Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedबळीराजाचा जीवाभावाचा सोबती

बळीराजाचा जीवाभावाचा सोबती

म्हणता म्हणता श्रावण संपत आला आहे. श्रावण महिन्याचा शेवट पिठोरी अमावस्येच्या दिवशी होतो, हा दिवस बैलपोळा म्हणून सर्वत्र साजरा होतो. कृषीव्यवस्थेत बैलाला अनन्य साधारण महत्त्व आहे. बैलांच्या अपार कष्टप्रती ऋण व्यक्त करणारा दिवस म्हणजे बैलपोळा. या दिवशी मनमुरादपणे बैलाचे लाड केले जातात. बैलाच्या डोळ्यात सदैव आपल्या मालकाविषयीचे प्रेम दिसत असते. शेतकरी आणि बैल यांच्यातील नाते विलोभनीय असते. बैल हा शेतकर्‍यांचा सखा सोबतीच आहे ….. मालकाच्या मनातील भावना या मुक्या प्राण्याला समजतात जसे एका जीवलग मित्राला दुसर्‍या मित्राच्या मनातील भाव भावना कळतात.

भारत देशातील प्रमुख व्यवसाय हा शेती होय. आजच्या काळात शेती आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून केली जात असली तरी बैल हा शेतीचा प्रमुख कणाच मानला जातो. वर्षाभर आपल्या कामात व्यस्त असतो. बैल तर आपला जीवनातील सर्वात महत्त्वाचा घटक आहे. त्यादृष्टीने विचार करत जाता त्याच्या प्रती असणारी कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. भारताचे दिवंगत पंतप्रधान पंडित लालबहादूर शास्त्रीजींनी आपल्या देशाचा नारा ‘जय जवान, जय किसान’ असा केला होता. देश जर चांगला, सुस्थितीत चालवायचा असेल ‘जय जवान’ म्हणजे देशाची संरक्षण फळी मजबूत हवी आणि दुसरीकडे ‘जय किसान’ म्हणजे शेतकरी सुदृढ आणि संपन्न हवा. अशा संपन्न शेतकर्‍याचा देव म्हणजे त्याची काळी आई आणि बैल! गाईला जर गोर्‍हा झाला तर तिच्या डोळ्यातून आसवं येतात, त्याच्या कष्टदायक जीवनाविषयीची ती ममत्वरुपी करूणा असते. पण त्याचं कर्तव्य काय ते ती त्या गोर्‍हयाला समजावून सांगत असावी.

- Advertisement -

श्री शंंकराचे प्रिय वाहन नंदी होय. म्हणून श्रावणातील शेवटचे पूजन हे नंदीचे करून श्रावणाची सांगता करतात असे म्हणावे लागेल. ऊन, वारा, पाऊस या कशाचीही तमा न बाळगता शेतकर्‍यांच्या परिवारातील सर्व सदस्य आणि बैल वर्षभर बरोबरीनं शेतात राबतात. साहजिकच वर्षातून एकदा त्याच्या या ऋणाची परतफेड करण्याचा बैलपोळा म्हणजे शेतकर्‍यासाठी मोठ्या पर्वणीचा आनंदाचा दिवस होय. एखाद्या नातलगाला ज्याप्रमाणे आपण मोठ्या आदराने आदल्या दिवशी उद्याच्या जेवणाचे आमंत्रण देतो अगदी तसेच शेतकरीही बैलाला आदल्या दिवशी आवतन घ्या, जेवायला या, असे म्हणून रितसर आमंत्रण देतो.

शेतकरीराजा आणि त्याचे संपूर्ण कुटुंबीय पोळ्याच्या दिवशी बैलाचे लाड करतात. सकाळी बैलाला नदीवर नेवून स्वच्छ, अंग घासून आंघोळ घालतात. त्यांना विविध रंगांनी रंगवतात. फुलांच्या माळा घालून, शिंगावर बेगड लावून सजवतात. नवीन आरसे काम केलेली रंगीत वीणकाम केलेली झुल पांघरतात. आणि गावाबाहेरच्या मारोती मंदिरिात वाजत गाजत दर्शनाला नेतात. तेथे पोळा फुटल्यानंतर मिरवत घरी आणतात. घरीतील स्त्रीया त्यांचे औक्षण करून गरम पुरणपोळीचे जेवणं देतात. आणि बैल आणणार्‍याला काही पैसे आणि नवीन कपडे देतात.

काही काही गावात बैलांच्या शर्यतींचे आयोजन केले जाते. यामध्ये पहिला नंबर पटकावणार्‍या बैलाला आणि त्याच्या मालकाला बक्षीस दिले जाते. एकंदर बैलांसाठी एक प्रकारे हा दिवाळीचाच सण असतो असे म्हणता येईल. धन्याकडून होणार्‍या या लाडाने बैलराजाही भारावून जातोे.

आपल्याकडील सर्वच सण काहीना काही उद्देशानेच साजरे केले जातात. त्यातील संस्काराची ही पिढीजात शिदोरी पुढील पिढीस हस्तांतरीत केंली जाते. ती जतन केली जाते. भूतदया, निसर्गपूजा, वृक्षपूजा ही आपल्या संस्कृतीची मूलभूत संकल्पना आहे. यावरूनच भारताचे प्रतिबिंब सर्व जगात उमटलेले दिसते.

- Advertisment -

ताज्या बातम्या