अब की बार... बिहारात कोणाचे सरकार?

अब की बार... बिहारात कोणाचे सरकार?

नाशिक | एन. व्ही. निकाळे

चिराग पासवान यांच्या लोजपाने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेऊन एनडीएची डोकेदुखी वाढवली आहे. अशातच महाराष्ट्रात भाजपला धोबीपछाड देऊन सत्तेपासून वंचित ठेवणार्‍या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी बिहारमध्ये वेगळेपणे निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रात भाजपला जंगजंग पछाडल्यावर बिहार निवडणुकीनिमित्त या तिन्ही पक्षांचा ‘सामना’ प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी होण्याची चिन्हे आहेत. कारण बिहारमध्ये फडणवीस भाजपचे निवडणूक प्रभारी आहेत. ‘करोना’काळातील ही पहिलीच मोठी निवडणूक ठरणार आहे. निवडणुकीत संसर्ग टाळण्यासाठी प्रचारापासून मतदानपर्यंत अनेक नियम निवडणूक आयोगाने लागू केले आहेत. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत प्रभावीपणे कसे पोहोचायचे? हा राजकीय पक्ष आणि नेत्यांपुढचा यक्षप्रश्न आहे. प्राप्त परिस्थिती पाहता मतदानात मतदार किती उत्साह दाखवतात यावरच निकालाची भिस्त राहणार आहे.

‘करोना’चा वाढता संसर्ग लक्षात घेऊन भारत निवडणूक आयोगाने देशातील सर्व निवडणुका स्थगित केल्या होत्या. त्यामुळे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेवर निवड होण्यात अडचण निर्माण झाली होती.

राज्य सरकारने निवडणूक आयोगाला विनवणी केल्यावर मे महिन्यात ही निवडणूक घोषित करण्याची मेहेरबानी निवडणूक आयोगाने केली. आता तर ‘करोना’काळातही निवडणुका घेण्याचे धारिष्ट्य दाखवले आहे. बिहार निवडणूक ठरल्या वेळीच होईल, असा निर्वाळा आयोगाने दिला होता. सध्याची कठीण परिस्थिती पाहता बिहार विधानसभा निवडणूक पुढे ढकलली जाईल, अशी अटकळ राजकीय वर्तुळात बांधली गेली होती. ती निवडणूक आयोगाने वावडी ठरवली.

बिहार विधानसभा निवडणुकीचा निवडणूक कार्यक्रम आता जाहीर झाला आहे. त्यानुसार 28 ऑक्टोबर, 3 आणि 7 नोव्हेंबर अशा तीन टप्प्यांत मतदान होईल. 10 नोव्हेंबरला मतमोजणी होईल. ताबडतोब निकाल घोषित होतील. म्हणजे यंदा दिवाळीआधीच विजयाची आतषबाजी करण्याची संधी राजकीय पक्ष, त्यांचे नेते, कार्यकर्ते आणि चेले-चपाट्यांना आयोगाने मिळवून दिली आहे.

अशीच संधी गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरात महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक घेऊन आयोगाने मराठी मुलखातील नेत्यांना उपलब्ध केली होती. निवडणूक निकालानंतर महाराष्ट्रात जे काही अभूतपूर्व राजकीय महाभारत घडले ती देशाला करमणूकच ठरली. ‘अब की बार... बिहारात कोणाचे सरकार?’ याची उत्सुकता राजकारणात रस असणार्‍या मंडळींना आतापासूनच लागली आहे.

गेल्या महिन्यात केंद्र सरकारने तीन शेतीविषयक विधेयके संसदेत मतविभागणीशिवाय मंजूर करून घेतली. त्यानंतर देशभर असंतोष उसळला आहे. उत्तर प्रदेशातील हाथरस घटना आणि त्यासारखेच बलात्काराचे अमानूष गुन्हे रोज वाढत आहेत.

टाळेबंदीमुळे गोरगरिबांवर ओढवलेले बेरोजगारीचे संकट, अभिनेता सुशांत आत्महत्या प्रकरणावरून मुंबई आणि महाराष्ट्राची तसेच मुंबईच्या कार्यक्षम पोलीस दलाची प्रतिमा मलीन करण्याचे प्रयत्न, देशाच्या अर्थव्यवस्थेची खालावलेली स्थिती, शेतीविषयक कायद्यांना विरोध करून अकाली दलाचा एनडीएशी काडीमोड, मित्रपक्ष लोजपाची बिहारपुरती एनडीएशी फारकत आदी घटनांच्या पार्श्वभूमीवर बिहार विधानसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे.

नामदार रामविलास पासवान यांच्या निधनाने या निवडणुकीला वेगळेच महत्त्व येऊ शकते. गेल्या पाच वर्षांत स्वप्रतिमा स्वच्छ ठेवणार्‍या मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या सरकारने राज्यात जनहिताची किती विकासकामे केली?

विकासाला मतदार किती महत्त्व देतात यापेक्षा जनतेची अपेक्षापूर्ती करण्यात सरकार यशस्वी ठरले का? याला अधिक महत्त्व दिले जाण्याची शक्यताही असू शकते. रोजीरोटीसाठी महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली आदी राज्यांकडे बिहारमधील मजुरांना वर्षानुवर्षे धाव घ्यावी लागते. गेल्या पाच वर्षांत मजुरांना राज्यातच रोजगार देऊन त्यांचे स्थलांतर रोखण्यात नितीशकुमार सरकारला किती यश आले? किती रोजगारनिर्मिती झाली? आदी मुद्देही निवडणुकीत महत्त्वपूर्ण ठरू शकतात.

बिहारची निवडणूक काहीशी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वळणाने जाणारी आहे. महाराष्ट्रात विरोधक औषधालाही उरणार नाहीत, अशा गर्जना गेल्या वर्षी तत्कालीन सत्ताधार्‍यांनी करून राज्यात पुन्हा आमचीच सत्ता येईल, असा विश्वास व्यक्त केला होता. तथापि राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीने निवडणुकीत अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी केली. बर्‍यापैकी जागा पटकावल्या.

युतीला बहुमत मिळाले, पण मुख्यमंत्रीपदावरून घोडे अडले आणि राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले. सत्तांतर घडले. त्या धक्क्यातून महाराष्ट्रातील आताचा प्रमुख विरोधी पक्ष अजूनही सावरलेला नाही. बिहार निवडणुकीतसुद्धा विरोधकांचे फारसे अस्तित्व जाणवत नाही; म्हणून निवडणूक एकहाती जिंकता येईल, असे सत्ताधारी पक्षांच्या नेत्यांना सुरूवातीला वाटत होते. आता परिस्थिती बदलली असावी.

सत्ताधारी एनडीए विरुद्ध महाआघाडी अशी दुरंगी लढाई रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राजद-काँग्रेस महाआघाडीचे नेतृत्व लालूप्रसादपुत्र आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव करीत आहेत. पक्षाला ते नवी ऊर्जा देतील, अशी जाणकारांची अपेक्षा आहे. महाआघाडीचे जागावाटपही झाले आहे. लोजपा अध्यक्ष चिराग पासवान यांना नितीशकुमारांचे नेतृत्व मान्य नाही. तशात भाजपसोबत जागावाटपाची बोलणी फिसकटल्याने चिराग यांच्या लोजपाने 143 जागा स्वबळावर लढण्याचा निर्धार केला आहे.

काही मतदारसंघांत भाजपशी मैत्रिपूर्ण लढती होतील, असेही चिराग यांनी म्हटले आहे. किमान निम्म्या मतदारसंघांत तिरंगी लढती पाहावयास मिळू शकतील, असे संकेत आहेत. पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांना आपण आपले नेते मानतो. म्हणून त्यांच्या नावे मते मागू, असे चिराग यांनी सांगितले, पण चिराग यांच्या विरोधात स्पष्टपणे बोलायला राज्यातील भाजप नेते धजावत नाहीत, अशी कुजबूज ऐकू येते. नितीशकुमारांचे मन राखतानाच आणि राष्ट्रीयपातळीवर एनडीएसोबत राहण्याचा निर्धार व्यक्त करणार्‍या चिराग यांची बाजू सावरताना भाजपची अवस्था ‘इकडे आड अन् तिकडे विहीर’ अशी होईल का?

चिराग पासवान यांनाही मुख्यमंत्रीपद खुणावत आहे. पुढचे सरकार भाजप आणि लोजपा मिळून बनवू, असेही त्यांनी बोलून दाखवले. स्वबळावर लढणार्‍या चिराग यांनी जदयूवर निशाणा साधला आहे. त्याचवेळी भाजप नेत्यांना लोजपाकडे आकर्षित करायला त्यांनी सुरूवात केली आहे. आतापर्यंत तीन भाजप नेते त्यांच्या गळाला लागले आहेत. चिराग यांनी स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतल्यानंतर जदयू-भाजप यांच्यात समसमान जागावाटप झाले आहे. तरीही नितीशकुमार काहीसे नाराज असल्याचे दिसते.

जागावाटपाच्या घोषणेसाठी झालेल्या पत्रकार परिषदेत नितीशकुमार सुरुवातीला हजर नव्हते, असे सांगितले जाते. भाजप नेत्यांनी मनधरणी केल्यावर ते अनिच्छेने तेथे पोहोचले. नितीशकुमार यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढवण्याचा निर्धार भाजप नेत्यांना जाहीर करावा लागला, पण जागावाटपात भाजपने वाढ करून घेतली आहे. एनडीएला बहुमत मिळाले तर पक्षवार जिंकलेल्या जागांचा विचार न करता मुख्यमंत्री नितीशकुमारच होतील, असेही वचन नितीशकुमारांना भाजपकडून मिळाले आहे. अर्थात ते वचन निवडणूक निकालापर्यंत कायम राहिले तरी नंतर बदलणारच नाही असे नाही.

आतापर्यंत बिहारमध्ये जदयू-भाजप युतीत वर्चस्व असायचे ते नितीशकुमारांचे, पण त्यांची लोकप्रियता आता पूर्वीसारखी राहिली नाही. म्हणून जागावाटपाचा निर्णय रेंगाळला होता. अखेर नितीशकुमारांना नमते घ्यावे लागले. बिहारात जदयू ‘मोठा भाऊ’ असूनही भाजपला निम्म्या जागा सोडणे भाग पडले. अडीच वर्षांपूर्वी राजदची साथ सोडून नितीशकुमारांनी भाजपशी जुळवून घेतले. पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळवले.

साहजिकच कितीही नाराजी असली तरी भाजपसोबत राहण्याशिवाय जदयूपुढे पर्यायच नसावा, असे आजतरी चित्र आहे. निवडणूक निकालानंतर काहीही घडू शकते याचे मनोवेधक ताजे उदाहरण महाराष्ट्रातील राजकारणाने घालून दिले आहे. तसे काही होण्याची भीती जदयू व भाजपला वाटत असल्यास आश्चर्य नाही.

लोजपाने ‘एकला चलो रे’ची भूमिका घेऊन एनडीएची डोकेदुखी वाढवली आहे. अशातच महाराष्ट्रात भाजपला धोबीपछाड देऊन सत्तेपासून वंचित ठेवणार्‍या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी बिहारमध्ये वेगळेपणे निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतला आहे. महाराष्ट्रात भाजपला जंगजंग पछाडल्यावर बिहार निवडणुकीनिमित्त या तिन्ही पक्षांचा ‘सामना’ प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी होण्याची चिन्हे आहेत.

कारण बिहारमध्ये फडणवीस भाजपचे निवडणूक प्रभारी आहेत. ‘करोना’काळातील ही पहिलीच मोठी निवडणूक ठरणार आहे. निवडणुकीत संसर्ग टाळण्यासाठी प्रचारापासून मतदानपर्यंत अनेक नियम निवडणूक आयोगाने लागू केले आहेत. प्रचारावर बरीच बंधने आली आहेत. अर्थात तो बिहार आहे. बंधनांतून पळवाटा शोधण्यात वाकब्गार आहे.

जास्तीत जास्त मतदारांपर्यंत प्रभावीपणे कसे पोहोचवायचे हा राजकीय पक्ष आणि नेत्यांपुढचा यक्षप्रश्न आहे. गर्दी टाळून प्रचारसभा कशा होणार? आभासी सभांचा सुरक्षित पर्याय अवलंबल्यास तसा प्रचार मतदारांवर किती प्रभाव पाडू शकेल? प्राप्त परिस्थिती पाहता मतदानात मतदार किती उत्साह दाखवतात यावरच निकालाची भिस्त राहणार आहे.

newseditnsk@deshdoot.com

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com