सर्पदंश झालेल्यांनी मरायचे का ?

कोरोनाने धुमाकूळ घालण्याअगोदर देशात एड्स आजारा पाठोपाठ सर्वांत जास्त बळी सर्पदंशांचे होते तेच आता एड्सच्या आधी सर्पदंशाचे रुग्ण असले तर नवल वाटायला नको, अशी परिस्थिती आहे. सर्प हा वन्यजीव या व्याख्येत येतो म्हणजे वन्यजीव संरक्षण अधिनियमात सर्प समाविष्ट आहेत पण जसे इतर वन्यजीवांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडल्यावर शासकीय स्तरावरून नुकसानभरपाई मिळते तशी भरपाई सर्पदंशानंतर मिळत नाही, शेतकर्‍यांना काही प्रमाणात मिळते. पण त्याबाबत फारशी जनजागृती नसल्याने शेतकरी यापासून वंचितच आहे. भरपाई मिळवून देण्यासाठी थोडेफार प्रयत्न सर्पमित्रांमार्फत केले जातात तेव्हढेच एरवी सर्पदंश झालेला व्यक्ती दोन्ही बाजूने मरतच असतो.
सर्पदंश झालेल्यांनी मरायचे का ?

कोरोनामुळे जवळजवळ सर्वच जिल्ह्यात प्रमुख रुग्णालये, शासकीय महाविद्यालये, कोविड रुग्णालय म्हणून अधिग्रहित केल्याने सर्पदंश झालेल्या रुग्णांना फरपट करावी लागत आहे. योग्यवेळी उपचार न मिळाल्याने असंख्य रुग्णांना आपल्या प्राणास मुकावे लागले असून अनेक लोकांना खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार करून आर्थिक झळ सोसावी लागली आहे. सर्पदंश आणि उपचार या विषयावर मी महाराष्ट्र सर्पमित्र या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप वर सदर विषयावर चर्चा केली असता, काही प्रमाणात हे वास्तव समोर आले आहे.

वन्यजीव संरक्षण संस्थेच्या सर्पदंश नियोजन कार्यक्रम अंतर्गत केलेल्या पाहणीत फक्त 2 रुग्णालयांतच जिल्ह्यातील 4 रुग्ण मृत्युमुखी पडले आहेत. नुकताच संस्थेचा सर्पमित्र योग्य वेळी उपचार मिळाल्याने वाचला तर त्याच वेळी भुसावळ तालुक्यात घोणस सापाचा दंश झालेला तरुण केवळ हॉस्पिटल शोधण्यात वेळ गेल्याने 2 तासांनी रुग्णालयात दाखल झाला आणि दगावला.

जळगाव जिल्ह्यात याच महिन्यात संस्थेस माहीत असलेल्या 4 केस फक्त 15 दिवसांत दगावल्या आहेत. या घटनांची दखल घेऊन आता तरी योग्य पावले उचचली गेली पाहिजे, नाहीतर सर्पदंशाने मृत्यू होण्याचे प्रमाण प्रचंड वाढणार आहे .

मागे एक बातमी वाचनात आली सर्पदंशावर मोफत उपचार मिळणार नाहीत वाचून आश्चर्य वाटलं.

सर्पदंशाचे सर्वाधिक प्रमाण शेतकरी आणि मजूर वर्गात आहे, अशा लोकांना जर मोफत उपचारासाठी जागाच नसली तर हे श्रमजीवी खासगी हॉस्पिटलमध्ये भरण्यासाठी लाख ते दहा लाख कुठून आणणार.

एकीकडे सरकार एड्सवर उपाययोजन करते. मोफत उपचार देतात. मात्र, सर्पदंश झाल्यानंतर आता मेडिको लिगल केस असल्याची नोंद केली जात नाही. यामुळे मोफत उपचाराची असलेली सोय संपली असून सर्पदंशानंतर शेतकर्‍याला मृत्यूच्या खाईत शासनच ढकलत असल्याचा प्रकार पुढे आला आहे. सदर माहिती 2 वर्षांपूर्वी वाचनात आल्यावर सरकार नेमकं काय करतंय, तेच समजत नव्हतं. मग एकदा नागपूरमधील अशीच एक घटना माहीत पडली

मेडिकल हॉस्पिटलमध्ये एका गरीब रुग्णांला सर्पदंशावरील उपचारासाठी आणले. कार्ड काढल्यानंतर त्यावर मेडिको लिगल केस (एमएलसी) अशी नोंद केली. मात्र, लगेच लिपिकाने डॉक्टरच्या सल्ल्याने ती खोडून प्रतिबंधक लस खरेदी खरेदी करण्याच्या सूचना दिल्या. पैसे नसल्याने अखेर त्या रुग्णाच्या नातेवाईकाला आजूबाजूच्या लोकांनी वर्गणी करून दिले. यामुळे हा प्रकार पुढे आला. आताच 8 दिवसांपूर्वी नशिराबाद जवळील एका नामांकित मेडिकल कॉलेजमध्ये एक मण्यार सापाचा दंश झालेली महिला उपचारासाठी दाखल झाली. व्हेंटिलेटर उपलब्ध नाही म्हणून खासगीत घेऊन जा असा सल्ला दिला गेला. महिलेचा पती गरीब शेतमजूर, घरची परिस्थिती अतिशय बिकट तरीही दुसर्‍या हॉस्पिटलमध्ये नेण्यासाठीअ‍ॅम्ब्युलन्स शोधण्यास गेला, तीदेखील मिळाली नाही. शेवटी त्याच हॉस्पिटलमध्ये 30 मिनिटांच्या विलंबाने उपचार सुरू झाले, पण महिला दगावली. तिच्या पतीचे अवसान गळाले. कोरोनाचा व्याप नसता तर महिला वाचली असती, असाच एक रुग्ण जळगांव जिल्हा रुग्णालय, प्रसिद्ध मेडिकल कॉलेज अशा चकरा मारत गेटवरच नकारघंटा खात खात शेवटी तिथल्याच डॉक्टरांच्या सल्ल्याने जळगाव शहरातील मोठ्या खासगी हॉस्पिटलला ऍडमिट झाला. त्याला मण्यारचा दंश झाला होता. फिरून फिरून पेशन्ट बेशुद्ध झाला. आता त्याच्यावर उपचार सुरू आहेत. शेवटी शेती किंवा घर विकून हॉस्पिटलची फी भरावी लागली, तरी जीव वाचण महत्वाचं अस म्हणत त्याच्या परिवाराने अश्रूंना वाट मोकळी करून दिली.

सरकारकडून असे आदेश येतातच कसे? हे विशेष वाटते. कारण सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना गावखेड्यात घडत असून शेतकर्‍यांची संख्या मोठी आहे. यामुळे आता साप चावल्यावर शेतकर्‍यांवर होणार्‍या मोफत उपचारावरही वरवंटा फिरवला गेल्यामुळे सर्पदंशामुळे शेतकरी मोफत उपचाराअभावी मृत्यूच्या दाढेत सापडणार आहे. राज्याच्या दुर्गम आदिवासी तसेच ग्रामीण भागात सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडतात. प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रांमध्ये सुविधांचा अभाव आहे. यामुळे मृत्यूच्या सर्वाधिक घटनांची नोंददेखील ग्रामीण भागातच होतात. पावसाळा सुरू असल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे, त्यामुळे सर्वच गावांमध्ये प्रामुख्याने सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यातच सर्पदंशावरील उपचाराकरिता तांत्रिक, मांत्रिकांकडे जाण्याची प्रवृत्ती आहे. यामुळेही सर्पदंशामुळे होणार्‍या मृत्यूचा आकडा वाढतो. देशात सर्वाधिक सर्पदंशाच्या घटना नेहमीच महाराष्ट्रात घडल्या आहेत. 2018-2019मध्ये महाराष्ट्रात 42 हजार 26 जणांना सर्पदंश झाला असून त्याखालोखाल पश्चिम बंगालमध्ये 36 हजार 858 घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात नाशिकमध्ये सर्पदंशाच्या सर्वाधिक घटना घडल्या असल्याचंही एका अहवालात नमूद करण्यात आलं आहे. एल्सेव्हिएर जर्नलमध्ये हा अहवाल छापून आला आहे.

जगातील सर्पदंशांच्या घटनांपैकी अर्ध्या घटना एकट्या भारतात घडत आहे. तसेच सर्पदंशाने दगावणार्‍यांची संख्याही भारतात सर्वाधिक असल्याचं या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. 2017-2018च्या अहवालानुसार महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे 32 लोकांना साप चावल्याचं उघड झालं आहे. तर पश्चिम बंगालमध्ये 36, तामिळनाडूत 36 आणि गोव्यात 34 लोकांना साप चावल्याचं आढळून आलं आहे. तर 2018-2019मध्ये महाराष्ट्रात एक लाख लोकसंख्येमागे 35 आणि पश्चिम बंगालमध्ये 39 लोकांना साप चावल्याच्या घटना घडल्या आहेत. मात्र, सर्पदंशामुळे दगावण्याचं महाराष्ट्रातील प्रमाण इतर राज्यांच्या तुलनेत कमी असल्याचंही या अहवालात म्हटलं आहे. गेल्या दोन वर्षात महाराष्ट्रातील 14 जिल्ह्यातील सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ झाली असून पश्चिम बंगालच्या 12 जिल्ह्यात सर्पदंशाच्या घटना घडल्याचं आढळून आलं आहे. 2018-19मध्ये नाशिकमध्ये सर्पदंशाच्या 4294 घटना घडल्या आहेत. पालघरमध्ये 3204, ठाण्यात 2655, कोल्हापूर 2298, पुणे 2102, रत्नागिरी 1994 आणि जळगावमध्ये सर्पदंशाच्या 1842 घटना घडल्या आहेत

ही आकडेवारी या पेक्षा जास्त आहे. अनेक दुर्गम भागातील रुग्ण उपचाचार न करताच दगावतात त्यांची आकडेवारी कशी घेणार, हादेखील महत्वाचा मुद्दा आहे.

देशात सर्वात जास्त सर्पदंशाच्या घटना महाराष्ट्रात घडतात. 2017 मध्ये देशात 1 लाख 61 हजार 487 सर्पदंशाच्या घटना उघडकीस आल्या आहेत. यातील 36 हजार साठ सर्पदंश महाराष्ट्रातील आहेत.

रेफर टू मेडिकल कॉलेज सर्पदंशानंतर ग्रामीण रुग्णालयापासून तर प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल कॉलेज) तत्काळ रेफर करण्यात येते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये सर्पदंशाच्या रुग्णाची नोंद मेडिको लिगल केसअंतर्गत नोंदविली जात होती. यामुळे सर्पदंशावर प्रतिबंधक लस मोफत दिली जात होती. परंतु, आता मेडिको लिगल केसअंतर्गत सर्पदंश झालेल्या रुग्णांची नोंद करण्यास मेडिकल प्रशासनाकडून नकार दिला जातो. यामुळे आता सर्पदंशावर उपचारासाठी प्रतिबंधक लस खरेदीसाठी पैसे मोजावे लागतात. शेतकरी कफल्लक यामुळे प्रतिबंधक लस खरेदी करणे हे त्याच्या आवाक्यात नाही. यामुळे गरीब शेतकरी आता सर्पदंशावरील उपचारापासून वंचित राहून मृत्यूच्या दारात पोहोचणार, हे मात्र नक्की.

दोन विभागात विरोधाभास सार्वजनिक आरोग्य विभागात जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयापासून तर प्राथमिक आरोग्य केंद्रात साप चावल्यांतर आवश्यक प्रतिबंधक लस प्रत्येकालाच मोफत टोचली जाते, परंतु वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाशी संलग्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) एमएलसी नोंद बंद करण्यात आल्याने मोफत लस टोचण्यात येत नसल्याचे वास्तव पुढे आले. सर्पदंशाच्या घटना बघितल्या असता डोकं सुन्न होत अर्थात खरे आकडे अजून जास्त आहेत.

वर्ष संख्या

2014-15 38 हजार 514

2015-16 39 हजार 103

2016-17 36 हजार 60

2017-18 34 हजार 900

2018- 19 42 हजार 026

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयाकडून मिळत असलेली वागणूक बघता 2020 --21 मध्ये हे प्रमाण नक्कीच 50, 55 हजारांच्या पुढे जाणार हे नक्की सर्पदंश झालेल्यांनी मरायचं का? हा प्रश्न नेहमी पडतो. नेहमीच सर्प आणि सर्पदंश हा भीती आणि मृत्यूचा विषय बनून राहिला आहे. महाराष्ट्रात दरवर्षी लाखो लोकांना सर्पदंश होतात. विषारी सर्पदंशाने हजारो नागरिक मृत्युमुखी पडतात. याला प्रमुख कारणे म्हणजे सर्पांबद्दल असलेली भीती, अज्ञान आणि वेळेत मिळत नसलेले वैद्यकीय उपचार. जळगाव शहरातील वन्यजीव संरक्षण संस्था गेल्या 3 वर्षांपासून सर्पदंश नियोजन कार्यक्रम राबवित आहे यात दोन टप्प्यात हा कार्यक्रम राबविला जात असून एक म्हणजे जनजागृती आणि दुसरा वैद्यकीय सुविधा तपासणे हा आहे.

जनजागृतीसाठी संस्थेची टीम नेहमी ग्रामीण भागात शाळा, ग्रामपंचायत आणि प्रमुख्याने शेताच्या बांधावर जाऊन नेमकी विषारी सर्पांची ओळख, प्रथमोपचार आणि त्या भागात तत्काळ वैद्यकीय उपचार कसे उपलब्ध होतात, त्याच्या नोंदी घेऊन त्याप्रकारे जनजागृती केली जाते. आमच्या अभ्यासानुसार सर्पदंश प्रामुख्याने जून ते जानेवारी या महिन्यांत सर्वाधिक होतात आणि सर्वात जास्त सर्पदंश 85 % हे शेतकरी आणि शेतमजुरांना होतात इतर नागरिकांना म्हणजे शहरात सर्पदंश होण्याचे प्रमाण हे अंदाजे 15 % आहे तर ग्रामीण भागात हे प्रमाण सुमारे 85% आढळून येते. कोणत्याही शहरात वैद्यकीय सुविधा सुसज्ज असतात तर तालुका स्तरावर त्या साधारण असतात. परंतु ज्या भागात सर्पदंश सर्वाधिक होतात त्या गावात, खेड्यात, पाड्यांवर सर्पदंशावर होणारी वैद्यकीय सुविधा ही अतिशय प्राथमिक स्तरावर असते.

सर्पदंश झाला तर त्या रुग्णाला वाचवण्यासाठी 3 सूत्र आवश्यक ठरतात पहिल सूत्र स्वतःसाठी 1) प्रथमोपचार 2) स्वतःवर आत्मविश्वास की, मी वाचणारच; मला लवकरात लवकर वैद्यकीय उपचार मिळतीलच. दुसरं सूत्र

सोबत असलेल्या सहयोगीसाठी ज्याला सर्पदंश झालेला आहे, त्याला धीर देत प्रथमोपचार करत लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये दाखल करणे. तिसरे सूत्र आहे वैद्यकीय प्रतिनिधींच आपल्याकडे आलेला पेशन्ट सर्पदंश झालेला आहे त्याला लवकरात लवकर योग्य उपचार दिलेच गेले पाहिजे.

ही मानसिकता प्रत्येक डॉकटर्सची असतेच, पण आता योग्य उपचार करण्यासाठी सक्षम यंत्रणा हवी त्यात झालेला सर्पदंश हा विषारी आहे की, बिनविषारी याची ओळख करता आली पाहिजे

रुग्णास जाणवत असलेली लक्षणे महत्वाची ठरतात. यासाठी उपस्थित वैद्यकीय प्रतिनिधींना लक्षणांची माहिती असणे गरजेचे आहे. त्यानंतर झालेला दंश हा विषारी आहे की, बिनविषारी जर विषारी असला तर ड्राय बाईट आहे का ?

बाळकृष्ण देवरे,(वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव)

मो. 9028308365

Related Stories

No stories found.