आषाढी विशेष : नोहे ऐकल्याचा खेळ...

आषाढी विशेष : नोहे ऐकल्याचा खेळ...

नाशिक | ह.भ.प.पंढरीनाथ महाराज वालवणे (गुरुजी)

पायी वारीतून गिरवले जातात लोककलेचे धडे. वारीत चालताना, मुक्कामाच्या ठिकाणी वारकर्‍यांचे (Warkari) अनेक खेळ रंगतात. फुगडी, पिंगा, लपंडाव, विटीदांडू, चेंडूफळी, टिपरी, हुंबरी, पावल्या या मैदानी खेळात (Sports) स्त्री-पुरुष एकत्र येऊन विश्रांतीचा आनंद लुटतात. ईश्वर हा खेळीया त्यांचे सवंगडी म्हणजे संत आणि भक्त या खेळीया सोबत खेळात सामील होतात. कारण या खेळात देव आणि भक्त हे द्वैत उरतच नाही...

पंढरीची वारी (Pandharichi Wari) हा विश्वाला कवेत घेणार्‍या विठुरायाच्या भक्तांचा अनुपम्य सोहळा. विठुरायाच्या भेटीसाठी आकारास आलेले एक कुटुंब. विविध प्रकारचे खेळ, विश्रांतीच्या वेळेतील क्षण...तुका म्हणे धावा। आहे पंढरी विसावा ॥ प्रत्येक वारकरी पांडुरंगाच्या (Pandurang) भेटीसाठी आतूर होतो. टाळ, मृदुंगाचा नाद आसमंतात घुमतो, विठ्ठलमय होतो. वारीमध्ये वारकरी तल्लीन का होतात? वारीत चालताना वारकर्‍यांची पाऊले थिरकतात. चालताना, दिंडी (Dindi) मुक्कामाला थांबली की विविध प्रकारचे खेळ रंगतात.

‘नोहे एकल्याचा खेळ। अवघा मेळविला मेळ ॥’

या सोहळ्यात अंतरात्मातील पांडुरंग जेव्हा खेळीया होऊन नाचू लागतो तेव्हा आत हरी। बाहेर हरी॥

अशी उन्मनी अवस्था वारकर्‍यांची होते.

‘तुम्ही आम्ही एकमेळी। गदारोळी आनंदे॥’

वारकरी संप्रदायाचे कृतिरूप स्वरूप म्हणजे वारीतले खेळ. हे खेळ खेळण्यासाठी विठ्ठल खेळीयाबरोबर त्यांचे सवंगडीही खेळू लागतात, नाचू लागतात. कीर्तनात तर

गाये नाचे उडे आपुलिया छंदे

लावुनी मृदुंग, श्रुती टाळ, घोष।

सेवू ब्रह्मरस आवडीने॥

ब्रह्मरसाची प्रचिती ही वारीतल्या खेळांनी आणि भारुडांनी येते. फुगडी, पिंगा, हमामा, लपंडाव, विटीदांडू, चेंडूफळी, टिपरी, हुंबरी, पावल्या या मैदानी खेळात स्त्री-पुरुष एकत्र येऊन विश्रांतीचा आनंद लुटतात. ईश्वर हा खेळीया त्यांचे सवंगडी म्हणजे संत आणि भक्त या खेळीयासोबत खेळात सामील होतात.

कारण या खेळात देव आणि भक्त हे द्वैत उरतच नाही. फुगड्या घालताना चार जणांची फुगडी, दंडमोडणी फुगडी, दोन हाताची फुगडी, बस फुगडी असे प्रकार आढळतात. पिंगा घालतात. मुळात ईश्वर खेळीया नाही तर तो बहुरुपीदेखील आहे ही वारकर्‍यांची धारणा आहे.

‘बहुरुपे नटला नारायण।

सोंग संपादून जैसा तैसा॥’

बहुरुपी नारायणाची सोंगे वारीतल्या भारुडामधून घेतली जातात. सोंगी भारूड पथनाट्य, लोकधर्मी नाट्य वासुदेव, गोंधळी, डोंबारी, गारुडी या वेशभूषेतील व्यक्ती व त्यांचे विविध साहित्य यातून संगीतमय कृतीयुक्त भारूड सादर केल्याने नाद, ताल, ठेका यातून मिळणारा आनंद व लोकशिक्षण हे अनुभवायला मिळते वारीतूनच.

पांरपरिक वेशभूषेत वैशिष्ट्यपूर्ण सादर केलेली भारुडे, उभे रिंगण, आडवे रिंगण यामध्ये स्वयंशिस्तीचा आदर्श पाठ दृष्टीस पडतो. पताकधारी, टाळकरी, वृंदावनधारी, वारकरी, अश्व रिंगणात सामील होऊन आनंद द्विगुणीत करून समाजाला एकतेचा संदेश देतात.

‘पिटू भक्तीचा डांगोरा।

कळी काळाशी धाक दरारा॥’

या खेळामधूनच इतिहास, संस्कृती याची माहिती मिळते. महाराष्ट्राच्या सांस्कृतिक लोकजीवनातील एक अच्युत आणि सर्वव्यापी आनंद सोहळा जणू. लाखो वारकर्‍यांच्या रुपातील लोकभावच. मानवी जीवनात सकारात्मक परिवर्तनाच्या दिशेने पडणारे विवेकी पाऊल म्हणजे वारी. वारीत चालताना, खेळ खेळताना, पाऊलागणिक ऊर्जा देणारा, जशी पंढरी जवळ येईल तसे पाऊले गतिमान होतात.

कुठून येते त्यांच्यात बळ, ऊर्जा? वारी आणि वारकरी समाजाला देऊ करतात समतेचे, एकतेचे व सर्वधर्मसमभावाचे धडे आणि मनोरंजनाचे दाखले. एका पांढर्‍या शुभ्र लाटेतील शुभ्र आणि तितकेच शांत व संयमी धडे. खांद्यावरची पताका गगनी फडकते. पांडछरंगाचा बुक्का कपाळी येऊन बसतो, पांडुरंगाच्या गळ्यातील तुळशी हार हा तुळशी माळ होऊन कंठी मिरवतो, टाळांचा गजर नादब्रह्म होतो. अभंगाचे चरण मुखारविंदातून बाहेर पडते आणि पडणारे प्रत्येक पाऊल हे मार्गस्थ होते भूवैकुंठाकडे..वारीच्या रूपाने.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com