भविष्यवेध : डाबरचा तरुण चेहरा !
फिचर्स

भविष्यवेध : डाबरचा तरुण चेहरा !

Balvant Gaikwad

कोलकात्याच्या बर्मन परिवाराने भारतीय बाजारपेठेवर डाबरच्या माध्यमातून अधिराज्य गाजविले. आयुर्वेदिक उत्पादनांमध्ये आघाडीवर असलेल्या या कंपनीच्या तरुण वारसदारांनी अन्य क्षेत्रांतही हात अजमावले. कंपनीचा विस्तार आणि वाढण्यासाठी बर्मन परिवारातील अन्य सदस्यांप्रमाणेच मोहित बर्मन यांनीही कसब पणाला लावले. डाबर परिवाराचे सदस्य असण्यापलीकडे ‘अविवा’ आणि ‘एलिफंट कॅपिटल’ त्यांची खास ओळख. सध्या ते अविवा इंडिया लाईफ इन्शुरन्स कंपनीचे चेअरमन आहेत; तर डाबर इंडियाचे संचालक. लंडन स्टॉक एक्स्चेंजची पर्यायी गुंतवणूक संस्था म्हणून ओळख असलेल्या एलिफंट कॅपिटलचे ते कार्यकारी संचालक आहेत.

डाबरची ओळख आयुर्वेदिक उत्पादने असली तरी मोहित यांना मात्र अर्थ आणि गुंतवणूक विषयाचे आकर्षण. त्यामुळे इंग्लंडमधील उच्चशिक्षणानंतर तेथेच एका प्रॉपर्टी कंपनीत त्यांनी गुंतवणूक केली. त्यानंतर ते डाबर फायनान्स कंपनीत स्थिरावले. अविवा आणि डाबर इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या जॉइंट व्हेंचरमधून ‘अविवा इंडिया’ कार्यरत आहे. सध्या या कंपनीची धुरा अध्यक्ष या नात्याने मोहित यांच्याकडे आहे. बलसारा होम अ‍ॅण्ड हायजीन या उद्योगाचे डाबरमध्ये विलीनीकरण झाले. यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. लंडनमध्ये प्रॉपर्टी क्षेत्रात डाबर स्थिरावली, यात मोहित यांचा अभ्यास कामी आला. अविवा, डाबरसह तब्बल 31 कंपन्यांवर ते संचालक आहेत. आयपीएलमधील किंग्ज इलेव्हन पंजाबचे ते सहमालकही आहेत. गुंतवणूक हे क्षेत्र त्यांच्यासाठी लाभदायी असल्याचे कुंडली दर्शविते. मोहित यांचे करिअर त्याच दिशेने विस्तारल्याचे दिसते. गुंतवणूक क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर त्यांनी मोठा पल्ला गाठला आहे. मात्र यासाठी तब्बल 20 वर्षे संघर्षही त्यांनी केला. आज स्थिरावलेले मोहित बर्मन आगामी वर्षात अधिक नाव कमावतील, असे योग आहेत.

पत्रिकेतील योग – अनफा योग, धुर्धरा योग, ब्रह्मा योग, नवयोग, धन योग, बुद्धिमातुर्य योग, युक्ती समानाविद्वाग्मी योग.
पत्रिकेतील जमेची बाजू – बुध स्वराशीला, रवि-गुरू-राहू मित्र राशीला, गुरू-चंद्र-शुक्र-नेपच्यून यांचा नवपंचम योग, शुक्र-शनी, रवि-चंद्र, गुरू-नेंपच्यून, राहू-बुध हे केंद्र योगात, चंद्र-मंगळ, गुरू-मंगळ, हर्षल-नेपच्यून, राहू-बुध हे केंद्र योगात, चंद्र-मंगळ, गुरू-मंगळ, हर्षल-नेपच्यून लाभयोगात, तर नवमांशात शुक्र-रवि स्वराशीला. तर गुरू उच्च राशीला, तसेच चंद्र-बुध-राहू मित्र राशीला.

पत्रिकेतील कमकुवत बाजू – तनुस्थानी वर्गात्तम नीचस्थ शनी नक्षत्री अष्टम व षष्ठम स्थान दूषित तर नवमांशात भाग्यस्थ व सुखस्थान दूषित. पत्रिकेचा दर्जा 65 %

स्वभाव वैशिष्ट्ये – मोहित विवेक बर्मन यांचा जन्म 20 जुलै 1968 रोजी पहाटे 12 वाजता कोलकाता येथे झाला. जन्म राशी मेष तर नक्षत्र कृत्तिका. मेष लग्नी शनी चंद्र तर मंगळ पराक्रमात बुधासह मिथुनेला असल्याने स्वभावात घाईत आणि तडकाफडकी निर्णय घेणे, एक घाव दोन तुकडे करण्याची मानसिकता असल्याने कोणतेही काम रेंगाळत ठेवणे आवडत नाही. एकदा तयार झालेले मत बदलणे जड जाते. प्रत्येक गोष्ट व्यवस्थित असावी याकडे कल आहे. योग्य ठिकाणी गुंतवणूक व खर्च व्हावा हा कटाक्ष असतो. स्वतःचे मत अतिशय निर्भीडपणे मांडतात. मनाविरुद्ध काहीही घडल्यास येणार्‍या उदासीनतेमुळे चिडचीड होते. स्वभाव अत्यंत स्वाभिमानी असल्यामुळे अपमान सहन होत नाही. कठीण शारीरिक व मानसिक परिश्रम करणे आवडते. समयसूचकता आणि विनोद बुद्धीमुळे समोरच्यावर एक वेगळी छाप पडते. ज्ञान ग्रहण करण्याची क्षमता व बुद्धिचातुर्य उत्तम असल्यामुळे जीवनात उत्तम लाभ होताना दिसतो. योग्य वाटेल अशा ठिकाणी भरभरून दान देणे आवडते. देवाबद्दल श्रद्धा असली तरी कर्मकांड आवडत नाही. स्वभावातील भावूकता व उदारता यांचा संगम ही आपल्या स्वभावाची वैशिष्ट्ये होत.

करिअर – 15 फेब्रुवारी 1990 ते 16 फेब्रुवारी 2008 हा राहूच्या महादशेचा कालखंड असल्याने जीवनात अस्थिरता चढउतार व मानसिक त्रासामुळे आयुष्याला दिशा मिळण्यात बरेचदा अडथळे येताना दिसतात. 17 फेब्रुवारी 2008 नंतर मात्र खर्‍या अर्थाने यश व स्थैर्याला सुरूवात झालेली आहे. 27 फेब्रुवारी 2011 नंतर विविध उद्योगक्षेत्रांच्या माध्यमातून जागतिक स्तरावर स्वतःचे स्थान निर्माण होण्यास सुरुवात झालेली आहे. अष्टमेष मंगळ भाग्यात असून लाभेष शनी लग्नी नीचस्थ असल्याने कमी श्रमात जास्त लाभ देणार्‍या व्यवसायांतून म्हणजे शेअर्स, विमा अप्रत्यक्ष क्रीडा क्षेत्रातून भरभराट होताना दिसते. म्हणूनच आज जगात शेअर मार्केट किंग अशी ओळख निर्माण झालेली आहे. षष्ठात कन्येला केतू तर बुध पराक्रमात मिथुनेला असल्याने आरोग्य किंवा आयुर्वेदिक उत्पादनाच्या माध्यमातून उत्तम नाव व लाभ होत राहण्याचे योग. 16 जून 2024 पर्यंत यशाचा हा वारू चौफेर उधळत राहण्याचा योग आहे. 17 फेब्रुवारी 2024 नंतर काही काळ म्हणजे 19 फेब्रुवारी 2027 पर्यंत चढउतार निर्माण होणार असले तरीही नंतर पुन्हा उद्योगक्षेत्राची घोडदौड सुरुच राहील.
सल्ला – भाग्योदय यश व सौख्यासाठी उजव्या तर्जनीत पुष्कराज रत्न तर अनामिकेत माणिक रत्न धारण करावे. लाल रंगाचा वापर जास्त करावा. शुक्रवार व बुधवार महत्त्वाचे निर्णय घेऊ नयेत.

Deshdoot
www.deshdoot.com