Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedफिरा अन् प्रसन्न, संपन्न व्हा!

फिरा अन् प्रसन्न, संपन्न व्हा!

– कॅप्टन नीलेश गायकवाड

कोरोना संकटाची तीव्रता कमी होऊ लागल्यानंतर पर्यटनासाठी बाहेर पडणार्‍यांची संख्या वाढू लागली आहे. याचे कारण पर्यटन ही चैन नसून गरज आहे.

- Advertisement -

पर्यटनामुळे विरंगुळा तर मिळतोच; परंतु त्याबरोबरच माहिती आणि ज्ञानाचा खजिना आपल्यासमोर उलगडतो. ऐतिहासिक पर्यटन, धार्मिक पर्यटन, कृषी पर्यटन, साहसी पर्यटन, निसर्ग पर्यटन असे वेगवेगळे प्रकार माणसाचे मन प्रफुल्लित करण्याबरोबरच त्याला अनुभवांनी समृद्ध करतात. त्यामुळेच पर्यटनाची व्याप्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठ्या प्रमाणात वाढली असून, तो एक प्रमुख व्यवसायही बनला आहे. पर्यटनाच्या व्यवसायावर लाखो लोकांची उपजीविका थेट किंवा अप्रत्यक्षपणे अवलंबून आहे.

शिकून-सवरून करिअर करणे, आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होणे, मग विवाह, कुटुंबाची उपजीविका, मुलाबाळांची जबाबदारी, त्यांचे शिक्षण, वार्धक्याची सोय असे साचेबद्ध जीवन आपण जगत असतो. या सर्व भौतिक स्वरूपाच्या गरजा आहेत आणि प्रत्येक व्यक्तीला त्या पूर्ण कराव्याच लागतात. परंतु यापलीकडेही माणसाच्या काही गरजा असतात. किंबहुना भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी माणूस मानसिकद़ृष्ट्या सक्षम असावाच लागतो आणि त्यासाठीच मनाच्या गरजा त्याला पुरवाव्या लागतात.

मन रमवण्यासाठी करमणुकीच्या दुनियेबरोबरच छंद, आवडीनिवडी, नवसृजन आणि पर्यटन या आवश्यक बाबी आहेत. घर आणि व्यवसायाचे किंवा नोकरीचे ठिकाण अशी ये-जा तर माणूस रोजच करीत असतो. परंतु या रहाटगाडग्यातून सवड काढून जेव्हा तो निसर्गात जातो, तेव्हा त्याच्या मनाला उभारी मिळते. जेव्हा तो ऐतिहासिक ठिकाणांना भेटी देतो तेव्हा त्याला आपल्या पूर्वजांच्या जीवनाची, क्षमतांची माहिती मिळते. अशा अनेक गोष्टींसाठी पर्यटन गरजेचे आहे. घर आणि नेहमीची दिनचर्या सोडून जो फारसा फिरत नाही, त्याचे व्यक्तिमत्त्व कोमेजल्यासारखे भासते. याउलट भ्रमंती करणारा, अनेक ठिकाणांना भेटी देणारा माणूस ज्ञानसंपन्न तर होतोच; पण तो तरतरीत राहतो.

सोप्या शब्दांत सांगायचे झाल्यास पर्यटन म्हणजे हिंडणे-फिरणे, मौजमजा करणे. परंतु याबरोबरच माहिती मिळविणे, ज्ञान प्राप्त करणे, मनःशांती मिळविणे आणि अन्य काही हेतूंनी केलेला प्रवाससुद्धा पर्यटन याच सदरात मोडतो. म्हणूनच निसर्ग पर्यटन, इतिहास पर्यटन, आध्यात्मिक पर्यटन असे वेगवेगळे प्रकार विकसित झाले आहेत.

थोडक्यात, फिरण्यासाठी कारण कोणतेही असले तरी पर्यटन ही एक आनंददायी, समाधान देणारी गोष्ट आहे. देशांतर्गत (डोमेस्टिक) आणि आंतरराष्ट्रीय पर्यटन असे पर्यटनाचे दोन ढोबळ प्रकार सांगता येतात. देशांतर्गत पर्यटनासाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता भासत नाही तर आंतरराष्ट्रीय पर्यटनासाठी व्हिसा, पासपोर्ट आदी कागदपत्रे तयार करावी लागतात. आंतरराष्ट्रीय पर्यटनाचेही दोन प्रकार आहेत. जेव्हा एखादा पर्यटक एका देशातून दुसर्‍या देशात, दुसर्‍यातून तिसर्‍या देशात असा प्रवास करत राहतो तेव्हा त्याला ‘इनबाउंड टूरिझम’ म्हणतात. जेव्हा एखादी व्यक्ती आपल्या देशातून दुसर्‍या देशात पर्यटनासाठी जाते आणि तिथून पुन्हा मायदेशी परतते तेव्हा त्याला ‘आउटबाउंड टूरिझम’ म्हणतात.

याखेरीज फिरण्यासाठी जी अनेक कारणे असतात, त्यावरून पर्यटनाचे अनेक प्रकार पडतात. लहानपणी ‘शैक्षणिक सहल’ सर्वांनीच अनुभवलेली असते. अशा प्रकारे माहिती, ज्ञान घेण्यासाठी अनेकजण फिरस्ती करतात. त्यांना विविध ठिकाणची वेगवेगळी संस्कृती पाहण्यात, अनुभवण्यात, अभ्यासण्यात रस असतो. संस्कृतीसोबतच त्या-त्या ठिकाणच्या, वेगवेगळ्या मानवसमूहांच्या कला, नृत्ये, संगीत वेगवेगळे असते. लोकसंस्कृती हा एक समृद्ध ठेवा असतो. ती संस्कृती पाहणे, अनुभवणे आणि ती टिकविणार्‍या लोकांसमवेत राहणे अनेकांना आवडते. यालाच आपण सांस्कृतिक पर्यटन म्हणू शकतो.

निसर्गात जाऊन साहसी कृत्ये करायलाही अनेकांना आवडते आणि असे लोक ‘अ‍ॅडव्हेन्चर टूरिझम’ म्हणजे साहसी पर्यटनाचा आस्वाद घेतात. सामान्यतः किशोरावस्थेतील मुलांना याचे आकर्षण अधिक असते. जंगलात भटकंती करण्यापासून उंच डोंगर सर करणे, नद्या ओलांडणे अशा गोष्टींमध्ये ‘थ्रिल’ असते आणि ते अनुभवण्यासाठी तरुण साहसी पर्यटनाला जातात. मात्र, अनुभवी आणि तज्ज्ञ व्यक्ती सोबत असल्याखेरीज अशा प्रकारचे पर्यटन करू नये, असा सल्ला दिला जातो.

रोजच्या धकाधकीचा कंटाळा येऊन केवळ रिलॅक्स होण्यासाठी आपण जेव्हा फिरायला बाहेर पडतो, तेव्हा त्याला ‘रिक्रिएशनल टूरिझम’ म्हणतात. कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्रांसमवेत लोक रिक्रिएशनल टूरिझम म्हणजेच मनोरंजनात्मक पर्यटनाला जातात. सामान्यतः लोक निसर्गाच्या सान्निध्यात, शेतघरात, समुद्रकिनारी, थंड हवेच्या ठिकाणी, हिमाच्छादित पर्वतरांगांमध्ये फिरायला जातात. ताणतणावातून बाहेर पडणे आणि फिरून आल्यावर फ्रेश मनाने पुन्हा कामाला सामोरे जाणे हा या पर्यटनाचा उद्देश असतो. आजकाल ‘हेल्थ टूरिझम’ म्हणजेच आरोग्य पर्यटनाचाही बोलबाला आहे. लोक हळूहळू आपल्या आरोग्याविषयी जागरूक होऊ लागले आहेत. त्यामुळे योग कॅम्पपासून मनःशांतीच्या दृष्टीने विपश्यनेपर्यंत अनेक ठिकाणी लोक मनोबल आणि शारीरिक बल प्राप्त करण्यासाठी जातात. रोजच्या दिनचर्येतून काही दिवस स्वतःची मुक्तता करून घेणे आणि तो कालावधी चांगल्या आरोग्यविषयक सवयी लावून घेण्यासाठी घालविणे हा या पर्यटनाचा उद्देश असतो. शिवाय, उपचारांसाठी लोक हल्ली आंतरराष्ट्रीय पर्यटन करतात. काही देशांमध्ये विशिष्ट आजारांवरील उपचार चांगल्या प्रकारे केले जातात. काही ठिकाणी उपचारपद्धती स्वस्त असतात. अशा ठिकाणी आरोग्य पर्यटनासाठी येणार्‍या लोकांचा ओघ वाढतो.

कामासोबत पर्यटन किंवा कामासाठी पर्यटन असाही एक प्रकार हल्ली रूढ झालेला आहे. त्याला ‘कन्व्हेन्शन टूरिझम’ असे नाव देण्यात आले आहे. मोठमोठ्या कंपन्या आपली अधिवेशने, बैठका, चर्चासत्रे, कार्यशाळा थंड हवेच्या ठिकाणी भरवितात. सामान्यतः जे लोक माहिती तंत्रज्ञान (आयटी) क्षेत्रात काम करतात, त्यांना अशा प्रकारचे पर्यटन हमखास अनुभवायला मिळते. अशा ठिकाणचा संपूर्ण खर्च कंपनीकडून उचलण्यात येतो आणि कामासोबतच कर्मचार्‍यांना पर्यटनाचा आनंद घेता येतो. अनेकांना कंपनी एलटीसीसारख्या सुविधा देते. कंपनीकडून पर्यटनासाठी पैसे मिळतात म्हणून दरवर्षी कुटुंबासोबत फिरायला जाणारे लोक आहेत. याला ‘इन्सेन्टिव्ह टूरिजम’ असे म्हणतात.

पर्यटन हा देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान देणारा एक महत्त्वाचा व्यवसाय आहे. कोरोनाच्या प्रसारकाळात अनेक व्यवसायांवर गदा आली आणि त्यावर अवलंबून असलेल्या लोकांना बेरोजगार राहावे लागले. त्यात पर्यटन उद्योगातील लोकांचा समावेश मोठ्या संख्येने होता. पर्यटनावर थेट आणि अप्रत्यक्षरीत्या लाखो लोक अवलंबून आहेत. आपल्या देशात पर्यटनाला मोठे महत्त्व आहे. त्याचे कारण असे की, आपल्याकडील ऐतिहासिक स्थळे, निसर्गरम्य ठिकाणे आणि अन्य पर्यटनस्थळांची संख्या मोठी असल्यामुळे दरवर्षी सुमारे 50 लाख परदेशी पर्यटक भारतात येतात. देशांतर्गत पर्यटन करणार्‍यांची संख्याही भारताने नव्वदीच्या दशकात खुले आर्थिक धोरण स्वीकारल्यापासून सातत्याने वाढतच आहे. या सर्व पर्यटकांची राहण्याची, खाण्यापिण्याची, फिरण्याची सोय करण्याच्या प्रक्रियेत असंख्य लोकांना रोजगार मिळतो. याखेरीज प्रत्येक ठिकाणची खाद्यसंस्कृती, हस्तकला, संगीत, लोककला आदी प्रसिद्ध असते. या सर्वांना पर्यटकांमुळे काम मिळत असते. पर्यटकांना विविध प्रकारच्या वस्तूंची विक्री करून पोट भरणारे लाखो लोक भारतात आहेत. शिवाय, हॉटेल, लॉज, रिसॉर्ट आदी व्यवसायांमध्येही मोठ्या संख्येने रोजगार निर्माण झाला आहे. परदेशी पर्यटकांची वाढती संख्या विचारात घेऊन भारत सरकारनेही ‘अतुल्य भारत’सारख्या योजना सुरू केल्या आहेत. आंतरराष्ट्रीय पर्यटनामुळे परदेशी चलनाची गंगाजळी वाढते. याचे सर्वांत मोठे उदाहरण 2010 मधील आहे. त्यावेळी जागतिक मंदीचे सावट असूनसुद्धा भारतातील पर्यटन 9 टक्क्यांनी वाढून त्यातून मिळालेले उत्पन्न 42 अब्ज डॉलर एवढे होते

देशांतर्गत पर्यटनामुळे राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागते. विविधतेतील एकता हे भारताला एकत्र बांधणारे प्रमुख सूत्र आहे. ही विविधता आपल्याला वेगवेगळ्या प्रांतांमध्ये पाहायला मिळते. खाद्य संस्कृतीपासून कला, संगीत आणि भाषेपर्यंत सर्वत्र ही विविधता आढळते. प्रवासाला बाहेर पडल्यानंतर अनेकदा आपण

अनोळखी प्रदेशात असतो आणि आपल्याला काही अडचणी येतात. अशा वेळी धैर्याने आणि विवेकाने परिस्थिती हाताळावी लागते. अशा प्रसंगांवर मात करण्याच्या अनुभवातून प्रवास करणार्‍याला आत्मविश्वास मिळतो.

देशाटनासाठी पूर्वी खूप मूठभर लोक बाहेर पडत असत. वाहतुकीच्या सोयी नसल्यामुळे वर्षानुवर्षे त्यांची फिरस्ती सुरू असे. परंतु विविध ठिकाणी जाऊन वेगवेगळ्या लोकांना भेटून ते ज्ञान प्राप्त करीत होते. जुन्या काळातील या प्रवाशांनी त्यांचे अनुभव लिहून ठेवल्यामुळेच देशविदेशातील तत्कालीन लोकसंस्कृतीची माहिती आज आपल्याला मिळू शकते. पर्यटनासाठी बाहेर पडणार्‍यांना जसे अनेक फायदे मिळतात, तसेच पर्यटकांमुळे एक मोठा व्यवसाय आकाराला आला असून, असंख्य लोकांना त्यामुळे रोजगार मिळाला आहे. त्यामुळेच आंतरराष्ट्रीय पातळीवर पर्यटन हा एक प्रमुख व्यवसाय मानला गेला असून, त्या अनुषंगाने देशोदेशीची सरकारे नियोजन करतात.

- Advertisment -

ताज्या बातम्या