आषाढी विशेष : वारीतील मूल्यशिक्षण व व्यवस्थापन

आषाढी विशेष : वारीतील मूल्यशिक्षण व व्यवस्थापन

नाशिक | भास्कर बबन सोनवणे, वारकरी

लाखो वारकरी आषाढ आणि कार्तिक महिन्यात पंढरीच्या दिशेने चालू लागतात. वारीमध्ये सहज मूल्यशिक्षण होते, असा वारकर्‍यांचा अनुभव आहे. वारीचे व्यवस्थापन हा अभ्यासाचा विषय आहे. त्याचाच हा धांडोळा...

पंढरीची वारी (Pandharichi Wari) म्हणजे मूल्यशिक्षण, नीतिमूल्ये आणि व्यवस्थापन अभ्यासाचा अनमोल खजिना आहे. आषाढी एकादशीनिमित्त (Ashadi Ekadashi) परम परमात्मा पांडुरंगाच्या मनोहर दर्शनासाठी आसूसलेले लाखो लोक नीतिमूल्यांच्या परंपरेचेसुद्धा वारकरी (Warkari) आहेत.

अभूतपूर्व असणारा पंढरपूरचा (Pandharpur) मेळा व वारी जी प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी अनुभवली तर हे विश्वची माझे घर ही व्यापक विचारधारा मनामनांत कायमची रुजली जाते. भरकटत चाललेल्या समाजाला आणि नीतिमूल्यांच्या र्‍हासाला जागेवर आणून स्वयंशिस्त लावणारी पंढरीची वारी जगभरात अभ्यासाचा आणि संशोधनाचा (Research) विषय ठरली आहे.

वारी म्हणजे पंढरपुरापर्यंत विठ्ठल नामसंकीर्तन करत करत शेकडो कि.मी.चा केलेला पायी प्रवास. पंढरीची वारी अद्वितीय, अविस्मरणीय, अवर्णनीय, अतुल्य व अद्भूत असते. कारण लाखो लोक कोणताही सांगावा अथवा निमंत्रण न देतासुद्धा भक्तिभावाने वारीत सामील होतात. स्वयंशिस्त, सौहार्द, सहचर्य, सहकार्य, समर्पण आणि शरणागती या नीतिमूल्यांवर पंढरीची वारी चालते. वारीत जपलेली कमालीची शिस्त, भक्तिभाव, एकरूपता, निश्चलता, सौहार्द, समर्पण आणि शरणागती या नीतिमूल्यांचेही सर्व श्रेय तमाम वारकरी माऊलींना द्यावे लागेल.

वारीत वारकरी शिस्तीत टाळ-मृदुंग वाजवत चार-चारच्या समूहाने एकामागे एक चालत असतात. सगळेच त्यांना ‘माऊली’ म्हणून संबोधतात. वारकरी मिळेल तेथे आंघोळ करतात, कपडे धुतात. अंगावर, पाठीवर वा हातात घेऊन चालत असताना वाळवतात. मिळेल तिथे नाही तर रस्त्यावरच दुपारचा, रात्रीचा विसावा घेतात.

दिवसा व संध्याकाळी मुक्कामी काहीजण भजन, कीर्तन करत दंग असतात, तर काही स्वयंपाक करून पंगतीच्या व्यवस्थेत दंग राहतात. जेवणाचे सामान असणारे ट्रक आकस्मिक कारणामुळे वेळेत पोहोचू शकले नाहीत तर हजारो वारकरी भुकेले राहिले तरीही कोणीही तोंडातून ‘ब्र’ काढत नाही. हे सर्व नीतिमूल्यांचे प्रतीक आहे.

देवापेक्षाही मातृ-पितृ सेवेला प्राधान्य देणार्‍या पुंडलिकासाठी युगानुयुगे विठ्ठल उभा आहे. पुंडलिकाच्या मातृ-पितृभक्तीच्या आदर्शाचे मूल्यशिक्षण देणे व तेही सहजपणे उपदेशाचे डोस न पाजता होण्याची क्रिया वारीत सहज घडते. आपोआप घडणारे सत्कार्य वारीत प्रत्यक्षात अनुभवण्यास मिळते. हजारो ट्रक, बसेस, पाण्याचे टँकर, चहावाले, कपडेवाले, फळविक्रेते, गंध लावणारे यांच्या उदरनिर्वाहाचा स्त्रोत पंढरीची वारी आहे.

वारीचे व्यवस्थापन हा खरोखरीचा अभ्यास व संशोधनाचा विषय आहे. वारीत लाखो वारकरी वय, जात-पात, लिंगभेद, दर्जा, हुद्दा न मानता पंढरपुरी येतात. पाऊस-पाणी, ऊन-वारा इ. गैरसोयीची तमा न बाळगता, कुठल्याही सांगाव्याशिवाय वारीतून पायी पंढरपुरास येतात आणि तेही दरवर्षी न चुकता. कोणाची कोणाशी ओळख नसते, पण त्याने काही फरक पडत नाही. विठ्ठलभक्ती हीच सर्वांची ओळख असते.

वारी आदरभाव शिकवते. वारकरी एकमेकांसमोर आले की एकमेकांच्या पाया पडतात. वारीदरम्यान सगळ्यांचे एकच नाव असते ‘माऊली’. वारीत सगळे भेदाभेद गळून पडतात. माऊली एकत्र येतात. उराउरी भेटपतात. एकंदरीत पंढरीची वारी मानवी जीवनासाठी उपयुक्त नीतिमूल्ये रुजवणारी निर्मळ गंगा आहे. मानवी जीवन समृद्ध करण्यासाठी सध्याच्या काळात याची आत्यंतिक निकड आहे. ‘पेरिले तेच उगवते’ या न्यायाने वारीमध्ये झालेली योग्य पेरणी उद्याचा सक्षम समाज उभा केल्याशिवाय राहणार नाही. यामधून मिळालेली नीतिमूल्ये नेहमीच रुचेल, पचेल आणि टिकेल या त्रिसूत्रीप्रमाणे मिळत राहतील यात संशय नाही.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com