Tiger
Tiger
फिचर्स

खान्देशातील वाघांच्या संचारमार्गात लालफितीचा पट्टा निघेल का ?

Balvant Gaikwad

Balvant Gaikwad

वाघांचे महत्त्व हे संपूर्ण निसर्गसाखळीत अनन्यसाधारण आहे. वाघ हे अन्न साखळीतील टोकाचे स्थान भूषवतात. त्याचा अर्थ त्यांच्यापेक्षा नैसर्गिक क्षमतेमध्ये वरचढ शिकारी नाहीत. ते इतर प्राण्यांची शिकार करून जगतात. गवत हे सर्वत्र उपलब्ध असल्याने तृणभक्षक प्राण्यांची संख्या भरभर वाढते. वाघांचे निसर्गात सर्वात महत्त्वाचे काम म्हणजे या प्राण्यांची संख्या नियंत्रणात ठेवणे. वाघ नसतील तर या प्राण्यांची संख्या अनियंत्रित प्रमाणात वाढेल व इतर निसर्गसंपदेवर या गोष्टीचा ताण पडेल व निसर्गचक्र बिघडून जाईल. वाघ जंगलात असणे हे जंगलाच्या स्वास्थ्याच्या दृष्टीने अत्यंत गरजेचे आहे. वाघ असलेल्या जंगलात साधे लाकूडतोड व जंगलावर अवलंबून लोक भीतीपोटी जात नाहीत व जंगल सुरक्षित राहते. वाघ नाहीसे झालेली जंगले साफ होण्यास वेळ लागत नाही, असा आजवरचा अनुभव आहे व जंगलतोडीने होणारे निसर्गचक्राचे दुष्परिणाम आज जागतिक तापमानवाढीने दिसतच आहेत. महाराष्ट्रातील खान्देशदेखील यातून सुटलेला नाही.

खान्देशात पूर्वीपासूनच वाघांचे अस्तित्व राहिले आहे त्यातच जळगांव जिल्ह्यातील यावल अभयारण्य अजिंठा डोंगररांगा आणि मुक्ताईनगर वाढोदा वनक्षेत्रात 1962 सालापासून वाघ अस्तित्वात असल्याची माहिती त्या परिसरात स्थानिक जुन्या जाणकार व्यक्तींकडून मिळते

सद्यःस्थितीत दुर्मिळ असलेले आणि वाघांचे प्रमुख भक्ष्य असलेले रानगवेदेखील जिल्ह्यातील यावल अभ्यारण्यात 80 च्या देशकात मोठ्या प्रमाणात होते. ते आजही असल्याच्या नोंदी मिळत आहेत. यावरून जिल्ह्यात सद्यःस्थितीत असलेले वाघ हे भटके नसून जिल्ह्यातील वाघांचा अधिवास हा पूर्वीपासूनच असल्याचे सिद्ध होते. उलट उत्तर महाराष्ट्रात जळगांव जिल्ह्यात असलेल्या वाघांची संख्या वाढल्यास त्यांचा पुढे गुजरातपर्यंत विस्तार होऊ शकतो आणि नंदुरबार गुजरातच्या सीमेपर्यंत आजही वाघांच्या अस्तित्वाच्या खुणा आढळून येत आहे. वाघांच्या वाढीसाठी त्यांना पुरेसे वनक्षेत्र असणे गरजेचे आहे. तितकेच संचारमार्गाचे महत्व आहे, हे माझे मत आहे. योग्य संचारमार्ग तयार झाल्यास आणि वाघांच्या संवर्धनासाठी युद्धपातळीवर नियोजन झाल्यास वाघांची संख्या नक्कीच वाढणार आहे. मेळघाटमधील वाघांची वाढती संख्या लक्षात घेता, त्या भागातून येणारे वाघ जळगाव जिल्ह्यात स्थिरावतील मग त्यांना पुढे सरकण्यासाठी (वाघांचा कॉरिडॉर )संचारमार्ग महत्वाची भूमिका निभावेल.

परंतु शासन स्तरावरून या वाघांच्या संवर्धनासाठी उदासीन असल्याचे वेळोवेळी दिसून येत आहे. जळगाव जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत तीन पट्टेदार वाघांचा वेगवेगळ्या कारणांनी मृत्यू झाला. जळगाव वनविभागात वढोदा क्षेत्रात सात-आठ आणि यावल वनक्षेत्रात दोन असे सुमारे दहा वाघ जिल्ह्यात आहेत. एकीकडे वाघांच्या संवर्धनासाठी शासनाकडून कोट्यवधींचा खर्च करून अभियान राबविले जात असताना दहा वाघ असूनही जळगाव जिल्ह्यातील या दोन्ही वनक्षेत्रांना अभयारण्याचा दर्जा मिळालेला नाही.

वन्यजीव संरक्षण संस्था, न्यू कॉन्झरवर संस्था, पर्यावरण शाळा, समर्पण संस्थेच्या पाठपुराव्यानंतर मुक्ताई भवानी व्याघ्र संवर्धन प्रकल्प म्हणून 2014 साली घोषणा झाली असली तरी वाघांच्या संवर्धनासाठी तेवढे पुरेसे नाही. सातपुडा पर्वतराजीने वेढलेल्या जळगाव जिल्ह्याला मोठी वनसंपदा लाभलेली आहे. केवळ सातपूड्याला लागून असलेल्या यावल अभयारण्यातच नव्हे तर मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा आणि यावल अभयारण्य वनक्षेत्रात वाघ, लांडगे, पिसोरी, कॅरॅकल क्याट, रानकुत्रे, खवले मांजर, पाण मांजर, साळींदर, गवा, यासारखे वन्यजीव तर ट्री क्रिपर, वन पिंगळा, व्हीगर्स सनबर्ड, स्टोर्क बिल्ड किंग फिशर, सारखे अनेक पक्षी आणि दुर्मिळ वन्यजीवांचा अधिवास आहे.

व्याघ्र संवर्धनाच्या योजनांवर कोट्यवधींचा खर्च दरवर्षी होत असताना वढोदा व यावल वनक्षेत्रातील वाघांना वाचविण्याबाबत मात्र शासन यंत्रणा कमालीची उदासीन आहे. वाघ वाचवण्याच्या या चळवळीला लोकसहभाग व राजकीय इच्छाशक्तीची जोड मिळाली, तर जगण्यासाठी धडपड करणार्‍या केळीच्या बागेतील वाघाचे अस्तित्त्व टिकून राहणार आहे. या वाघांच्या संवर्धनासाठी प्रयत्न झाले पाहिजे, जळगाव वनविभागातील वढोदा वनक्षेत्रात सुरुवातीला वाघाचे अस्तित्त्व आढळून आले. तत्कालीन वनक्षेत्रपाल डी. आर. पाटील यांनी वाघाचे अस्तित्त्व सर्वप्रथम मान्य केले. त्यानंतर तत्कालीन जिल्हाधिकारी ज्ञानेश्वर

राजूरकर यांनी 29 जुलै 2011 मध्ये वढोदा वनक्षेत्राला भेट देवून वाघाचे अस्तित्त्व अधोरेखित केले होते. जळगाव जिल्ह्यात वाघ असल्याचे समोर आल्यानंतर महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन प्रधान वनसचिव यांनी वढोदा व डोलारखेडा वनक्षेत्राला भेट दिली होती. प्रधान वनसचिवांच्या पाहणीत वाघांच्या पाऊलखुणा आढळल्या होत्या. तेव्हा वढोदा व डोलारखेडा वनक्षेत्रात वाघांच्या अस्तित्त्वावर शिक्कामोर्तब झाले होते. सुरवातीला जळगाव जिल्ह्यात पूर्वीपासूनच अधिवास असलेले पट्टेदार वाघ नाहीच, असा दावा केला जायचा. परंतु, गेल्या काही वर्षांत वाघांच्या अस्तित्वाचे अनेक पुरावे समोर आलेच, शिवाय स्थानिकांना या दोन्ही वेगवेगळ्या वनक्षेत्रात अनेकदा वाघांचे दर्शनही झाले होत आहे.

जळगाव वनविभागांतर्गत मुक्ताईनगर तालुक्यातील वढोदा क्षेत्रात सद्य:स्थितीत सात-आठ वाघ आहेत. तर यावल अभयारण्यातही दोन वाघांच्या अस्तित्वाचे पुरावे मिळाले आहेत ही सत्यता नाकारता येणार नाही .

आमच्या सर्वांच्या प्रयत्नांतून व्याघ्र प्रकल्प घोषित झाला पण फक्त घोषित झाल्याने काही फरक पडला नाही त्या नंतर आवश्यक असलेला कॉरिडॉर आराखडा लाल फितीत अडकला हे दुर्दुव आहे .

प्रकल्प तर घोषित करायचा, पण वाघांच्या मुक्त संचाराला आवश्यक असलेल्या नैसर्गिक कॉरिडॉरबाबत मात्र अनास्था दाखवायची, अशी व्याघ्रसंवर्धन नीती सध्या सातपुड्याच्या जंगलात दिसून येत आहे.

खान्देशातील एक प्रमुख जिल्हा म्हणून ओळख असलेल्या जळगाव जिल्ह्याला समृद्ध वनसंपदा लाभली आहे. जिल्ह्याच्या 11.63 लाख हेक्टर भूभागापैकी अंदाजे 17 टक्के क्षेत्र वनांखाली आहे. वन्यजीव व दुर्मिळ वनस्पतींनी सातपुडा, यावल व जळगाव विभागातील वनक्षेत्रे बहरलेली आहेत वन्यजीव संरक्षण संस्थे तर्फे वेळोवेळी होणार्‍या संशोधनातून हे अधोरेखीत होत आहे .

संस्थेचे राहुल सोनवणे यांनी अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती, पक्षी, रवींद्र सोनवणे यांनी अनेक सरीसृप, कीटक, विंचू, पाली, जलचर, यांच्या महत्वपूर्ण नोंदी घेतल्या आहेत.

अनेक दुर्मिळ वन्यजीवांचा अधिवास असलेला जिल्ह्याच्या नैसर्गिक वैभवात भर घालणारा सातपुडा पर्वत हा नैसर्गिकरीत्या पश्चिम घाटाला जोडला गेला आहे. त्याला लागूनच जळगाव जिल्ह्यातील वढोदा मुक्ताईनगर वनक्षेत्र आहे.

वढोदा (मुक्ताईनगर) वनक्षेत्रात वाघाचे अस्तित्त्व आढळून आल्यानंतर सातपुडा बचाव समितीने या वनक्षेत्राचा व्याघ्र संवर्धन प्रकल्प करावा, अशी मागणी करत, त्याचा सविस्तर आराखडा वनविभागाकडे पाठविला.

2012 साली टायगर कॉन्झर्वेशन आणि रिसर्च सेंटर चे प्रमुख प्रसाद हिरे, पर्यावरण शाळेचे राजेंद्र नंनवरे, न्यू कॉन्झरवर चे अभय उजागरे, विनोद पाटील, वन्यजीव संस्थेचे सचिन ठाकूर, बाळकृष्ण देवरे , सतीश कांबळे, अलेक्झांडर प्रेसडी या शिष्ट मंडळाने तेव्हाच्या केंद्रीय वनमंत्री जयंती नटराजन यांना वस्तुस्थिती समजावून सांगितली प्रस्ताव दिला त्याचबरोबर वाघांसाठी सुरक्षित मार्ग हवा म्हणून मेळघाट अभयारण्य, अंबा बरूआ अभयारण्य, वढोदा रेंज, यावल अभयारण्य ते अनेर डॅम वनक्षेत्र असा टायगर कॉरिडॉरचा प्रस्तावही सादर केला. सरकारने या प्रकल्पाची ‘मुक्ताई-भवानी व्याघ्र संवर्धन प्रकल्प’ या नावाने गॅझेटमध्ये नोंद केली. पण, कॉरिडॉरच्या प्रस्तावाचे भिजत घोंगडेच राहिले. व्याघ्र संवर्धन प्रकल्पात महत्त्वाचा टप्पा नैसर्गिक कॉरिडॉर असून, तोच सुरक्षित नसेल तर वाघांचे संवर्धन होईल कसे, हा प्रश्न आहे.

वाघ हा कायम संचार करणारा प्राणी आहे. वढोदा येथे वाघांचे आणि वाघिणीचे अस्तित्व असल्याचे पुरावे मिळाले आहेत. मेळघाटातील वाघ तिकडे संख्या वाढल्यावर वर उल्लेख केलेल्या कॉरिडॉरद्वारे प्रजननासाठी वढोदा वनक्षेत्रात येणारच. अभ्यासकांच्या मते वाघ एकाच क्षेत्रात अधिक काळ राहिला आणि जवळच्या नात्यात प्रजनन झाले तर जनुकीय बदलांमुळे दुर्बल पिढी निर्माण होण्याचा धोका असतो. त्यामुळे वाघ स्थलांतर करताना दिसतात.

छावा एक-दीड वर्षांचा झाला की, तो आई व भावंडांपासून वेगळा होतो, स्वत:चे नवे क्षेत्र शोधतो. एका वाघाला 20 ते 40 चौरस किलोमीटर क्षेत्र लागते. अशा क्षेत्रासाठी तो कित्येक मैल प्रवास करतो. हा मार्ग अर्थातच जंगलातला असावा लागतो. त्यामुळे आहे ते नैसर्गिक मार्ग सुरक्षित करणे तसेच नवीन मार्ग तयार करणे आवश्यक आहे.

मेळघाट ते जळगाव जिल्ह्यातील अजिंठा ते अनेर डॅम वनक्षेत्रापर्यंतचा टायगर कॉरिडॉरचा प्रस्ताव तातडीने मंजूर करून त्यावर अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. याच जोडीला आता वढोदा, मुक्ताई नगर, बोदवड व जामनेर, अजिंठा मार्गे गौताळा अभयारण्य जोडण्यासाठी आणखी एका कॉरिडॉरची मागणी जिल्ह्यातील वन्यप्रेमींकडून होत आहे. जोपर्यंत वाघांच्या संचाराचे हे मार्ग सुरक्षित होत नाहीत, तोपर्यंत जिल्ह्यात व्याघ्र संवर्धन होणे अवघड आहे,

2 वर्षा पूर्वी 1 एप्रिल 2018 ला मुक्ताईनगर डोलारखेडा येथे व्याघ्र पंचायत परिषद पार पडली यात वन्यजीव संरक्षण संस्थेच्या गेल्या 8 वर्षापासूनच्या जनजागृती ने प्रेरित होऊन व्याघ्र प्रेमींच्या आग्रहास्तव डोलार खेडा गावातील 18 शेतकर्‍यांनी आपली 200 एकर जमीन इतर ठिकाणी जमीन किंवा आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात वाघांसाठी सोडण्यास तयार असल्याचे प्रतिज्ञापत्र देखील करून दिले

परिषदेतील शेतकर्‍यांच्या काही मागण्या होत्या त्यात ही प्रमुख मागणी होती की

डोलारखेड्यातील शेतकर्‍यांना त्यांच्या शेतीचा योग्य मोबदला देऊन त्यांची 200 एकर शेतजमीन वनक्षेत्राशी जोडावी

वरील मागण्यांचे निवेदन तत्कालीन वनमंत्री सुधीर मनगुंटीवार यांनादेखील दिले होते पण अद्याप पावेतो कारवाई शून्य सगळे प्रस्ताव लालफितीत अडकले आहेत.

जर सध्या तुटपुंज्या क्षेत्रफळाचे भाग संवर्धन राखीव होऊ शकतात तर यावल अभयारण्याला व्याघ्र प्रकल्पाचा दर्जा का दिला जाऊ नये जर उद्योगांसाठी काही निकष बाजूला ठेवता येतात तर वाघांच्या वाढी साठी निकष बदलवावे लागले का नको बदलायला .

प्रजननक्षम वाघांच्या संख्येसाठी किती क्षेत्र मानवविरहीत असावे याबाबत राष्ट्रीय व्याघ्र प्राधीकरणाचे काही निकष आहेत. त्यानुसार 800 ते 1000 चौरस किलोमीटर क्षेत्राची गरज असते. सहसा एवढे मोठे क्षेत्र मिळणे शक्य होत नाही. त्यामुळे निदान 150 ते 200 चौरस किलोमीटर क्षेत्रात अभयारण्य बनवणे आवश्यक होते असे तज्ज्ञांचे मत आहे .

1962 मध्ये वाघ होते या ऐकीव माहिती नंतर किमान 1992 पासून या परिसरात वेळोवेळी वाघ दिसले आहेत. यामुळेच दाट झाडी असलेल्या जळगाव वनक्षेत्रातील चारठाणा, डोलारखेडा, वढोदा हे वाघांचे संचारक्षेत्र राहिले आहे. जळगाव जिल्ह्यात वढोदा रेंज 14 हजार 246 हेक्टरात पसरलेले आहे.

या वनक्षेत्राच्या पश्चिमेला तापी नदी, दक्षिणेला पूर्णा नदी, उत्तरेला मध्य प्रदेशातील वनक्षेत्र येत असून, हे वनक्षेत्र मेळघाट व्याघ्र प्रकल्प आणि यावल अभयारण्य दरम्यानचा संचलन मार्ग आहे. यामुळे वढोदा वनक्षेत्र यावल अभयारण्याला जोडले गेल्यास एकत्रित असा व्याघ्रप्रकल्प होऊ शकतो. या साठी शासकीय आणि राजकीय इच्छाशक्ती हवी .

वाघांचा संचार हा 40 किलोमीटरपर्यंत असतो. मेळघाटमधील वाघ हे अंबाबरवा अभयारण्यामार्गे वढोदा रेंजमधून यावल अभयारण्यात येतात. पुढे अनेर अभयारण्य, तोरणमाळ, तळोदा राखीव जंगलामधून गुजरातच्या डांगपरिसरात फुलपानेश्वर अभयारण्यात जातात.

त्यामुळे मेळघाट ते फुलपानेश्वर मार्ग जोडला जाणे, तेथे दाट अरण्य होणे, संपूर्ण मार्ग वाघांसाठी सुरक्षित होणे गरजेचे आहे. जळगाव जिल्ह्यातील वढोदा रेंज अभयारण्यात येत नाही परंतु वढोदा रेंजमधील डोलारखेडा भाग हा अत्यंत सुरक्षित असल्याने येथे वाघिणीने वेळोवळी आपल्या बछड्यांना जन्म दिला आहे. यामुळे मेळघाट ते यावल अभयारण्य जोडल जाणे नैसर्गिक दृष्ट्या गरजेचे आहे,

समितीने ही बाब राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण, नवी दिल्ली यांना कळवली असता प्राधिकरणाने तात्काळ याची दखल घेत शासनाला सूचनाही केल्या होत्या. तरी राज्य शासनाच्या वनविभागाने आतापर्यंत याची गंभीर दखल घेतली नव्हती. अखेर जळगाव वनविभागाने याची दखल घेत वढोदा ते यावल अभयारण्य जोडणारा संचलन मार्ग व्हावा, असा प्रस्ताव पाठवला आहे.

तसेही जळगांव चे वाघ कोणत्याच निकषात बसत नाहीत ते अगदी प्रोसोपीस ( वेडी बाभूळ) मध्ये रमतात, कॅशिया टोरा, आणि दर्पतुळसमध्ये धावतात, बाभळीच्या शेंगा खाणार्‍या तृणभक्षी प्राण्यांवर उपजीविका करतात, गावाच्या हाळावर पाणी पिण्यास येतात, केळीच्या बागेत प्रजनन करतात तिथेच त्यांच्या पिढ्या वाढत आहेत, एक दुर्दैवी घटना वगळता गेल्या 40 वर्षात मानव व्याघ्र संघर्ष घडून आला नाही अवघ्या 15 ते 20 किलोमीटर च्या परिसरात नर , माद्या , पिले सर्वच गुण्या गोविंदाने नांदत आहेत ना मादीसाठी भांडण ना प्रदेश हक्का हद्दीचा वाद मानवाच्या इतक्या जवळ असून देखील नरभक्षक बनले नाहीत कारण त्यांनी स्वतःला परिस्थितीशी जुळवून घेतले आहे त्यांची खरी लढाई आहे ती सरकारी लालफितीसोबत स्वतःचे अस्तित्व टिकवून ठेवण्यासाठी त्यांना वन्यजीव प्रेमींच्या, गावकर्‍यांच्या आधाराची गरज आहे तो आधार त्यांना मिळतोय पण या वाघांच्या वाढीला त्यांच्या पुढच्या पिढीला रोखून धरण्या साठी लाल फितीचा पट्टा त्यांच्या आणि व्याघ्र संवर्धन क्षेत्राच्या गळ्यात अडकवला आहे तो राजकीय इच्छाशक्तीनेच काढता येईल नाहीतर आम्हा वन्यजीव प्रेमींचे प्रयत्न तोकडे ठरतील.

बाळकृष्ण देवरे

मो. 9028308365 (संस्थापक वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव.)

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com