आषाढी विशेष : पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग...

आषाढी विशेष : पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग...

नाशिक | हभप दीपक महाराज डावरे

सिन्नर तालुक्यातील (Sinnar taluka) कोनांबेकरांची दिंडी सर्वात जुनी. संत निवृत्तिनाथांच्या (Sant Nivruttinath) पालखीत सुरुवातीला दोनच दिंड्या असायच्या. त्यातील ही एक. ही परंपरा वै. शिवराम महाराज डावरे यांनी सुरू केली. त्यांच्या घराण्यातील पाचवी पिढी ही परंपरा पुढे नेत आहे. सहाव्या पिढीतील दीपक महाराज कीर्तनकार (Deepak Maharaj Davre) आहेत. ते ही परंपरा पुढे चालवणार आहेत. तरुण वयात हा वारसा पेलतांना काय आहेत त्यांच्या भावना? यावर ते म्हणतात,पुढे गेले त्यांचा शोधित मार्ग। चला जावू माग घेत आम्ही..

परंपरा पुढे जोपासायची जबाबदारी आहे आणि त्याचा आनंदच आहे. आम्ही तीन भाऊ. वडील लहानपणापासूनच मला त्यांच्या बोटाला धरून कीर्तनाला, भजनाला न्यायचे. हरिपाठ, भजन आणि कीर्तनाचे बाळकडू त्यांनी पाजले. त्याची गोडी लागत गेली आणि वाढतच गेली. त्यातच आनंद वाटत गेला. मी मराठी आणि संस्कृतमध्ये बीए झालो आहे. वारकरी परंपरेचेही शिक्षण घेतले आहे.आमच्या घरातील परंपरेचा आनंद आणि अभिमान पण आहे.

कीर्तनकाराकडे समाज आदराने पाहातो.आम्हालाही अनेक मर्यादा पाळाव्या लागतात. पण त्यातही आनंद आहे. मला अनेक लोक विचारतात, सर्वसामान्य तरुणाईसारखे फिरावे, मज्जा करावी असे तुम्हाला वाटत नाही का? त्यावर माझे उत्तर असे आहे, तो क्षणिक आनंद आहे. परमार्थातील किंवा लाइफटाइम परमार्थ करण्यातील आनंद त्याच्या नाही. तो आनंद, ते समाधान क्षणिक आहे.मी देखील गेल्या 6-7 वर्षांपासून वारी करतो आहे.

मी आपसूकच वारीत जायला लागलो. वाडवडिलांनी ज्या परंपरा रुजवल्या त्या मला प्रत्यक्ष वारीत समजावून घेता येतात. त्यामागची त्यांची तळमळ उमगते. दिंडीत चालणे म्हणजे काय? चालतांना काय गोष्टी कराव्या लागतात? समाजाला कसे सांभाळावे लागते? अचानक उपस्थित होणारे प्रसंग कसे हाताळायचे? दिंडीत ज्या सेवा कराव्या लागतात त्यांचे विभाजन कसे करावे लागते? रथामागे चालणारे, पुढे चालणारे अशा अनेक बारीकसारीक गोष्टी प्रत्यक्ष दिंडीत समजावून घेता येतात.

डोळ्याखालून घालता येतात. आपल्या वाडवडिलांच्या बाजूला उभे राहिले तर ते या सगळ्या गोष्टी कशा करतात ते समजावून घेता येते. शिवाय रथाच्या सोबत जाणे गरजेचे नाही का?माझ्या वडिलांनी म्हणजे बाळकृष्ण महाराजांनी बाजूला बसवून सांगायची वेळच आली नाही. माझ्या बोटाला धरून त्यांनी मला त्यांच्याबरोबर परमार्थाच्या या मार्गावर चालवले. ते त्यांच्यासोबत मला न्यायला लागेल, परमार्थचे शिक्षण घेण्यासाठी मला आश्रमात घातले तेव्हा घराण्याची परंपरा पुढे चालवायची हेही मला आपसूकच उमगले.

माझ्या वडिलांची मिरासी गा देवा !

तुझी चरणसेवा पांडुरंगा॥

सद्गुरू श्री निवृत्तिनाथ महाराजांचा पालखी सोहळा प्रतिवर्षी आषाढीवारी निमित्ताने श्रीक्षेत्र पंढरपूर येथे जात असतो. या पालखी सोहळ्याचे एक मुख्य मानकरी वै. शिवराम महाराज डावरे कोनांबेकर हे होत. त्यांची वारीची परंपरा त्यांच्या पाचव्या पिढीत अव्याहत चालू आहे. 1) वै. शिवराम महाराज 2) वै. पुंडलिक महाराज 3) वै. गंगाधर महाराज 4) वै. पंढरीनाथ महाराज व पाचवे वंशज बाळकृष्ण महाराज डावरे कोनांबेकर हे चालवत आहेत.

कोनांबेकर दिंडी रथाच्या मागे क्रमांक एकवर चालते. दिंडीमध्ये प्रतिवर्षी सातशेच्या आसपास वारकरी सामील असतात. दिंडी व्यवस्थापनासाठी दिंडी ट्रस्ट आहे. रथामागे दिंडी चालत असताना दिवसभर भजन, नामस्मरण चालू असते आणि वारकरी हा पंढरीच्या वारीकरता सारखी वाट पाहत असतो.

कारण या वारीतून त्याला जे सुख मिळते, आनंद मिळतो तो इतर कुठल्याही साधनाने मिळत नाही. त्यामुळे जावे पंढरीसी आवडे मनासी... एकादशी, आषाढी हे जशी वारीजवळ येते तशी तळमळ सुरू होते. याचे कारण एक आहे. पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे या संत वचनावर विश्वास ठेवून प्रत्येक वारकरी पंढरीची वारी करतो. पण दुर्दैवाने दोन वर्षे पालखी सोहळा करोनामुळे बंद आहे. त्यामुळे वारकरी दु:खी आहेत. त्याची पांडुरंगाच्या चरणी एक प्रार्थना आहे. करोना लवकर संपो व वारी चालू होवो.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com