये केरकचर्‍याच्या होळ्या पेटवा. लाकडांच्या होळ्या पेटवू नका, होळी सणाला अंधश्रध्देचे रूप न देता काळानुसार सण साजरा करावा. प्रदूषणविरहित सण साजरे करावेत. पर्यावरण रक्षणासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरण्यासाठी आधुनिक पध्दतीने होळी साजरी करावी. जनतेचे प्रबोधन व्हावे, लोकशिक्षण व्हावे, जनजागृतीसाठी, पर्यावरणाच्या रक्षणासाठी, प्रदूषण टाळण्यासाठी भारतीय राज्यघटना कलम 51-अ मध्ये भारतीय नागरिकांची

मूलभूत कर्तव्ये सांगितली आहेत –

1) पर्यावरण दूषित होण्यापासून वाचविणे तसेच वनसंपदा, सरोवरे, नद्या आणि वन्यजीव यासारख्या नैसर्गिक गोष्टींचे रक्षण करणे, सजीव प्राण्यांवर दया करणे.

2) वैज्ञानिक दृष्टिकोन, दयाळूपणा आणि चौकशी व सुधारणा यांचा विकास करणे

3) सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे तसेच हिंसाचारापासून दूर राहणे या नागरिकांच्या कर्तव्यांचा विचार बंधू-भगिनींनी करावा.

काळाचे भान एळखा, वैज्ञानिक दृष्टिकोनाची कास धरा आज भारतात प्रचंड लोकसंख्या, प्रचंड बेकारी, उपासमार, पाण्याची तीव्र समस्या, पर्यावरण व प्रदूषणाच्या समस्या निर्माण झालेल्या आहेत याचा जनतेने विचार करावा.

Deshdoot
www.deshdoot.com