आत्मनिर्भर आणि भारत

jalgaon-digital
3 Min Read

– प्रसाद पाटील

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने ‘मेक इन इंडिया’वर गेल्या अनेक वर्षांपासून भर देत आहे. परंतु त्यास अपेक्षेप्रमाणे यश मिळताना दिसून येत नाही. यामागे अनेक कारणे असले तरी प्रामुख्याने राजकीय इच्छाशक्तीचा अभाव हेच कारण गृहित धरायला हवे. कारण पंतप्रधांनी आवाहन केले तरी अन्य नेते त्याचे कितपत पालन करतात, यावर पुढील गोष्टी अवलंबून आहेत.

देशातील जनता आत्मनिर्भर अभियान यशस्वी करु इच्छित आहे. परंतु देशातील सर्व पक्षांतील राज्यकर्त्यांनी यास प्रामाणिकपणे साथ द्यावी, एवढीच अपेक्षा आहे. ‘मन की बात’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला नवीन वर्षात स्वदेशी उत्पादनावर भर देण्याचे आवाहन केले आहे. देशातील बहुतांश जनता देशातच तयार झालेले उत्पादन खरेदी करु इच्छित आहे. प्रश्न असा की पंतप्रधानांचे म्हणणे किती नेते मनावर घेतील, असा आहे. नेत्यांची मुले परदेशात शिक्षणासाठी जातात. अर्थात ही परंपरा अनेक वर्षांपासून आपल्याकडे सुरू आहे.

ही मुले परदेशी गाड्यात फिरतात. त्यांच्या घरी साबणापासून ते कपड्यापर्यंत सर्व काही परकी बनावटीचे असते. पण या सर्व गोष्टी सर्व नेत्यांना सरसकट लागू होतीलच असे नाही, परंतु या बाबी कोणापासूनही लपलेल्या नाहीत. म्हणूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन किती सत्यात उतरेल, हे सांगता येत नाही.

प्रत्यक्षात आजचा देश दोन गटांत विभागला आहे. पहिला गट हा परदेशातील वस्तूंची खरेदी करण्यासाठी उत्सुक असतो तर दुसरा गट हा स्वस्ताईमुळे परदेशातील वस्तू खरेदी करण्याबाबत आग्रही असतो. म्हणूनच घरगुती उत्पादनाला चालना देण्यासाठी परदेशी उत्पादकांच्या विक्रीवर किंवा आयातीवर बंदी घालणे हा उपाय ठरत नाही. देश चालवणारे व्यक्ती स्वदेशीबाबत ठोस उदाहरण का देऊ शकत नाहीत, असा प्रश्न निर्माण होतो. प्रत्येक नागरिक देशाला मजबूत करु इच्छित असताना त्याचे निकष लागू करताना मात्र दुटप्पीपणा अभिप्रेत नाही. जेव्हा नेत्यांची मुले परदेशात शिकण्यासाठी जातात, तेव्हा आत्मनिर्भर भारताचे अभियान कमकुवत होणे साहजिकच आहे.

परदेशात शिक्षण घेण्याचा अर्थच असा की देशातील शाळा उत्तम दर्जाच्या नाहीत. आर्थिक उदारीकरणातून आज जगाची वाटचाल होत आहे. सध्याची जनता परवडणारे आणि चांगले वाटणार्‍या वस्तूंना प्राधान्य देत आहे. मग ती वस्तू परदेशातील का असेना. जर एखाद्या भारतीय उद्योगपतीला आपल्या उत्पादनांची विक्री व्हावी असे जर वाटत असेल तर त्याने दर्जा राखण्याचाही विचार करायला हवा. चीनशी संघर्ष झाल्यानंतर सरकारने चीनच्या अनेक अ‍ॅप्सवर बंदी घातली आहे.

तसेच चीनच्या उत्पादनावर नियमही कडक केले आहेत. मात्र कालांतराने चीनशी संबंध सुधारले तर? स्वदेशी उत्पादनाचा डंका परत मागे पडू शकतो. म्हणूनच आत्मनिर्भर भारत अभियान यशस्वी करायचे असेल तर देशातंर्गत निकोप स्पर्धा विकसित करायला हवी.लहान व्यापार्‍यांना बाजारात टिकून राहण्यासाठी सवलती द्याव्या लागतील. आता आपण काय करु शकतो, यावर विचार करायला हवा. नेत्यांपासून अभिनेत्यांपर्यंतच्या लोकांनी आत्मनिर्भर अभियान मोहिम यशस्वी करण्यासाठी कंबर कसली तर त्यात आपण यशस्वी होऊ शकतो. शेवटी जनता देशाचा नायक आणि चित्रपटातील नायकांचेच अनुकरण करण्यात धन्यता मानतो.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *