उत्तरार्ध - सर्पदंश झालेल्यांनी मरायचे का?

उत्तरार्ध - सर्पदंश झालेल्यांनी मरायचे का?

सापाने चावा घेतल्यावर शरीरात विष टोचले आहे का ? टोचले आहे तर किती प्रमाणात टोचले आहे ? वरील निदान करण्यासाठी दंश केव्हा झाला रुग्ण केव्हा पोहोचला ही माहिती महत्वाची ठरते. सर्प दंशानंतर रक्ताचे नमुने घेतले जातात आणि त्यातून टेस्ट करून सर्पदंश कोणता ते ठरवले जाते. या सर्व प्रक्रियेनंतर रुग्णाला नेमके उपचार कसे द्यायचे आहेत, त्यावर निर्णय होतो. विषारी सर्पदंश झाल्यानंतर रुग्णाच्या परिस्थितीनुसार आणि डॉकटर्सच्या कौशल्यावर रुग्णाचा जीव वाचवला जातो. यात काही तांत्रिक बाजू अतिशय म्हत्त्वाच्या ठरतात. त्यात व्हेंटिलेटर महत्वाची भूमिका बजावते आणि नेमके जिल्हा रुग्णालय आणि मोठे खासगी हॉस्पिटल वगळता ही सुविधा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात उपलब्ध नसते. ही खरी शोकांतिका आहे. (पण भविष्यात कोरोनाच्या मेहरबानीने सहसा सर्वच तालुका स्तरावर व्हेंटिलेटर सुविधा उपलब्ध राहणार आहे )

आमच्या अभ्यासात असेही लक्षात आले की, ग्रामीण भागातून सर्पदंश झालेले सर्वच रुग्ण जिल्हा रुग्णालयात पाठवले जातात किंवा खासगी हॉस्पिटलमध्ये जाण्याचा सल्ला दिला जातो. प्रत्येकवेळी डॉक्टर्सला दोष दिला जातो, ते पण योग्य नाही. कारण मण्यार आणि कोब्रासारखे विषारी सर्पदंश झाल्यानंतर त्याला व्हेंटिलेटर लागणार, याची श्यक्यता जास्त असते. व्हेंटिलेटर हे एक प्रमुख कारण असले तरी दुसरी छुपी बाजूदेखील आहे. जेव्हा सर्पदंश होतो, तेव्हा साधारण 10 ते 15 मिनिटे धडधाकट व्यक्ती असली तर 30 मिनिटांपर्यंत कोणतीच अंतर्गत लक्षणे जाणवत नाहीत. जसे चक्कर, अंधारी येणे, बोबडी वळणे तोंड कोरडे पडणे, श्वास घेण्यास त्रास होणे, पोटात दुखणे वगैरे. पण बाह्य लक्षणे तत्काळ दिसतात, जसे सूज, जळजळ, दंश झालेली जागा काळी-निळी पडणे ( अनेकवेळा दिवड, धामण, अजगरसारखे बिनविषारी सर्प चावल्यावर थोडी सूज येते) मग अशी व्यक्ती मांत्रिक , भोंदू बाबांकडून उपचार करतात. त्या रुग्णाला मारुतीच्या पारावर झोपवले जाते इतर अघोरी उपचार करून अत्यवस्थ झाल्यावर डॉक्टरकडे नेले जाते. अशा परिस्थितीत जर रुग्ण दगावला तर जमाव हिंसक बनून गावातल्या डॉक्टर आणि हॉस्पिटलला हानी पोचवू शकतो. अशा घटना घडलेल्या आहेत. म्हणून मग सर्वच सर्पदंश झालेल्या रुग्णांना तात्पुरता इलाज करून तालुका किंवा जिल्हास्तरावर पाठवले जाते. वरील प्रक्रियेत बराच वेळ जातो. धावपळीत रुग्णाची मानसिक स्थिती ढासळते. एका मागून एक लक्षणे दिसायला लागतात.

बर्‍याच वेळा योग्य वेळेत उपचार मिळाला नाही तर रुग्ण कोमात जातो आणि प्रसंगी मृत्यू पावतो. अनेक लोक विचारतात की, सर्पदंश झाल्यावर तुम्ही म्हणतात, योग्य वेळेत हॉस्पिटलमध्ये पोचले पाहिजे. ती योग्य वेळ काय? तर यावर उत्तर आहे की, दंश झालेली व्यक्ती न घाबरता प्राथमिक प्रथमोपचार करून जसे चावलेला साप जर नाग किंवा मण्यार असेल तर आवळपट्टी बांधून तत्काळ उपचारासाठी निघावे. वाहनात असताना दंश झालेली जागा पाण्याने स्वच्छ करत दंश झाल्यापासून तासाभराच्या आत योग्य हॉस्पिटलला पोहोचणे. याला आम्ही गोल्डन हवर म्हणतो आणि या वेळेच्या आत विषारी सर्पदंश झालेल्या रुग्णास तत्काळ योग्य उपचार मिळाले तर 80 % पेक्षा जास्त रुग्ण वाचल्याच्या नोंदी आहेत. अनेकदा ग्रामीण भागातील डॉक्टरांना सर्पदंश बाबतची माहिती नसल्यानेही उपचारांमध्ये वेळ दवडला जात असल्याची माहिती आरोग्य यंत्रणेकडून दिली जाते. यापूर्वी सर्पदंश झाल्यानंतर त्याचा शरीरावर होणारा परिणाम पाहण्यात वेळ दवडला जात होता. मात्र, यामध्ये साप विषारी असल्यास त्याचे विष मोठ्या प्रमाणावर भिनले जात होते. सध्या मात्र नव्या उपचार पद्धतीप्रमाणे सर्पदंश झाला असता तातडीने उपचार सुरू करण्यात येतात. तसेच त्यासह शरीरावर होणारा परिणाम लक्षात घेत त्यासाठी स्वतंत्र औषधे दिली जातात. ही नवी प्रक्रिया डॉक्टरांना समजवण्यासाठी प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन केले जात नाही.

ज्याची प्रतिकारशक्ती कमकुवत आहे, ज्यांना प्रतिसर्पविषाची ऍलर्जी आहे, अशा काही रुग्णांना धोका जास्त असतो. अर्थात गोल्डन हवरला पण अपवाद झाल्याची उदाहरणे आहेत. काही रुग्ण दंश झाल्यानंतर 20 मिनिटांतदेखील दगावली आहेत. तरी हे अपवाद वगळता योग्य वेळेत पोहोचलेला रुग्ण योग्यवेळी योग्य उपचार घेऊन खात्रीशीर बरा होतो. याला उदाहरण द्यायचे झाल्यास वन्यजीव संरक्षण संस्थेचे सर्पमित्र रवींद्र भोई यांना नुकताच कोब्रा बाईट झाला. ते 55 मिनिटांत हॉस्पिटलमध्ये दाखल झाले योग्य उपचार मिळाले आणि ते धोक्याबाहेर आले असे अनेक उदाहरणे आहेत.

वरील सर्व घटना बघता एकच विचार येतो आता सर्पदंश झालेल्यांनी मरायचं का? तर याच उत्तर आहे नाही; मुळीच नाही. जर ग्रामीण भागातील प्रत्येक डॉक्टरने काही गोष्टी आत्मसात केल्या तर सर्पदंशाने होणारे मृत्यूचे प्रमाण नक्कीच टाळता येणार आहे. मागे काही मुद्दे वाचनात आले. बहुतेक प्रसिद्ध सर्पदंश उपचारतज्ज्ञ डॉ. हिंमत बावस्कर यांनी मांडला असावा, तो खालीलप्रमाणे

1) वैद्यकीय उपचार चावलेला साप विषारी की, बिनविषारी आहे हे माहीत नसल्यास सर्पविषाच्या लक्षणांची व चिन्हांची सुरुवात दिसत असेल तरच उपचार करा. साप विषारी आहे अशी खात्री किंवा पुरेसा संशय असल्यास उपचार सुरू करावेत, हे चांगले. एएसव्ही (सर्पउतारा) नाग-मण्यार व घोणस-फुरसे यांचे विष वेगवेगळे असते. पण या सर्व विषांना निकामी करणारा उतारा एकत्र केलेल्या स्वरूपात मिळतो. हे इंजेक्शन घोड्याच्या शरीरात सर्पविषे टोचून रक्तामध्ये जी प्रतिघटके तयार होतात, त्या रक्तापासून बनवलेली असतात व ही सर्व प्रथिने असतात. हा पदार्थ कोरडया स्वरूपात मिळतो आणि त्याला ठेवायला फ्रीजची गरज लागत नाही. शुध्द पाणी ठरावीक प्रमाणात मिसळून हे इंजेक्शन तयार करता येते. या इंजेक्शनला ‘एँटी-स्नेक’ व्हेनमम (म्हणजे सर्पविषाविरुध्दचा उतारा) असे म्हणतात. या औषधाने रक्तातल्या सर्पविषाचे सूक्ष्म कण नष्ट केले जातात.

भारतातील सर्व प्रमुख जातींच्या विषारी सापांचे विष वापरून हे तयार केलेले असल्याने कोठल्याही सर्पविषावर हे गुणकारी आहे. पण सर्पविष आधीच शरीरातील निरनिराळ्या अवयवांत भिनलेले असेल तर मात्र याचा उपयोग होत नाही. विषाचे अवयवावर जे दुष्परिणाम आधीच सुरू झालेले असतात, ते तसेच राहतात. म्हणूनच सर्पविषावरचा उतारा लवकरात लवकर दिला गेला पाहिजे. याची सहसा तीन इंजेक्शने पुरतात. पण कधीकधी जास्त इंजेक्शने द्यावी लागतात. हे इंजेक्शन शिरेतून किंवा सलाईनमधून देतात.

सर्पविष उतार्‍याला पेनिसिलीनप्रमाणे रिअ‍ॅक्शन (प्रतिक्रिया) येऊ शकते. अंगावर लाल गांध उठणे, चक्कर येणे, रक्तदाब अचानक कमी होणे, जुलाब होणे, इत्यादी परिणाम शंभरात एखाद्या बाबतीत घडू शकतात. पण हा ‘रिअ‍ॅक्शन’चा धोका सर्पविषाच्या धोक्याशी तुलना करता परवडण्यासारखा आहे व त्यावर उपचारही करता येतात. (ऍड्रेनॅलिनचे एक इंजेक्शन स्नायूमध्ये )

2) नाग व मण्यार यांच्या बाबतीत विशेष उपाय नाग, मण्यार यांच्या विषांमुळे श्वसनक्रिया, विशेषतः चेतासंस्थेचे कामकाज बंद पडते हे आपण पाहिले आहे. एकदा ही क्रिया सुरू झाली तर, नुसत्या सर्पविष उतार्‍याने थांबवता येत नाही. यासाठी ऍट्रोपीन + निओस्टिग्मीन ही दोन इंजेक्शने शिरेतून दर अर्ध्या तासाने द्यावी लागतात. यातले निओस्टिग्मीन श्वसन व इतर क्रिया चालू ठेवण्यास मदत करते. एकदा हे इंजेक्शन दिले की अर्धा तास जीवदान मिळते. तेवढया वेळात अगदी अत्यवस्थ रुग्णही आपण रुग्णालयात पोहोचवू शकतो. पापण्या जडावण्याची चिन्हे दिसल्या-दिसल्या हे इंजेक्शन दिले गेले पाहिजे. या चिन्हावर लक्ष असावे म्हणून रुग्णास झोपू देऊ नये. कारण रुग्ण झोपल्यास पापण्या जडावण्याची काहीही सूचना मिळणार नाही. उलट रुग्णास बोलते ठेवून पापण्यांकडे लक्ष ठेवले पाहिजे.

3) श्वसन संस्थेवर काय परिणाम होत आहे, हे जोखण्यासाठी एका दमात रुग्णास जेवढे आकडे मोजता येतील तेवढे मोजायला लावावेत. पूर्वीपेक्षा आकडा मोजणे कमी पडत असेल तर श्वसनक्रियेवर दुष्परिणाम होत आहे, असे म्हणता येईल. निओस्टिग्मीन या इंजेक्शनामुळे नाग किंवा मण्यार दंशाच्या उपचारात फार सुधारणा झाली आहे. यामुळे रुग्ण वाचण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे.

4) रक्तस्रावावर उपाय - रक्त भरणे फुरसे, घोणस यांचे विष रक्तस्राव घडवून आणते, हे आपण पाहिले आहे. आधीच खूप रक्तस्राव झाला असल्यास रक्त द्यावे लागते. हे उपचार सुसज्ज रुग्णालयातच होऊ शकतील.

फुरसे, घोणस यांच्या दंशाच्या जागी खूप सूज येते व जखम चिघळते. कधीकधी संबंधित भाग सडून काळा पडतो. हा सगळा सर्पविषाचा परिणाम असतो. वेळीच उपचार झाले तर हे काहीअंशी टाळता येते. पण जखम नंतर जंतुदोषामुळे जास्त चिघळते. यावर व्यवस्थित मलमपट्टी, जंतुविरोधी औषधे देऊन उपचार करावे लागतात. सर्पदंशाचा उपचार हा खूप जोखमीचा असतो. चावलेला सर्प विषारी आहे आणि शरीरात त्याच्या विषारीपणाची खात्री झाल्याझाल्या ताबडतोब चांगले उपचार सुरू झाले तर जीव वाचण्याची शक्यता जास्त असते. यात जेवढा उशीर होईल, तेवढे नुकसान अधिक. गावपातळीवर आपण काय आणि किती करू शकू, हे रुग्णालयातल्या पुढच्या उपचारांइतकेच महत्त्वाचे आहे. चांगले उपचार झाले तर विषारी दंश झालेल्यांपैकी 70-80 टक्के व्यक्ती वाचू शकतात, हे निश्चित. मग आपणच ठरवा सर्पदंश झालेल्यांनी मरायचं का ?

बाळकृष्ण देवरे,मो. 9028308365 (वन्यजीव संरक्षण संस्था, जळगाव)

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com