आषाढी विशेष : लागला टकळा पंढरीचा

आषाढी विशेष : लागला टकळा पंढरीचा

नाशिक | ह.भ.प. संतोष महाराज झोमन

करोनाकाळात (Corona) दुसर्‍यांदा वारी (Wari) चुकली आहे. खरे सांगू का, वारी चुकल्यानंतर किती तरी दिवस काहीतरी हरवल्यासारखे वाटते. मन काळजाला खात राहाते. वारीच्या अलौकिक आठवणीने मन गलबलून येते. वारकर्‍यांना त्याच्या भेटीची आस लागलेली असते. वारकरी (Warkari) वर्षभर वारीची वाट पाहत असतात...

सोपे वर्म आम्हा सांगितले संती!

संपदा सोहळा न आवडे मनाला

लागला टकळा पंढरीचा

जावे पंढरीसी आवडी मनाशी

कधी आषाढी एकादशी हे

तुका म्हणे ऐसे आर्त ज्याचे मनी

त्यांची चक्रपाणी वाट पाहे

दिवस आषाढाचे, दिवस वारीचे, किती आठवावा मनात तो सुख सोहळा. पंढरीची वारी आम्हा सकल वारकर्‍यांच्या जीवनातला सुखाचा काळ. वारी एक वारकर्‍यांची साधना होय. वारी म्हणजे चैतन्य. वारी म्हणजे ऊर्जा. वारी म्हणजे आनंदवारी. संसारात थकल्या भागल्या जिवाला विसावा. वारी म्हणजे भगवद् भेटीची लागलेली आस. त्या सुखाला पारावारच नाही. वर्षभर आम्ही वारकरी वारीची वाट पाहत राहतो. मनाला एक अनामिक तळमळ लागून राहते. वारीला जाण्यासाठी मन हुरहुरत राहते.

भेटी लागे जिवा

लागलीसे आस

पाहे रात्रंदिवस वाट तुझी

जगद्गुरू श्री संत तुकोबारायांच्या या अभंगासारखी अवस्था वारकर्‍यांची होते. कधी वारीला जाईल अन् पंढरी निवासी सकल विश्वाचा चालक पंढरी श्री विठ्ठलाचे (Shri Vitthal) दर्शन घेईल असे होते. दिवाळी सणाला जसे सासूरवासणीला माहेराच्या वाटेला डोळे लागतात, कधी माहेराला जाईल असे होते अगदी तसेच होते वारकरी जीवनात. मग त्याचे मन कशातही लागत नाही. घरदार, संसार, शेतीवाडी सगळे सगळे श्री पंढरीनाथाच्या हवाली करून वारीच्या वाटेला लागतो.

मग एकदा का वारीच्या वाटेला लागले की आनंदाला उधाण येते. कुणी संतश्रेष्ठ निवृत्तिनाथांबरोबर चालते, पालखी सोबत चालते, कुणी माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय यांच्या बरोबरीने चालते. कुणी पैठण निवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराजांबरोबर चालते, कुणी आदिशक्ती मुक्ताबाईंच्या पालखी सोबत चालते.

कुणी संत सोपानदेव, कुणी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकोबाराय यांच्याबरोबर चालते. सकल संतांच्या पालख्या पंढरीला निघतात. सगळे वारकरी भक्तिरसात न्हाऊन निघतात. ज्ञानोबा-तुकाराम भजनात वारकरी तल्लीन होऊन चालत राहतात. ऊन, वारा, पाऊस त्यांच्या डोळ्यासमोर दिसते. फक्त अन् फक्त पांडुरंगाचे सावळे रूप निष्काम जीवन कसे जगायचे हे वारी शिकवते. माऊलींनी एका गौळणीत वर्णन केलेली अवस्था प्राप्त होते.

‘याती कुळ माझे गेले हरपुनी’

‘श्री रंगावाचुनी आनू नेणे’

वारीत कुठलाही भेदभाव नसतो. कुणी गरीब, कुणी श्रीमंत नसतो. असतात ते फक्त माऊली. कुणीही माऊलीशिवाय कुणाला आवाज देत नाही. माऊली. माऊली माऊलीच्या जयघोषाने आसमंत निनादून निघतो. कीर्तनात रममाण होताना, भजनात तल्लीन होताना, काकड्यात देवाला भावभराने आळवताना, भारुडात विनोदातून प्रबोधनाकडे जाताना आत्म स्वानुभावाच्या जागृतीकडे वारकरी जातात.

हरिपाठात पावल्या खेळताना, फुगडी खेळताना तेथे आपलेपणाचा विसर आपोआप पडतो. मी तू पणाची पातळी मिटून जाते अन् परमार्थासाठी भगवतप्राप्तीसाठी लागणारी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अवस्था ती प्राप्त होते. खरेच असे वाटते किती सोपा परमार्थ आमच्या वारकरी संतांनी सकल विश्वाला दिला. तुकोबाराय एका अभंगात म्हणतात...

‘सोपे वर्म आम्हा सांगितले संती

टाळ, दिंडी, हाती घेऊन नाचा’

वाखरीतले रिंगण झाले की ओढ लागते ती श्री विठ्ठलाच्या दर्शनाची. एकदा कळस दिसला की जीव सुखावून जातो. तासन्तास उभे राहून जेव्हा पांडुरंगाच्या पायावर डोके ठेवून वर्षभरात एकदा तरी सुखदु:ख सांगावे असे होते. त्याचे साजिरे-गोजिरे रूप पाहून सकल संतांना अन् माऊलींना जी अनुभूती आली ती माझ्यासारख्या प्रत्येक वारकर्‍याला येते.

‘रुप पाहता लोचनी

सुख झाले ओ साजनी’

मग त्या सुखाला पारावार राहत नाही. अनंत सुखाचे सागर भेटतात. शिनभाग निघून जातो. उरतो फक्त आत्मआनंद काला करून परतीच्या वाटेला मनात नुसती कालवाकालव होत राहते. आमचे जगद्गुरू तुकोबाराय म्हणतात...

‘हेची व्हावी माझी आस

जन्मोजन्मी तुझा दास

पंढरीचा वारकरी’

वारी चुको नेदी हरी’

मग कधी अशा करोनाच्या काळात वारी चुकली तर नंतर किती तरी दिवस काहीतरी हरवल्यासारखे वाटते. मन काळजाला खात राहते. वारीच्या अलौकिक आठवणीने.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com