आषाढी विशेष : विठ्ठल तत्व

आषाढी विशेष : विठ्ठल तत्व

नाशिक | अजित कडकडे

विठ्ठलासंदर्भातील (Vitthal) कथांमधून आपल्याला काय संदेश मिळतो? तर संत ज्ञानेश्वरांपासून (Sant Dnyaneshwar) चोखामेळा (Chokhamela), रोहिदास (Rohidas), कान्होपात्रा (Kanhopatra) आणि सर्व भक्तांना विठ्ठलाने तेवढ्याच मायेने जवळ केले. प्रत्येकालाच त्याने आपल्या रूपाचे दर्शन दिले आणि त्यांच्यासाठी पडेल ती कामेसुद्धा केली. त्यामुळे विठ्ठलाची भक्ती करताना हे विठ्ठल तत्त्व आपण अंगीकारले तर ती भक्ती खर्‍या अर्थाने विठ्ठलचरणी रुजू होईल. ही तत्त्वे आपल्या आचरणात आली पाहिजेत. आपले सर्व दृष्टिकोन हळूहळू बदलले पाहिजेत. सर्वत्र समान दृष्टीने पाहता आले पाहिजे...

यंदा करोनामुळे वारीच्या आनंदानुभवाला हरिभक्त मुकणार आहेत. विठ्ठल हे एक तत्त्व असून हा विठ्ठल पंढरपुरात तर आहेच पण तो सर्वव्यापक, चराचरातही भरलेला आहे. आपल्या देहात जो विठ्ठल आहे त्याला जागृत करून त्याच्याशी आपल्याला एकरूप व्हायचे आहे. आपल्यातील विठ्ठलरुपी सौंदर्याची उपासना करून हा मानव देह सुंदर पद्धतीने आपण घडवला पाहिजे. आपल्या अंतरंगात असणार्‍या विठ्ठलरुपी तत्त्वाची उपासना आपण केली पाहिजे.

हा विठ्ठल जर आपल्याला अंतरंगात आढळला तर सर्वत्र आनंदीआनंदच राहील ना? त्या आनंदतत्त्वाचा जर आपण शोध घेतला तर कळून येईल तो सर्वत्र आहे. आनंद हा करायचा नसतो किंवा मिळवायचा नसतो. कारण ‘मी’ हेच आनंदतत्त्व आहे. आपण नेहमी बाहेर आनंद शोधत असतो. त्यावेळी माझ्यातच आनंद आहे, मीच आनंद आहे हे आपण विसरतो. म्हणूनच विठ्ठलाला मी केवळ पंढरपूरपुरता मर्यादित न ठेवता त्याला मी माझ्यात पाहतो. इतकेच नव्हे तर प्रत्येक सजीवामध्ये, चराचरामध्ये त्याला पाहण्याचा प्रयत्न करत असतो, तसे वागायचा प्रयत्न करत असतो.

आषाढ महिन्यात विठ्ठलाच्या ओढीने महाराष्ट्रभर सर्व वारकरी भजन, कीर्तन गात वारीला निघालेले असतात. या वारकर्‍यांचे मला मोठे कौतुक वाटते. मी नेहमी म्हणतो की, एका जन्मात तरी मला वारकरी म्हणून जन्माला येऊ दे. मी जरी वारी केली असली तरीसुद्धा मी वारकरी नाही. कारण हाडाचा वारकरी हा वेगळा असतो.

हा वारकरी आपले घर सोडून काट्याकुट्यातून, ऊन-पावसाची फिकीर न करता, कुठल्याही सोयीसुविधेचा विचार न करता दरवर्षी भक्तिभावाने या वारीला जात असतो. ते हाडाचे वारकरी असतात. या हाडाच्या वारकर्‍यांबद्दल मला खूप आदर आहे. त्यांच्यात विठ्ठलाप्रती प्रेम, भक्ती, माया आहे. त्यामुळेच संपूर्ण संसार प्रपंच विसरून मुखाने केवळ विठ्ठल नामाचा गजर करत आणि विठ्ठलाच्या दिशेने चालत राहणे त्यांना साध्य होते. असा वारकरी मला विठ्ठलाने कुठल्यातरी जन्मात करावा, असे मला नेहमी वाटते.

वारकर्‍यांमधील विठ्ठलाशी एकरूप झालेला भक्तिभाव मला खूप भावतो. ते एवढे विठ्ठलमय झालेले असतात की, त्यांच्या मुखातून सतत विठ्ठलाचेच नामस्मरण होत असते. ज्या ठिकाणी ते थांबतात तेथेही अभंगातून, भजनातून विठ्ठलाचाच गजर होत असतो. म्हणजे त्यांचे संपूर्ण मन आणि शरीर विठ्ठलमय झालेले असते.

प्रपंचातून परमार्थ साधावयाचा अनुभव ही वारकरी मंडळी या वारीतून घेत असते. तुळशीचे रोप डोक्यावर घेऊन दहा-पंधरा दिवस सलग चालत राहणे, सोबत आपली शिदोरी, अन्न शिजवण्याचे सामान घेऊन मुक्काम पडेल तिथे ते शिजवून उदरभरण करणे या सर्व गोष्टी खरोखरच कठीण आहेत. त्यासाठी मनाची खूप मोठी तयारी लागते. वारकर्‍यांचा हा भक्तिभाव खरोखरच वाखाण्याजोगा आहे.

मी विठ्ठलाची भजने, अभंग नेहमीच गात असतो. त्या प्रत्येक वेळी मला वेगवेगळी अनुभूती येत असते. ‘अबीर, गुलाल उधळीत रंग’ किंवा ‘उंबरठ्यासी कैसे शिवू, आम्ही जाती हीन, रुप तुझे कैसे पाहू आम्ही जाती दीन’ हा चोखोबांचा अभंग गातो तेव्हा एक वेगळाच अनुभव मिळतो. विठ्ठलाला कोणताही भेदभाव मंजूर नव्हता.

माणुसकीच्या नात्यातून विचार केला तर जातपात खरेच आहे का? ज्ञानेश्वर माऊली नेहमी म्हणत, ‘ज्ञानदेवा प्रमाण, आत्मा हा निधान। सर्वां घटी पूर्ण एक नांदी॥’ यावरून सर्वांचा मायबाप एकच आहे. आपण सर्व एकाच नात्यागोत्यातील आहोत. एकाच परमात्म्याची आपण लेकरे आहेत. विठ्ठलाची भजने किंवा संतांचे अभंग गाताना मला नेहमी हा एकरुपतेचा अनुभव येतो.

विठ्ठल हा फक्त मूर्तीत नसून तो चराचरात दडलेला आहे. प्रत्येकाच्या हृदयात तो आहे. त्यामुळे आपण प्रत्येकाचे अंतःकरण सारखे दुखावत राहिलो तर हृदयात वसलेल्या जिवंत विठ्ठलाला आपण दुखावतो. माझी विठ्ठलाबाबतची आणि त्याच्या भक्तिभावाबद्दलची व्याख्या साधी सोपी सरळ आहे. विठ्ठलाची अनुभूती घ्यायची असेल तर प्रत्येक प्राणीमात्रामध्ये त्याला पाहण्याची दृष्टी निर्माण केली पाहिजे.

संत एकनाथ महाराज काशीला गेले असताना स्वतःच्या कावडीमधील पाणी त्यांनी निपचिप पडलेल्या गाढवाला पाजले. पूर्वी काशीला जायला दोन-तीन महिने लागायचे. एवढा प्रवास करून एकनाथ महाराज तिथे गेले. त्यांनी त्या गाढवाला तिथे पाहिले आणि ते म्हणाले, ‘तुला एवढी तहान लागली आहे तेव्हा हे पाणी घे.’ त्यांच्या सोबत इतर जे लोक होते त्यांच्याबरोबरही कावडी होत्या. पण त्यांनी कोणीच त्या गाढवाला पाणी दिले नाही.

कारण त्या प्रत्येकानेच हा विचार केला की, तीन महिने येण्यासाठी लागले, आणखी तीन महिने जाण्यासाठी लागतील. तेव्हा हे पाणी जर गाढवाला दिले तर आम्ही काय करायचे? पण एकनाथांनी त्या गाढवामध्येही देव पाहिला. हाच खरा संतभाव, ही खरी श्रद्धा. त्या तुलनेत आपण सामान्य माणसे आहोत. वर्षानुवर्षे अनेक जन्म घेऊन आपल्यात काही सुधारणा झाली का? आपण आहोत तसेच आहोत. ते बदलायचे असेल तर विठ्ठलाची किंवा कुठल्याही आराध्य दैवाताची उपासना करताना अंतरात्म्याचे निरीक्षण करत राहणे, भक्तिभावातून आपल्यात कोणती सुधारणा झाली, कोणती झाली नाही, असे प्रश्न स्वतःला विचारत राहणे आवश्यक आहे.

अशा प्रकारे आपण एकेक पायरी पुढे चढू तेव्हा ती उपासना पूर्ण झाली, असे म्हणता येईल. उपासनेतून आंतरिक स्थिती शुद्ध होणे खूप महत्त्वाचे आहे. कारण देव बाह्य रूप पाहत नाही. तो केवळ आंतरीक स्थिती, मनातील भाव बघतो. विठ्ठलासंदर्भातील अनेक कथांमधूनसुद्धा आपल्याला हेच अभिप्रेत होते की, पांडुरंगाने कुठलाच जात-पात हा भेदभाव केला नाही. प्रत्येकालाच त्याने आपल्या रूपाचे दर्शन दिले आणि त्यांच्यासाठी पडेल ती कामेसुद्धा केली.

जातीपातीची दरी माणसाने निर्माण केली. विठ्ठलाची भक्ती करताना हे विठ्ठल तत्त्व आपण अंगीकारले तर ती भक्ती खर्‍या अर्थाने विठ्ठलचरणी रुजू होईल. ही तत्त्वे आपोआपच आपल्या आचरणात आली पाहिजेत. आपले सर्व दृष्टिकोन हळूहळू बदलले पाहिजेत. सर्वत्र समदृष्टीने पाहता आले पाहिजे. विठ्ठल तत्त्व हे स्वतःमध्ये रुजवण्याचा सातत्याने प्रयत्न करत राहणे ही खरी पांडुरंगाची भक्ती आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपल्यामध्ये ही समदृष्टी येण्यासाठी विठुरायालाच प्रार्थना करावी.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com