आषाढी विशेष : ठायीच बैसोनी करा एकचित्त

आषाढी विशेष : ठायीच बैसोनी करा एकचित्त

नाशिक | ह.भ.प.बाळासाहेब महाराज काकड

सकळ वारकर्‍यांचे आद्यपीठ आणि भक्तिपीठ असणार्‍या त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथून अर्थात नाथांच्या संजीवन समाधीपासून पंढरपूरला (Pandharpur) प्रस्थान ठेवणारी वारी मोजक्याच वारकरी भाविकांच्या उपस्थितीत 19 जुलै 2021 रोजी त्र्यंबकेश्वर येथून एस.टी. बसने प्रस्थान ठेवत आहे. वारीमार्गावरच्या अनंत भावनांचा आणि भक्ती प्रेमाचा कल्लोळ तसाच अंतःकरणात ठेवत दुरूनच याचे साक्षी व्हावे लागणार आहे. यंदाही करोना महामारीने वारकरी पंढरीच्या वाटेवरल्या सुखसोहळ्याला मुकणार आहेत. पण तरीही वारीच्या मार्गावरील काही आठवणींना दिलेला हा उजाळा...

‘पंढरीची वारी आहे माझ्या घरी आणिक न करी तीर्थव्रत’

असे तुकोबाराय मोठ्या आत्मविश्वासाने आणि तितक्याच प्रेमभावनेने सांगत आहेत. ते जरी स्वत:बद्दलचा हा अनुभव सांगत असले तरी त्यांच्या या अभंगातून समस्त वारकर्‍यांची आणि वारीची संजीवन प्रेरणा ध्वनीत होत आहे.

अनेक शतकांची परंपरा या वारीला लाभली आहे. आदी, समाधी आणि तीर्थावली या आपल्या ग्रंथात संत नामदेवांनी संत भेटीचा योग व त्याची फलश्रुती मोठ्या वात्सल्य भावनेने विशद केली आहे. संत निवृत्तिनाथ, ज्ञानदेव आणि सोपान आदींसह नामदेवांनी केलेली ही तीर्थयात्रा थेट पंजाबमधील घुमानपर्यंत गेली.

अनेक प्रदेश, प्रांतातून निरनिराळ्या संतांच्या भेटी घेऊन त्या-त्या ठिकाणी वारकरी संप्रदायाचे बीजारोपण करत ही संत मांदियाळी पुन्हा महाराष्ट्रात आली आणि तेथून पुढे सकळ संत भेटीचा आणि पांडुरंगाच्याही भेटीचा महिमा वारीच्या माध्यमातून प्रसृत होऊ लागला. या वारीचे उद्गाते खरेतर निवृत्तिनाथच आहेत. ते आपल्या अभंगात म्हणतात,

‘चांगया लाधले नामया दिधले

विठ्या पावले हरिकृपा

प्रेमाचे पुतळे भीमातीरा आले

जयजयकार केले हरिभक्ती

वैकुंठ आपण भक्तामाजी खेळे

पुंडलिक लिळे खेळतुसे

निवृत्ती निवाला आनंदे नाचतु

उन्मनी भरितु ज्ञानदेव’( नि. अभंगगाथा 244)

अशी ही सनकादीक संतांची वारी संतांच्या कार्याने संजीवनच ठरली आहे. पंढरीच्या वाटेवर नाचत, गात, विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन होत वारकरी संतसुखाच्या सहवासात निघतात. काया, वाचा मने भौतिक विषयांचा त्याग करून मानसिक विरक्तीकडे खर्‍या वारकर्‍याचे मार्गक्रमण होत असते आणि त्याची पाऊलवाट ही वारीची आहे. तुकोबाराय तर याहूनही पुढे जाऊन म्हणतात की, पंढरीचे वारकरी ते अधिकारी मोक्षाचे.

असे वारकरी जे मोक्षाचे अधिकारी तर आहेतच, पण त्यांच्यासोबत जे चालतात त्यांनाही संतसंगतीच्या परिणामाने मोक्षपदाचा लाभ अनायासेच मिळतो. वारी म्हणजे केवळ पंढरपूरला पायी जाणे नव्हे, पायी तर आपण असेही आयुष्यभर चालतच असतो, पण ते चालणे म्हणजे ती असते पायपीट, तिच्यात थकवा असतो, वेदना असते, साफल्याचे सुख तिच्यात नसते. कारण प्रापंचिक संवेदना त्यात असल्याने संतसहवासाचा परिसस्पर्श तिला लाभत नाही. जर केवळ चालणे असते तर ती वारी चिरंतन ठरली नसती. वारीत आबालवृद्ध सारेच मोठ्या आनंदाने सामील होतात.

पंढरीच्या पांडुरंगाची लागलेली ओढ तुकोबाराय एका अभंगातून व्यक्त करतात

‘आता पंथ पाहे माहेराची वाट

कामाचा बोभाटा पडो सुखे

काय करू आता न गमेसे झाले

बहुत सोसिले बहु दिस

घर लागे पाठी चित्ता उभे वारे

आपुले ते झुरे पहावया

तुका म्हणे जीव गेला तरी जाओ

धरिला तो देह भाव शुद्ध’ ( तु. गाथा, अभंग 556)

पांडुरंगाचे मुख पाहण्यासाठी तुकोबा कासावीस झाले आहेत, झुरत आहेत. तीच भावना आज वारकर्‍यांमध्ये आहे. मजल दरमजल करत हे वारकरी पंढरीला जातात, चंद्रभागेच्या वाळवंटात सुस्नात होतात, संत संगतीचा काला पंढरीला होतो. या काल्याचे संतांनी मोठे भावस्पर्शी वर्णन आपल्या अभंगातून केले आहे. निवृत्तिनाथ आपल्या एका अभंगात म्हणतात,

आनंद सर्वांचा काला अरुवार

नामया साचार फुंदतसे

राही रखुमाई सत्यभामा माता

आलिया त्वरिता काल्यामाजि

उचलिला नामा प्रेमाचे फुंदन

नुघडी तो नयन काही केल्या

बुझावीत राही राखुमादेवी बाही

पितांबर साही करिती हरी

ज्ञानासी कवळू सोपनासी वरु

खेचरा अरमारु कवळू देतू

निवृत्ती पूर्णिमा भक्तीचा महिमा

नामयासी सीमा भीमातीरी’ (नि गाथा, 235)

असा हा संतसंगतीचा महिमा आणि त्यातून सिद्ध झालेली वारी गेल्यावर्षीपासून मुकी आहे. विटेवर मस्तक ठेवण्याचे भाग्य वारकर्‍याला करोनामुळे मिळेनासे झाले आहे, पण तरीही आपल्या भावनेवर संयम ठेऊन वारकरी हा वारीचा आनंद सोहळा मनोमन साजरा करत आहेत. निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यात जरी मोजकेच वारकरी असले तरीही नाथांची ही वारीची परंपरा कितीही संकटे आली तरीही अखंड राहील.

मखमलाबादच्या वारीविषयी...

मखमलाबाद गावातून 1988 साली पंढरपूरच्या वारीला सुरुवात झाली. दगडू तेली चांदवडकरही या दिंडीत पहिल्यापासून सहभागी होत होते. येथील श्रीराम भजनी मंडळ ही वारीची परंपरा अजूनही नित्यनेमाने जपत आहेत.

मखमलाबाद येथून निघाल्यानंतर संत निवृत्तिनाथ पालखी सोहळ्यात ही दिंडी सामील होते. आता अशा एकूण 42 दिंड्या या पालखी सोहळ्यात सहभागी होत असतात. आमची मखमलाबाद नाशिक परिसर दिंडी क्र. 5 ही दिंडी संत निवृत्तिनाथ महाराज पालखीसोबत 150 वारकरी व महिला भगिनींसह चालत असतात.

आमच्या कुटुंबातही वारीची परंपरा आहे. माझे वडील सुखदेव अर्जुन काकड हे वारी करत होते. त्यांच्याही अगोदर माझे आजोबा अर्जुन आबाजी काकड हे वारी करत होते आणि त्यांचीच परंपरा आता माझ्याकडे आली आहे.

‘आनंद तेथीचा मूकयासि वाचा

बहिरे ऐकती कानी रे

आंधळ्यासि डोळे पांगुळ्यासि पाय,

तुका म्हणे वृद्ध होति तरणे’

या तुकोबारायांच्या उक्तीप्रमाणे हा वारीचा सोहळा याचि देही याचि डोळा अनुभवता आला पाहिजे. वारी एकदा जरी जीवनात येऊन केली तरी तिची प्रेरणा अनंत काळ मनावर गारूड करून राहते. संत निवृत्तिनाथ समाधी संजीवन सोहळा परंपरेने नेहमी नगर मुक्कामी आणि तोही पंढरपूर वारीला जाताना असतो. मात्र यंदा तो करोनामुळे त्र्यंबकेश्वर येथेच झाला. असो, तरीही वारकरी भाविकांनी तो नतमस्तक होऊन साजरा केला. ही वारी शतकानुशतके वारकरी बांधवांना ऊर्जा देत राहील हे निश्चित!

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com