निकषांमुळे पीक नुकसानीला अडथळे

निकषांमुळे पीक नुकसानीला अडथळे

येवला । सुनील गायकवाड | Yeola

तालुक्यात सततच्या पावसाने शेतात पाणी साचल्याने पीजे सडली, नष्ट झाली, तरीही महसूल मंडळात 24 तासात 65 मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाला असेल तरच तेथील शेतकर्‍यांनाच जाहीर झालेली शासनाची मदत मिळणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकर्‍यांचे करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे.त्यांना शासनाच्या नुकसान भरपाईचा रुपयाही मिळणार नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

सततच्या पावसामुळे झालेल्या पीक नुकसानीची पाहणी माजी मंत्री भुजबळ यांनी केली होती. पंचनाम्याचे आदेशही दिले होते. मात्र 65 मिमी पावसाच्या या निकषामुळे मदतीच्या यादीतून जिल्ह्यातील पाच तालुके गायब झाली आहेत.

शासनाने मोठा गाजावाजा करून जुलै ते ऑगस्टपर्यंत राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी तसेच पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीसाठी शेतकर्‍यांना दुप्पट दराने मदत केली जाईल अशी घोषणा केली होती. नैसर्गिक आपत्तीत अतिवृष्टीच्या निकषानुसार मंडळामध्ये 24 तासात 65 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद असल्यास मंडळातील गावांमध्ये 33 टक्क्यांपेक्षा जास्त शेती पिकांचे नुकसान झाल्यास ही मदत देण्यात येईल असे स्पष्टपणे शासन निर्णयात म्हटले होते.

त्याच निकषानुसार आता मदतीचे जिल्ह्यात वितरण झाले ठरले आहे.तसेच शेतजमीतील गाळ,मातीचा ढिगारा काढणे,शेती दुरुस्ती,थर काढणे,दरड कोसळणे,जमीन खरडणे खचणे,नदीपात्र बदलणे,शेत जमीन वाहून जाणे या नुकसानीसाठी मदत देताना शेतकर्‍यांनी कोणत्याही शासकीय योजनेखाली मदत किंवा अर्थसहाय्य घेतलेले नसावे अशीही अट घालण्यात आली आहे.

मुळात जिल्ह्यात मुसळधार पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे.मात्र दोन-तीन ते आठवडाभरापर्यंत सततचा पाऊस नेहमीच होत असतो.किंबहुना जुलै व ऑगस्ट या दोन महिन्यात तर जिल्ह्यात सतत रोज तास-दीड तास पाऊस पडत होता.या पावसाचे प्रमाण 65 मिलिमीटर नसले तरी रोजच पाऊस होऊन शेत जमिनीत पाणी साचल्याने कपाशी,मका, सोयाबीन तसेच कांद्याची रोपे सडल्याचेही प्रकार घडले किंबहुना पाटोदा भागात तर काही शेतकर्‍यांनी शेतात खराब झालेली मका अक्षरशः नांगरून टाकल्याच्याही घटना घडल्या आहेत.संपूर्ण तालुक्यातच सततच्या पावसामुळे शेतात पिके खराब होऊन शेतकर्‍यांना 50 टक्के हुन अधिक उत्पन्नात घट सहन करावी लागणार आहे. काही पिके पावसामुळे खराब झाल्याने

गुंतवलेले भांडवल ही निघणार नसल्याची परिस्थिती तालुक्यात व जिल्हाभरात आहे.अशा नुकसानीचेही पंचनामे करून शासनाने मदत द्यायला हवी होती.मागील वर्षी अशा नुकसानीला देखील पंचनामे करून मदत मिळाली होती.मग आत्ताच यावर्षी का नाही ?असा सवाल उपस्थित करून संपूर्ण नुकसानीचे पंचनामे करावेत व त्यानुसार मदत मिळावी अशी मागणी शेतकरी करू लागले आहे.

5 तालुके मदतीपासून वंचित!

जिल्हाधिकार्‍यांनी शासनाकडून प्राप्त झालेल्या मदतीचे तालुकानिहाय वाटपाचे विवरणपत्र निश्चित केले आहे.यानुसार दहा तालुक्यांना 11 कोटी 24 लाख 85 हजार रुपयांचा निधी वाटप होणार आहे. यात एकट्या मालेगाव तालुक्यासाठीच सात कोटी 96 लाख रुपये मिळणार आहे.तर येवला,सिन्नर,पेठ,चांदवड, इगतपुरी या तालुक्यांना मदतीचा रुपयाही मिळणार नसल्याचे या पत्रावरून दिसते.

तालुक्यात तीन,चार प्रकारची भौगोलिक रचना असल्याने तालुक्यातील प्रत्येक मंडळ विभागात परिस्थिती अशी की एक गाव सधन तर शेजारचे गाव पिण्याच्या पाण्यास मोहताज अशी परिस्थिती असल्याने नुकसान ही त्याच प्रमाणात कमी अधिक झाले आहे.पण सरकारी निकषाने नुकसान होऊनही शेतकरी कायमच मदतीपासून वंचित राहतो.त्यामुळे नुकसानभरपाईचे निकष इतर वैयक्तिक नुकसानी प्रमाणे शेतीचेही वैयक्तिक नुकसान गृहीत धरून मदत मिळाली पाहिजे.

- हरिभाऊ महाजन,तालुकाध्यक्ष, प्रहार शेतकरी संघटना,येवला

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com