Thursday, May 2, 2024
HomeUncategorized‘बर्ड फ्लू’ला हलक्यात घेऊ नये

‘बर्ड फ्लू’ला हलक्यात घेऊ नये

प्रा.डॉ.पी.एस.लोहार

कोरोनाने भारतासह जगभरात थैमान माजवले. कोरोना विषाणूंचा संसर्ग झालेल्या कोव्हीड-19 रुग्णांची संख्या 8 कोटी 85 लाखाच्या पुढे गेली आहे. तर मृतांचा आकडा 19 लाख 7 हजाराहून अधिक आहे.

- Advertisement -

तर 1 कोटी 44 लाखाच्यावर सार्स-कोव्ही2 ने बाधितांची संख्या व त्यामुळे मृत पावलेले 1 लाख 51 हजाराहून अधिकच्या संख्येसह जगात भारत दुसर्‍या क्रमांकाचा देश आहे. नोहेंबर 2020 पर्यन्त संसर्गाचा वेग मंदावत होता व रुग्ण बरे होण्याचा दर सुधारत असताना कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे दुसर्‍यांदा रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना भारतावर आता आणखी एक नवे संकट कोसळले आहे. गेल्या आठवड्यात केरळमधील मलप्पुरममधील परप्पनगडी येथे बर्ड् फ्लू आढळला. या बर्ड फ्लूचा प्रसार रोखण्यासाठी विषाणूग्रस्त कोंबड्यांची व इतर पक्षांची किलिंग केले जात आहे. बर्ड फ्लू हा संसर्गजन्य रोग असल्याने झपाट्याने पसरण्याची भीती आहे.

बर्ड फ्लू हा आजार एवियन इन्फ्लूएंजा व्हायरस एच5एन1 मुळे होतो. हा वायरस पक्षी आणि माणसांना आपलं शिकार बनवतो. बर्ड फ्लू इन्फेक्शन चिकन, टर्की, मोर, कावळे, कबुतर आणि बदक तसेच परदेशी पक्ष्यांमुळे पसरतो. हा इन्फ्लूएंजा वायरस फार धोकादायक असून यामुळे पक्ष्यांसोबतच माणसांचाही मृत्यू होण्याचा धोका असतो. 1878 साली हा रोग पहिल्यांदा इटलीतून समोर आला होता. 1918-19 मध्ये या रोगाला स्पॅनिश फ्लू म्हटलं जायचं. या रोगामुळे आतापर्यंत अनेकांचे बळी गेले आहेत. 1957 हा रोग जगभरात पसरला होता, त्यावेळी 10 लाखांहून अधिक पक्षांचा जीव गेला होता.

त्यानंतर 1997 साली हाँगकाँगमध्ये हा रोग पसरला. त्यावेळी 7 लोकांचा बळी गेला होता. 2003 साली हा विषाणू चीनमधून पुन्हा प्रसारित झाला. मात्र यावेळी अनेकांचे बळी गेले. 2005 पर्यंत दक्षिण-पूर्व आशियात या विषाणूचा प्रसार वाढला. अफ्रिका आणि युरोपमध्ये बर्ड फ्लूच्या अधिक समस्या असतात. सामान्यतः माणसांमध्ये हा आजार कोबड्यांमुळे किंवा बर्ड फ्ल्यू झालेल्या पक्ष्यांच्या सानिध्यात आल्यामुळे होतो. एखाद्या पक्ष्याला हा आजार झाला असेल आणि तुम्ही कोणत्याही प्रकारे त्याच्या सानिध्यात आलात तर हा आजार तुम्हालाही होऊ शकतो. माणसांमध्ये बर्ड फ्लू या गंभीर आजाराचा विषाणू डोळे, नाक आणि तोडांमार्फत प्रवेश करतो. हा आजार मुख्यत्वे पक्षापासूनच माणसाकडे पसरतो. माणसापासून माणसाकडे हा आजार फार कमी प्रकरणात पसरलेला आहे.

माणसांत ताप, छातीमध्ये कफ, सर्दी, डोकेदुखी, घशामध्ये सूज, स्नायू व सांधेदुखी, पोटाच्या समस्या, सतत उलट्या होणं, अस्वस्थ वाटणं, श्वसनासंदर्भातील विकार, न्युमोनिया, डोळ्यांच्या समस्या आदी लक्षणं आढळल्यास त्वरीत एवियन एन्फ्लूएंजा व्हायरसची तपासणी करून घेतली पाहीजे. बर्ड फ्लूची साथ पसरल्यास पक्ष्यांपासून लांब रहा. एखाद्या पक्ष्याचा मृत्यू झाला असेल तर त्याला स्पर्श करू नका. बर्ड फ्लूच्या साथीत मांसाहरी जेवण टाळा, नॉन व्हेज खाद्यपदार्थांची खरेदी करताना स्वच्छ असल्याची खात्री करून घ्या. बर्ड फ्लूची साथ पसरलेल्या शहरात फारवेळ राहू नये.

वैद्यकीय सल्ल्यानुसार बर्ड फ्लूवर उपचार म्हणून एंटीवायरल ड्रग ओसेल्टामिविर (टॅमीफ्लू) आणि झानामिविर (रेलेएंझा) परिणामकारक ठरतात. ह्या विषाणूची तीव्रता कमी करण्यासाठी लागण झालेल्या व्यक्तीने पूर्णपणे विश्रांची घेणं गरजेचं असतं. तसेच योग्य व समतोल आहार घेणं गरजेचं असतं ज्यामध्ये द्रव्यस्वरूपातील पदार्थांचा जास्त समावेश असेल. बर्ड फ्लूची लागण इतर लोकांना होऊ नये म्हणून बाधा झालेल्या रूग्णाच्या संर्कात येणं टाळा. ज्याप्रमाणे आपण कोरोना विषाणूपासून स्वतः व इतरांचे रक्षण करण्यासाठी उपाययोजना राबवून भारता सारख्या अफाट लोकसंख्या असलेल्या देशात कोव्हीड-19 ची साथ आटोक्यात आणू शकलो त्याप्रमाणेच बर्ड फ्लू या आजाराला देखील आळा घालू शकतो.

(लेखक चोपडा महाविद्यालयातील विज्ञानाचे वरीष्ठ प्राध्यापक असून विद्यापीठात अभ्यास मंडळाचे अध्यक्ष आहेत.)

- Advertisment -

ताज्या बातम्या