Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedकॅप्टन विरुद्ध सिद्धू

कॅप्टन विरुद्ध सिद्धू

– व्ही. के. कौर

काही वर्षापूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार्‍या नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबमध्ये आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. सिद्धूला पंजाबचे प्रदेशाध्यक्षपद हवे आहे. आगामी निवडणुकीपर्यंत काँग्रेस हायकमांडने हे पद आपल्याला सोपवावे असे सिद्धूला वाटते.

- Advertisement -

दुसरीकडे सोनिया गांधी यांनी कॅप्टनना अभय दिले असून विधानसभा निवडणूक कॅप्टन अमरींदरसिंग यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील हे ठामपणाने स्पष्ट केले आहे. परंतु सध्याच्या सिद्धूच्या कुरपाती पाहता ते निवडणुकीपर्यंत कोणता ना कोणता घोळ घालणार हे निश्चित आहे.

विधानसभा निवडणुकांना सहा महिने राहिलेले असताना सुरू झालेला हा सुप्तसंघर्ष काँग्रेसला हानीकारक आहे. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजत आहेत. काँग्रेस, आम आदमी पक्ष, अकाली दल, भाजप यासारखे प्रमुख पक्ष कामाला लागले आहेत. सत्ताधारी काँग्रेस मात्र अंतर्गत वादात अडकली आहे. विशेषत: माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धूने मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. सध्याच्या स्थितीत दिल्लीतील हायकमांड दोघांनाही नाराज करु इच्छित नाही. परंतु दोघांचे मन सांभाळताना काँग्रेस पक्षाचे नुकसान होवू शकते.

पंजाबमधील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग आणि काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट झाली. यानंतर अतंर्गत वाद हे थांबणे अपेक्षित आहे. देशातील सर्वात जुना आणि सत्तारुढ असलेल्या पक्षात अशा प्रकारच्या कुरबुरी दुर्देवी आहेतच त्याचबरोबर प्रतिमा खराब करणार्‍या आहेत.

काही वर्षापूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार्‍या नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबमध्ये आपल्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांविरोधात मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विधानसभेला केवळ सहा महिने राहिलेले असताना काँग्रेसमध्ये निर्माण झालेले वाद हे पक्षाला हानीकारक आहेत. मुख्यमंत्री हे प्रमुख विरोधी पक्ष असणार्‍या अकाली दलाशी साटेलोटे करुन सरकार चालवत असल्याचा आरोप सिद्धूने केला आहे. अर्थात हा आरोप आश्चर्यकारक आहे. कारण 2017 च्या विधानसभा निवडणुकीत अकाली दलाला पराभूत करुन कॅप्टनने सरकार स्थापन केले. तेव्हा कॅप्टननी अकाली दलाच्या दहा वर्षाच्या कारभारावर ताशेरे ओढत भ्रष्टाचाराचा मुद्दा प्रभावीपणे मांडला. त्याला जनतेने साथ दिली. विधानसभेच्या 117 पैकी 80 जागा काँग्रेसने जिंकल्या होत्या. आजच्या स्थितीला अकाली दलच नाही तर आम आदमी पक्षातही काँग्रेसला पराभूत करण्याची क्षमता नसल्याचे सांगितले जात आहे. परंतु जिंकलेली बाजी हारण्याची काँग्रेसला हौस आहे, असे खेदाने म्हणावे लागेल.

नवज्योत सिंग सिद्धूने सध्या वीज टंचाईवरुन कॅप्टनविरोधात आघाडी उघडली आहे. सिद्धूच्या या भूमिकेपासून विरोधी पक्ष देखील प्रेरणा घेत असून ते देखील रस्त्यावर उतरले आहेत. परंतु सिद्धूने स्वत:च्याच घराचे 8 लाख रुपयाचे बिल अद्याप भरलेले नाही, असे समोर आले आहे. यातून सिद्धूंच्या राजकारणातील पोकळपणा दिसून येतो. सत्ता मिळवण्यासाठी आणि पदप्रतिष्ठेसाठी एखादा राजकीय नेता कोणत्या पातळीपर्यंत घसरु शकतो, हे सिद्धूने दाखवून दिले आहे.

सिद्धूला पंजाबचे प्रदेशाध्यक्षपद हवे आहे. आगामी निवडणुकीपर्यंत काँग्रेस हायकमांडने हे पद आपल्याला सोपवावे असे सिद्धूला वाटते. दुसरीकडे सोनिया गांधी यांनी कॅप्टनना अभय दिले असून विधानसभा निवडणूक कॅप्टन अमरींदरसिंग यांच्याच नेतृत्वाखाली लढल्या जातील हे ठामपणाने स्पष्ट केले आहे. परंतु सध्याच्या सिद्धूच्या कुरपाती पाहता ते निवडणुकीपर्यंत कोणता ना कोणता घोळ घालणार हे निश्चित आहे. सिद्धूच्या बोलण्यास हुरळून जावून हायकमांडनी जर त्यांच्यावर एखादी जबाबदारी सोपवली तर भाजपसाठी ही बाब पथ्यावर पडू शकते. पंजाब निवडणुकीच्या प्रचारात पाकिस्तानचे जनरल बाजवा यांची सिद्धू यांनी गळाभेट भाजपाकडून चर्चेत आणली जाऊ शकते. त्यासंदर्भातील फोटो व्हायरल केले जाऊ शकतात. तसे झाल्यास ही बाब काँग्रेसच्या अंगलट येवू शकते.

पाकिस्तानातील नानकाना साहिब कॉरिडॉर सुरू करण्याचे श्रेय सिद्धूने घेतले असून त्याचा डांगोरा पिटला जात आहे. त्याचा प्रभाव पंजाबच्या नागरिकांवर आहे. परंतु सध्या पाकिस्तानकडून ज्या रितीने ड्रोन हल्ले केले जात आहेत, त्यावरुन पाकिस्तानविषयी संताप व्यक्त केला जात आहे. याप्रकारच्या हल्ल्याचा इशारा कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्येच दिला होता. कारण पंजाबमध्ये पाकिस्तानातून येणारे ड्रोन पाडण्यात आले होते. त्यात मोठ्या प्रमाणात शस्रास्त्रे सापडली होती. या गोष्टींपासून सिद्धू पळ काढत आहेत. पाकिस्तान आणि पंतप्रधान इम्रान खान यांच्या प्रेमात आंधळे झालेल्या नवज्योत सिद्धूंना ड्रोन हल्ले दिसत नसल्याचे निदर्शनास येते.

सिद्धू आणि कॅप्टन यांच्यातील राजकीय साठमारीत राज्यातील लोककल्याणकारी कामे बाजूला पडली आहेत. आता सर्वकाही हायकमांडच्या भूमिकेवर अवलंबून आहे. काँग्रेस पक्ष पंजाबमध्ये शेवटच्या दिवसांपर्यंत काम करत राहिल, हे पाहण्याची जबाबदारी दिल्लीश्वरांची आहे. सत्तारुढ पक्षातील साठमारीत लोकांच्या कामांत तडजोड करता येणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नवज्योत सिद्धूला त्याची जागा दाखवून देणे आवश्यक आहे. ही कृती दिल्लीश्वरच करु शकतात.

आतापर्यंत सिद्धूने दिल्लीला जेवढ्या चकर्‍या मारल्या, त्यानंतर ते छाती फुगवत पंजाबला परत गेले. पण राजकारणात वक्तृत्व गुण हा एका मर्यादेपर्यंत काम करते. त्याचा कालावधी कमीच असतो. सिद्धू पंजाबमध्ये मंत्री देखील राहिलेले आहेत. परंतु त्यांनी आपल्या कार्यकाळात एकही उल्लेखनीय काम केलेले नाही आणि असले तरी ते सांगण्यासारखे नाही. हा प्रसंग विसरण्यासारखा नाही. जेव्हा सिद्धू लोकसभेत भाजपकडून अमृतसरचे खासदार होते, ते केंद्रात काँग्रेसचे सरकार होते. तेव्हा त्यांनी अमृतसर येथे निर्यात केंद्र उभारण्याची मागणी केली होती. यावेळी तत्कालिन वाणिज्यमंत्री कमलनाथ यांनी त्यांना पंजाबमध्ये आपले सरकार असून त्यांच्यांकडून जमीन उपलब्ध करुन द्या, अशी सूचना केली. तेव्हा सिद्धूने ही जबाबदारी झटकली. सांगण्याचे तात्पर्य एवढेच की केवळ डायगलॉगबाजी करुन राजकारण करता येत नाही. त्यासाठी प्रत्यक्षपणे काम करणे अपेक्षित असते. त्याचवेळी सिद्धू आता कॅप्टनविरोधात बिगूल वाजवत आहेत आणि स्वार्थापोटी ते पक्षालाही गाळात घालण्याचे काम करत आहेत. पंजाबमध्ये मागची निवडणूक कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी आपल्या सक्षम नेतृत्वाच्या बळावर जिंकली होती. तेव्हा आम आदमी पक्ष आणि अकाली दल हे काँग्रेसला हरवतील, अशी जोरात हवा होती. परंतु कॅप्टननी ाज्यातील शेतकर्‍यांत लोकप्रियता वाढवली असल्याने विरोधकांची झोप उडाली आहे. परंतु यावेळी काँग्रेस पक्षातीलच नेते सिद्धू हेच कॅप्टन अमरसिंगांची झोप उडवण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे यंदाची निवडणूक ही अधिक चुरशीची असेल यात शंकाच नाही.

- Advertisment -

ताज्या बातम्या