Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedवाढत्या घटस्फोटांची कारणमीमांसा

वाढत्या घटस्फोटांची कारणमीमांसा

– अ‍ॅड. आभा सिंग सामाजिक कार्यकर्त्या

भारतीय समाजात महिलांची स्थिती बदलत आहे, ही चांगली गोष्ट आहे. अनेक महिलांना आता जीवनातील निर्णय स्वतःच्या मतानुसार घेण्याचे स्वातंत्र्य मिळत आहे. त्यामुळे वैवाहिक संबंध चांगले नसल्यास त्या बंधनात राहू इच्छित नाहीत. घटस्फोट घेऊन त्या नवीन जीवन सुरू करू इच्छितात. कायद्यांविषयी वाढत्या जागरूकतेमुळेही भारतात घटस्फोटांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते.

- Advertisement -

भाजपचे वरिष्ठ नेते आणि पक्षाचे खासदार सौमित्र खान यांनी त्यांच्या पत्नी सुजाता खान यांना तलाकसाठी नोटीस पाठविल्याची बातमी नुकतीच वाचायला मिळाली. त्यांच्या पत्नीने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्याच्या दुसर्‍याच दिवशी सौमित्र यांनी त्यांना ही नोटीस धाडली. अशा घटना पाहून प्रश्न पडतो, की लग्न हा बाहुला-बाहुलीच्या लग्नासारखा खेळ बनला आहे की काय? या घटनेमुळे भारतातील घटस्फोटांच्या परिस्थितीबाबत विचार करायला मला भाग पाडले. एकीकडे आपला देश जगातील सर्वांत कमी घटस्फोटांचा दर असणारा देश म्हणून या संदर्भातील निर्देशांक यादीत सामील आहे. दुसरीकडे भारतात दिवसेंदिवस घटस्फोटांच्या घटना वाढत चालल्या आहेत. जर राजकीय पक्ष बदलल्यामुळे लग्न मोडता येऊ शकते, तर मात्र या विषयावर सखोल विचारमंथन आता झालेच पाहिजे.

देशात टिकणार्‍या लग्नांचा उच्चदर पाहून असे लक्षात येते की, लग्नात दोन्ही कुटुंबांची मोठी भागीदारी असल्यामुळे घटस्फोट होत नाहीत. कुटुंबातील सदस्य नेहमी हस्तक्षेप करतात आणि घरातील ज्येष्ठ मंडळीच पती-पत्नींचे समुपदेशक बनतात. ही एकीकृत समाज संरचना जोडप्यांना घटस्फोट घेण्यापासून एका विशिष्ट मर्यादेपर्यंत रोखू शकते. त्याचबरोबर भारतात आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी असणार्‍या महिलांची संख्या फारशी नाही. त्यामुळे अशा महिलांजवळ मुळातच पर्याय मर्यादित असतात.

घटस्फोट मिळविण्याची प्रक्रिया दीर्घकाळ चालत असल्यामुळे त्याचाही परिणाम घटस्फोट कमी होण्यावर होतो. कधीकधी घटस्फोटाचे एखादे प्रकरण वर्षानुवर्षे सुरू राहते. त्यामुळे पती-पत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांवर मानसिक आणि आर्थिक दबाव वाढत जातो. भारतात आता वातावरण बदलत आहे. पूर्वी महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी नसल्यामुळे घरगुती हिंसाचाराला बळी पडल्या तरी पतीसोबत राहत होत्या. घटस्फोट घेणे त्या टाळत असत. आता मात्र आर्थिकदृष्ट्या महिला मजबूत होण्याचे प्रमाण वाढत आहे. पुरुषांवरील त्यांचे अवलंबित्व कमी झाले आहे. अशा महिला अपमानजनक आणि आक्रमक व्यवहार सहन करत नाहीत. असा व्यवहार करणार्‍या पुरुषांसोबत त्या राहू इच्छित नाहीत. वडिलांच्या संपत्तीत कायदेशीर अधिकार मुलींना मिळाल्यानेही महिलांची स्थिती मजबूत झाली आहे.

आजच्या धावपळीच्या जगात संवाद कमी होत चालला असून, त्यामुळे आयुष्यभराच्या जोडीदाराचे अन्यत्र संबंध प्रस्थापित होण्याचे प्रमाण वाढले आहे. व्यभिचार हा भारतात गुन्हा मानला गेला नसला, तरी घटस्फोट घेण्यासाठी तो एक वैध आधार मानला जातो. अशा प्रकरणात जेव्हा पती किंवा पत्नी पकडले जातात तेव्हा जोडीदार त्या आधारावर घटस्फोटासाठी दावा दाखल करू शकतो.

भारतीय समाजात महिलांची स्थिती बदलत आहे, ही चांगली गोष्ट आहे. अनेक महिलांना आता जीवनातील निर्णय स्वतःच्या मतानुसार घेण्याचे स्वातंत्र्य मिळत आहे. त्यामुळे वैवाहिक संबंध चांगले नसल्यास त्या बंधनात राहू इच्छित नाहीत. घटस्फोट घेऊन त्या नवीन जीवन सुरू करू इच्छितात. कायद्यांविषयी वाढत्या जागरूकतेमुळेही भारतात घटस्फोटांचे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. आपण आपल्या मुलींना उच्चशिक्षित करणे आवश्यक आहे. असे केल्यास मुली त्यांच्या जीवनात येणार्‍या आव्हानांना भिडण्यासाठी तयार होऊ शकतात आणि ताठ मानेने जगू शकतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या